बौद्ध जातककथा अजिंठा लेण्यांमधील चित्रांतून मांडलेल्या आहेत. त्यात साधारणत: पाचशेसत्तेचाळीस जातककथा आहेत. त्यांतील पंधरा-वीस चित्रे अजूनही ठळकपणे दिसतात. त्या चित्रांमध्ये कितीतरी गोष्टी दडल्या आहेत! जातककथा म्हणजे धर्मतत्त्वे समजावून सांगण्यासाठी सोप्या भाषेत सांगितलेल्या कथा. नीतिनियमांची नैतिक चौकट कशी असावी याची मांडणी सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेत कळावी यासाठी रचलेल्या त्या कथा! शिबी जातक, संकपाल जातक, महाजनक जातक, चांपये जातक यांच्या कथा मोठ्या रंजक आहेत. त्यांतून धर्मतत्त्वांची चौकट ठळकपणे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आजी जशी गोष्ट रंगवून सांगते तशीच प्रत्येक जातककथा ‘रंगवून‘ सांगण्याचे कसब कलाकुसरीने साध्य करण्यात आले आहे. त्यांचे वर्णन ‘भित्तिचित्रांच्या दुनियेत अजिंठा लेण्यांतील चित्रे म्हणजे नीलमणी’ असे केले जाते. ती चुनखडीचा गिलावा ओला असताना नैसर्गिक रंगांतून रंगवली गेली आहेत. ज्वालामुखीतून निर्माण झालेल्या खडकांचे रंगही त्यात वापरले गेले असल्याचे सांगितले जाते. ती चित्रे एवढी शतके टिकून कशी राहिली? शिल्प घडवता येईल असा पाषाण असतानाही तेथे चित्रे का काढली गेली असतील याचीही उत्सुकता अनेक वर्षांपासून आहे. पुरातत्त्व विभागातील मॅनेजर सिंग यांनी केलेल्या संशोधनात मिळालेली माहिती त्या काळातील प्रगत तंत्रज्ञानावर प्रकाश टाकणारी आहे. रंगांचे ते मिश्रण वेगवेगळ्या भाज्या, साळीचा भुस्सा, गिलाव्यासाठी वापरली जाणारी वेगवेगळ्या प्रकारचे गवतमिश्रित माती आणि गांजाची काही पाने असे होते. गांजा पाणी शोषून घेतो. त्यामुळे लेण्यांवर कितीही पाऊस पडला तरी भिंतींमधून पाझर होत नाही. परिणामी, चित्रे अनेक वर्षें टिकून राहिली. सर्वाना आवडणारी आणि जगन्मान्य असणारी दोन चित्रे म्हणजे- पद्मपाणी आणि वज्रपाणी. त्यांचे वर्णन कमळांच्या पाकळ्यांसारखे डोळे, धनुष्याकृती भुवया, मजबूत देहयष्टी, अजानुबाहू, रुंद छाती अशा विविध शब्दांत केले जाते, तरी ते अपुरेच वाटते. पद्मपाणी कोण होता? तो होता राजकुमार. बौद्ध तत्त्वज्ञानातील पारिमिता पाळणारा. पारिमिता म्हणजे जगण्याची नैतिक वा मूल्याधिष्ठित चौकट! दान, शांती, शील, सत्त्व, अधिष्ठान, प्रज्ञा, मैत्री अशा त्या पारिमिता. त्यांचे पालन जो करतो आणि इतरांच्या सुखासाठी जो झटतो असा बोधिसत्त्व म्हणजे पद्मपाणी. पद्मपाणी आणि वज्रपाणी ही दोन्ही चित्रे शब्दांत उतरवता येत नाहीत, पण त्यांचाही काही भाग दिसेनासा झाला आहे आणि एका राखाडी लेपाच्या खाली चित्र बुजून गेले आहे. काय काय दडले आहे त्या चित्रांमध्ये? कोठे सुबत्तेचा पांढरा हत्ती दिसतो, तर बऱ्याच ठिकाणी हंसही दिसतो. विविध प्राणी-पक्षीही चित्रांमध्ये दिसतात. बोधिसत्त्वाच्या विविध जातककथांची चित्रे जगातील कलाकारांना व प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत राहिली आहेत. कारण त्यातून बौद्ध तत्त्वज्ञान तन्मयतेने पोचवले गेले आहे.

अजिंठा लेण्यांमधील कला व इतिहास यांचा शोध घेण्याचा प्रयत्न गेल्या साठ-सत्तर वर्षांत विशेष जोमाने झाला आहे. वॉल्टर स्पिंक्स नावाचा अमेरिकन माणूस त्या लेण्यांचा अभ्यास 1952 सालापासून करत आहे. ते वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षीदेखील अभ्यासकांना मार्गदर्शन करत असतात. नाशिकच्या प्रसाद पवार यांनी त्या लेण्यांची काढलेली छायाचित्रेदेखील अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकतात. ते एका नव्या माध्यमातून अजिंठ्याची छायाचित्रे लोकांसमोर मांडत असतात. त्यांचे काम अफाट आहे. प्रकाश पेठे नावाचे बडोद्याचे आर्किटेक्ट विद्यार्थी असताना, म्हणजे 1950 च्या दशकात अजिंठा लेण्यांत चार दिवस राहिले होते. त्यावेळी बंधने कोणतीच नव्हती. पेठे यांनी तेव्हा अनेक रेखाटने केली. ते त्यानंतर दोन वेळा अजिंठ्याला गेले, त्यांनी फोटो काढले, नोंदी केल्या. मुंबई आयआयटीच्या ‘आर्ट हिस्टॉरिक इण्टरप्रिटेशन’च्या माध्यमातून काही नवीन अभ्यासही मांडले जात आहेत. विजय कुळकर्णी व एम आर पिंपरे हे दोन कलाकार त्यांच्या ‘कॉपी’ चित्रांतून अजिंठा राखून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे येथील सायली पाळंदेही त्यात अग्रेसर आहेत.
अजिंठालेण्यांतील चित्रांमधून त्या काळातील सामाजिकता, तेव्हाचे अर्थशास्त्र यांचाही अभ्यास स्वतंत्रपणे केला जात आहे. सध्या सुरू असलेले प्रयत्न व्यक्तिगत पातळीवरील आहेत. काही व्यक्तींनी कामाला संघटनात्मक रूप देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला मोठे संस्थात्मक बळ आवश्यक आहे. पण अजिंठा लेण्यांची व्याप्तीच एवढी प्रचंड आहे, की त्यासाठी प्रयत्न सातत्याने करावे लागतील!
अजिंठा लेण्यांच्या विषयी खूप छान माहिती .. खमी एकदाच धावत्या प्रवासात एक दिड तास थांबलो आता मला आणखी उत्सुकता लागली आहे .. अख्खा एक दिवस थांबून ही लेणी पाहणार आहे