शिवाजी महाराजांना शत्रूंची सागरी मार्गावरील आक्रमण परतावून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती करण्याची गरज भासू लागली. त्यासाठी सुरक्षित आणि भक्कम स्थळांचा शोध सुरू झाला. समुद्रकिनारे धुंडाळले गेले. त्या शोधाला पूर्णविराम मिळाला तो मालवणजवळील अरबी समुद्रातील कुरटे नावाच्या काळ्या खडकाळ बेटामुळे. ती जागा 1664 साली किल्ल्यासाठी निवडण्यात आली. किल्ल्याच्या बांधकामाला 25 नोव्हेंबर 1664 रोजी सुरुवात झाली व बांधकाम 1667 मध्ये पूर्ण झाले. ज्या चार कोळ्यांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी जागा शोधली त्यांना इनाम स्वरूपात गावे देण्यात आली.
सिंधुदुर्ग हा किल्ला आरमाराच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. किल्ला अठ्ठेचाळीस एकर जमिनीवर पसरला आहे. किल्ल्याला तीन किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. तट तीस फूट उंचीचा असून त्याची रूंदी बारा फूट आहे. तटाचा पश्चिम व दक्षिण दिशांकडील पाया घालताना शिसाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेल्याचा उल्लेख कागदोपत्री आढळतो. किल्ला बांधण्यासाठी सुमारे एक कोटी होन खर्च करण्यात आले. त्यांपैकी तटबांधणीला ऐंशी हजार होन खर्च आला होता. तटबंदीवर जवळपास बावन्न बुरुज असून पंचेचाळीस दगडी जिने आहेत. तटावर तोफा ठेवण्याच्या जागा आणि शत्रूवर बंदुकांचा मारा करण्यासाठी जंग्या म्हणजे तटाला भोके ठिकठिकाणी ठेवलेली आहेत. तेथे दूधविहीर, साखरविहीर व दहीविहीर अशा तीन दगडी विहिरी आहेत. तिन्ही विहिरींना गोडे पाणी आहे. किल्ल्याच्या बाहेर समुद्राचे खारे पाणी आणि किल्ल्याच्या आत गोडे पाणी हा नैसर्गिक चमत्कारच म्हणावा लागेल. तेथे पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी बांधलेला कोरडा तलाव आढळतो. किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे शंकररूपातील मंदिर आहे. ते राजाराम महाराज यांनी 1695 साली बांधले होते. मंदिराला ‘श्री शिवराजेश्वर’ म्हणून ओळखले जाते. किल्ल्यावरील शिवाजीमहाराजांच्या देवळाच्या मंडपात महाराजांची प्रतिमा बैठी आहे. तशी ती इतर कोठल्याही किल्ल्यावर आढळत नाही. किल्ल्याची पायाभरणी शिवाजी महाराजांच्या हस्ते झाली होती. तो दगड मोरयाचा दगड या नावाने प्रसिद्ध आहे. महाराजांनी एका दगडावर गणेशमूर्ती, सूर्याकृती आणि चंद्राकृती कोरून त्या दगडाची पूजा केली होती.
काळाच्या ओघात लाटांमुळे किल्ल्याचे काही बुरुज व तट यांचा भाग ढासळला आहे. मात्र किल्ल्याचे सौंदर्य अबाधित आहे. किल्ल्यावर शिवजंयती, रामनवमी, नवरात्र इत्यादी उत्सव तिथीनुसार साजरे केले जातात. काही कुटुंबांची वस्ती तेथे असून अंगणवाडी व पूर्व प्राथमिक शाळा आहे. शिवरायांच्या मराठा साम्राज्याची व वैभवाची साक्ष देत जलदुर्ग अरबी समुद्रात दिमाखात उभा आहे.
– अनिश गांधी
Lekhkani likhlela Lekh…
Lekhkani likhlela Lekh Khupach chan aahe…Hya Lekhakache aajun Lekh mala miltil ka vachyala..Krupaya email ne sangave.
Comments are closed.