हिजड्यांच्या टाळीला समाजाची हाळी! (Transgender Community and Social Reaction)

1
63
मुलं पहिली-दुसरीच्या वर्गात अक्षरओळख शिकत असताना अक्षर आलं की दोन शब्द हमखास सांगतात छत्रीआणि छक्का’. छक्का म्हणत असताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या चोरट्या हसण्यात त्यांचा छक्काया शब्दाबद्दलचा, तो शब्द धारण करणाऱ्या व्यक्तींबद्दलचा भाव लपलेला असतो. तो असतो उत्सुकतेचा, थोडा चेष्टेचाही. वस्तीत पैसे मागत फिरणारे छक्के किंवा हिजडे त्यांना आठवत असतात. घरातली मोठी माणसं त्यांच्याबद्दल काय बोलतात, त्यांच्याशी कशी वागतात हेही त्यांना आठवत असतं… मुलं मोठी झाली तरी त्यांच्या हिजड्यांबद्दलच्या भावना त्याच राहतात.
पण मुलं ज्यांना हसतात, ते हिजडेही कधीतरी त्यांच्या वयाचे असतातच कीमग ते त्या वेळी काय करत असतात? कसे असतातकसे दिसतात
हिजडेसाडी नेसून, बाईसारखे हावभाव करत फिरत असले, तरी जन्मतः असतात मुलगेच. जन्मलेलं मूल मुलगा आहे की मुलगी, हे ठरवलं जातं त्याचं जननेंद्रिय पाहून. ते बहुसंख्य वेळा बरोबर असतं. पण अगदी क्वचित, निसर्गाची काहीतरी गडबड झालेली असते आणि त्यामुळे गफलत होते. जन्मलेल्या मुलाचं दिसणारं लिंग एक असतं आणि त्याच्या मेंदूची वाढ मात्र वेगळीच होते. पुरुष हार्मोन कमी प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे मुलगा असला तरी त्याचे विचार, भावना यांत स्त्रीत्व दिसतं. त्याला स्त्रीसारखं वागायला, राहायला आवडतं. आईच्या साड्या, बहिणीच्या ओढण्या त्याच्या अंगावर चढतात, ओठावर पुसटशी लिपस्टिक येते; वयात आले की त्यांना पुरुषांचंच आकर्षण वाटतं.
मात्र ते आणखी थोडे मोठे झाले, की त्यांना ते पुरुष नाहीत, स्त्री आहेत आणि त्यांना पुरुषाच्या शरीरात अडकावून ठेवलंय असं वाटू लागतं. त्यांच्याकडून स्त्रीसारखं अधिकाधिक दिसण्यासाठी भडक वागणं, भडक मेकअप अशा कृती केल्या जातात. ती (हिजडे) मुलं वयात येत असताना हे सगळं होत असतं आणि ते समाजानं ठरवून दिलेल्या लैंगिकतेच्या विरूद्ध असतं. आडनिडं वय, पडणारे प्रश्न, त्यांची न मिळणारी उत्तरं… त्या प्रत्येक मुलाच्या मनात किती उलथापालथी होत असतील! पण त्याच्या कुटुंबाला, समाजाला ते समजतच नाही. तो मुलीसारखा वागतो, मुलींबरोबर खेळतो म्हणून आजुबाजूचे लोक त्याला चिडवतात, घरातले लोक ओरडतात. तो वेगळा आहे हे त्याला कळत असतं, पण म्हणजे…मी नक्की कोण? असा प्रश्न त्या मुलाला पडतो. तो मनातल्या प्रचंड घुसळणीनंतर त्याच्या पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरं शोधतो आणि हिजड्यांच्या समाजात प्रवेश करतो! त्याचं तोवरचं आयुष्य आणि नवं आयुष्य संपूर्ण वेगवेगळं असतं. तिथं गुरू-शिष्य परंपरा असते. गुरूला आई मानलं जातं. आई-मुलाचं जसं नातं असतं, तसंच ते नातं निभावलं जातं. संगीतात जशी घराणी आहेत, तशी हिजड्यांची काही घराणी आहेत. प्रत्येक घराण्याचे नियम, रीतिरिवाज थोडे थोडे वेगळे, पण कडक असतात. त्यांचं नवं आयुष्य त्यांच्या अंगवळणी पडतं.
तृतीयपंथीयांचे उल्लेख भारतीय प्राचीन संस्कृतीतरामायणात-महाभारतात-पुराणांत सापडतात. तृतीयपंथीय इतिहासातही राजेरजवाड्यांच्या पदरी होते. ते दरबारात मुत्सद्दी म्हणूनही असल्याचे उल्लेख आहेतराजेशाही अठराव्या शतकात संपली आणि तृतीयपंथीयांना मिळणारा रोजगार बंद झालामग ते भीक मागू लागलेशरीरविक्रय करायला लागले. ब्रिटिश आल्यावर त्यांनी त्यांच्या सभ्य सामाजिक जीवनात बाधा आणणारे म्हणून तृतीयपंथीयांविरुद्ध कायदे केलेत्यांना गुन्हेगार जमात ठरवलंब्रिटिशांनी त्यांना समाजापासून तोडत असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही गदा आणलीसमलिंगी संबंध कायद्याने गुन्हा ठरवले गेले (कलम 377)शरीरविक्रय करणारे तृतीयपंथीय त्यात अडकलेत्यांच्यासमोर पोट भरण्याचा मार्गच उरला नाहीत्यांच्याकडून कधी कधी सभ्यतेच्या मर्यादाही ओलांडल्या जाऊ लागल्या आणि समाज त्यांच्यापासून अधिकच दूर होत गेलासमाज त्यांना काही करू देत नाहीम्हणून ते अधिक आक्रमक बनत गेले. समाजाकडून त्यांना घृणेचीभेदभावाचीच वागणूक मिळत होती. समाज त्यांनाच दोष देत होता; कधी ते चोर असतात म्हणत होताकधी मुलं पळवून नेतात असं छातीठोकपणे सांगत होतातर कधी अश्लील चाळे करतात असा आरोप त्यांच्यावर करत होतात्यांच्या पंथातली लहान मुलंही त्यातून सुटत नव्हतीचिडवणंछळणं यामुळे ती शाळेत/ कॉलेजात जात नसतत्यांचं शिक्षण थांबत असेत्यामुळे समाजात त्यांना स्थान नसेरोजगाराचे जवळजवळ सर्व मार्ग बंद होत.
एका विवाह समारंभात
ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात. देशातली पहिली एचआयव्ही पॉझिटिव्ह केस 1986 मध्ये मिळाली आणि त्यानंतर झालेल्या सर्वेक्षणांमध्ये जोखमीची मानली जाणारी वर्तणूक करणाऱ्या समाजगटांत तृतीयपंथीयही आहेत हे स्पष्ट झालंस्वयंसेवी संस्था आणि सरकारी पातळीवर तृतीयपंथीय यांच्यात काम सुरू झालंत्या गटांना आवाज मिळाला आणि त्यांचं जगणं, त्यांचे प्रश्न समाजासमोर यायला लागले. सगळ्यात मोठा, मूलभूत प्रश्न होता तो त्यांचं अस्तित्वच न मानण्याचा. समाज तर हिजड्यांचं अस्तित्व मानत नव्हताच, पण देशाचा कायदाही त्यांना गणत नव्हता. तो त्यांना स्त्रीकिंवा पुरुषयातच बसवू बघत होता. त्यांना तसं नको होतं. त्यांना तृतीयपंथीम्हणून स्वतःचं अस्तित्व हवं होतं, त्यांची वेगळी ओळख हवी होती. ते या देशाचे नागरिक आहेत, घटनेने त्यांना काही हक्क दिले आहेत आणि ते नाकारले जात असतील तर त्यांनी त्यासाठी आवाज उठवला पाहिजे याची जाणीव होत होती. वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांचा झगडा सुरू झाला. अनेक हिजडे एकत्र आले, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था उभ्या राहिल्या आणि या झगड्याचं रूपांतर लढ्यामध्ये झालं! नाझ फाउंडेशन आणि इतर काही संघटना यांनी समलिंगी संबंध हा कायद्याने गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 ला दिल्ली उच्च न्यायालयात 2001 मध्ये आव्हान दिलंत्यांची ती याचिका न्यायालयाने रद्द केलीमात्र फेरविचार याचिकेत दिल्ली उच्च न्यायालयाने कलम 377 नुसार समलिंगी संबंध हा कायद्याने गुन्हा ठरणार नाही असं 2009 मध्ये सांगितलंकाही धार्मिक संघटना त्यावर सर्वोच्च न्यायालयात गेल्यातिथं न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय 2013 मध्ये रद्द केला.
नाल्सा जजमेंट सेलिब्रेट करताना लक्ष्मीनारायण
त्रिपाठी आणि इतर तृतीयपंथीय
आणि पुढच्याच वर्षी, 2014 मध्ये ‘नाल्सा जजमेंट’ आलंनाल्सा, NALSA म्हणजे National Legal Services Authority. या संस्थेने इतर दोन याचिकादारांसह केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांचं कायदेशीर अस्तित्व मान्य करण्याचा निर्णय दिलाआता स्त्री आणि पुरुष यांच्यासह आणखी एक़ तिसरा लिंगभाव देशात आहेतो ट्रान्सजेंडर्सचात्यांना त्यांचा लिंगभाव स्वत:च ठरवण्याचा अधिकार आहेतो बजावण्यासाठी त्यांना शारीरिक नव्हेतर मानसिक चाचण्या कराव्या लागणार आहेत, वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत, कल्याणकारी योजना राबवल्या जाणार आहेतएकीकडे तृतीयपंथीयांना कायदेशीर मान्यता द्यायची आणि दुसरीकडे ते ज्या प्रकारचे संबंध ठेवतातते समलिंगी संबंध गुन्हा ठरवायचा हे एकमेकांना छेद देणारं होतं. 2016 मध्ये मग त्याच आधारावर पाच एलजीबीटी कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली खाजगीपणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय 2017 मध्ये आला आणि शेवटी, 6 सप्टेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला – दोन प्रौढ व्यक्तींनी परस्परांच्या संमतीने ठेवलेले समलिंगी संबंध हा गुन्हा नाही!
नाल्सा जजमेंटने तृतीयपंथीयांना त्यांचं अस्तित्व मिळवून दिलंओळख दिलीत्यांना शिक्षणाची दारं खुली झालीसार्वजनिक जीवनाची दारं खुली झालीराजकारणाचीही खिडकी उघडली. 1998 मध्ये मध्य प्रदेशातून शबनम मौसी ही तृतीयपंथी आमदार म्हणून निवडून आल्यावर कमला जान आणि आशादेवी या दोन तृतीयपंथी अनुक्रमे मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महापौर झाल्या होत्यापण त्यांच्या जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत आणि त्या स्त्रिया नाहीतया कारणाने न्यायालयांनी त्यांची निवड अवैध ठरवलीआता मात्र तसं होणार नाहीतृतीयपंथीयांना स्त्री म्हणून नाही, तृतीयपंथीय म्हणूनच लढता येणार आहे आणि ते लढायला लागलेही आहेतमुंबईला बरीच वर्षं काम करणारी तृतीयपंथी प्रिया पाटील हिने 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही काही ठिकाणी तृतीयपंथी उमेदवार उभे होते.
एकूणच सार्वजनिक जीवनात तृतीयपंथी दिसू लागले आहेत. लोक त्यांना हळूहळू स्वीकारू लागले आहेत. लक्ष्मीनारायण त्रिपाठीने सच का सामना’, ‘दस का दमअशा कार्यक्रमांमधून छोट्या पडद्यावर तिची ओळख बनवली होती. तिच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक जणी वेगवेगळ्या रिअॅलिटी शोजमध्ये झळकू लागल्या आहेत. बॉबी डार्लिंग, तमन्ना, अंजली, अँडी, रिया, गौरी, स्वतः लक्ष्मी या सगळ्या बिग बॉसया लोकप्रिय शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. सुशांत डिगवीकर बिग बॉसमध्ये सहभागी झाला आणि त्यानंतर रानी कोहिनूर म्हणून झी टीव्हीवरच्या सारेगमपया गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये बऱ्याच पुढपर्यंत गेला होता. गौरी सावंत आणि तिने दत्तक घेतलेली मुलगी यांची व्हिक्सची जाहिरात तीन-चार वर्षांपूर्वी व्हायरल झाली होती. तशाच व्हायरल आहेत दिशाच्या कविता. दिशा सामाजिक, राजकीय कामांतही सक्रिय आहे. या सगळ्यांमुळे तृतीयपंथी सतत समाजासमोर येत आहेत.
मात्र तरीही सगळं आलबेल नाही. कुटुंबांमध्ये अशा मुलग्यांना आपलेसमजलं जात नाही. कुटुंबाने समजून घेतलं, स्वीकार केला तर त्या मुलांचं शिक्षण, पुढचं आयुष्य उद्‌ध्वस्त होण्याची शक्यता कमी आहे. पण कुटुंबांना कसं समजावायचं? लिंग, लैंगिकता, लिंगभाव याबद्दल न बोलण्याची दांभिकता पार नष्ट व्हायला हवी, मोकळेपणाने त्यावर मुलांशी चर्चा व्हायला हवी.
राज्याराज्यांत तृतीयपंथीयांसाठी कल्याण मंडळं स्थापन झाली आहेत. महाराष्ट्रातही नुकतंच तशा मंडळाचं गठन झालं आहे. त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातील. ते होत असताना समाजाने समाज म्हणून खुलं असायला हवं. हिजडे टाळ्या वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण टाळी एका हाताने वाजत नाही. समाजाने दुसरा हात पुढे करायला हवा!
– वैशाली रोडे 9870108450
vaishali.rode@gmail.com
वैशाली रोडे पत्रकार आणि लेखक आहेत. त्या महानगरआणि सकाळया दैनिकांत सव्वीस वर्षें पत्रकारिता करत होत्या. त्यांनी समाज, साहित्य, स्त्रिया या विषयांवर आधारित पुरवण्या, दिवाळी अंक यांचे संपादन केले आहे. त्या सध्या मुक्त पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी मी हिजडा मी लक्ष्मीया लक्ष्मी नारायण त्रिपाठी या हिजडा कार्यकर्त्याच्या आत्मचरित्राचे शब्दांकन केले आहे. त्या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ते इंग्रजी, हिंदी, गुजरातीत अनुवादित झाले आहे. त्यांनी अभिनेते ए.के. हंगल यांच्या इंग्रजी आत्मचरित्राचा मराठी अनुवाद केला आहे.
——————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. खूप  छान माहिती  दिली आहे. माझ्या एका विद्यार्थिनीने याच विषयावर डिझाईन थिसीस केला होता . त्यामुळे मलाही बरीच माहिती झाली 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here