हरिहर गड : वास्तुस्थापत्याचे सौंदर्य

33
103
carasole

हरिहरगड ओळखला जातो तो पायऱ्यांमुळे! त्या गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या मनावर छाप उमटवतात! भटका माणूस रायगडावर जाऊन जसे टकमक टोक, बाजारपेठ, दरबार विसरत नाही किंवा राजगडावर जाऊन जसे तेथील बालेकिल्ल्याचे चित्र पुसून टाकू शकत नाही किंवा हरिश्चंद्रगडावर जाऊन जसा कोकणकड्याचा अजस्त्र आविष्कार आयुष्यभर मनात ठेवून वावरत राहील, तसाच प्रकार हरिहरगडाच्या पायऱ्यांच्या बाबतीत घडतो! गडांच्या यादीतील थोडे वेगळे नाव आणि तसेच आडवाटेवरचे स्थान म्हणजे हरिहर!

गडावरील कातळात पायऱ्या कोरण्‍याची पद्धत सातवाहन राजवटीपासून चालत आली आहे. बहुतांशी गडांवर तशा पायऱ्या दिसतातही; परंतु अनेक ठिकाणी त्या कालौघात, विशेषत: इंग्रजांनी १८१८ मध्ये केलेल्या विध्वंसात नष्ट झाल्या.

हरिहर हा नाशिक जिल्ह्यातील क्षेत्र त्र्यंबकजवळील हर्शवाडी गावानजीक वसलेला गड. त्‍याचे स्‍थान ब्रम्‍हगिरीच्‍या पश्चिमेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे. हरिहर किल्‍ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली त्‍याशेजारच्‍या त्र्यंबकगडासोबत तोही किल्ला जिंकून घेतला. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे, १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी तो गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. मोगल सरदार मातब्बरखान याने हरिहर किल्ला ८ जानेवारी १६८९ रोजी जिंकला. शेवटी, १८१८ मध्ये तो गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतिहासात अशी विविध मालकी अनुभवणारा त्र्यंबकगडापाठोपाठ हरिहरगड हा त्या भागातील दुसरा महत्त्वाचा किल्ला आहे.

हरिहरगड ‘हर्शगड’ या नावानेदेखील ओळखला जातो, त्याचे कारण त्याच्या पायथ्याला ‘हर्शवाडी’ नावाचे गाव आहे. हरिहरगडाचा त्रिकोणी आकार, त्‍याच्‍या कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे लागणारा बोगदा आणि गडावरील इतर दुर्गावशेष अशा साऱ्याच गोष्‍टी वैशिष्‍ट्यपूर्ण आहेत. तो किल्‍ला समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा आहे. मराठेशाही बुडवण्याच्या १८१८ सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्‍यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्‍यादी किल्‍ल्‍यांचा समावेश होतो. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्‍यांच्‍या राकट सौंदर्याची मोहिनी कॅप्टन ब्रिग्जवर घातली. त्‍यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्‍काही लावला नाही. यावरूनही त्‍या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.

हहिरहरगडहरिहरगडावर चढाई करणारे गिर्यारोहक आदल्या रात्री वाडीत मुक्काम ठोकतात, अन् दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे गडाची वाट धरतात. पदभ्रमण करणारा साधारण तासाभराची खडी चढाई केल्यानंतर छोट्या पठारावर येतो. तेथे शंकराचे मंदिर व पुष्करणी तीर्थ आहे. पुढील वाट मळलेली आहे. त्या वाटेने अर्धा तास चालून गेले, की तो हरिहर गडाच्या रेखीव पायऱ्यांसमोर पोचतो. तेथील दगडी जिना मान वर करून बघावा लागतो. ती वाटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण ऐंशी अंशाच्या कोनामध्ये सरळ रेषेत ती जणू आभाळात घुसते! ती वाट पादचाऱ्याने चढण्यास सुरुवात केली, की त्याला तिचा खरा अंदाज येतो. एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची तिची रचना आहे. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी खोबण्या आहेत. त्‍यात पंजा रुतवता येतो व वर चढताना त्यांचा आधार मोठा ठरतो. सुमारे नव्‍वद पायऱ्यांचा सोपान चढल्‍यानंतर गडाचे पहिले छोटेखानी पण सुरेख प्रवेशद्वार लागते. त्या प्रवेशद्वारातून आलेली वाट पाहिली तर असे लक्षात येते, की वर येणे एकवेळ सोपे, मात्र उतरणे महाकठीण! प्रवेशद्वाराच्‍या शेजारी गणेशाची शेंदूर फासलेली छोटी मूर्ती दिसते. प्रवेशद्वाराच्या पुढे, गडाच्या पोटात खोदलेला रस्ता आहे. उलट्या ‘सी’ इंग्रजी आकारासारखा किंवा नारळाच्या अर्ध्या करवंटीसारखा! कातळात कोरलेले दोन दरवाजे पार केल्‍यानंतर सुमारे एकशे तीस पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. त्‍या जिन्‍यासही दोन्‍ही बाजूंस आधारासाठी खोबणी आहेत. त्याच्याच पुढे, वर जाण्यासाठी अप्रतिम असा दगडी बोगदा आहे. गडावर एकापेक्षा एक सरस सौंदर्याकृती पायघड्या टाकून पुढे येत राहतात. त्यामुळे एका रचनेचे कौतुक करायला जावे तर दुसरी समोर! वास्तुस्थापत्याचे ते सौंदर्यतुषार झेलतच गडाच्या माथ्यावर वावर चालू राहतो.

हरिहर किल्ल्याचा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस गुहा दृष्‍टीस पडते. पण तेथे उतरण्यासाठी दोराची आवश्‍यकता भासते. गडमाथ्यावर मोठा तलाव आहे. पश्चिमेकडे भिंत बांधून त्या तलावाचे पाणी अडवण्‍यात आले आहे. तलावाच्‍या काठावर हनुमानाचे मंदिर असून शेजारी उघड्यावर असलेले शिवलिंग आणि नंदी आहेत. गडाच्या टोकाला दारुगोळा कोठाराची इमारत आहे. त्या इमारतीभोवती पाण्याची सहा टाकी दिसतात. आहेत छोटीच. किल्ल्याच्या मधोमध छोटासा पन्‍नास-साठ फुटांचा सुळकाही नजरेत भरणारा आहे. तो कातळ चढून पार करता येतो. मग लागते ती किल्ल्यावरील सर्वांत उंच जागा. गडाच्या माथ्यावरून सभोवारचे विहंगम दृश्‍य फार छान दिसते. तेथून पूर्वेकडे दिसणारे त्र्यंबक डोंगररांगेचे चित्र डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. उत्तरेच्‍या दिशेला वाघेरा किल्‍ला तर दक्षिणेकडे वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्यांचे डोंगर फार आकर्षक दिसतात.

खाली उतरल्‍यानंतर समोर घुमटाकार माथा असलेली तीस फूट लांब व बारा फूट रुंद अशी दगडी कोठी दिसते. पूर्वीच्‍या काळी तेथे दारूगोळा साठवला जाई. कोठीचे प्रवेशद्वार छोट्या खिडकीसारखे असून त्या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. ती गडावरील छत शाबूत असलेली एकमेव इमारत आहे. तेथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फार सुंदर दिसतो. हरिहरगडाची फेरी पूर्ण करण्यास सुमारे दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना पुन्‍हा त्‍या सरळसोट पायऱ्या समोर येतात. त्‍यामुळे उतरताना विशेष काळजी घ्‍यावी लागते.

हहिरहरगडावरील दृश्‍यहरिहरगड इगतपुरी-घोटीपासून जवळच आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ‘निरगुडपाडा’ हे गाव खोडाळा-त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. ते गाव हरीहरकिल्ला व भास्करगड या दोन्ही गडांच्या पायथ्याशी आहे. त्र्यंबकेश्वरपासून वीस किलोमीटरवर निरगुडपाडा गाव लागते. तेथे मुंबईहून दोन मार्गांनी पोचता येते. एक – मुंबईहून कल्याण-कसारा-खोडाळा असे करत निरगुडपाडा येथे पोचायचे. ते अंतर एकशेचौऱ्याण्णव किलोमीटरचे आहे. दुसरा मार्ग म्‍हणजे मुंबईहून कल्याण-भिवंडी-वाडा-खोडाळा या वाटेने निरगुडपाडा गाठणे. हे अंतरही जवळपास तेवढेच, म्‍हणजे एकशेनव्वद किलोमीटर एवढे! इगतपुरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपुरी गाठले आणि इगतपुरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडली तर निरगुडपाड्यास पोचता येते. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. तसेच इगतपुरीहून त्र्यंबकेश्वर-खोडाळा मार्गे निरगुडपाडा गावापुढील कासुर्ली गावात जाता येते. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या बसनेही त्‍या गावात उतरता येते. कासुर्ली गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाची वाडी लागते. त्‍या वाडीतून हरिहर किल्ल्यावर पोचण्यास एक तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे.

– ओंकार  वर्तले

ovartale@gmail.com

Last updated on 29 June 2019

About Post Author

33 COMMENTS

  1. kharach khup sunder asa gad
    kharach khup sunder asa gad ahe pan mi ajparaynt pahila nahi tumchi trip kahi nighte ka jar nighat asel tar mala infom kara jay shivray

  2. kharokhar atiuttam ase
    kharokhar atiuttam ase varanan kele ahe mazi icha ahe ha gad pahanyachi tumchi trip kahi nighat asel tar nakki kalava ha mAza whatsapp number 9665093630

  3. Atishay sundar mahiti hya
    Atishay sundar mahiti. Ya majiticha adhar Gheun konihi Sahaj gad par karel. Khup chhan.

  4. जय जिजाऊ जय शिवराय
    जय जिजाऊ जय शिवराय

  5. खुप छान

    खुप छान

    गडावर जायला नेहमी आवडते, पण या ठिकानची माहीती नव्हती

  6. Really fantastic, I have
    Really fantastic, I have only seen d photographs of steps but was unknown about d fort. On you tube while surfing got d clip so got information and is really great thanks for uploading great efforts

  7. खूप छान माहिती मिळाली .आपले
    खूप छान माहिती मिळाली .आपले आभार..!

  8. खुपच छान माहीती परंतु तो…
    खुपच छान माहीती परंतु तो कील्ला त्या काळात महामहाराजांनी कोणत्या कामासाठी सर्वात ऊपयुक्त ठरला होता हे समजले असते तर बर झाल असत

  9. really excellent &…
    really excellent & thrilling fort.
    jai jijau jai shivrai jai shambhuraje

  10. गडाच्या माहीतीची मांडणी…
    गडाच्या माहीतीची मांडणी अत्यंत सुरेख आहे. ती गडावर जातांना व चढतांना खुप उपयोगी पडली.

  11. मी अपंग आहे. गड,किल्ले आणि…
    मी अपंग आहे. गड,किल्ले आणि लेण्या आज दि.25/11/18 ते 26/11/18 अखेर 38 भटकंती केलेत. सर्वात अवघड किल्यापैकी एक…अप्रतिमच …..

  12. खुपच छान माहीती परंतु तो…
    खुपच छान माहीती परंतु तो कील्ला त्या काळात महामहाराजांनी कोणत्या कामासाठी सर्वात ऊपयुक्त ठरला होता हे समजले असते तर बर झाल असत
    धावडे निखिल
    21/12/2018

  13. jay shivray, mi aani maze…
    जय शिवराय, मी आणि माझे मित्र मागील वर्षी पावसाळ्यात हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी गेलो होतो. ती खूप सुंदर जागा आहे.

  14. Khup chan info dili ahe sir…
    छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  15. अप्रतिम अस चढाई पुन्हा…
    अप्रतिम अस चढाई पुन्हा पुन्हा जावे असे वाटेल

  16. हरिहर गड म्हणजे अभूतपुर्व गड…
    हरिहर गड म्हणजे अभूतपुर्व गड होय.चढाईचा थरार तर वेगळाच पण उतरतानाचा थरार जीवाला घोर लावणारा होता.पाय लटपटत होते.निसर्गाचा चमत्कार अनुभवायास मिळाला. जय भवानी जय शिवाजी.

  17. हर्षवाडी हे माझा गाव आहे ,या…
    हर्षवाडी हे गाव आहे, या हरिहर गडाच्या पायथ्याशी वसलेले आहे.

  18. Kharach khup chan va…
    Kharach khup chan va avismarniya asa killa aahe janu swarga ani to jina mhnje swargacha jina aahe

  19. मी हरीहर गडावर राजा…
    मी हरीहर गडावर राजा शिवछत्रपती परीवार मोहिते गेलो होतो दिनांक : १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८:२५ ला गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.आणि गडावर चढायला सुरुवात केली.जवळपास १ तास चालल्यानंतर मी गडाच्या दगडी पायऱ्या पाशी पोहोचलो.त्या पायर्या‌ सुंदर तर दिसताच पण अवघड ही आहेत.आम्ही गडाच्या दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली तेव्हा आणि पायर्या चढून स्वराज्या प्रवेश द्वार वर पोहोचलो.नंतर डोगरामधुन कोरलेली वाट लागली थोडं पुढे गेल्यावर आणखी तशाच अवघड पायर्या लागल्या पण या पायावर फक्त कडाच्याच बाजुस दगडात कोरलेल्या घोमण्या आहेत.त्यात हात घालून वर जाता येते.वर गेलेवर खालील बाजूस एक गुंफा आहे.तेथे जाता येत नाही.आणखी थोडं वर गेल्यावर गडावरील पृष्ठ भाग लागतो.गडावर मारुती मंदिर आहे.एक तलाव आहे आणि मारुती मंदिर समोर ३ पाणी साठवून ठेवण्यासाठी टाकी आहेत.आणि तळ्यामध्ये महादेव पिंन्ड आणि नंदि आहे.गडाच्या पुर्व बाजूस दारू गोळा ठेवण्यासाठी एक मजबूत आणि आता सुध्दा जशास तसी अशी वास्तू आहे त्यामध्ये जाण्यासाठी खिडकी इतकीच वाट आहे.गडाच्या पुर्व बाजुला बघीतले तर भ्रमगीरी पर्वत दिसतो ‌.हा गड पाहायला खूप मजा येते आणि आनंदही मिळतो.गडावरुन खाली उतर असताना काळजी पुर्व उतरायला हवे.खरंच सर्वांनी हा गड पाहायला नक्कीच जा

Comments are closed.