अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्राईस टॅग असतोच!

0
24

प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्नावर सार्वमत घ्यावे असे म्हणून देशात खळबळ  उडवून दिली आहे.

श्रीराम सेनेनेही आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरून भूषण यांना मारहाण केली, ते जामिनावरही सुटले!

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा नैसर्गिक आविष्कार आहे आणि त्यानंतर होणारे परिणाम हे त्याचेच उपांग आहे.

चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी अभिव्यक्ती  स्वातंत्र्य वापरले आणि अनेक हिंदू संघटनांनी त्यांच्यावर खटले भरले. ते कोर्टांनी दाखल करून घेतले. याचा अर्थ हुसेन यांच्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होऊ शकतो हे कोर्टाने मान्य केले. त्यामुळे हुसेन यांना आपल्या स्वतःच्या देशात मरणही मिळू शकले नाही! कारण ते या कोर्टकचेर्‍यांना कंटाळून गेले. थोडक्यात, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किमत त्यांना मोजावी लागली. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ त्यानी स्वतः आणली. ‘नथुराम गोडसे’ या नाटकालाही त्याच्या निर्माते–दिग्दर्शक मंडळींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागत आहेच.

एकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जेव्हा दुसर्‍याच्या  अस्मितेचा अपमान करणारे ठरते  तेव्हा ही परिस्थिती उद्भवणारच! अभिव्यक्ती ही जेव्हा सार्वजनिक व्यासपीठावर येते तेव्हा हे प्रश्न जटिल होतात, लोकशाहीचा हा एक वेगळा शाप आपल्या सगळ्या नैसर्गिक हुंकाराला आहे हे आपण मान्य केले पाहिजे. येशू खिस्तापासून, गॅलिलिओपर्यंत आणि कुमार केतकरांपासून ते कुमार सप्तर्षींपर्यंत प्रत्येकाने हे स्वातंत्र्य उपभोगले; त्यापासून त्यांना कोणी अडवले नाही. हा त्यांना मिळालेला सर्वात मोठा आत्मिक आनंद नाही का?  त्यानंतर जे झाले ती त्यांनी त्याची मोजलेली किंमत असे नाही का म्हणता येणार?

यावर काथ्याकूट करण्यापेक्षा आपण हा आनंद असाच उपभोगत राहू या!

शुभा परांजपे
shubhaparanjpe@gmail.com

About Post Author