‘हाँ जी’ असे विनयाने म्हणणे म्हणजे ‘हांजी हांजी करणे’ असे नाही. भांडण केल्याने का कधी धंदा होतो? धंद्यात बरकत हवी असेल तर गोड बोलायला हवे!
हम परदेसी लोग!
– वसंत केळकर
‘मराठी माणूस मागे का?’ या बहुचर्चित विषयाची ही आणखी एक बाजू.
भारतीय समाजाचे विश्लेषण करताना ‘जात’ नेहमीच महत्त्वाची ठरते, कारण प्रत्येक जातीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. सर्व जाती आपापली वैशिष्ट्ये टिकवून असल्यामुळे; विवाह करताना, मुलाला मुलगी व मुलीला मुलगा आपापल्या जातीचा असावा असे अजूनही वाटते; ते जातपात मानत नसले तरीही. आणि असे असल्याने जाती टिकून आहेत. त्यामुळे सांस्कृतिक विविधता व जातीप्रमाणे व्यवसाय या गोष्टीही अजून टिकून आहेत. जातींच्या अनिष्ट गोष्टी बंद व्हायला पाहिजेत व त्यासाठी योग्य ते उपाय योजायला पाहिजेत. पण जात व भाषा यांच्या वेगळेपणामुळे भारतीय समाजात जी विविधता आहे, तीदेखील बंद पडू नये. एकसारखी संस्कृती, एकसारखे संगीत, एकसारखे भोजन, एकसारखे बोलण्याचे विषय, एकसारखा पेहराव असेल तर सामाजिक जीवन मिळमिळीत होऊन जाते. पाश्चात्य लोकांना तो मिळमिळीतपणा सदैव जाणवतो व म्हणून भारतीय जीवनपध्दतीबद्दल त्यांना आकर्षण असते.
महाराष्ट्रात मराठा ही जात क्षत्रिय आहे. या जातीतले लोक राजकारण व सैन्य या आपल्या पारंपरिक क्षेत्रात पुढे आहेत. साखर उद्योगातले मराठ्यांचे कर्तृत्व अपवादात्मक समजले पाहिजे. साखरधंदाही औद्योगिक कमी व राजकीय जास्त असा आहे. इतर प्रदेशांतील साखरधंदा, उद्योगधंद्यांच्या परंपरा असलेले लोक सांभाळत असल्यामुळे महाराष्ट्रापेक्षा जास्त यशस्वी ठरत आहेत असे ऐकण्यात येते. |
गेल्या शंभर वर्षांत उद्योगधंदे, व्यापार यांचे महत्त्व वाढले आहे. माझा पहिला मुद्दा असा आहे, की या क्षेत्रात ज्या जाती असायला पाहिजेत अशा जातीच महाराष्ट्रात नाहीत किंवा असल्या तरी त्यांनी आपापल्या जातीप्रमाणे जो व्यवसाय करायला हवा त्यात लक्ष घालणे गेल्या शंभर वर्षांत सोडून दिले आहे. उत्तर भारतात वैश्य वर्णामध्ये मोडणा-या जाती- अग्रवाल, गुप्ता, गोयल, मित्तल- उद्योगधंदे, व्यापार, व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, वित्तव्यवस्था, पैसा व त्याची गुंतवणूक या क्षेत्रांत अग्रेसर आहेत. यांतले बहुसंख्य लोक हिंदू आहेत व काही जैन आहेत. जैन असले तरी ते श्वेतांबर आहेत, महाराष्ट्राप्रमाणे दिगंबर जैन नाहीत. त्यामुळे उद्योगधंदा, व्यापार, संपत्ती यांत उत्कर्ष करणे हे त्यांच्या धार्मिक कल्पनांच्या आड येत नाही. ही मंडळी संपत्ती बाळगूनही साधी राहणी पसंत करतात व शाकाहारीही असतात. पूर्व भारतात वैश्य वर्णातल्या जाती- सेन, रॉय, मिश्रा, गुप्ता, बोस – व्यापार, उद्योगधंदे यांत अग्रेसर आहेत. आंध्रमध्ये रेड्डी, तामिळनाडूमध्ये शेट्टी आहेत. कर्नाटक व केरळ राज्यांमध्ये मात्र या जातींचा उत्कर्ष कमी दिसतो. त्यामुळे बंगलोरमध्येपण तिथल्या कन्नड लोकांना अकन्नड लोकांचे बंगलोरमधील वर्चस्व खुपते. केरळच्या लोकांनी मात्र केरळच्या बाहेर जाऊन, मोठाले उद्योगधंदे नाहीत तरी छोटे-मोठे व्यवसाय यशस्वी करण्याची कला साधली आहे.
महाराष्ट्रातले अग्रवाल, गुप्ता, गोयल, मित्तल हे अमराठी आहेत. वैश्य जातीत अस्सल महाराष्ट्रीय नाहीतच. महाराष्ट्राचे जैन दिगंबर पंथाचे असून; त्यांनी व्यापार, उद्योगधंदे, संपत्ती यांना महत्त्व देऊ नये अशीच शिकवण धर्माची आहे.
ब्राह्मण जातीचे महाराष्ट्रीय लोक व्यासंग, समाजसेवा, शिक्षण, राजकारण, सैन्य या आपल्या परंपरा सांभाळून आहेत. ते आधुनिक काळानुसार व्यवस्थापन, तंत्रज्ञान, विज्ञान, व्यवसाय, संगीत, नाट्य यांतही पारंगत आहेत. व्यापार, उद्योगधंदे, संपत्ती या त्यांच्या परंपरा नव्हत्या. त्या वैश्य वर्णातील लोकांच्या असायला पाहिजेत. पण महाराष्ट्रात या जाती उपलब्ध नाहीत असे वाटते, माळी, शिंपी, महार, कुंभार या जातीपण वैश्य परंपरेच्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पण व्यापार, उद्योगधंदे, संपत्ती यांत उत्कर्ष साधणे केले नाही. त्यांच्या जातीचे संत होऊन गेले – सावता माळी, नामदेव, चोखामेळा, गोरा कुंभार. त्यांनी उद्योगधंदे, व्यापार यांत गुंतून जावे असा उपदेश करण्याचा प्रश्नच नव्हता. महाराष्ट्रातले वाणी म्हणजे संत तुकाराम आठवतात. त्यांचे व्यापारातले लक्ष सर्वश्रुत आहे. संत तुकारामांचे कर्तृत्व धार्मिक, आध्यात्मिक, नैतिक व साहित्यिक क्षेत्रात होते.
महाराष्ट्रात मराठा ही जात क्षत्रिय आहे. या जातीतले लोक राजकारण व सैन्य या आपल्या पारंपरिक क्षेत्रात पुढे आहेत. साखर उद्योगातले मराठ्यांचे कर्तृत्व अपवादात्मक समजले पाहिजे. साखरधंदाही औद्योगिक कमी व राजकीय जास्त असा आहे. इतर प्रदेशांतील साखरधंदा, उद्योगधंद्यांच्या परंपरा असलेले लोक सांभाळत असल्यामुळे महाराष्ट्रापेक्षा जास्त यशस्वी ठरत आहेत असे ऐकण्यात येते.
ऐटबाज, आदबशीर, अमराठी लोकांसारखी हिंदी बोलण्याने आपण सुरुवात करू या. भांडण करून का कधी कुठे जमते? आपले संपत्तिक्षेत्रात वर्चस्व निर्माण झाले की अमराठी माणूस मराठी आपोआप शिकायला लागेल. संपत्तीवर ज्यांचा ताबा असतो त्यांचीच भाषा, गाणी, संस्कृती इतर लोक उचलतात. |
ब्राह्मण जातीकडे समाजाचे असलेले नेतृत्व महाराष्ट्रात अजूनही कायम आहे. उत्तर हिंदुस्थानात ते वैश्य समाजाच्या ताब्यात गेल्यासारखे दिसते. सांपत्तिक दृष्ट्या तरी. महाराष्ट्रातही असेच झाले असते पण वैश्य समुदाय महाराष्ट्रात नसल्यामुळे अमराठी वैश्य समाजाने हे काम महाराष्ट्रात केले आहे. पारशी लोकांनाही या बाबतीत वैश्य समजायला हवे. त्यामुळे महाराष्ट्रात सांपत्तिक नेतृत्वास अमराठी विरूध्द मराठी असे स्वरूप आले आहे. जोपर्यंत मराठी लोकांचे सांपत्तिक नेतृत्व मुंबईत किंवा महाराष्ट्रात प्रस्थापित होत नाही तोपर्यंत मराठी लोकांची आपल्याच प्रांतात असलेली हीन भावना कमी होणार नाही. त्यासाठी वैश्यांच्या ज्या काही जाती महाराष्ट्रात आहेत त्यांना व इतर जातींनाही या बाबतीत पुढाकार घ्यावा लागेल.
लोहार, सुतार, गवंडी या जातींचे मराठी लोक अमराठी लोहार, सुतार, गवंडी यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत व नुसत्या दगड फोडण्याच्या किंवा अकुशल पण त्रासदायक कामांतही मराठी लोक मागे पडतात. असे का हे समजणे अवघड आहे. अंधश्रध्दा, दैववाद व अशिक्षितता महाराष्ट्रात इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे की काय याचा शोध घ्यायला पाहिजे. माणसाने बिलंदर नसले तरी स्मार्ट असायला हरकत नाही.
आत्मविश्वास कमी पडत असेल तर ‘इतर लोक बिलंदर असतात’ ही समजूत वाढीस लागते. दुस-या माणसाला हात जोडून नमस्कार करणे व तोंडाने ‘नमस्कार’, ‘नमस्तेजी’ वगैरे म्हणण्याची पध्दत आपली नाही. ती आपल्याला व्यर्थ वाटते. आपुलकी, मैत्री, आदर, प्रेम व्यक्त करताना फार शब्द वापरणे किंवा हावभाव करणे आपल्याला नाटकी वाटते, पण आपल्या सांस्कृतिक चालीरीतींना आपण मानाचे स्थान मिळवून देऊ शकत नाही. सांपत्तिक वर्चस्व असणा-या लोकांची भाषा व संस्कृती यांनाच शेवटी मान मिळतो. त्यामुळे नावापुढे ‘जी’ लावण्याची उत्तर भारतीय पध्दत बघता बघता आपल्याकडे रुजली. ‘राव’, ‘पंत’ मागे पडले. ‘ठाकरेजी’ म्हटलेले बाळासाहेबांनाही आवडते. जोपर्यंत स्पर्धेच्या कसोटीवर ती जागा आपण आपल्या हातात घेत नाही तोपर्यंत आपण अमराठी लोकांच्या चालीरीती शिकून घ्यायला काहीच हरकत नाही. ‘आमच्याच मुंबईत हे करण्याची आम्हावर पाळी यावी ना?’ अशी खंत करण्यात हशील नाही. बघता बघता, परिस्थिती पालटेल आणि आपण सांपत्तिक वर्चस्व व त्याचबरोबर सांस्कृतिक प्रभाव आपल्या मुंबईत व नंतर भारतातही निर्माण करू शकू. आपण भारतीय अमेरिकेत जे करायला लागलो आहोत ते आपण महाराष्ट्रीय आपल्याच मुंबईत करू शकायला हरकत नाही.
‘प्रपंच करावा नेटका’ हा उपदेश फारच तोटका आहे. उद्योगधंदे निर्माण करण्याची, व्यापार प्रस्थापित करण्याची जिद्द किंवा स्फूर्ती या तोटक्या उपदेशाने होत नाही. त्यामुळे छोटी-मोठी नोकरी करून आयुष्य प्रभुचिंतनात घालवावे अशीच प्रेरणा होण्याचा संभव जास्त. प्रभुचिंतनाला माझा आक्षेप नाही, पण सर्व संत मंडळींनी वारंवार हे सांगितले आहे, की या जगातील आपली कार्ये करत असताना आपण सदाचार सोडला नाही तर त्याचा अर्थ आपण प्रभुचिंतन सोडले नाही असाच होतो. सदाचार न सोडता कार्ये कोणती करावीत याबद्दल संत मंडळींनी काहीच निर्बंध घातलेले नाहीत. ही कार्ये उद्योग उभारणे, बाजार करणे, शिक्षणव्यवस्था बळकट करणे, हॉस्पिटले उभारणे, देशाचा कारभार चालवणे, खेळ-कला-साहित्य-संगीत यांत प्रावीण्य मिळवणे अशीपण असू शकतात. संत मंडळींनी स्वत:साठी जी कार्यक्षेत्रे व जीवनशैली निवडली होती तीच सर्वांनी निवडावी असे संतमंडळी म्हणत नाहीत. सदाचार हा परमेश्वरप्राप्तीचा मार्ग एकच असला तरी आपली जीवनातली ध्येये व क्षेत्रे, आवडीनिवडीनुसार वेगवेगळी असू शकतात; जीवनशैलीपण वेगवेगळ्या असू शकतात.
आध्यात्मिक उपदेश मनावर घेतला तर त्यातून ढोंग निर्माण होण्याची शक्यता जास्त. आध्यात्मिक उपदेशाचे सार नीटपणे समजून घेणे स्मार्टपणाचे व प्रॅक्टिकल आहे. संपत्ती विषासमान असे मानणारे लोक हातात पैसा मिळाल्यावर दारू, कोंबडी यांमध्ये उडवतात. दारुबंदी असताना जसे लोक चोरटेपणाने, गलिच्छपणाने, शिव्या हासडत दारू पित असत त्याप्रमाणे. खानदानी श्रीमंतांचे वर्तन साधे व सदभिरुचिपूर्ण असू शकते. त्यासाठी बरे-वाईट याबाबतच्या आपल्या कल्पना बदलाव्या लागतील. अमराठी लोकांच्या चांगल्या गोष्टी शिकाव्या लागतील. सुदैवाने, हिंदी-उर्दू चित्रपटसृष्टी मुंबईत असल्यामुळे, आपण हिंदीचा निदान द्वेष तरी करत नाही. पण हिंदी न येण्याची हीन भावना राहिलीच. ऐटबाज, आदबशीर, अमराठी लोकांसारखी हिंदी बोलण्याने आपण सुरुवात करू या. भांडण करून का कधी कुठे जमते? आपले संपत्तिक्षेत्रात वर्चस्व निर्माण झाले की अमराठी माणूस मराठी आपोआप शिकायला लागेल. संपत्तीवर ज्यांचा ताबा असतो त्यांचीच भाषा, गाणी, संस्कृती इतर लोक उचलतात.
– वसंत केळकर
दूरध्वनी – (022) 27719957
ई-मेल – vasantkelkar@hotmail.com