स्यमंतक – भिंतींपलीकडील शाळा!

3
60

रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी ‘शांतिनिकेतन’‘नई तालिम’ या संकल्पनांमधून भारतात प्रामुख्याने शिक्षणव्यवस्थेचा वेगळा विचार रुजवण्याचे प्रयत्न केले. पण भारतात रूढ झाली ती ब्रिटिशांनी रुजवलेली शिक्षणपद्धत. मात्र काहीजण त्या परिस्थितीतही शिक्षणव्यवस्थेच्या वेगळ्या वाटेवरून चालण्याचे धाडस करत असतात.

स्‍यमंतकतशीच ‘स्यमंतक’ ही ‘शाळा’ आहे! तो अभिनव प्रयत्न कुडाळ-मालवण रस्त्यावर चालू आहे. त्यात क्रांतीचे सुप्त बीज आहे…  तेथे वर्ग नाहीत, बसायला बाक नाहीत, फळ्यावर काही लिहून माथी मारण्याचा प्रयत्न नाही. परीक्षा घेणे-उत्तीर्ण करणे-पुढच्या वर्गात प्रमोट करणे असलाही प्रकार नाही; तज्ज्ञांची पुस्तके प्रमाण मानून विद्यार्थ्यांची बुद्धी घडवण्याचे काम तेथे होत नाही!

कोकणी गावातील अँटिक वाटणा-या ‘स्यमंतक’ नावाच्या चिरेबंदी ‘घरा’त प्रवेश केला, की तेथील मुक्त वातावरण, मुलांचे चालणे-फिरणे, त्यांनी त्यांच्या आवडीच्या वेगवेगळ्या कामांत मग्न असणे… हे सर्व पाहिल्यावर वाटते की तो जणू एक आश्रमच आहे! तेथील कृषी-अभियांत्रिकीचे प्रयोग म्हणजे ते जणू एक वर्कशॉप आहे. ‘स्यमंतक’ची स्वयंपाक खोली म्हणजे ‘होम सायन्स’चा अभ्यासवर्ग वाटतो.

चाकोरीबद्ध शिक्षण कसे बदलता येईल, मुलांमधील बहुआयामीपणा-कौशल्यबहुलता यांचा विकास समांतरपणे कसा साधता येईल, मुलांना ‘माणसे’ बनण्याचे आणि ‘माणसे’ म्हणून आत्मविश्वासाने जगण्याचे बळ कसे देता येईल, ती स्पर्धेत उतरून एकटी बनू नयेत म्हणून त्यांच्यात सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार कसा रुजवता येईल असे व तत्सम अनेक प्रयोग तेथे चालू आहेत.

सचिन देसाई आणि त्यांच्या पत्नी मीनल यांनी तो प्रयोग सहा वर्षांपूर्वी सुरू केला. दोघेही व्यावसायिक. सचिन यांचा सॉफ्टवेअरचा व्यवसाय होता. सचिन म्हणतात, ‘‘ज्या प्रकारची शिक्षणपद्धत लहानपणापासून पाहिली त्यात फारशी रुची राहिली नव्हती. आमची मुलगी मृणाल शाळेत जाण्याच्या वयाची झाली तेव्हा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला, की आम्हाला जी पद्धत आवडली नाही तीत पुन्हा मुलीलाही का म्हणून ढकलून द्यायचे?”

त्याच दरम्यान, सचिन डॉ. श्रीनाथ कालबाग यांच्या संपर्कात आले. कालबाग यांनी‘ड्रॉप आऊट’ मुलांसाठी पुण्याजवळ शाळा सुरू केली होती. त्यासाठी, त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सचिन यांच्या मनात तसा वेगळा प्रयोग करावा अशी इच्छा निर्माण झाली. तोपर्यंत सचिन यांचा महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ शिक्षणपद्धतीशी व ‘गावाकडे चला’च्या तत्त्वज्ञानाशी ब-यापैकी सूर जुळत चालला होता. सचिन यांचे धामापूर गावात वडिलोपार्जित घर होते. सचिन व मीनल या दोघांनी तेथे तो प्रयोग करण्याचे ठरवले. सचिन त्याचा इंदूरचा मुक्काम हलवून कुटुंबासह धामापूर गावी राहायला आले. इंदूर ही सचिनची सासुरवाडी.

सचिन देसाईसचिन देसाई यांच्‍या पत्‍नी मीनल देसाई आणि मुलगी मृण्‍मयीशाळेची पहिली विद्यार्थिनी होती सचिन यांची मुलगी. त्यात भर म्हणून, सचिन-मीनल यांनी बालसुधारगृह व अनाथाश्रम येथून सहा मुलांना आणले. सचिन म्हणतात, की मुळात आम्हाला शिकवायचे काहीच नव्हते; फक्त शिकायचे होते. पहिला धडा ‘घराची दुरुस्ती’ हा ठरला. त्यापासून शिक्षणाची सुरुवात झाली. घराचे प्लंबिंग, लाइट फिटिंग ही कामे होती, शिवाय कार्पेंटरी. सचिन यांनी व मुलांनी स्वत: ती कामे अनुभवी कारागिरांच्या मदतीने शिकून केली. घराच्या आजुबाजूला असलेल्या जमिनीत सेंद्रीय पद्धतीने शेतीचे काही प्रयोग चालतात. त्यासाठी लागणारे खत, मुले कंपोस्टिंग युनिटच्या माध्यमातून तयार करतात. छोटीशी गोशाळा आहे. तेथील शेणाचा वापर करून बायोगॅस प्रकल्प चालवला जातो. शिक्षणाची पद्धत वेगळी; तेथे कोणी कोणाला अमुकच कर म्हणून दटावत नाही. प्रत्येकजण त्याच्या आवडीनुसार काम घेतो व गरज भासलीच तर मार्गदर्शन मागतो. मुले सकाळी उठतात व दिवसाच्या कामाची वाटणी करून घेतात. त्यात सचिन यांच्या मुलीचाही समावेश असतो. दिवसा विविध उपक्रम झाल्यावर संध्याकाळी खेळ व चर्चा होतात. मृणाल सर्व मुलांत मिळूनमिसळून वाढते हे पाहून आनंद होतो, असे सचिन सांगतात.

‘स्यमंतक’ची वास्तू सचिनचे पणजोबा विष्णूपंत देसाई यांनी उभारली. ते पुण्याच्या फर्ग्युंसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांचा गणिताचे प्राध्यापक आणि संस्कृत पंडित म्ह्णून लौकिक होता. विष्णूपंत देसाई यांचा जन्म १८९४ साली धामापूर येथे झाला. ते त्यांची शिक्षणाबद्दलची निष्ठा आणि त्या क्षेत्रातील त्यांचे योगदान यासाठी ओळखले जात असत. देसाईंमुळे प्रभावित झालेल्या कोल्हापूरच्‍या महाराजांनी त्यांचा कोल्हापूरच्या दरबारात खास जागा देऊन सन्मान केला. ती जागा कोल्हापूरच्या दरबारात आजही पाहता येते. भारताचे माजी राष्ट्रपती बी. डी. जट्टी, मुंबई विद्यापीठाचे गणिततज्ज्ञ हुजूर बजार, शिक्षणतज्ज्ञ यशवंतराव चौहान, जे. पी. नाईक आणि डॉ. एम. आर. देसाई अशा नामवंत व्यक्तींनी विष्णूपंत देसाई यांच्या हाताखाली शिक्षण घेतले.

सचिन देसाई म्हणतात की, त्यांचे आजोबा सुभाषचंद्र देसाई यांच्याकडून त्यांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली. ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश. त्यांच्यां संस्कारांमुळे सचिन देसाई यांना जीवनसत्याचा अनुभव घेता आला आणि त्याची पावित्रता आणि सत्य‍ यांचा अनुभव घेता आला.

‘स्यमंतक’मध्ये मुलांच्या इच्छेचा मान राखला जातो. त्यांच्यातील मोकळेपणा जपला जातो. सचिन म्हणतात, मुलांना एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले गेले पाहिजे. त्यांची शर्यत लावू नये. शिक्षणादी एखादा विषय शिकवताना तो तुटक न शिकवता सम्यकपणे शिकवला जावा. शिक्षण प्रयोगशील झाले पाहिजे. साखर गोड आहे असे जेव्हा लहान मूल लिहिते त्याआधी साखरेची गोडी त्या मुलाने प्रत्यक्ष चाखलेली असली पाहिजे अशी त्यांची धारणा आहे. ‘स्यमंतक’मधील मुलांना त्यांची इच्छा असेल तर ‘ओपन स्कूल’च्या परीक्षेला बसवले जाते. परीक्षेला बसलेली मुले सत्तर टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहेत असेही त्यांनी सांगितले.

शाळेत वाचनालय आणि ब्रॉडबॅण्ड कनेक्शन आहे. प्रयोग करताना मदत लागते तेव्हा संदर्भासाठी त्यांचा उपयोग केला जातो. तेथे टीव्ही नाही, वर्तमानपत्रही येत नाही. ‘स्यमंतक’ने त्या गोष्टी जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या आहेत.‘स्यमंतक’मध्ये पस्तीस मुले ‘शिक्षित’ होऊन गेली आहेत. ती सर्व ‘स्ययमंतक’मध्येे आली तेव्हाे अनाथाश्रमातील, बालसुधारगृहातील, ‘ड्रॉपआऊट’, मतिमंद ठरवून शिक्षणव्यवस्थेतून बाद ठरवली गेलेली अशी होती.

'स्‍यमंतक'मधील सोलार डिहायड्रेटरमग अर्थकारणाचे काय? ‘स्यमंतक’सारखी संस्था प्रयोग करत आहे, पण आर्थिकदृष्ट्या शाळा ‘सस्टेन’ तर व्हावीच लागेल! सचिनचे उत्तर असे- संस्थेचा महसूल हा ६०:४० अशा प्रमाणात आहे. म्हणजे ‘स्यमंतक’च्या आवारातील कृषी उत्पादने, कंपोस्ट आदी विकून; तसेच, तेथील मुले त्यांनी कमावलेले कौशल्य वापरून साठ टक्के महसूल संस्थेत आणतात, उरलेला महसूल हा दात्यांच्या देणगीतून येत असतो.

कृष्णा नावाचा मुलगा ‘स्यमंतक’मध्ये गेल्या दोन वर्षांपासून आहे. तो पनवेलच्या एसओएस संस्थेतून तेथे आला. तो शाळेत काही वर्ग शिकल्यानंतर शाळेने तो मतिमंद असल्याचे सांगितले. नंतर, तो मतिमंदांच्या शाळेत काही महिने गेलाही. पण तेथे त्याचे मन रमले नाही. तितक्यात त्याचा ‘स्यमंतक’शी योग जुळून आला. त्याला डिस्लेक्सियाचा त्रास होता. आज, सर्वसामान्य मुलांत व त्याच्यात काहीच फरक वाटत नाही. तो ‘स्यमंतक’ व त्याचे आवार यांची इत्थंभुत माहिती देतो. तेथील औषधी झाडांचे उपयोग, कंपोस्टिंग युनिटची सविस्तर हकिगत सांगतो. त्याने ‘अडुळसा कल्प’ व जास्वंदीचे सिरप तयार करण्याची प्रक्रिया शिकून घेतली आहे. (स्यमंतकमधील अडुळसा कल्पाचे तीन प्रकार आहेत. अडुळसा केन शुगर (General), अडुळसा पाल्म शुगर (Special) आणि अडुळसा प्लेकन (Without Sugar). हे कल्पच प्रयोगशील शिक्षणातून तयार करण्यात आले आहेत.) तो स्वत: ते बनवतो; तसेच, इतरांनाही ते खुबीने शिकवतो. त्या दोन गोष्टींचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्याला हैदराबाद येथून निमंत्रण आले! ‘स्यमंतक’च्या स्वयंपाकघराची जबाबदारी त्याची आहे. तो ताटात असलेला अन्नपदार्थ जोखू शकतो; ताटातील प्रत्येक चपाती किती ग्रॅम पिठाची बनली आहे ते सांगू शकतो.

‘स्यमंतक’मधून ‘उत्तीर्ण’ झालेली मुले त्यांच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास घेऊन समाजात मिसळली. एक मुलगा अभय बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेत मदतीसाठी गेला. एकाला मुंबईत आयआयटीच्या एका विभागात ‘इण्टर्नशिप’ करण्याची संधी मिळाली. एक मुलगा संगणक अभ्यासक्रमाकडे वळला. तो तेथे मागे पडला, ‘ड्रापआऊट’ ठरला व ‘स्यमंतक’मध्ये आला. तेथे त्याला पशुसंवर्धनाविषयी रस निर्माण झाला. तो स्वत:चे फार्म चालवतो. काही मुलींनी तेथे येऊन त्यांच्या आयुष्याची वाट शोधली. त्यांच्यापैकी एक इंदूर येथे प्रकल्प सहाय्यक म्हणून एनजीओत काम करत आहे तर दुसरीने तिच्या आईसोबत काजू प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे.

'समतोल' संस्‍थेचे विजय जाधव स्‍यमंतकमधील मुलांसोबत. तेथील दोरखंड तयार करण्‍याचे यंत्र छायाचित्रात दिसत आहे.सचिन यांची एक खंत आहे. ते म्हणतात, की आमची ‘घडलेल्या’ मुलांकडून छोटीशी अपेक्षा असते. त्या मुलांनी गावात जावे, तेथे राहून काम करावे, येथील विचार पुढे न्यावा. पण त्यात फारसे यश आलेले नाही. काही उदाहरणे सोडली तर मुले कौशल्य प्राप्त केल्यानंतर पुन्हा व्यवस्थेच्या मूळ प्रवाहात ओढली जातात आणि तेथेच राहू लागतात.

मुलांना जीवनकौशल्य कमावण्याच्या संधीबरोबर माणुसकीचे, स्वत:च्या जीवनाचा उद्देश जाणून घेण्याचे शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी आम्ही विशेष संशोधन करत आहोत. गांधी, विवेकानंद आदींनी माणसांत अध्यात्म शोधण्याचे जे काम केले ते माणुसकी प्रदान करण्याच्या उद्देशानेच होते. भारतीय शिक्षणव्यवस्था ते काम करण्यात अपुरी पडत आहे. त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे असे सचिन व मीनल देसाई सांगतात.

समीर झांट्ये यांचा लेख प्राप्त झाल्यानंतर ‘थिंक महाराष्ट्र’ने सचिन देसाई यांना काही प्रश्न विचारले. त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे :

• तुम्ही दोघे व्यावसायिक असल्याचा उल्लेख लेखात येतो. मीनल देसाई यांचा व्यवसाय कोणता?

– माझी पत्नी मीनल इंदूरची आहे. तिने तिचे शिक्षण ‘देवी अहिल्या विश्वविद्यालया’तून केले आहे. तिने वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आहे व इंग्रजी साहित्यात मास्टर्स केले आहे. त्यानंतर मीनल चार्टर्ड अकाउंटन्सीचा अभ्यास करत होती व त्याचबरोबर मध्यप्रदेशातील नामांकित सी.ए. फर्म्सबरोबर काम करत होती.

• तुमचा ‘नई तालिम’ आणि ‘गांधी’ यांच्या विचारांशी सूर कसा जुळत गेला?

– माझी कंपनी मध्यप्रदेशात ‘संगणकाच्या माध्यमातून शिक्षण’ हा प्रकल्प नामांकित शाळांमध्ये राबवत होती. प्रकल्पाची सुरुवात १९९८ साली मध्यप्रदेशातील सर्वांत ग्रामीण भागात झाली. प्रकल्पाचा विस्तार त्यानंतर मध्यप्रदेशमधील शहरांत झाला. त्याचे फ्रँचायजी मॉडेल महाराष्ट्रातील विदर्भामध्ये सुरू झाले. मी सुरुवातीला भारतातील एका प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीबरोबर काम सुरू केले. पण नंतर ‘विज्ञान आश्रम’च्या डॉ. कलबाग यांनी बनवलेल्या सॉफ्टवेअरचा प्रचार-प्रसार सुरू केला. जेव्हा कलबाग यांच्या ‘विज्ञान आश्रम’ला पहिल्यांदा भेट दिली तेव्हा आयुष्याबद्दल प्रश्न निर्माण झाले. शाळेत नापास झालेल्या मुलांचे प्रयोग तेथे बघितले तेव्हा शाळेचे जुने दिवस आठवले. मी स्वत: नववीत शाळेत नापास झालो होतो, म्हणून नापास झालेल्या मुलांच्या मनाची काय अवस्था असते ते मला माहीत होते, पण आयुष्याच्या धबडग्यात ते सगळे विसरून गेलो होतो.

अशीच काही वर्षे गेली. मुलीला भोपाळच्या नामांकित शाळेत दाखल केले होते. माझे आजोबा भूतपूर्व न्यायाधीश होते आणि आध्यात्मिक व सामाजिक विचारांचे होते. त्यांनी त्या सर्व बाबींवर मला विचार करण्यास प्रवृत्त केले. तिलोनिया (राजस्थान)मधील श्री. बंकर रॉय यांचे  ‘बेअर फूट कॉलेज’, केरळमधील बेबी व शर्ले यांचा ‘कणवू’ हे शिक्षणातील प्रयोग अनुभवले. शिक्षण आणि आयुष्य यांबद्दल योग्य समज येत गेली. मला हे कळले, की मी या consumerist education चा एक भाग आहे आणि मलाच त्यातून आधी बाहेर यावे लागेल. consumerist education वरून हळुहळू विश्वास उडत चालला होता. मीनललासुद्धा तिच्या सीएच्या व्यवसायाबद्दल प्रश्न निर्माण होत गेले. एकूणच, आम्हाला आमच्या शहरी जीवनशैलीबद्दल प्रश्न निर्माण होत गेले. आम्ही दोघांनी आमची जीवनशैली बदलण्याचा निर्णय घेतला. त्या नवीन प्रवासात आमची ‘नई तालीम’ सुरू झाली.

देसाई कुटुंबासोबत 'स्‍यमंतक'मध्‍ये आलेले स्‍पेनचे पाहुणे.• मुलांना ‘ओपन स्कूल’शी कसे जोडून घेतले जाते? ती प्रक्रिया कशी आहे?

– मुळात, आम्ही प्रचलित शाळा-कॉलेज या व्यवस्थेमधील भागच होतो. तरीसुद्धा त्या व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी आम्ही डॉ. कालबाग यांचा ‘व्हिलेज पॉलिटेक्निक’ हा प्रकल्प सिंधुदुर्ग-रत्नागिरीत दहा शाळांमधून राबवला. पण शालेय व्यवस्थेत आणि मानसिकतेत फार बदल करू शकलो नाही. बिनभिंतींच्या शाळेच्या मुलांना ‘ओपन स्कूल’शीच जोडले जाते. ‘ओपन स्कूल’चाच प्रचार-प्रसार केला जातो.

लहान मुलांना (वय सहा ते चौदा वर्षे) ‘नॅशनल ओपन स्कूलिंग’च्या ‘ओपन बेसिक एज्युकेशन’मध्ये नोंदवले जाते. त्या वयोगटावरील मुलांना त्यांच्या आवडीनुसार विविध व्होकेशनल परीक्षांना बसवले जाते.

पण ‘सम्यंतक’ बिनभिंतींची शाळा हे व्यावसायिक परीक्षण केंद्र नाही. ते एक शाश्वत विकास व शाश्वत शिक्षणकेंद्र आहे. तेथे फक्त कौशल्यांवर भर नाही. तो शिक्षणात humanization ला कारणीभूत परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बिनभिंतींची शाळा ही सर्वांसाठी शिकण्याकरता प्रयोगशाळा आहे.

• मुले शाळेत यावी यासाठी प्रचार-प्रसिद्धी करावी लागते का?

– प्रचार-प्रसिद्धी हा व्यावसायीकरणाचा भाग आहे. त्यामुळे आमची वेबसाइट वगळली तर त्यापेक्षा अधिक आम्ही काही करत नाही. आमची प्रेरणा असलेल्या डॉ. कलबाग यांच्या पत्नी मीरा कलबाग (अम्मा) म्हणतात, की कळी जेव्हा फूल बनते तेव्हा भुंगे, फुलपाखरे आपोआप येतात. फुलाला प्रचार-प्रसिद्धी करावी लागत नाही. आमचे काम फुलाप्रमाणे आहे असे आम्हाला वाटते.

• बालसुधारगृह व अनाथाश्रम यांमधून मुलांना तेथे आणताना अडचणी आल्या नाहीत का? उपक्रम सुरू करण्याचा खर्च कुणी, कसा केला?

– प्रथम काही अडचणी आल्या नाहीत. पण येणाऱ्या काळात गंभीर समस्या आहेत. ‘नॅशनल ओपन स्कूलिंग’चे ‘ओपन बेसिक एज्युकेशन’ भारत सरकार २०१५ मध्ये बंद करणार आहे. त्यानंतर त्या वयोगटातील मुलांना शाळेत सक्तीचे शिक्षण होईल. त्याला आमचा विरोध आहे. गावात काही असामाजिक घटक आम्हाला त्रास देण्याकरता ‘आर.टी.ई.’चा वापर करून आम्हाला unconstitutional ठरवू शकतील.

आमच्यासारख्या काही संस्था भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून काम करत आहेत. गोंड आदिवासी समाजात असलेली ‘गोटूल परंपरा’ शहरी आणि विकसित समाजाकडून बंद करण्यात आली. उच्चभ्रू समाजाने संस्कृतिसाक्षर असलेल्या त्या समाजाला अविकसित आणि निरक्षर समजून, त्यांच्या जीवनशैलीला कमी लेखण्याचे काम केले आहे. प्रचलित शाळा-कॉलेजांमध्ये न पाठवता शिक्षणाची सांगड रोजच्या जीवनाशी घालणारे शिक्षण देणाऱ्या काही संस्था व पालक भारतात आहेत. त्या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ‘ओपन लर्निंग फोरम ऑफ इंडिया’ची (O.L.F.I.) सुरुवात नुकती केली गेली आहे. त्याबाबत प्रचार-प्रसार सुरू आहे.

• ‘स्यमंतक’च्या मालकीची शेती किती आहे? त्यात कोणते प्रयोग चालतात?

– धामापूर येथील आमचे घर व जमीन हे सर्व ‘स्यमंतक’ संस्थेच्या नावाने नोंदणी करणे, त्यासाठी जमिनीची मोजणी करणे ही प्रक्रिया सुरू आहे. निधीअभावी कामात अडचणी येत आहेत.

‘स्यमंतक’मध्ये शिकताना वेगवेगळ्या विषयांवर काम केले जाते. त्यातून केलेला अभ्यास गाव-समाजापर्यंत नेला जातो. त्यातूनच आम्ही तीन गावांमध्ये ‘सेंद्रीय शेतकरी गट’ स्थापन केले आहेत. त्या गटांना विविध गोष्टींमध्ये मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांकडूनसुद्धा मुलांना शिकण्यास मिळते. सेंद्रीय शेतीला उपयुक्त असे ‘स्यमंतक’ने बनवलेले ‘पंचगव्य’ व ‘पंचगव्य गांडूळ खत’ प्रसिद्ध आहे. भारतात सर्वप्रथम गांडूळ खताचे काँप्रेस्ड ब्लॉक्स केले गेले. त्या ब्लॉक्संना शहरातील नर्सरीतून चांगली मागणी आली. लाल जास्वंदीच्या फुलांपासून केलेल्या सिरपकरता कृष्णाला गेल्या वर्षी ‘कोकण फ्रूट फेस्टिव्हल, गोवा’मध्ये पहिले पारितोषिक मिळाले. कृष्णाला ‘स्यमंतक’मध्ये येण्याआधी मतिमंद म्हणून पनवेलच्या शाळेतून काढून टाकण्यात आले होते. पुढे तो एक वर्ष मतिमंद शाळेत शिकलाही.

गोव्यात ‘स्यमंतक’च्या उत्पादनाला चांगली मागणी आहे. ‘सेंद्रीय शेतकरी गटां’ना अशी उत्पादने, त्यांचे पॅकेजिंग, मार्केटिंग याबाबत मार्गदर्शन केले जाते. देशी गायींचा प्रकल्प, देशी बियाण्यांची बँक हे काही प्रकल्प ‘स्यमंतक’मध्ये सुरू आहेत.

• ‘स्यमंतक’मध्ये टीव्ही-वर्तमानपत्र नसण्याचा तोटा जाणवत नाही का? मुले भोवतालच्या जगाशी कशी जोडली जातात? जर ती जोडलेली असतील तर  त्यांच्याकडून टीव्ही-वर्तमानपत्राची मागणी होत नाही का?

– टीव्ही-वर्तमानपत्र नसण्याच्या तोट्यापेक्षा फायदा खूप होतो. शहरात जे टीव्ही-वर्तमानपत्र वाचत असतात त्यांना जगात काय चालले आहे याची माहिती असते, पण भोवताली काय आहे याची माहिती नसते. मुळात माहिती आणि ज्ञान यांतील फरक समजून घेतला गेला पाहिजे. शिक्षणाची सुरुवात ही from near to far अशी असली पाहिजे. ‘स्यमंतक’च्या माहिती तंत्रज्ञान कक्षात जवळ जवळ एक हजार पुस्तकांचा वापर विद्यार्थी करतात व त्यासाठी अमर्यादित ब्रॉडबँडचा वापर सक्षमपणे त्यांच्याकडून केला जातो. एल.सी.डी. प्रोजेक्टर वर चांगले चित्रपट, लघुपट इत्यादी बघितले जातात. अॅग्रोवन, सोसायटी, भूमी, दिलीप कुलकर्णी यांचे ‘गतिमान संतुलन’ मासिक यांचे वाचन ‘स्यमंतक’मधील मुले करतात व तो लाभ त्यांना होतो.

• ‘स्यमंतक’ची पुढील पाच दहा वर्षांची काही दिशा ठरवली आहे का?

– स्यमंतक – बिन भिंतीची शाळा हे एक organic learning and sustainable living साठी learning center आहे. येथे रेसिडेंट इंटर्नच्या शिवाय देशविदेशांतून सुद्धा लोक volunteering साठी येतात. त्यांना आम्ही short term intern म्हणतो. धामापूरमधील आमची पारिवारिक जागा ‘स्यमंतक’ला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. येणाऱ्या काळात स्यमंतकीयच ती संस्था चालवतील यासाठी लक्ष केंद्रित करत आहोत.

• येथून बाहेर पडून गेलेल्या मुलांचे गेटटुगेदर होते का?
– अजून तरी नाही, पण भविष्यात करू. ते फेसबुकवर कनेक्टेड असतात.

• काय झाले म्हणजे मुले ‘स्‍यमंतक’मधून बाहेर पडतात?

– बाहेर पडण्यासाठी काही वेळकाळ नाही. कारण तो काही कोर्स नाही; अथवा अकॅडेमिक वर्ष नाही. मुले येतात तेव्हा त्यांसना प्रचलित शिक्षण पद्धतीने अथवा समाजाने नाकारलेले असते. त्यांच्यात स्वावलंबन आले की, ते त्यांडचा मार्ग स्वतः शोधतात. प्रयोगशील शिक्षणातील मुलांना बाजारातील चढाओढ, स्पर्धा अथवा नोक-यांची काळजी नसते. दर वर्षी वेगवेगळ्या पार्श्वभूमीची मुले येतात. आमच्यासाठी ते शिकण्यासाठी वेगवेगळे विषय असतात.

• तुमची कन्या किती वर्षांची आहे? ती कोणतीही डिग्री घेऊ इच्छित नाही का?

– मुलगी दहा वर्षांची आहे. ती राष्ट्रीय मुक्त शाळेतून (NIOS) च्या ओपन बेसिक एज्युपकेशन (OBE) मधून परीक्षा देत आहे. पुढे ती तिच्या आवडीनुसार, कलनुसार तिचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून अथवा तिच्या आवडीनुसार करील. डिग्रीसाठी न शिकता संपूर्ण आनंद आणि माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही शिकावे लागेल ते ती शिकेल. Qualified असणे आणि culturally educated अथवा  culturally literate असणे यांमध्ये फरक आहे.

स्यमंतक
१६३, मु.पो. धामापूर,
ता. मालवण, सिंधूदुर्ग – ४१६६०५
९४०४१६४९४५ / ०२३६५२५५६२०
www.syamantak.cfsites.org

(मूळ लेख – नवप्रभा, पणजी, गोवा)

समीर झांट्ये,
देवसू – पोस्ट कोरगाव,
तालुका पेडणे – गोवा – ४०३५१२
९८२३१२२१६४
sameerzantye@gmail.com

About Post Author

3 COMMENTS

  1. खूप छान उपक्रम आम्ही तुमच्या
    खूप छान उपक्रम. आम्ही तुमच्या या ठिकाणी येणार!

  2. खूप छान उपक्रम आम्ही तुमच्या
    खूप छान उपक्रम. आम्ही तुमच्या या ठिकाणी येणार.

  3. प्रवाहाविरुध्द जावुन ,प्रचलित
    प्रवाहाविरुध्द जाऊन, प्रचलित शिक्षणाचा मार्ग सोडून नवीन वाट निर्माण करणे कठीणच! त्यातही इतरांना मार्गदर्शन करुन ती वाटचाल सहजपणे लक्षणीय करणे… सलाम! अफाट,अलग… कार्यास सफलता मिळो ह्या शुभेच्छा.

Comments are closed.