स्त्रियांची बदलती मनोवस्था

‘द वुमन अनबाऊंड’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
‘द वुमन अनबाऊंड’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ

ग्रंथालीने प्रकाशित केलेले प्रकाशवाट हे पुस्तक‘द वुमन अनबाऊंड’ या पुस्तकाचे मुखपृष्ठमी तेलगु भाषेतून लिहिणार्‍या ‘व्होल्गा’ या लेखिकेच्या ‘द वुमन अनबाऊंड’ या पुस्तकातील कथांचा मराठी अनुवाद केला. ‘ग्रंथाली’ ने ‘प्रकाशवाट’ या नावाने त्यांचा संग्रह मार्च २००९ मध्ये प्रकाशित केला.

‘प्रकाशवाट’च्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे, मला इंग्रजी कथासंग्रहाच्या नावातील ‘अनबाऊंड’ हा शब्द विशेष भावला. त्यातील ‘प्रयोग’ ही लग्नासंबंधी भाष्य करणारी कथा माझ्या मनाला भिडली. मूळ लेखिकेचे आणि माझे सूर, स्वभाव जुळतात असे जाणवले आणि मी त्या कथांचा अनुवाद करू शकले.

त्या पुस्तकास उत्तम प्रतिसाद लाभला. काही महिन्यांपूर्वी मला वसईहून एका बाईंनी फोन करून त्याविषयीचे मत कळवले. संग्रहाबाबत एक गोष्ट विशेष आहे, ती अशी, की माझ्या ओळखीतल्या सन्माननीय पुरुषांचे अपवाद वगळता एकाही पुरुषाची अजून तरी मला प्रतिक्रिया कळलेली नाही! ज्या प्रतिक्रिया आल्या त्या सर्व स्त्रियांच्या होत्या. त्यामध्ये घरकाम करणार्‍या स्त्रियांपासून ते कोल्हापूरच्या ज्येष्ठ लेखिका डॉ. अनुराधा गुरव यांच्यासारख्यांचा समावेश आहे.

मुळात, इंग्रजी कथांचा अनुवाद करताना त्या कथा जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत पोचवण्याकरता त्यांचा मराठी अनुवाद करायला हवा हे मनात होते. त्याला अनुसरून त्यांवर ठिकठिकाणी चर्चा घडवून आणता येतील असा विचार मनात आला आणि तसा योगही जुळून आला. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इथे कै. उदय खानोलकर स्मृती वाचनालयातील वाचकांशी त्या कथांवर चर्चा झाली. चर्चेला अठरा स्त्रिया व चार पुरूष उपस्थित होते. प्रथम, ज्यांनी कथा वाचल्या त्या प्रत्येकाने त्यांना कोणती कथा सर्वात जास्त आवडली ते सांगितले. सर्वच कथा उत्तम आहेत, पण ‘अन्वेषी’ व ‘प्रयोग’ या कथा पेलवणार्‍या नाहीत असा सूर होता. ‘अयोनी’ या कथेतील नायिका लहान मुलगी आहे. सर्वांनीच तिच्याविषयी हळहळ व्यक्त केली. संग्रहातील अनुक्रमे ‘प्रकाशवाट’, ‘अन्वेषी’ आणि ‘प्रयोग’ या कथांवर बरीच चर्चा झाली.

‘प्रकाशवाट’ची नायिका सरस्वती ही उच्चशिक्षित असून कलेक्टरच्या पदावर कार्यरत आहे. परंतु तिच्या पालकांनी तिच्यावर लग्न आणि नवरा यांच्याविषयी जे विचार ठसवण्याचा प्रयत्न केला, तिच्याकडून ज्या अपेक्षा केल्या, त्यांमुळे ती उच्चशिक्षित पण आज्ञाधारक मुलगी तिच्या वकील पतीच्या हातातील बाहुली बनून राहिलेली दिसते. ती तो सांगेल त्या फाईल्सवर सह्या करत असते. तिच्यामधे स्वत:चा निर्णय घेण्याची, तो अंमलात आणण्याची क्षमता राहत नाही. अशा वेळी तिच्या ऑफिसमधील पुरुष सहकारी तिला त्या गोष्टीची तीव्र शब्दांत जाणीव करून देतो. तिला तिच्यातील आत्मविश्वासाच्या अभावाची कल्पना येते. ती त्या क्षणी भविष्यात कधीही परावलंबी निर्णयांनी वागायचे नाही असा निर्णय घेते.

एका तरूण अविवाहित मुलीची कथेवर प्रतिक्रिया – ‘नायिकेवर वर्चस्व गाजवून आपल्या मनासारखे करायला लावणारा पुरूष आणि तिला त्या वर्चस्वातून बाहेर पडायला प्रवृत्त करणाराही पुरूषच. पुरूषाची दोन्ही रूपे कथेत पाहायला मिळतात.’

विवाहित, थोड्या अनुभवी स्त्रियांच्या प्रतिक्रिया – नुसते शिक्षण उपयोगाचे नाही. पालकांनी मुलीत आत्मविश्वास निर्माण करायला हवा होता.

दुसरी बहुचर्चित कथा – अन्वेषी. त्या कथेची नायिका आहे क्रांती. ती बारावीला ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली असते. पठडीतील शिक्षणाचे सर्व पर्याय नाकारणारी. एकूण दिसण्या-वागण्यासंदर्भात स्वत:ला पटेल आणि आवडेल असे वागणारी. तिचे आईवडील त्यांच्या तरुणपणी नक्षलवादी चळवळीत काम केलेले, त्या काळाच्या तुलनेत आधुनिक विचारसरणीचे असतात. परंतु आता त्यांच्या विचारात आणि कृतीत तफावत असते. क्रांती त्याच घरात लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे तिला आई-वडिलांच्या वागणुकीतला दांभिकपणा जाणवतो. ती त्याविषयी त्यांच्याशी परखडपणे बोलते. आई-वडिलांमधे मुलीच्या वागण्याविषयी सदैव चिंता. मुलीने प्रचलित अभ्यासक्रम नाकारल्यामुळे तिच्याविषयी राग. एकमेकांवर आरोप. एकमेकांना समजावणे. शेवटी, वडील आईला समजावताना म्हणतात, ‘बाहेरच्या जगात हरली की येईल परत, जाईल कुठे? पण आईला मात्र वाटते, की तिच्या मुलीचा पराभव न होवो!’

चर्चेत सहभागी झालेल्या तरूण मुलींपेक्षा आयांनाच कथेबद्दल खूप उत्सुकता. मुलांचे करिअर आणि विशेषत: मुलींचे वागणे हा पालकवर्गाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रतिक्रिया अशा होत्या:

१. हल्लीची मुले ही अशीच. त्यांना जबाबदारीने काही करायची इच्छा नसते.

२. एवढे चांगले नव्वद टक्के मार्क्स मिळाले, पालक मेडिकलला, उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवायला तयार आहेत तर मुलीला जायला नको. ती पुढे काय करणार? – प्रश्नच आहे.

३.एवढी हुशार मुलगी असे का वागते? अशा मुलांच्या पालकांनी वागायचे तरी कसे?

चर्चेनंतर मी त्या स्त्रियांना प्रश्न विचारला, ‘कल्पना करा, ही मुलगी तुमची आहे तर तिची आई म्हणून तुम्ही तिच्याबाबतीत काय कराल? तुम्हाला काय वाटेल?’

त्यावर सर्व आयांचा एकूण सूर ‘खूप काळजी वाटेल, वाईट वाटेल’ असा होता. निराशावादी होता. एका बाईंनी तर ‘अशी मुलगी मला झेपणारच नाही. तिच्या टेन्शनने मलाच काहीतरी होईल’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आणि कथेच्या शेवटी, क्रांतीच्या आईने ‘मुलीचा पराभव न होवो’ ही जी इच्छा व्यक्त केली त्यावरून आईच्या आणि वडिलांच्या मुलांकडून असणा-या अपेक्षांमधला फरक अधोरेखित केला. एका पुरूष वाचकाला मात्र तिच्या आईबाबांची दया आली. ‘मी तिचा बाप असतो तर असाच हतबल झाला असतो’ अशी प्रतिक्रिया त्याने सांगितली.

तिसरी कथा- ‘प्रयोग’. त्या कथेमध्ये एक नायक व दोन नायिका. पैकी एक नायिका नायकाची पत्नी व दुसरी त्याची मैत्रीण. मैत्रीण लग्नाआधीपासूनची. पण तिचे विचार पेलवणारे नसल्याने लग्न तिच्याशी न करता, पारंपरिक पद्धतीने, मुलगी बघून विधीपूर्वक केले. प्रत्यक्षात वैवाहिक जीवनाला सुरूवात केल्यानंतर येणा-या वास्तव अनुभवाअंती मैत्रिणीची साथ हवीशी वाटते. पण मैत्रीण ती साथ नाकारते.

ब-याच वाचकांना नायकाच्या मैत्रिणीचे विचार पटले असे दिसले, पण त्यांनी ते पेलवणारे नाहीत याची स्पष्ट कबुली दिली.

इतर कथांमधील ‘प्रयोग’, ‘लग्न-एक-राजकारण’ या कथांतील वास्तवता सर्वांनाच पटली. शेवटही आवडला.‘खरे शत्रू’ या सासूसुनेतील कथेच्या नावात ‘शत्रू’ हा शब्द खटकतो असे मत काहींनी व्यक्त केले.

‘अयोनी’ ही कथा लहान मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्यानंतरची, तिची मनस्थिती व्यक्त करणारी आहे. त्याआधीची तिची मनस्थिती, आनंदी वृत्ती आणि नंतरची मनोवस्था दारूण दु:खद असल्यामुळे आलेली निराशा याविषयी सर्वांनी हळहळ व्यक्त केली. कुठल्याही मुलीवर असा प्रसंग येऊ नये अशी उत्स्फूर्त होती.

‘साथसंगत’ ही कथा जोडीदार गमावलेल्या स्त्रीची आणि पुरूषांमधल्या मैत्रीतून उमलत जाणार्‍या नात्याची, अखेरीस ते कायमच एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. सुखान्त असणारी ही कथा सर्वांनाच आवडली.

– वंदना करंबेळकर,
9850473012,
vaniramay@gmail.com

About Post Author