हुतात्मा रामचंद्र शंकर कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय

0
93
_HutatmaRamchandra_ShankarKumbharde_2.jpg

निफाड तालुक्याच्या (नाशिक जिल्हा) नांदुर्डी गावातील रामचंद्र शंकर कुंभार्डे यांना 1965 सालच्या भारत-पाक युद्धामधे, वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी वीरमरण आले. रामचंद्र यांच्या पाठीमागे त्यांची आई, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार होता. रामचंद्र यांचे त्यांच्या जन्मभूमीत, नांदुर्डी येथे स्मारक व्हावे असे गावकऱ्यांना वाटत होते. त्यासाठी समिती स्थापन झाली. गावकऱ्यांसमोर स्मारक काय करावे हा प्रश्न पडला होता. निफाड पंचायत समितीचे तत्कालीन सभापती विनायकराव पाटील यांनी असे सुचवले, की गावात ‘हुतात्मा रामचंद्र’ यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात यावे. गावकऱ्यांना ती कल्पना पटली.

‘हुतात्मा रामचंद्र कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय, नांदुर्डी’ या संस्थेचा आरंभ विनायकराव पाटील, यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर1968 रोजी झाला. संस्था उभी राहिली तरी वाचनालयास शासकीय मान्यता मिळाली नव्हती. तेथे कायद्याची अडचण आली. शासकीय नियमाप्रमाणे पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांना वाचनालयासाठी शासकीय मान्यता व अनुदान मिळत होते. नादुर्डीची लोकसंख्या तेव्हा कमी होती. शासनासोबत सतत पत्रव्यवहार चालू होता, पण दाद काही लागत नव्हती. अखेरीस वाचनालयाचे त्यावेळचे अध्यक्ष शिवाजीराव निकम व सरचिटणीस रामचंद्र पिलाजी कुंभार्डे या दोघांनी वाचनालयासाठी शासनास आमरण उपोषणाची धमकी दिली. वर, लोकसंख्येची अट शिथिल करा किंवा कुटुंब नियोजन बंद करा, म्हणजे लोकसंख्या वाढेल असा आग्रह धरला.

_HutatmaRamchandra_ShankarKumbharde_4.jpgस्मारक समिती 26 ऑक्टोबर 1970 ला विसर्जित केली व तो निधी वाचनालयाकडे वळवला गेला. ‘महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघां’चे वार्षिक अधिवेशन, दादर येथील ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ या ठिकाणी होणार होते. ते निमित्त साधून, शासनाविरुद्ध उपोषण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व सरचिटणीस, मुंबईला सर्व तयारीनिशी गेले. ते उपोषणाला बसले तेव्हा शासकीय अधिकारी जागे झाले. त्यांनी उपोषणकर्त्यांची मुंबईत भेट घेतली. शासनाने वाचनालयास शासकीय मान्यता देण्यासंबंधी, नियमांत बदल करण्याचे ठरवले असल्याचे सांगत त्या अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण करू नका अशी विनंती केली. अखेर, नांदुर्डी गावच्या वाचनालयास शासकीय मान्यता 24 मार्च 1971 रोजी मिळाली. वाचनकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे लोकसंख्येची वाचनालय मान्यतेसंदर्भातील अट शिथिल झाली. त्याचा परिणाम ग्रामीण भागात वाचनालयांची संख्या वाढण्यात झाला आणि वेगळ्या अर्थाने हुतात्मा रामचंद्र यांचे वीरमरण सार्थ झाले!

वाचनालयाच्या प्रगतीसाठी नांदुर्डी गावचे कार्यकर्ते झटत होते. वाचनालयातील पुस्तकांची तसेच वाचकांची संख्या वाढत होती. सुरुवातीला, वाचनालयाची इमारत नव्हती. ती बांधण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू होते. इमारत बांधून 1 जानेवारी 1977 ला पूर्ण झाली. त्यावेळचे परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. शरद पवार (कृषीमंत्री), के.एम. बापू पाटील, रा.सु. गवई इत्यादी नेते तसेच महाराष्ट्रातील अनेक खासदार, आमदार, कार्यकर्ते असा पंचवीस हजारांचा जनसमुदाय तेव्हा उपस्थित होता. विनायकराव पाटील त्या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष होते.

वाचनालय 1968 साली सुरू झाले, तेव्हा पन्नास पैसे मासिक वर्गणी व दोन रुपये डिपॉझिट आकारण्यात येत असे. सध्या एक हजार रुपये डिपॉझिट तर मासिक वाचन फी वीस रुपये आहे.

वाचनालय 1978 साली ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात गेले. पुस्तकांची संख्या दहा ते बारा हजार व वाचकसंख्या पन्नास ते पंच्याहत्तर हजार असेल, तर वाचनालयाला ‘ब’ वर्ग मिळतो.

वाचनालयाच्या अनुदानात वाढ झाली, मुख्यमंत्री निधीतून मदत मिळाली.

_HutatmaRamchandra_ShankarKumbharde_1.jpg‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे नववे वार्षिक अधिवेशन 28 ऑक्टोबर 1979 रोजी नांदुर्डीत झाले. कविवर्य कुसुमाग्रज यांनी वाचनालयास भेट 20 नोव्हेंबर 1979 रोजी देऊन व्याख्यान दिले होते. वाचनालयाने ‘ब’ वर्गातून, ‘अ’ वर्गात प्रवेश 1983 साली केला. त्यामुळे अनुदानात आणखी वाढ झाली. त्याकाळी ग्रामीण भागात ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवणारे पहिले वाचनालय म्हणून नांदुर्डीच्या वाचनालयाला नाशिकच्या ग्रामीण भागात गौरवण्यात आले होते. (पंधरा हजार पुस्तके व वाचकसंख्या पाचशे असेल, बारा ते पंधरा वर्तमानपत्रे व पन्नास ते पंच्याहत्तर मासिके वाचनालयात येत असतील व वाचनालयाची स्वतःची इमारत असेल तर वाचनालयाला ‘अ’ दर्जा मिळतो.)

नांदुर्डी वाचनालयापासून प्रेरणा घेऊन तालुक्यातील, कुंदेवाडी, दावचवाडी, काकासाहेब नगर, कुंभारी, देवपूर, पालखेड, उगाव, वाकद इत्यादी गावांमधे वाचनालये सुरू करण्यात आली.

नांदुर्डी वाचनालयाने 1983 साली गावासाठी रोगनिदान चाचणी शिबिर भरवले होते.

‘महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघा’चे सदतीसावे अधिवेशन नांदुर्डीसारख्या ग्रामीण भागात प्रथमच 1987 साली घेण्यात आले. शरद पवार त्याचे उद्घाटक होते. तालुक्याचे सुपुत्र माधवराव गडकरी, अध्यक्षस्थानी होते. कुसुमाग्रज प्रमुख पाहुणे होते. विनायकराव पाटील स्वागताध्यक्ष होते.

कोलकताच्या ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’ यांच्याकडून वाचनालयास अकरा वेळा एक लाख तीन हजार दोनशेअकरा रुपये किंमतीचे एक हजार एकशेअठ्याहत्तर ग्रंथ भेट म्हणून प्राप्त झाले आहेत. नांदुर्डी वाचनालयाने 8 ते 12 ऑगस्ट 2010 या दरम्यान राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’च्या सहकार्याने, नाशिक जिल्ह्यातील ग्रंथालय कार्यकर्ते व ग्रंथालय सेवक यांसाठी प्रतिष्ठानच्या विविध योजना व संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. नांदुर्डी वाचनालयाने पत्रकार दिनानिमित्त 6 जानेवारी 2011 रोजी निफाड तालुक्यातील पत्रकारांचे संमेलन आयोजित केले होते.

नाशिकचे दिलीप खैरे यांनी वाचनालयास संगणकांचे संच भेट दिले आहेत. वाचनालयात Libsoft हे ग्रंथालय सॉफ्टवेअर वापरले जाते. संगणकास यू.पी.एस. प्रिंटर; तसेच, इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. निफाड तालुक्याचे आमदार अनिल कदम यांनीही वाचनालयास संगणक संच भेट दिला.

शांताराम जाधव हे वाचनालयाचे ग्रंथपाल म्हणून 1986 सालापासून काम पाहत आहेत. त्या वाचनालयातील कामकाजाची उत्कृष्ट पद्धत पाहून ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’ने 2009-10  साली शांताराम जाधव यांना ‘उत्कृष्ट ग्रंथालय सेवक’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना 2009-10 साली महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट ग्रंथालय सेवक डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान केला. पुरस्काराचे सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व पंधरा हजार रुपये रोख असे स्वरूप होते.

वाचनालयाकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे असे उपक्रम वेळोवेळी राबवले जातात. वाचनालयाने 2008 व 2009 या वर्षांच्या अखेरच्या दिवशी रक्तदान शिबीर आयोजित करून एकावन्न पिशव्यांचे रक्तसंकलन केले होते. ग्रंथालयास 2010-11 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार मिळाला आहे.

वाचनालयात ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, क्लार्क व शिपाई असे चार कर्मचारी आहेत.

वाचनालयाने 1990 सालापासून जनता विद्यालय (नांदुर्डी) व 2016 सालापासून  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (नांदुर्डी) या शाळांतील प्रत्येक वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला डिक्शनरी किंवा एखादे पुस्तक भेट म्हणून देण्याचा; तसेच, लहान मुलांना परीक्षेसाठी पॅड पुरवण्याचा उपक्रम चालवला आहे.

वाचनालयात बावीस हजार पुस्तके आहेत. त्यात कथा, कादंबऱ्या, धार्मिक पोथ्या, प्रवासवर्णन इत्यादी प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे.

संपर्क – शांताराम जाधव (ग्रंथपाल) – 9730832828

– पद्मा कऱ्हाडे

About Post Author