‘नेत्रदान’ हे श्रेष्ठ दान आहे ही जाणीव गडहिंग्लज तालुक्याच्या ‘अत्याळ’ गावातील लोकांमध्ये जागी झाली आहे. तेथे गेल्या दहा वर्षांपासून (2012) ‘अंधांना डोळे व डोळसांना दृष्टी’ या ब्रीदवाक्यावर आधारित चळवळ सुरू आहे. कौतुक म्हणजे अत्याळमधील चळवळीशी वर्षागणिक नवी गावे जोडली जात आहेत. चळवळीच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या गावांतून अकरा वर्षांत शहाण्णव जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे ! परस्परांपासून दुरावत चाललेली माणसे एकमेकांना जोडली जावीत ही भावना हा चळवळीचा गाभा होऊन गेला आहे. ज्या अंधांना नेत्र प्रत्यारोपणातून दृष्टी मिळू शकत नाही अशा दृष्टीहीनांचा समाजातील वावर सुकर व्हावा म्हणून कार्यशाळा आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केंद्र असे जादा उपक्रमही चळवळीमार्फत चालतात.
अत्याळ गावात ‘एक गाव, एक गणपती’ असा गणेशोत्सव साजरा केला जातो. उत्सवासाठी गाव एकत्र येते. पण ते एकत्र येणे उत्सवापुरते मर्यादित असे. त्याच दरम्यान काही गावकऱ्यांच्या मनात गावाची वेगळी ओळख निर्माण करणारा कायमस्वरूपी काही उपक्रम राबवला जावा, असा विचार आला आणि त्यातून ‘नेत्रदान चळवळी’च्या संकल्पनेचा उदय झाला. गावाला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. पण त्याविषयी अभिमानाने सांगताना आपल्या पिढीने त्यामधे भर घातली पाहिजे, हा मुद्दा गावकऱ्यांना पटवून देण्यात आला. कौतुक म्हणजे सर्वांनी तो विचार उचलून धरला. गावातील सर्व राजकीय पक्ष व गट एकत्र आले. चळवळीला सुरुवात कोल्हापूरचे विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या उपस्थितीत 29 ऑक्टोबर 2012 रोजी करण्यात आली.
नेत्रदान चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ग्रामस्थ त्या चळवळीचा कार्यकर्ता असे सूत्र ठरवण्यात आले. नेत्रदानात शासकीय अथवा सेवाभावी संस्थांचे काम संकल्पपत्र (फॉर्म) भरून घेण्यापर्यंत थांबते. परंतु अत्याळकरांनी प्रबोधनाच्या माध्यमातून त्यापुढील काम करण्याचे ठरवले. समाजात नेत्रदानाबाबत जाणीवजागृती हे काम कार्यकर्त्यांनी हाती घेतले. गडहिंग्लज येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पाटणे यांचे तांत्रिक सहकार्य चळवळीस मिळाले. त्यांच्या ‘अंकुर आय हॉस्पिटल’मध्ये नेत्रदान प्रक्रिया पार पडू लागल्या. वैद्यकीय व्यवसायातील स्पर्धा आणि ताण-तणाव अशा वातावरणातही डॉक्टर पाटणे यांनी सामाजिक भान जपले आहे. ते कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून चळवळीत कार्यरत आहेत.
अवयवदानाबाबत समाजाची उदासीनता लक्षात घेऊन, फक्त एका नेत्रदानाचे उद्दिष्ट पहिल्या वर्षभरात ठेवले होते. परंतु चळवळीच्या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी माजी सरपंच जयसिंग पाटील यांच्या मातोश्री पद्मावती यांचे निधन झाले. जयसिंग पाटील यांनी त्यांच्या आईचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय चळवळीसाठी महत्त्वाचा ठरला. त्या नेत्रदानातून ग्रामस्थांचे गैरसमज दूर झाले. त्या वर्षभरात एकापाठोपाठ सात ग्रामस्थांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. ग्रामस्थांचे ऐक्य आणि चळवळीवरील विश्वास यांमुळे खडतर वाटणाऱ्या पाऊलवाटेचे रूपांतर रस्त्यामध्ये झाले व चळवळ इतर गावांतही पसरली. अत्याळशेजारच्या करंबळी, बेळगुंदी, भडगाव, कौलगे, ऐनापुर, सरोळी या गावांमध्ये चळवळीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. ती सारी गावे चळवळीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली गेली आहेत. त्या गावांतील एकोणपन्नास ग्रामस्थांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. ग्रामीण भागात सुरू झालेल्या या चळवळीला गडहिंग्लज शहरातूनही बळ मिळत आहे. शहरातील तीन नागरिकांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे.
नेत्रदान चळवळ ही एका पातळीवर, पण माणसाला माणूस जोडण्याचेही काम दुसऱ्या पातळीवर सुरू आहे. ‘माणसापासून दूर जाणारा माणूस’ हेच समाजातील सर्व समस्यांचे मूळ आहे ही जाणीवही समाजात हळुहळू रूजत आहे. गावातील प्रत्येक माणूस एकमेकाशी जोडला जात असताना, प्रत्येक गावही अन्य गावांशी जोडले जात आहे.
चळवळीतील एक कार्यकर्ते पत्रकार अवधूत पाटील यांनी या चळवळीविषयी सांगितले, की “चळवळीचे काम करणारा कोणताही कार्यकर्ता अंध नाही. त्याचे कोणी नातेवाईक अंध नाहीत. त्यामुळे हे काम केवळ परोपकाराच्या भावनेतून उभारले जात आहे. चळवळीत अध्यक्ष, सचिव, खजिनदार अशी कोठलीही पदे नाहीत. कार्यकर्ता हेच सर्वोच्च पद ! व्यक्ती, संस्था या पारंपरिक साच्याला फाटा देऊन, गाव पातळीवर राबवलेली कदाचित ही देशातील पहिली चळवळ असावी !”
अवधूत पाटील म्हणाले, की नेत्रदान चळवळीसाठी ‘झिरो बॅलन्स’चे सूत्र अवलंबले आहे. चळवळीतील उपक्रमांसाठी गरजेइतकीच देणगी स्वीकारली जाते. चळवळीच्या खात्यावर एकही रुपया शिल्लक राहणार नाही, हा नियम कटाक्षाने पाळला जातो. चळवळीच्या कार्यक्रमांमध्ये केवळ प्रमुख पाहुण्यांची खुर्ची व्यासपीठावर असते. स्थानिक मान्यवरांसह ग्रामस्थ व्यासपीठासमोरील खुर्च्यांवर बसतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ हा भेदभाव गळून पडतो. चळवळीच्या कोणत्याही कार्यकर्त्याने पुरस्कार किंवा सत्कार स्वीकारलेला नाही. नेत्रदात्याच्या कुटुंबीयांचा मात्र गौरव केला जातो.
नेत्रदान प्रक्रियेत तज्ज्ञ डॉक्टर मृत व्यक्तीच्या घरी येतात. डॉक्टर घरातील बंद खोलीमध्ये दहा ते पंधरा मिनिटांमध्ये डोळे काढून घेतात. स्मशानभूमीमध्येही मयत व्यक्तीचे नेत्रदान घेता येते. नेत्रदानातून मिळालेली बुब्बुळे (कॉर्निया) नेत्रपेढीत जमा करून ठेवतात. नेत्रदानानंतर पंधरा दिवसांपर्यंत अंध व्यक्तीवर नेत्र प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करता येते. बुब्बुळे नेत्र प्रत्यारोपणासाठी विनामूल्य पुरवली जातात. एका मृत व्यक्तीच्या नेत्रदानातून दोन अंधांना दृष्टी देता येते. मात्र सर्वच अंध व्यक्तींना नेत्र प्रत्यारोपणातून दृष्टी देता येत नाही. बुब्बुळे खराब झाल्यामुळे दृष्टी गेलेल्या व्यक्तीलाच नेत्र प्रत्यारोपणाने दृष्टी देता येते. अन्य कारणांनी अंधत्व आलेल्या व्यक्तींना नेत्र प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दृष्टी देता येत नाही. मग अशा अंधांचे काय, या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नेत्रदान चळवळीचा दुसरा टप्पा ऑक्टोबर 2022 पासून सुरू करण्यात आला आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्यांतील अंधांचे सर्वेक्षण करण्यात आले. गडहिंग्लज तालुक्यात त्रेसष्ट, आजरा तालुक्यात सदतीस तर चंदगड तालुक्यात सदुसष्ट तशा अंध व्यक्ती आढळून आल्या. त्या अंधांसाठी प्रत्येक तालुक्यात ‘स्वयंसिद्धता कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. कार्यशाळा दोन दिवस चालली. त्यांना पांढरी काठी कशी वापरावी, पायऱ्यांचा चढ-उतार कसा करावा, फळे-भाजीपाला-कडधान्य स्पर्शाच्या माध्यमातून कसे ओळखावे, दिशांची ओळख कशी पटवावी अशा गोष्टी शिकवण्यात आल्या.
अंधांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी अत्याळ येथे आठ दिवसांची निवासी रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी अंधांना एलईडी बल्ब्स्, एलईडी माळा, ट्यूबलाईट्स, सौर ऊर्जेवरील वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेत तीन तालुक्यांतील बारा अंध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासाठी गडहिंग्लज येथे रोजगार निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्रात अंध बांधव एलईडी बल्ब्स्, एलईडी माळा, चार्जिंग बल्ब्स् तयार करत आहेत. शिवाय, अंधांना कापडी पिशवी व कागदी बॅग तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.
भारत देशात दरवर्षी सुमारे एक लाख डोळ्यांची आवश्यकता भासते; तर प्रत्यारोपणासाठी केवळ वीस हजार डोळे नेत्रदानातून उपलब्ध होतात.
संपर्क : अवधूत पाटील 8805015565 avadhuthpatil@gmail.com
– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com
———————————————————————————————-
अतिशय स्तुत्य उपक्रम👍👍
अत्याळ ची उल्लेखनीय चळवळ! सर्वच संबंधित अभिनंदनास पात्र आहेत!!