विदर्भ प्रदेश हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जाई. काँग्रेस पक्षाने कोणत्याही जागेवर कोठलाही उमेदवार उभा करावा, उमेदवार नसेल तर दगड उभा करावा- त्यालाही लोक निवडून देतील असे बोलले जाई ! पण काँग्रेसच्या त्या अभेद्य बालेकिल्ल्याला जणू सुरुंग लागल्याचे वातावरण लोकसभेच्या 1989 च्या निवडणुकीत निर्माण झाले होते. त्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे झुंजार नेते भाई सुदाम देशमुख ! सुदाम देशमुख हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अचलपूर येथील नेते होते. गिरणी कामगार, शेतकरी, शेतमजूर-आदिवासी यांच्या समस्यांवर प्रासंगिक आंदोलने उभारणे, मोर्चे काढणे आणि लहानमोठ्या समस्या सोडवून घेणे हे त्यांचे काम असे. ते अविवाहित होते. त्यांनी सारे आयुष्य सामाजिक संघर्षासाठी, न्याय्य लढ्यांसाठी वाहून टाकण्याची शपथ घेतली होती. सुदाम देशमुख यांना स्वत:चे घर असावे असे कधी वाटले नाही. त्यांनी पोटापाण्यासाठी उद्योग केले नाहीत, की त्यांची रात्रीच्या आरामासाठी लागणाऱ्या निवाऱ्याची सोय नव्हती ! ते लोकांसाठी जगले, त्यांनी लोकांसाठी संघर्ष केला, उलट, लोकांनी भाई सुदाम यांचा सांभाळ केला. ते त्या 1989 च्या निवडणुकीत त्यागी, कर्मठ आणि तपस्वी उमेदवार म्हणून पुढे आले आणि लोकांनी त्यांची उमेदवारी उचलून धरली !
अमरावती जिल्ह्याच्या सामाजिक-राजकीय इतिहासात 1980 ते 1990 चे दशक हे विकासासाठी आसुसलेल्या लोकांच्या आशाआकांक्षांचा जागर करणारे होते. सुदाम देशमुख यांनी सातत्याने पेटवत ठेवलेली दलित-शोषितांच्या आंदोलनाची धग, रिपब्लिकन नेते रा.सु. गवई यांचे पोक्त आणि समन्वयी नेतृत्व आणि बी.टी. देशमुख यांनी संसदीय आयुधे वापरून विधिमंडळात विविध प्रश्नांवर विकासासाठी चालवलेला संघर्ष यांतून अमरावती जिल्ह्याच्या नेमक्या समस्या काय, त्या सोडवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न अधिकाधिक स्पष्ट होत गेले होते. जुने गावगाड्याचे, एकाधिकारशाहीचे राजकारण शेवटचे आचके देऊ लागले होते.
सुदाम देशमुख हे कम्युनिस्ट होते, पण त्यांना कम्युनिस्टांची संघटना बांधणी- तिचा विस्तार करणे वगैरे जमले नाही. त्या उलट, त्यांनी मार्क्सवादाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा थेट लोकांमध्ये जाऊन प्रचार-प्रसार करणे आणि लोकांना प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहित करणे असे काम केले. त्यांनी अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गाव पाहिले होते. पक्षाची संघटना मर्यादित होती. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही उजव्या पक्षांनी नुकतीच कोठे उभारी घेण्यास सुरुवात केली होती. शिवसेनेचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते सुदाम यांच्या पाठीशी उभे राहिले. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांमुळे ग्रामीण भाग ढवळून निघाला होता. शेतकरी वर्गही सुदाम देशमुख यांच्या प्रचारात उतरला. ती निवडणूक मोहीम अशी होती, की त्या मोहिमेमध्ये कोणीही पुढारी नव्हता, व्यवस्थापन नव्हते, पैसा असण्याची शक्यता तर केवळ शून्य एवढी होती. पण वातावरणच पेटून उठले ! लोक स्वत: प्रचारक बनले. ‘तुमचा गेरू तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा’ ही घोषणा लोकप्रिय झाली !
निवडणुका केवळ लोकसामर्थ्यावर जिंकल्या जात नाहीत तर मोठ्या प्रमाणावर संसाधने आणि व्यवस्थापन यांच्या भरवशावर जिंकल्या जातात हे व्यावहारिक सत्य असते. मात्र अमरावतीत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले. काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांना परंपरेने मतदान करणाऱ्या लोकांनीही काळजावर दगड ठेवून कम्युनिस्ट पक्षाला मतदान केले आणि सुदाम देशमुख मोठ्या मताधिक्याने निवडून आले ! अमरावतीचा इतिहास, तेथील लोकांच्या इच्छाआकांक्षा सारे एका व्यक्तिरूपात प्रकट झाले होते !
सुदाम यांचे पूर्ण नाव वामन दत्तात्रय देशमुख. त्यांचे वामन हे नाव मागे का पडले आणि सुदाम हे नाव प्रचलित कसे झाले याबद्दल माहिती नाही. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1923 रोजी अचलपूर तालुक्यातील दोनोडा (खैरी) या गावी झाला. घराणे वतनदार असले तरी सुदाम यांचे वडील दत्तात्रय देशमुख हे बडनेरा येथील विजय मिल्समध्ये कामगार म्हणून काम करत. सुदाम हे शाळेत असताना अमरावती येथील अॅडव्होकेट वि.दा. आणि सीताबाई ब्रह्म यांच्या संपर्कात आले. ब्रह्म हे परिवर्तनवादी विचारांचे कुटुंब समाजकार्यात अग्रणी होते. त्यांचा कम्युनिस्ट पक्षाशी प्रत्यक्ष संबंध नव्हता. त्यांच्याकडे तरुण कार्यकर्त्यांचा राबता असे. त्या वातावरणात सुदाम यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचे संस्कार झाले. त्यांना बडनेरा येथील कॉ. दिवाणजी आणि त्यांच्या पत्नी मालिनी दिवाणजी यांचीही माया लाभली. सुदाम यांनी अमरावतीच्या न्यू हायस्कूल येथून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि नंतर बहि:शाल विद्यार्थी म्हणून बी ए पर्यंतचे शिक्षण घेतले.
स्वातंत्र्य चळवळ ठिकठिकाणी सुरू होती. सुभाषचंद्र बोस हे क्रांतिकारक नेते तरुणांच्या गळ्यातील ताईत होते. सरंजामशाही व्यवस्थेचा अखेरचा काळ होता. सावकार आणि व्यापारी कृत्रिम अन्नधान्य टंचाई निर्माण करत आणि ते चढ्या दराने विकत. त्या साऱ्या प्रकाराला विरोध करण्यासाठी तरुणांनी ठिकठिकाणी मंडळे स्थापन केली होती. सुदाम यांनीही अशा चळवळीचे नेतृत्व केले. टिमटाला येथील एका सावकाराच्या घरावर दरोडा पडला. त्या प्रकरणी सुदाम देशमुख यांना गोवण्याचे प्रयत्न झाले, पण न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली.
भाई सुदाम यांनी वऱ्हाड प्रदेशातील शोषणाची स्थानिक परिस्थिती ओळखली आणि राज्यकर्ते व मिल मालक यांच्या विरोधात आंदोलने केली. त्यांनी स्वत:ला सामाजिक संघर्षामध्ये झोकून दिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधी राहणी, स्पष्ट विचार, प्रभावी वक्तृत्व आणि असामान्य चारित्र्य या गुणवैशिष्ट्यांनी बहरत गेले आणि लवकरच, सुदाम देशमुख हे दलित-शोषित वर्गातील जननायक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कम्युनिझमविषयीच्या जाणिवाही दृढ झाल्या.
सुदाम देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात विदर्भातील बहुजन समाजाने सामील व्हावे यासाठी जिवाचे रान केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामुळे प्रचंड जनजागृती घडून आलेली होती. त्यांनी कष्टकरी, दलित, पीडित वर्गाला त्या चळवळीत सहभागी करून घेतल्यामुळे चळवळीला जोर चढला. मोर्चे-आंदोलने ठिकठिकाणी होऊ लागली. त्या चळवळीमुळे भाई सुदाम देशमुख हे नाव सर्वत्र पोचले. मार्क्सप्रणीत क्रांतीची संकल्पना ही लोकजागृतीवर बेतलेली आहे. लोकांना त्यांचे शोषण कसे होते हे कळावे आणि लोकचळवळीच्या माध्यमातून क्रांती घडावी हे मार्क्सवादाला अपेक्षित आहे. म्हणूनच सुदाम यांनी समाजाच्या प्रबोधनासाठी आवश्यक असलेले प्रचारकत्व स्वीकारले. त्यांना कोठलीही निवडणूक लढवताना त्या निवडणुकीत त्यांचा पराभव होणार हे माहीत असे. पण निवडणूक हे लोकांच्या समस्यांबद्दलची ‘बोंब ठोकण्याचे’ साधन आहे. तशी संधी पाच वर्षांतून एकदा मिळते. ती का दवडावी? असा प्रश्न ते उपस्थित करत आणि पराभवांना सहजपणे सामोरे जात.
सुदाम देशमुख हे पक्षकार्यासाठी म्हणून अचलपुरात 1942 च्या सुमारास आले. त्यांनी विदर्भ मिल्समधील कामगारांना संघटित करून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने गिरणी मजदूर संघाची स्थापना केली. त्यांचे घर हीच त्यांची अभ्यासिका आणि तेच त्यांचे कार्यालय देखील होते. तेथे सातत्याने लोकांचा राबता असे. अचलपूरची विदर्भ मिल्स म्हणजे त्या परिसरातील एकुलता एक उद्योग. लोक त्या मिलकडे त्यांचे जीवन-मरण या दृष्टीने पाहत. मिलमधील मध्यम व उच्च वर्ग त्यांच्या शांतिप्रिय, सुखवस्तू चाकोरीमध्ये जीवन जगणारा. सुदाम देशमुख कामगारांच्या हितासाठी जी आंदोलने उभारत ती त्यांना त्यांचे शांतिप्रिय जीवन नष्ट करणारी वाटत. त्यामुळे तो वर्ग त्यांच्यापासून फटकून असे. मात्र सुदाम यांनी मजूर-कामगार आणि तळागाळातील लोक यांच्या सहाय्याने वेळोवेळी उठाव केले. तेथील नवाबी वातावरणातील सत्ताधाऱ्यांना शह देणारी एक शक्ती सुदाम देशमुख यांच्या रूपाने तयार झाली. विदर्भ मिल्सचे व्यवस्थापन उत्पादित माल बट्टा लावून व्यापारी वर्गाला कमिशनवर विकत असे. कामगारांनी ती बाब उघडकीस आणली. सुदाम यांनी व्यवस्थापनाशी चर्चा करत त्या प्रकारांना आळा घातला. गिरणी तोट्यात दाखवण्याचे व्यवस्थापनाचे प्रयत्न हाणून पाडले. त्यांनी कामगारांच्या कामाच्या वेळा, कामाचे तास, ओव्हरटाइम या संदर्भात वेळोवेळी संघर्ष केला. गिरणी कामगार संघ ही एक बलाढ्य संघटना होती. विदर्भ मिल्स ही गिरणी 1965 मध्ये बंद करण्यात आली. हजारो कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले. सुदाम देशमुख यांनी धरणे आंदोलने केली. व्यवस्थापनाने गिरणी महाराष्ट्र सरकारला भाडे तत्त्वाने चालवण्यास 1968 मध्ये दिली. कालांतराने, ती गिरणी नॅशनल टेक्स्टाइल्स कॉर्पोरेशनकडे गेली. उद्योगावर सिन्थेटिक कापडाचे संकट आले, तेव्हा साऱ्याच गिरण्या बंद पडल्या. विदर्भ मिल्सच्या जागेवर फिनले मिल्स उभी राहिली. तीही पुढे बंद पडली.
सुदाम देशमुख यांनी जसे कामगार, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी वर्गासाठी सातत्याने लढे दिले; तसाच संघर्ष, त्यांनी मेळघाटमधील कोरकू, गोंड या जमातींवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध केला. सुदाम देशमुख यांनी किसान सभेच्या झेंड्याखाली खेडोपाडी पायी फिरून वाहितदारांसाठी प्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या त्या चळवळीमुळे अचलपूर तालुक्यातील शंभर टक्के वाहितदारांना संरक्षित कुळाचा हक्क प्राप्त झाला, तो कार्यक्रम ग्रामीण लोकांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणारा ठरला.
भाई देशमुख हे साम्यवादी नेते. सुदाम यांनी त्यांच्या परीने साम्यवादाचा अर्थ समजून घेतला. समाजातील गरिबी ही कोणाच्या तरी शोषणामुळे कायम असते आणि सत्ताधारी व समाजातील संपन्न वर्ग हे शोषणासाठी कारणीभूत असतात ही त्यांची सरळसोट मांडणी होती. साम्यवाद हा आंतरराष्ट्रीय असला तरी त्यांनी मात्र जीवनभर अमरावती जिल्हा हेच त्यांचे कार्यक्षेत्र मानले. त्यामुळेच, तेथील जमीनदारीची व्यवस्था, त्यातून होणारे ‘नाही रे’ वर्गाचे शोषण, जीनिंग प्रेसिंग संस्था, कापड गिरण्या या लहानमोठ्या उद्योगांमधून कामगार वर्गावर होणारा अन्याय हेच त्यांचे चिंतेचे विषय राहिले.
सुदाम देशमुख अचलपूर मतदार संघातून निश्चितपणे निवडून येणार असे वातावरण 1978 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निर्माण झाले होते, पण त्यांना त्या निवडणुकीत केवळ आठशे मतांनी झालेला पराभव पाहवा लागला. पुढे, 1980 मध्ये मात्र सुदाम देशमुख आमदार झाले. लहानमोठे प्रश्न भेटीगाठीतून सुटत चालले होते. सुदाम आमदार 1985 मध्ये पुन्हा एकदा बनले. तशातच 1989 ची ती ऐतिहासिक लोकसभा निवडणूक झाली. लोकनेते सुदाम देशमुख यांची ती निवडणूक लोकांनी लढवली. तो त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा कळस होता. खासदारकीचा त्यांचा तो काळ चौदा महिन्यांचा. त्यांनी लोकसभेतही त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. जीवघेण्या कॅन्सरने त्यांना त्याच काळात गाठले. त्यांचे स्वरयंत्र काढून टाकण्यात आले. तशा स्थितीत त्यांनी 1991 ची लोकसभा निवडणूक केवळ पक्षाच्या आग्रहास्तव लढवली. ते त्यावेळी पराभूत झाले ! सुदाम देशमुख यांची प्राणज्योत 14 मे 1993 रोजी मालवली.
– शशिकांत ओहळे 9561012357 shashi.ohale@gmail.com
(शशिकांत ओहळे यांच्या ‘जननायक’ या पुस्तकातील लेख, संक्षिप्त स्वरूपात)
———————————————————————————————————————