‘स्वच्छ भारत’ – स्वप्न आणि सत्य

_swacha_bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे शौचालये गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने बांधण्यात आली, हे खरे आहे. भारतात 1988 ते 1999 या अकरा वर्षांच्या काळात चौऱ्याण्णव लाख शौचालये बांधण्यात आली होती; तर गेल्या पाच वर्षांत चार कोटी नऊ लाख! शौचालयांच्या संख्येत वाढ झाल्याने भारतातील स्वच्छतेचा प्रश्न सुटला असे मात्र म्हणता येणार नाही. अद्याप, भारताच्या अनेक भागांत पुरेशा प्रमाणात शौचालये नाहीत; शौचालये आहेत तर पाणी नाही अशी अवस्था आहे. सध्या भारतातील दोन लाख चारशेछपन्न हजार गावांमध्ये शौचालये आहेत, परंतु केवळ एक लाख पाच हजार गावांनाच नळाद्वारे पाणी पुरवठा होतो असा शासकीय अहवाल आहे. शिवाय, केवळ शौचालये बांधून स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वी होणार आहे का? जोपर्यंत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, गाई त्यांचे पोट प्लास्टिकवर भरताहेत, गटारे तुंबलेली आहेत, नद्यांमध्ये कचरा साठलेला आहे आणि त्याच्या परिणामी, सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे, तोपर्यंत ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न साकार होणे दूरच; भारत त्याच्या जवळपास तरी गेला असे म्हणता येईल का? त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतादूत म्हणून जागतिक पुरस्कार घ्यावे, तसे जगभर मिरवावे; परंतु भारतदेशवासीयांना स्वच्छतेची जाणीव झाली आहे असे समजू नये. स्वच्छता ही अंगभूत व्हावी लागते. स्वच्छता ही सेवा स्वरूपात उपलब्ध नाही. ती जशी व्यक्तिगत सवय आहे तशी सार्वजनिकही आहे. किंबहुना ती व्यक्तिगततेतून सार्वजनिक होत जाते. त्यामुळे स्वच्छतेबाबतचा विचार हे लोकांना आधुनिक बनवण्याचे उत्तम साधन ठरते. 

शौचालये बांधणी आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत. भारतीयांची मानसिकता केरकचरा उचलणे, घाण साफ करणे ही कामे विशिष्ट वर्गाची किंवा स्वच्छता कामगारांची आहेत; ती त्यांची नव्हे अशी आहे. त्या मानसिकतेत बदल होत नाही, तोपर्यंत ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न साकार होणे मुष्कील आहे. भारतीयांना मानवी विष्ठा, घाम आणि डोक्यावरील कापलेले केस यांमुळे पर्यावरणावर परिणाम होऊन प्रदूषण वाढीला लागते असे वाटतच नाही. त्यांच्या या संबंधातील सवयी बघा. या तिन्ही गोष्टींचा संचार भारतात सर्वत्र आढळतो. घामेजले स्त्रीपुरुष हे तर त्यांच्या कष्टांचे गौरवचिन्ह ठरते! भारतीयांना त्यांनीच त्यांनी निर्माण केलेली घाण साफ करायची असते अशी सवय जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत ‘स्वच्छ भारता’च्या दिशेने वाटचाल कशी होणार? स्वच्छता हा माणसांच्या व्यक्तिगत आचाराचा भाग झाला पाहिजे.

पाश्चिमात्य जगात स्वच्छतेच्या मोहिमेला 1850 च्या सुमारास आरंभ झाला, पण स्वच्छतेची कामे करण्यासाठी त्यांच्याकडे भारताप्रमाणे समाजातील विशिष्ट वर्ग नव्हता. त्यामुळे त्यांना मैला साफ करणे, घाण उचलणे इत्यादी कामे करण्यासाठी समाजातील विशिष्ट वर्गाची गरज भासली नाही. त्या व्यवस्था हळुहळू व्यावसायिक पातळीवर होत गेल्या. भारतात अस्वच्छ परिसर आणि आजार यांचा संबंध घनिष्ट आहे ही धारणा जनमानसात बिंबलेली नाही. त्यामुळे लोक घाणीमुळे दुर्गंधी पसरली तर नाकाला रुमाल धरून गप्प बसतात, परंतु त्यांना त्या दुर्गंधीमुळे आजार होऊ शकतो अशी भीती वाटत नाही.
लंडनमधील थेम्स नदीत 1850 च्या मध्यावर इतकी घाण निर्माण झाली होती, की नदीवर असलेल्या ब्रिटिश संसदगृहाच्या पडद्यांनादेखील दुर्गंधी येऊ लागली. त्याच सुमारास एक छोटी बोट थेम्स नदीमध्ये बुडाली. बुडता बुडता वाचलेल्या व्यक्तीला पाण्यात बुडण्याची भीती वाटण्याऐवजी नदीच्या पाण्याच्या दुर्गंधीची भीती वाटू लागली होती! त्या घाणीमुळे लंडनच्या प्राणीसंग्रहालयातील एक गेंडा मेल्याची अफवाही पसरली. _kachara_vyavsthapanघाणीचे असे साम्राज्य सर्वत्र होते. शास्त्रज्ञ जॉन स्नो यांनी त्या घाणीमुळे जंतूंचा प्रादुर्भाव होऊन कॉलरा उद्भवतो असे संशोधन एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सादर केले. तद्नंतर पाश्चर आणि कॉरव यांनी घाणीमुळे निर्माण होणारे जंतू आणि आजार यांचा संबंध असल्याचे जगाला पटवून दिले. पर्यावरण आणि आजार यांचा परस्परसंबंध असल्याचे जनतेला पटत गेले. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य यांकडे जनतेचे लक्ष वेधले गेले. एडविन चाडविक यांनी तापाची साथ आणि आरोग्याची परिस्थिती यांचे संबंध घनिष्ट असल्याचे दाखवून दिल्यानंतर 1871 साली ब्रिटनमध्ये सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य यांसाठी खास स्वतंत्र खाते स्थापन करण्यात आले.

आयुर्वेद हे भारतात जगण्याचा व स्वास्थ्याचा विचार करणारे शास्त्र. त्यात अस्वच्छ परिसर आणि अनारोग्य यांचा संबंध जोडला गेलेला नाही. किंबहुना सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य या संकल्पनाच भारतीय मनाला शिकवल्या गेल्या नाहीत. वातज्वर (पावसाळी ताप), पित्तज्वर (हिवाळी ताप), कफज्वर (वसंत ऋतुमधील ज्वर) यांचा संबंध मानवी शरीराबाहेरील पर्यावरणाशी आहे असे सांगण्यात आलेले नाही. आजार शरीरातील समतोल बिघडल्याने उद्भवतो, इतकेच आयुर्वेदात नमूद आहे. आयुर्वेद शरीराबाहेरील परिसराच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाबद्दल काही सांगत नाही. घरासमोर सडासारवण ही भारतीयांची आदर्श सवय होय. परंतु घरासमोरच्या पुढे सारलेल्या केरकचऱ्याचे पुढे काय या व्यवस्थेचे उल्लेख भारतीय श्लोकवाङ्मयात येत नाहीत.  

त्यामुळेच, भारतीयांच्या चांगले आरोग्य आणि स्वच्छ पर्यावरण यांचा परस्परसंबंध सहजासहजी लक्षात येत नाही. शौचालये बांधण्याच्या व्यापक कार्यक्रमाबरोबर ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे साफ होणे महत्त्वाचे आहे. भारतातील नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर निर्माल्य, घाण पडलेली असते. जलाशयांमध्ये घाणीचेच साम्राज्य असते, पाणी कमी दिसते. केंद्र शासनाने गंगानदी साफ करण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानेच म्हटले आहे, की गंगा आगामी दोनशे वर्षांत तरी स्वच्छ होणार नाही! भारतातील सर्वच नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर घाण पडलेली असून त्यामुळे पर्यावरण दूषित होते. नद्यांचे पाणी दूषित झाल्याने जलचरांचे जीवन संपुष्टात येते. अनेक आजार नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाल्याने व नद्यांमधील केरकचरा कुजल्याने नदीकाठावरील पर्यावरण दूषित होऊन उद्भवतात.
केवळ मोठ्या प्रमाणावर शौचालये बांधून ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न साकार होणार नाही. फार तर, मोदी यांनी भारतात सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव करून दिली असे म्हणता येईल. पण स्वच्छतेचा मुद्दा तेथेच थांबतो. जी गावे स्वच्छता अभियानात पुरस्कार घेतात, ती धन्य होत! गावोगाव फिरणाऱ्या भारतीय माणसांना स्वच्छ गावे कोठे दिसलेली नाहीत. जनतेला अस्वच्छ परिसर व आजार यांचा अन्योन्य संबंध पटवून देऊन प्रदूषण अस्वच्छ परिसरामुळेच फार मोठ्या प्रमाणावर होऊन ताप, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो वगैरे आजार उद्भवतात हे ठासून सांगणे आवश्यक आहे. एरवी, भारतात दक्षिणेतील लोक ‘त्रिकाल स्नान’ करणारे तर _shauchalayउत्तरेकडील लोक जुम्मे के जुम्मे स्नानवाले अशी समजूत आहे. यामध्ये राजकीय अथवा धार्मिक संदर्भ नाही; त्यास भौगोलिक संदर्भ आहे. जगभर दोन गोलार्धांत उत्तर-उत्तर आणि दक्षिण-दक्षिण असा फरक होता. उत्तरेकडे श्रीमंती व सत्ता होती. दक्षिणेकडे गरिबी व वंचितता. त्याचे प्रमुख कारण लोकसंख्येची अनियंत्रित वाढ हे होते. त्या लोकसंख्येसाठी तेवढ्या मोठ्या सार्वजनिक व्यवस्था निर्माण करणे अवघड होते. असे ते एकात एक गुंतलेले अनेक संदर्भ आहेत. आधुनिक काळात व्यक्तिगत स्वच्छता टोकाला नेली जात आहे. तोच भर सार्वजनिक स्वच्छतेवर येण्यास हवा. स्वच्छता हा माणसाला सर्वांगांनी भिडणारा विषय आहे. याची जाणीव तरी स्वच्छतेचे पुरस्कार घेताना असायला व व्यक्त व्हायला हवी.

– संकलित: मुख्य स्रोत – जनपरिवार, वसई

अधिक शोध घेता आयुर्वेदीय संहितांमध्ये दूषित वायू, जल, देश यांपासून विकार होतात असा उल्लेख येतो असे सांगण्यात आले. ते तीन घटक साथीचे रोग होण्याचे प्रमुख कारण आहेत. त्यात केल्या जाणा-या चिकित्सेचाही ऊहापोह ग्रंथकारांनी केलेला आहे असेही आयुर्वेदाचार्यांच्या बोलण्यात आले. त्याकरता ‘जनपदोद्ध्वंसनीय’ नावाचा एक स्वतंत्र अध्याय आयुर्वेद शिक्षणात आहे. हवा आणि पाणी हे शरीरासाठी अत्यावश्यक आहेत. एखादा प्रदेश दूषित झाला, तर त्यावर स्थलांतर हा उपाय आहेच. परंतु देशातील पाणी आणि वायू दूषित झाले; तर संपूर्ण देश त्याजूनही उपयोग नाही असे वर्णन आयुर्वेदामध्ये करण्यात आले आहे म्हणे, परंतु तशा व्यवस्थेचा सार्वजनिक स्तरावरील विचार आढळत नाही.

About Post Author