‘स्लट वॉक’चा धुरळा

0
21

‘स्लट वॉक’ हा कार्यक्रम प्रोव्होक्ड करणारा होता यात शंका नाही. परंतु अशा पारंपरिक, सांस्कृतिक घड्या उध्वस्त करणार्‍या मोहिमा घेण्याची पाश्चात्य देशातील शैली स्त्रीमुक्ती चळवळीच्या सुरुवातीपासूनच दिसून येत आहे. उदाहरणार्थ, ‘ब्रा बर्निंग’. पुरूषाला आकर्षित करणारी मादकता कमावण्यासाठी लागणारे साधन म्हणजे ‘ब्रा’, अशीच प्रतिमा जाहितात विश्वात प्रचलित होती. म्हणूनच स्त्री म्हणजे मादकता, रतिसुखाचे चिन्ह या प्रतिमेचा निषेध करण्यासाठीची ‘ब्रा बर्निंग’ मोहीम! मला आठवते की मी हॉलंण्डला शिकत असताना, 80-81 साली सेक्स टूरिझमचा निषेध करण्यासाठी मी डच मैत्रिणींबरोबर एअरपोर्टवर गेले होते. व्हिएतनाम युद्धामुळे, अमेरिकन सैनिकांच्या सोयीसाठी थायलँडला अनेक वेश्यागृहे स्थापन होण्यास उत्तेजन मिळाले होते. हॉलण्डमध्ये जाहिरात करून थायलँडला जाण्यासाठी चार्टर्ड विमान आयोजित केले गेले होते. आजचे थायी ऐश्वर्य हे या स्त्रियांच्या शरीरविक्रयातून मिळालेल्या वाढाव्यावर उभे आहे. डच टूरिस्टांना निषेधाची प्लॅकार्ड दाखवत आम्ही उभ्या असताना त्यांच्यापैकी अनेकजण कुत्सित उदगार काढत पुढे जात होते. ‘तुम्ही कुरूप बायका! तुम्हाला कोण विचारतो?’ असा त्यांचा भाव. याचाच अर्थ पुरूषांच्या मनात कामुकता उद्दीपीत करणारी बाईची प्रतिमा पक्की बसून गेलेली आहे. या सर्वाला सुरुंग लावण्याचे अनेक मार्ग स्त्रीमुक्ती चळवळ शोधून काढत असते.

आपल्याहीकडे, बलात्कार म्हटले की प्रथम बाईला आणि तिच्या कपड्यांच्या शैलीला दोषी धरण्याची प्रथा पुरुषांच्याच नव्हे तर बाईच्या मानसिकतेतही आहे. मग लहान मुलींवर झालेल्या बलात्कारांची संख्या जास्त असो की धार्मिक व जातीय दंगलींमध्ये वृद्ध स्त्रियांसकट, गर्भवती स्त्रियांवर झालेल्या बलात्काराच्या ठसठशीत बातम्या असोत. पारंपरिक ‘शालीन’ ऊर्फ ‘आज्ञाधारक’, ‘गरीब गाय’ ऊर्फ ‘सहनशील’ अशाच स्त्रीप्रतिमेला कवटाळून बसलेल्या आपल्या समाजाच्या सेन्सिबिलिटीजना (सांस्कृतिक जाणिवा) सुरूंग लावण्यासाठी काहीतरी आक्रमक, खडबडून जागे करणारे अभियान चालवणे गरजेचे आहे. कपड्यांच्या शैली वेगाने बदलत आहेत आणि आपलेही डोळे सरावण्याची आवश्यकता आहे. एका मुस्लिम मुलाने ऑस्ट्रेलियातील गोर्‍या स्त्रियांच्या कपड्यांवर केलेली टिप्पणी म्हणजे पुरुषांनी आपली आक्रमकता जन्मजात आहे आणि त्यांच्यासाठी स्त्री ही मुख्यत: उपभोग्य वस्तू आहे या गृहित तत्त्वाचा उत्तम आविष्कार आहे. तो म्हणाला, की ‘मांस जर उघड्यावर ठेवले असेल तर खाण्याची इच्छा होते, तशी तोकड्या कपड्यांची ही शरीरे पाहून वासना भडकणारच!’ यावर आपण जास्त काही टिप्पणी करण्याची गरज नाही.

‘स्लट वॉक’बरोबर जे फलक असतात ते अधिक विचारपूर्वक व ‘स्त्री मुक्ती’संबंधातील मूलभूत मुद्दे पोचवणारे पाहिजेत. ‘पुरुषांच्या केसाळ छातीमुळे स्त्रिया उद्दीपीत होणार नाहीत का?’, ‘संमतीशिवाय शरीरसंबंध नाही’, ‘पुरुषाची आक्रमकता निसर्गदत्त नाही’, ‘वासना रोखा, प्रगल्भ वागा’, ‘स्त्रीवरील संचारबंदीला कारणीभूत स्वामीत्व गाजवणारी पुरुषी जात!’ अशा काही फलकघोषणा सुचतात.

आपल्याकडे ‘स्लट वॉक’ला फारसा प्रतिसाद मिळत नाही, कारण तरूण मुलींनाच हे मुद्दे पटलेले नसतात. अजूनही त्यांना फेमिनिटी, ‘स्त्रीपण’ म्हणजे नक्की काय याची स्पष्टता नसते. त्यांची बंडखोरी दाखवण्याची इच्छा असते, पण ती पुष्कळदा पारंपरिक प्रतिमेला धक्का देणे इतपत; असे करत ती ‘पुरुषी’ प्रतिमा जपण्यामध्ये किंवा पुरुषांशी स्पर्धा करण्यामध्ये जिरून जात असते. माणूस म्हणून कसे जगता येईल, सौंदर्यपूजा स्वत:चे व्यक्तिभान ओळखून कशी बांधता येईल याचा विचार झालेला नसतो, ‘स्लट वॉक’ हे वैचारिक धुरळा उडवण्यासाठीचे माध्यम आहे. शेवटी, मूलभूत विचार चर्चेने आणि इतिहासाच्या अभ्यासानेच पोचवता येतात. पुष्पा भावे यांचे म्हणणे मला पटले आहे.

छाया दातार
9322597997
chhayadatar@vsnl.net 

छाया दातार या स्‍त्रीमुक्‍ती चळवळीच्‍या कार्यकर्त्‍या असून त्‍या ‘टाटा इन्‍स्‍टीट्यूट ऑफ सोशल सायन्‍स’ च्‍या महिला शिक्षण विभागाच्‍या माजी प्रमुख आहेत.
छाया दातार यांच्‍याबद्दल अधिक माहिती

About Post Author