लेखक-अनुवादक उमा कुळकर्णी यांची मुलाखत तेजश्री कांबळे यांनी पुणे आकाशवाणीवर घेतली. कन्नड-मराठी साहित्य, अनुवादातील अडचणी, उमा कुळकर्णी यांचे स्वत:चे साहित्य-आत्मचरित्र अशा विविध लेखन-अनुवाद संबंधित विषयांवर बोलणे झाल्यानंतर तेजश्रीने भाषेच्या अभिजाततेचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, की दक्षिणेतील चारही भाषांना तो दर्जा मिळाला आहे, पण मराठीला मात्र मिळत नाही. त्यासाठी राज्य सरकारसह समस्त मराठी जनांचा आटापिटा चालला आहे. तर तुम्हाला काय वाटते?
उमा म्हणाल्या, की जयंत कैकिणी या कन्नड लेखकाने कन्नडचा अभिजात दर्जा या मुद्यावर काय भाष्य केले होते, ते सांगते. जयंत कैकिणी यांना त्या बाबतचा प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले, ‘टायटनिक बुडायला लागलंय आणि आपण विंडो सीट मिळाल्याचा आनंद मानतोय. सारे सभागृह उकाड्याने हैराण झालेले असताना एका कोपऱ्यात कोठेतरी एअरकंडिशनिंगच्या थंड वाऱ्याची झुळूक येत आहे याबद्दल आनंद मानायचा का? त्यावरच संतुष्ट व्हायचे? केंद्र सरकारच्या अभिजात दर्ज्यामधून तशी सुविधा भाषेला मिळणार आहे. तेवढेच त्या दर्ज्याचे महत्त्व ! त्यासाठी जीव किती आटवावा हे ज्या त्या भाषाप्रेमींनी ठरवावे. अवघ्या समाजातून कन्नड भाषा हरवत चालली आहे, कन्नड शाळा बंद पडत आहेत, त्याबद्दल उपाय योजण्याचे बेत कोणी बोलत नाही आणि भाषेला केंद्र सरकारचा अभिजात दर्जा आहे !
उमा म्हणाल्या, की कैकिणी यांचे म्हणणे मला पटते. मराठी शाळा बंद पडताहेत, अन्य क्षेत्रांतूनही मराठी हद्दपार होत आहे. तो प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी काही उपाय योजले पाहिजेत.
उमा कुळकर्णी यांचे माहेर मराठी व सासर कन्नड आहे.
कुसुमाग्रज जागतिक मराठी परिषदेत म्हणाले होते ते किती खरे आहे ! मराठी भाषा मुंबईत मंत्रालयाच्या दारात डोक्यावर (राज) मुकुट आणि अंगावर भिकारणीची वस्त्रे लेवून उभी आहे ! आणि मराठी भाषेचे कार्यकर्ते त्या मुकुटाची शोभा वाढवण्यास झटत आहेत.
– प्रतिनिधी
———————————————————————————————-