Home व्यक्ती अविनाश दुसाने – शब्द कमी कार्य मोठे!

अविनाश दुसाने – शब्द कमी कार्य मोठे!

0
carasole

चंद्राचे चांदणे शीतल व आल्हाददायक असते. त्याला तेज असते पण त्याने डोळे दीपून जात नाहीत. तसे विंचूरचे अविनाश दुसाने. अगदी शांत, साधे व मितभाषी. त्यांना ते विशेष, वेगळे, दखल घेण्याजोगे काही करतात ह्याची दखल आहे असेदेखील त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कसलाही अभिनिवेश नाही. असे ऋजू, निगर्वी व संयत व्यक्तिमत्त्व.

अविनाश दुसाने नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावाचे रहिवासी. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते दहावीला उत्तर महाराष्ट्रात ‘मराठी’मध्ये पहिले आले होते. दहावीला ८६ टक्के मार्क होते. पण त्यांनी त्यांना व्यापाराची व समाजकार्याची आवड असल्याने शिक्षण सोडले आणि ते पिढीजात चालत आलेल्या सराफ व्यवसायात लक्ष देऊ लागले. ते एक मंगल कार्यालयही चालवतात. ते अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त, स्वच्छ व वाजवी दरात उपलब्ध होते, ही त्याची प्रसिद्धी. अविनाश लोकांना रोजगार मिळावा म्हणून कार्यालय चालवतात असे लोक सांगतात.

अविनाश यांना सामाजिक कामाचे वेडच आहे. त्यांनी समविचारी मित्रांनी एकत्र घेऊन ‘स्वातंत्र्य वीर सावरकर मित्र मंडळ’ १९९३ मध्ये स्थापन केले. रक्तदान शिबिरे घेणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे अशी कामे मंडळामार्फत केली. त्यांनी सहकारी पतसंस्था २००२ मध्ये स्थापन केली. पतसंस्था नावारूपाला आली आहे. पतसंस्थेकडे सहा कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. पतसंस्थेने लेखापडताळणीत सातत्याने ‘अ’ वर्ग कायम राखला आहे. अविनाश दुसाने यांनी त्यांच्या छोट्या गावात इंग्रजी माध्यमाची सोय व्हावी म्हणून ‘सरस्वती एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली आहे. संस्थेची इंग्रजीबरोबर मराठी माध्यमाची देखील शाळा आहे. तिची पटसंख्या साडेतीनशे आहे. दुसाने यांनी आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या दिवसकार्यात गाव जेवण देण्याऐवजी आजोबांच्या स्मृती प्रीत्यर्थ गावाला रुग्णवाहिका घेऊन दिली. तीवर स्वखर्चाने वाहन चालक ठेवला आहे.

त्यांनी आजीच्या स्मृती जतन करण्याकरता वाचनालय सुरू केले आहे.

अविनाश दुसाने यांचा स्वच्छतेवर विशेष भर आहे. ते दीड वर्षें विंचूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी होते. त्यांनी ग्रामस्वच्छतेची अनेक कामे केली. भुयारी गटारे बांधली; गावातील सत्तर गटारे भुयारी आहेत. स्मशानभूमीचे सुशोभीकरण केले. स्वच्छतेसाठी जनजागृती केली. माध्यमिक शाळेत स्वच्छता अभियान राबवले. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेतल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेमागे उकिरडा होता. तेथे  कोणतेही शासकीय अनुदान न घेता लोकवर्गणीतून सार्वजनिक उद्यान तयार केले.

त्यांनी सरपंचपदावर असताना रस्त्यांच्या कडांनी एक हजार झाडे लावली. त्यांनी सरपंचपद सोडल्यावर झाडांना पाणी देऊन ती झाडे स्वत: खर्च करून जगवली.

त्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात एक रूपयाचा सुद्धा अपहार होऊ दिला नाही. उलट, त्यांनी त्यांना स्वत:ला मिळणाऱ्या दरमहा एक हजार मानधनातून कचरापेट्या घेऊन त्या सार्वजनिक ठिकाणी ठेवल्या. ते स्वत: आर्थिक भार सोसून सार्वजनिक कामे करत असतात. त्यांनी ग्रामस्वछतेचा ध्यासच घेतला आहे.

ते गावातील व्याख्यानमालेसारख्या अनेक सार्वजनिक उपक्रमांत सक्रिय सहभाग देतात. त्यांचे काम निरपेक्ष भावनेने चालू असते.

भल्याची दुनिया उरली नाही अशी वाक्ये अविनाश दुसाने यांच्यासारखी माणसे खोटी  ठरवत असतात!

– अनुराधा काळे

About Post Author

Exit mobile version