अजगर हा शब्द ‘अजागर’ ह्या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. अजागर म्हणजे जो जागत नाही तो, असा त्याचा अर्थ आहे. अजगराला संस्कृतमध्ये अजागर असे म्हणतात. सतत सुस्त असणाऱ्या अजगराला किती समर्पक नाव आहे!
अजगर ह्या सरिसृप वर्गातील प्राण्याबद्दल सर्वांच्या मनात भीतीयुक्त कुतूहल असते. अजगर प्राणी संग्रहालयात किंवा दूरदर्शनच्या वाहिन्यांवर हमखास बघण्यास मिळतो. सर्व सापांप्रमाणे अजगरदेखील त्याचे भक्ष्य संपूर्ण गिळतो. अजगराला लचके तोडण्याचे, चर्वण करण्याचे असे वेगवेगळे दात नसतात. तसेच, त्याचा वरचा आणि खालचा जबडा सैलसर अस्थिबंधनांनी जोडलेला असतो. त्यामुळे तो काटकोनात आ वासू शकतो. म्हणूनच तो ससा, भेकर, हरीण असे लहान-मोठे प्राणी सहज गिळू शकतो.
अजगर हा प्राणी शीत रक्ताचा आहे. त्याच्या चयापचयाचा वेगही कमी असतो. त्याला शरीर सतत उष्ण राखण्याची आवश्यकता नसल्यामुऴे ऊर्जाही कमी लागते. ह्या सर्वांमुळे अजगराने एकदा भक्ष्य गिळले, की त्याला अनेक दिवस काही खाल्ले नाही तरी चालते. त्या काळात तो सुस्तावतो. माणसालाही पोटभर मिष्टान्न भोजन केले, की तशीच सुस्ती येते. ‘अरे परांजप्या, जागा आहेस का झाला तुझा अजगर.’ असे पुलंनी ‘अंतू बरवा’ या व्यक्तिचित्रात्मक लेखात लिहून ठेवले आहे.
– उमेश करंबेळकर
(‘राजहंस ग्रंथवेध’ वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)