अंगणी माझ्या मनाच्‍या…

1
66

”किती छान अंगणासारखी मोकळी जागा आहे हो तुमच्या इथं. बच्चे कंपनीही मस्त मातीत खेळण्यात रमलीय. खूप दिवसांनी असं चित्र बघायला मिळतंय.” आमच्या घरी येणा-या जवळपास प्रत्येकाची ही प्रतिक्रिया असते. अशी चित्राची चौकट रेखाटली गेल्यावर मला त्यात आठवणींचे रंग भरण्याचा मोह आवरता येईना!

भूतकाळाची दारं उघडत अर्धशतकाचा उंबरठा ओलांडल्यावर बैठ्या चाळ संस्कृतीने डोकं वर काढलं. चाळी त्यांच्या पुढ्यात अंगण घेऊन दारं सताड उघडी टाकत नांदत होत्या. अंगण हे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. दिवसभर ते लाड-कौतुकात न्हाऊन निघायचं. तांबडं फुटण्याच्या आधीच अंगण डोळे चोळत जागं व्हायचं ते सडासंमार्जनानं. शुभ्र रांगोळीच्या रेघेनं ते सडे सजवले जायचे आणि न्हाऊमाखू घालून तीट-काजळ लावलेल्या तान्ह्या बाळाप्रमाणे अंगण गोजिरवाणं वाटू लागायचं. मृद् गंधानं लपेटलं जायचं आणि मांगल्यानं सजायचं. सूर्यदेव डोंगरांमधून वर यायचे आणि कोवळ्या सोनसळी रंगानं अंगण चमकू लागायचं. घरात काम सुचू न देणारी बालगोपाळ मंडळी आजी-आजोबांचं बोट धरून किंवा हट्टानं कडेवर बसून अंगणात पाऊल टाकायची. दिवस जसजसा वर येऊ लागायचा, तसतसं अंगण त्या शैशवाला अंगाखांद्यावर खेळवण्यात मग्न होऊन जायचं, चैतन्यानं भरून जायचं. रुसवेफुगवे, रडणं-भांडणं-चिडवाचिडवी-मारामारी अशी छोटी छोटी अस्त्रं बाहेर यायची. ‘आवाज की दुनिया’ तिथं रंगायची. सूर्य डोक्यावर आला की चटके बसल्यामुळे सगळी पावलं घरात वळायची.

अंगणातलं तुळशीवृंदावनउद्योग-व्यवसाय, शाळा-कॉलेज या निमित्तानं गडबडीत असलेले मोठे लोक अंगणाकडे डोळेझाक करत जा-ये करत राहायचे. अंगण शांतपणे पहुडायचं, विश्रांती घेत चिडीचूप व्हायचं. कोणीही नाही असं बघून, कडेला अंग चोरून उभ्या असलेल्या झाडांच्या सावल्यांचा आपापसातला खेळ वा-याच्या लुडबुडीनं मग चालू व्हायचा. मध्यान्हीचा शैथिल्य आणणारा काळ सरला, की अंगणात पुन्हा जान यायची. लहानथोरांचे खेळ सगळं अंगण व्यापून टाकायचे. क्रिकेटच्या धावा वाढत जायच्या. कधी चेंडू अंगणाची लक्ष्मणरेषा ओलांडून उघड्या दारातून आत घुसायचा. ‘फोर’ ,’सिक्सर’ यांनी धावसंख्या फुगायची, पण घरात महाभारत घडायचं. ‘घर’सेना खेळणार्यां च्या अंगावर चाल करून यायची आणि शाब्दिक युद्ध पेटायचं. खेळण्यावर त्या दिवसापुरती बंदी आणण्याचा व दुसर्या  दिवशी बंदी उठवण्याचा तह व्हायचा. तेवढ्यापुरता ‘राग’रंग  वेगळा असायचा. ठिक्कर,  दोरीच्या उड्या, दगड की माती, डबा ऐसपैस, लपाछपी, सायकलिंग हे अहिंसक खेळ खेळत वेगवेगळे गट त्यांच्या त्यांच्या अंगणातल्या हक्काविषयी जागृत राहायचे. ‘आपला तो बाब्या अन् दुस-याचं ते कार्टे’ या म्हणीला न्याय देण्यासाठी काही जागरूक माता गप्पांचं नाटक करत एक डोळा आपल्या ‘बाब्या’वर ठेवून असायच्या. ‘मातीत खेळू नकोस’  असं भलतंच सांगितलेलं न जुमानता चिल्लीपिल्ली मातीशी गट्टी करायची. त्यांच्या स्वत:च्या नाही तर त्यांच्या सवंगड्यांच्या डोक्यांतही माती घातली जायची. मग पाठीत धम्मक लाडू व चापट पोळीचा खुराक मिळायचा आणि बेसूर वाजंत्री लावत ‘फ्रेश’ व्हायला खाशा स्वा -या घराकडे वळायच्या. सगळी वानरसेना अंगणात यथेच्छ बागडायची!

दिवेलागण झाली की मात्र दमुनभागून सगळी पावलं गुपचूप घराकडे वळायचीच. ‘सातच्या आत घरात’ येण्याच्या कायद्याचं कसून पालन केलं जायचं. अंगण शांत, ध्यानस्थ वाटू लागायचं. जणू ते त्रयस्थाच्या भूमिकेतून घराघरातून ऐकू येणार्याा ‘शाब्दिक’ चळवळीकडे पाहात असायचं. सगळे दिवे मालवले गेल्यावर, अंगण चंद्रप्रकाशात गुडूप व्हायचं; सकाळची वाट बघत. मग तिथं उंदीर, घुशी, भटकी कुत्री यांचं राज्य सुरू व्हायचं.

उन्हाळा आला की अंगणाचा भाव एकदम वाढायचा! परीक्षा आटोपल्यावर शाळांना सुट्ट्या लागलेल्या असायच्या. सगळी वानरसेना हाताशी असायची. ‘नुरल्या सगळ्या त्या साठवणी’ हा सूर घरातून वर्ज्य असायचा. अंगणात दिवसभर मुक्कामाला येणार्यास चकचकीत, कडक उन्हाकडे गृहिणींचे डोळे लागलेले असायचे. वाळवण-साठवण करण्याचे तिचे आवडते दिवस; नवीन धान्य बाजारात आलेलं असायचं. पैशांची खास तरतूदही व्हायची. त्या वर्षी काय जास्त आणायचं, काय कमी आणायचं याचं गणित घरातील ज्येष्ठ अनुभवी स्त्रीच्या सल्ल्यानं  मांडलं जायचं. गहू, चणाडाळ, तूरडाळ अशी कडधान्यं घरात हजर व्हायची. तांदळाला ऊन सोसत नसल्यामुळे त्याची अंगणात लोळायची इच्छा अपुरीच राहायची. त्यांच्या अंगाला बोरीक पावडर नाहीतर दिवेल फासून दिवाळीनंतर लगेचच ते डब्यात जाऊन बसायचे.

अंगण स्वच्छ झाडून रंगीबेरंगी नऊवारी लुगडी अंथरली जायची. गहू, पिवळीधमक चणाडाळ, तूरडाळ, हिरवे मूग, तपकिरी मटकी, हिरवट तपकिरी कडवे वाल शेजारी शेजारी शेकायला बसायचे. रंगांच्या त्या उधळणीनं अंगण सजायचं. अंगण सगळ्या धान्यांच्या गाठोड्यांना रोज सकाळी  कवेत घ्यायचं. मनसोक्त ऊन खाऊ घालायचं. अंधार पडायच्या आधी तृप्त मनानं गाठोडी घरात शिरली की अंगणाला कृतकृत्य वाटायचं. मग साबुदाण्याच्या चिकोड्या नंबर लावायच्या. त्या त्यांचा स्थूलपणा, ओघळणारी काया कमी करण्यासाठी ‘अंगण’ ब्युटिपार्लरमध्ये ‘सोलर एनर्जी’ची ट्रीटमेंट घ्यायच्या. लेकीसुना, पोरीबाळी सगळ्यांचे हात त्यासाठी पुढे यायचे. ठरावीक जाडीच्या, आकाराच्या, ठरावीक अंतर राखून घातलेल्या चिकोड्यांचं डिझाइन अंगावर मिरवायला अंगणाला फार आवडायचं. चिकोड्यांमध्ये चांगलाच बदल घडून यायचा आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व पारदर्शी बनून जायचं. बटाट्याचा कीस मात्र चिकटपणानं किसणीला चिकटून बसत नाराजी व्यक्त करायचा. रागानं बारीक होत कडकपणाकडे झुकायचा. अंगणानं ऐकवलेल्या समजुतीच्या चार गोष्टींकडे दुर्लक्ष करून, हाताळणा-या हातांना हुळहुळणारी वेदना देत शेवटी डब्यात जाऊन बसायचा. कुरडया मात्र पटापट सो-यातून सुटका करून घेत उन्हात बसकण मारायच्या. ओळखता येणार नाही अशी ‘झिरो फिगर’ दाखवायच्या. ‘तळ्यात की मळ्यात’ असं म्हणत खाणा-याच्या तोंडातून सुटका झाली तर डब्यात बसायच्या. कोहळ्याचे सांडगे आले की अंगणाला अप्रूपच वाटायचं. भरलेल्या मिरच्यांच्या तिखटपणावर मात्र अंगणाची मात्रा चालायची नाही. लाल मिरच्या आणि फोडलेल्या हळकुंडांचं ‘हळद-कुंकू’ लावून घेतलं की अंगण धन्य व्हायचं! सर्वात शेवटी पापडांचा नंबर लागायचा. गोल गोल पापडांचा हलकाफुलका तागा अंथरला की अंगण चवदार बनायचं. उन्हाळी क्लबचे सगळे सभासद मुक्कामाला घरात गेले  की मगच अंगण शिकेकाईला प्रवेश द्यायचं. इतकं ऊन दाखवायचं की शिकेकाईच्या बिया कुरकुरीत होऊन त्या ‘नको नको आता पुरे’ करत कुरकुरत राहायच्या. येणारे-जाणारे शिंकत राहायचे, अंगण आपली मजा बघत राहायचं. त्या सगळ्या धामधुमीत घरातील बच्चे कंपनीची फौज, ‘तळे राखेल तो पाणी चाखेल’ या अटीवर अंगण सुरक्षिततेसाठी तैनात व्हायची. अर्धवट वाळलेल्या ओल्या कुरडया, सांडगे, कीस, पापड यांनी त्यांची तोंडं हलत राहायची. अंगण त्याचं वैभव न्याहाळत खूश व्हायचं. आटोपशीर पातेल्यात तोंडाला फडकं बांधून छुंदा येऊन बसला की शेवट गोड झालेला बघून अंगण विश्रांत व्हायचं! मग काय रात्री गाद्या, उशा लोळायला हजर.

वाळवणाचे दिवस सरले की नंतर मात्र अंगण अगदी उघडं पडायचं. उन्हाच्या तीव्रतेनं त्याची काहिली व्हायची. वाराही पडलेला असायचा. त्याचं पावसाच्या सरींची वाट पाहणं चालू व्हायचं. अचानक काळे ढग आकाशात गोळा व्हायचे. वा-याची धांदल उडायची. तो सैरावैरा धावत सुटायचा. अंगणातील माती वा-यालबरोबर उडायची, गोल फिरायची, अंगणाची दयनीय अवस्था  व्हायची. पण सुखद गारव्याला बिलगून चार थेंब पडायचे. त्याच्यापाठोपाठ सरी धावत येऊन भेटायच्या. मृद्गंध वातावरणात उधळला जायचा. लहानथोर अंगणातील पहिल्या पावसाचं कौतुक करायला बाहेर यायचे. छोटी कंपनी तर ‘आई मला पावसात जाऊ दे’ म्हणत अंगणात नाचायची. ओलेत्या अंगणाचं रूप डोळ्यांत भरायचं. पावसाचा जोर वाढायचा. उखडलेल्या अंगणात छोटी छोटी तळी निर्माण व्हायची. मग काय होड्यांचा गृहोद्योग तेजीत चालायचा! पाण्यात होडी सोडून तिच्या मागोमाग थबकथबक करत जाण्यात बालगोपाळ दंग व्हायचे. अंगण चैतन्यानं न्हाऊन निघायचं. वरून झरझर पडणा-या पांढ-या गोजि-या पागोळ्या खाली येऊन वर उसळायच्या. छोटंसं कारंज उडायचं आणि साचलेल्या पाण्यात विरत जाणारे तरंग उमटायचे. अंगणातील ते विलोभनीय दृश्य बघण्याला गॅलरीतल्या कठड्यावर रेलून कोणीतरी सतत उभं राहायचं. अंगणात कडेला असलेली झाडं त्यांच्या पानांवरचा मोत्यांचा साज अंगणात रिता करायची. अंगणातील पाऊस पाय-यांवर बसून बघताना मनामनात शिरायचा.

पावसानं अंगणाची दुर्दशा व्हायची. मग सामुदायिक  श्रमदान करून अंगण ठाकठीक केलं जायचं. मातीत खेळण्याची ती संधी कोणीही चुकवायचे नाहीत. शेणाचा सडा शिंपला जायचा. अंगण पूर्वस्थितीला यायचं. नवरात्रातील नऊ दिवस भोंडला बघण्यासाठी सज्ज व्हायचं. मधोमध हत्ती काढलेला पाट, धरलेला फेर, म्हटलेली गाणी, खिरापतीचा जल्लोष यानं अंगण शोभायमान होऊन जायचं. सगळ्यांना कोजागिरीचे वेध लागायचे. नीटनेटक्या अंगणात घराघरातून सतरंज्या, चटया आणून अंथरल्या जायच्या. हौशी कलाकारांच्या सुश्राव्य गायनानं शरदाचं चांदणं सुरेल व्हायचं. गप्पांमध्ये रात्र सरून जायची. अंगणातील निळ्याभोर आकाशातील चांदण्या पांघरून झोपण्याचा मोह कितीजणांना आवरायचा नाही.

सोनपावलांनी दिवाळी यायची. अंगणाचं भाग्य उजळून निघायचं. लहान मुलांची किल्ला करण्याची गडबड सुरू व्हायची. अंगणातील कोपरा सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचा. इतिहास जिवंत व्हायचा. प्रत्येकाच्या दारापुढे गेरूचे चौकोन आखले जायचे. मुलीबाळी माना मोडून, ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग भरायच्या. पण त्यांच्या ओळीनं अंगणाला सोनेरी किनार लाभायची. आकाशकंदिलातील रंगछटा अंगणात उतरायची. त्या रंगलेल्या, सजलेल्या अंगणाचं रूपडं मनात भरायचं. फटाक्यांच्या आवाजानं ते थरारून जायचं, तर भुईचक्र, अनार त्याला रिझवायचे. अंगणातील प्रकाशोत्सवात चाळ लखलखायची.

शिशिरातील पानगळीनं अंगण वाळक्या पानांनी भरून जायचं. उघडंबोडकं होत सतत कुरकुरायचं. फाल्गुनात अंगणात होळी पेटली, की सगळा कचरा तिच्यात विसर्जित व्हायचा. स्वच्छ झालेलं अंगण वसंतस्पर्शासाठी आतूर व्हायचं. घरात लग्न, मुंज असं धार्मिक कार्य असेल तर अंगणभर मांडव टाकला जायचा. ताशे-वाजंत्री वाजत राहायचे. माणसांनी अंगण फुलून यायचं. कधी आवळी भोजनाची अंगतपंगत बसायची. घरातील कोणत्याही पिढीला कंटाळा आला, वेळ जात नाही असे प्रश्न पडायचेच नाहीत. ती जबाबदारी अंगणानं त्याच्या शिरावर घेतलेली असायची.

त्या सगळ्या आनंदाला क्वचित घडणा-यात एखाद्या ‘मृत्यू’नं मात्र गालबोट लागायचं. सगळे सोपस्कार अंगणाच्या साक्षीनं पार पडायचे. वातावरण शोकमग्न व्हायचं. अंगण त्या दिवशी चिडीचूप असायचं. कोणीही बाहेर फिरकायचं नाही. हळुहळू गाडी रुळावर यायची. अंगण चैतन्यानं भरून जायचं.

अंगण स्वतंत्र बंगल्याभोवतालचं असेल तर दुधात साखरच. ते कुशल माळ्याच्या देखरेखीखाली फळाफुलांनी बहरून यायचं. घरामागील अंगण ‘परसू’ म्हणून ओळखलं जायचं.

वैज्ञानिक प्रगती झाली, तशा चाळी नामशेष होऊ लागल्या. बंद दारांची ब्लॉक सिस्टिम उदयाला आली आणि अंगण वाळून जाऊ लागलं. कुठे असलं तरी पायाला माती लागू नये म्हणून त्यावर सिमेंट किंवा दगडी फरश्या टाकण्यात आल्या. अंगणाची जागा पार्किंगनं व्यापून टाकली. औषधाला म्हणून एखाद्या ठिकाणी अस्तित्वात असलं तर दृक्श्राव्य माध्यमासाठी आवर्जून त्याचा उपयोग होऊ लागला. सर्वसाधारणपणे ‘अंगण संस्कृती’ कालौघात नामशेष झाल्यामुळे ‘अंगणी माझ्या घराच्या’ हे शब्द ओठावर येईनासे झाले, हे मात्र खरं!

(लोकसत्ता, २२ डिसेंबर २०१२, वास्तुरंग पुरवणी वरून)
(फोटो – रेखाचित्रे लोकसत्‍तामधून साभार. अंगणाचा फोटो – गिरीश सावंत)

सुचित्रा साठे,
इ – १,  पूर्वा सोसायटी, पाचपाखाडी,
सरस्वती इंग्रजी माध्य मिक शाळेजवळ,
ठाणे पश्चिम,
दूरध्वनी – ०२२ २५४३५२६५

About Post Author

1 COMMENT

  1. mala majhya lahanpanichi
    mala majhya lahanpanichi athwan jhali..ashach chhalit vadhatna je anubhawale hote te ya nimittane punha nawyane anubhavale… 🙂

Comments are closed.