अचलपूर नगरी- ऐतिहासिक वास्तू

0
325

अचलपूर म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली आणि एकेकाळी विदर्भाची म्हणजेच वऱ्हाडची राजधानी हे बिरुद मिळवणारी नगरी ! त्यामुळे त्या नगरीत विविध वंशांच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात अनेक वास्तू बांधल्या. त्या शिल्प-स्थापत्यांमध्ये मंदिर स्थापत्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा अशी काही मंदिरे आहेत. त्यामध्ये केशव नारायण मंदिर, कार्तिकेय मंदिर, देवी मंदिर यांचा उल्लेख करता येईल…

अचलपूर म्हणजे पौराणिकऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली आणि एकेकाळी विदर्भाची म्हणजेच वऱ्हाडची राजधानी हे बिरुद मिळवणारी नगरी ! त्यामुळे त्या नगरीत विविध वंशांच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात अनेक वास्तू बांधल्या आहेत. त्यात पाय विहिरी, किल्लेमंदिरे तर मध्ययुगीन कालखंडातील गढी, मशीद, महाल, दर्गा, जलविहाराच्या वास्तू, तलाव अशा विविध उत्तम शिल्पकारी व स्थापत्याच्या वास्तू यांचा समावेश आहे. त्या वेगवेगळ्या काळांमध्ये बांधल्या गेल्या आहेत. त्या पुरातन वास्तू काही दर्शनीय व चांगल्या तर काही अगदीच जीर्णावस्थेत आहेत. मात्र अवशेष पाहूनही तत्कालीन भव्य व उत्कृष्ट शिल्प स्थापत्याची कल्पना येते. त्या शिल्प-स्थापत्यांमध्ये मंदिर स्थापत्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा अशी काही मंदिरे आहेत. त्यामध्ये केशव नारायण मंदिर, कार्तिकेय मंदिर, देवी मंदिर यांचा उल्लेख करता येईल.

केशव नारायण मंदिराचे सध्याचे बांधकाम अद्ययावत असले तरी श्री विष्णूची चतुर्भुज मूर्ती ही बाराव्या शतकातील आहे. ती साडेतीन ते चार फूटांची असून विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. शंख, चक्र हे अलंकारिक असून त्यांचे गोंडे खाली सोडलेले आहेत. ती प्रतिमा गंडकी शिळेची कोरलेली आहे. त्या मूर्तीच्या गळ्यात हार, दंडात केयूर, मनगटे, मुकुट अशा सर्व अलंकारांनी ती सुशोभित आहे. मूर्ती शिल्पकारीचा अद्भुत असा नमुना आहे.

त्या मंदिराचे बांधकाम देवगिरीचे यादव यांचा सेनापती खोलेश्वर याने केले असे सांगितले जाते. खोलेश्वर याने अचलपूर येथे; तसेच, सभोवतालच्या परिसरामध्ये अनेक वास्तूंचे बांधकाम केले. त्याने पाणीपुरवठ्याच्या सोयीही केल्या होत्या. शिवाय, स्वतःच्या खोलेश्वर या नावावरून खोलापूर नावाचे एक गावही वसवले होते. स्थानिक लोकांमध्ये अशी समजूत आहे, की अचलपूरचा केशव नारायण, सावळापूरचा सत्यनारायण आणि  धानोऱ्याचा सुंदरनारायण या तिन्ही मूर्तींचे दर्शन एकाच दिवशी घेतल्याने बद्रीनारायणाच्या दर्शनाचे पुण्य लाभते.

अचलपूर येथील वतनदार देशपांडे यांच्या वाड्यात पार्वती देवीचे मंदिर आहे. तेथे पार्वती गौरी रूपात आहे. मंदिर देशपांडे यांची खाजगी मालमत्ता असली तरीही अचलपूर येथील स्थानिक भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. मूर्ती शास्त्रानुसार देवीच्या शिल्पाला पार्वती गौरी असे म्हणतात. मूर्ती तीन-साडेतीन फूट असावी. ती कोरीव नक्षीकाम केलेली देखणी अशी आहे. गौरी रूपातील पार्वती चतुर्भुज आहे. ती प्रदक्षिणा क्रमाने स्थानक अवस्थेत समपाद चरणात उभी आहे. मूर्तीच्या दोन उजव्या हातांपैकी एका खालील हातात अक्षमाला आहे तर दुसऱ्या वरच्या हातात दांडी धरलेल्या गोल फलकात शिवपिंड आहे. डाव्या खालील हातात कमंडलू धरलेला आहे तर वरील हातात दांडीवरील गोल फलकात गणपती प्रतिमा आहे. पार्वती गौरीला जटा मुकुट आहे. ती संपूर्ण अलंकृत आहे. तिच्या गळ्यात फलक हार, एकावली, वैकक्षक माला तर दंडात अंगद, केयुर व मनगटावर बांगड्या आहेत. तसेच, कमरेवर मेखला, पायात पादवलय, नुपूर, जोडवी असे सर्व अलंकार सजलेले आहेत. कमनीय बांधा असलेली पार्वती त्यामुळे अधिकच खुलून दिसते. मूर्तीच्या पायाशी इतर दासीगण व नंदी कोरलेले आहेत. संपूर्ण शिल्पपटात महिरप कोरलेली आहे. त्यामुळे त्या मूर्तीची उत्कृष्ट व दुर्मीळ शिल्पाचा नमुना म्हणून गणना होते.

अचलपूरच्या बिलानपुऱ्यात श्री कार्तिकेय स्वामींचे मंदिर आहे. त्या मंदिराची रचना ही जरी अर्वाचीन काळातील असली तरी तेथील मूर्ती मात्र यादवकालीन आहे. कार्तिकेयाची ती मूर्ती शिल्पकलेचा अद्भुत असा नमुना आहे. शिव-पार्वती पुत्र कार्तिकेयाचा जन्म स्कंदपुराणानुसार तारकासुराचा वध करण्यासाठी झाला. तो देवांचा सेनापती अनेक शस्त्रांनी सिद्ध असतो. मूर्तिशास्त्रानुसार कार्तिकेय मूर्ती सहा मुखे (म्हणून त्यास षडानन असेही म्हणतात) व बारा हात अशा स्वरूपात असते. कार्तिकेयाचे वाहन मयूर आहे. अचलपूरची कार्तिकेयाची मूर्तीदेखील सहा मुखांची असून, तिची दर्शनी तीनच मुखे व सहा भुजा दिसतात. कार्तिकेय मयूर वाहनावर आरूढ आहे. यानक अवस्थेतील ती मूर्ती चार ते साडेचार फूट आहे. प्रदक्षिणा क्रमाने उजवीकडील हातांमध्ये अक्षमाला, गदा, अंकुश तर डावीकडे पाश, कमंडलू, धनुष्य अशी शस्त्रे धारण केलेली आहेत. मूर्ती सालंकृत असून तिन्ही शीर्षांवर मुकुट आहेत. कानांत कुंडले, गळ्यात हार, दंडात केयूर, अंगद, कटी सूत्रे, स्कंधमाला, कटकवलय, पादवलय अशा सर्व अलंकारांनी अलंकृत आहे. मूर्तीच्या महिरपीवरसुद्धा कोरीव काम केलेले आहे. महिरपी वर वरील भागात शिवमूर्ती कोरलेली आहे. शिवमूर्तीच्या हातामध्ये बीजपूरक, त्रिशूळ असून ते वरदहस्त असे शिल्प आहे. कार्तिकेयाचे वाहन मोर हा सुद्धा शिल्पीने कोरीव कामाने देखणा केलेला आहे. अचलपूर नगरीत अशा बऱ्याच मूर्ती आहेत. काही भग्न स्वरूपात तर काही चांगल्या स्थितीत.

अचलपूर शहराच्या पूर्वेला मंडलेश्वर नावाची पाय विहीर आहे. ती मंडलेश्वर महादेवाची विहीर आहे. ती चौकोनी आकाराची आहे. ती राजा मानसिंग यांनी बांधली असे सांगतात. राजा मानसिंग हा अकबराचा प्रमुख सरदार होता. अकबराने त्यास दक्षिण विजयासाठी सेनापती म्हणून 1612 मध्ये विदर्भात पाठवले होते. विहिरीच्या पायऱ्या व बाजूचे दगड यांवर नक्षीकाम केलेले आहे. विहीर वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. तिच्यात बेलाचे पान टाकले तर ते गोल गोल फिरत एका कोपऱ्यात खाली बुडते. त्या ठिकाणी पाण्याखाली शिवपिंड आहे असे सांगतात. ती मंडलशा या अपभ्रष्ट नावाने ओळखली जाते. त्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा रोग बरा होतो असाही स्थानिकांमध्ये समज आहे. महानुभव पंथाचे अभ्यासक पुरुषोत्तम नागपुरे यांच्या मते ती विहीर राणी मदालसा हिने त्या काळात बांधलेली आहे. मदालसाचे मंडलशा असे अपभ्रष्ट झालेले रूप आहे असेही ते सांगतात.

राजा मानसिंग हा राजस्थानातील जयपूरच्या आमेर येथील राजा भगवान दास यांचा मुलगा. त्याचा जन्म 21 डिसेंबर 1550 रोजी झाला. भगवान दास हा अकबराचा मांडलिक सरदार. त्यामुळे त्याचा पुत्र राजा मानसिंग हादेखील अकबराच्या दरबारात सरदार म्हणून दाखल झाला. राजा मानसिंग याला त्याच्या वयाच्या सव्वीसाव्या वर्षी अकबर बादशहाकडून मेवाडचा रजपूत राजा राणा प्रताप याच्याशी बोलणी करण्याकरिता पाठवण्यात आले. ती बोलणी फसल्यामुळे राणा प्रताप व राजा मानसिंग यांच्यामध्ये हल्दीघाटीचे युद्ध 1576 मध्ये झाले. राजा मानसिंग हा अकबराची पत्नी राणी जोधाबाई हिचा भाऊ होता. राजा मानसिंग काबूलचा सुभेदार 1580 मध्ये झाला. भगवान दास यांचा मृत्यू 1589 मध्ये झाल्यामुळे राजा मानसिंग आमेरचा राजा बनला. राजा मानसिंग अकबराच्या दरबारात पहिला सात हजारी मनसबदार ठरला व नवरत्न दरबारातील एक सरदार झाला. त्याने आमेरला अनेक वास्तू बांधल्या. तसेच, त्याला सुभेदारी बंगाल, बिहार, ओरिसा, झारखंड या ठिकाणीही मिळाली. त्यामुळे त्याने त्या त्या ठिकाणी बरेच बांधकाम करून ऐतिहासिक वास्तू निर्माण केल्या. तो अहमदनगरच्या स्वारीवरून परतताना, अचलपूर येथे मुक्कामी होता. त्याने त्याच मुक्कामात मंडलेश्वर विहिरीचे बांधकाम केले. राजा मानसिंग त्या विहिरीच्या एका किनार्‍यावर तर दुसऱ्या किनार्‍यावर त्याचा गायक असे दोघे बसून, मानसिंग त्या गायकाचे गाणे ऐकत असे. राजा मानसिंग यांचा मृत्यू अचलपूरला 6 जुलै 1614 रोजी झाला. त्यांची समाधी विहिरी समोर थोड्या अंतरावर आहे. त्याच्या दोन्ही राण्या बाजूलाच सती गेल्यामुळे त्यांचेही सती वृंदावन त्या ठिकाणी बांधले आहे. राजा मानसिंग यांचे वंशज सवाई मानसिंग यांनी त्या समाधीवर दिवाबत्तीची सोय 1935 मध्ये करून दिलेली आहे. तसा फलक त्या समाधीच्या खालील पायाच्या भिंतीवर लिहिलेला आहे. राजा मानसिंग यांचे पंधरावे वंशज लंडनमध्ये आहेत, त्यांनी त्या समाधीचा जीर्णोद्धार होऊन ते पर्यटन स्थळ व्हावे असा मानस व्यक्त केला आहे.

अनुपमा खवसे 9420235506 anukhawase29@gmail.com

——————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here