सौमित्रला ‘मर्क’चा मुकुट! (Soumitra Athavale’s Success)

18
52

 

पुण्याचा सौमित्र आठवले पुण्याच्याच आयसरमधून बीएसएमएस (म्हणजे एम एस्सी) होऊन अमेरिकेतीलशिकागोजवळ अर्बाना शँपेन येथील विद्यापीठात(युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय)  रसायनशास्त्रात पीएच डी करण्यास गेला. त्याला पाठ्यवृत्ती मिळाली होती. सौमित्रने बारावीनंतर आयआयटीची हौस न धरता विशुद्ध विज्ञानाची कास धरली होती. त्याच्या त्या वेगळ्या ध्यासाची गुढी परवा, पाडव्याला नेमकी लागली. सौमित्रला ‘मर्क’ या बहुराष्ट्रीय औषध कंपनीने स्पर्धेतून निवडलेल्या दहा शास्त्रज्ञांपैकी एक असा बहुमान मिळाला. कंपनीचे तसे अधिकृत पत्र त्याला त्या दिवशी मिळाले. त्या दहा शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या रासायनिक प्रक्रिया प्रस्तावांची प्रायोगिक तपासणी कंपनीतर्फे येत्या तीन-चार महिन्यांत होऊन एका प्रस्तावाची निवड होईल व त्या प्रस्तावकर्त्यास दहा हजार युरोचा पुरस्कार दिला जाईल.

          मर्कची ही स्पर्धा जगभरच्या शास्त्रज्ञांसाठी व्यक्तीश: वा चमू म्हणून खुली असते. त्यामध्ये एकादे रासायनिक संयुग वेगवेगळ्या रेणूंपासून कसे बनत जाते ते सैद्धांतिक दृष्ट्या मांडायचे असते. म्हणजे गणितात समीकरणे जशी पदावल्या देऊन सोडवतात तसे. ते संयुग म्हणजे नवा ‘प्रॉडक्ट’च असतो व त्याची उत्पादन प्रक्रिया स्पष्ट करायची असते. ‘मर्क’ ही औषध कंपनी असल्यामुळे ती औषधोपयोगी रासायनिक संयुग बनवण्यास सुचवते. स्पर्धकाने त्यानंतर फक्त शहाण्णव तासांत त्याचा उत्पादन प्रक्रियाप्रस्ताव सादर करायचा असतो. जगभरचे रसायनशास्त्रज्ञ व त्यांचे चमू स्पर्धेच्या घोषणेची वर्षभर वाट पाहत असतात.

 

          सौमित्रने स्पर्धेत भाग घेतला त्या काळातील बौद्धिक आव्हानाचे वर्णन झकास केले. तो म्हणाला, की बुद्धिबळाचा अत्यंत गुंतागुंतीचा असा तो डाव असतो व आपण शास्त्रज्ञ म्हणून त्यात गुंतून गेलेले असतो.
          स्पर्धेतील प्रस्ताव प्राथमिक व अंतिम पातळीवर तपासण्याची रीतदेखील अभिनव आहे. स्पर्धेत एकशेबत्तीस स्पर्धकांनी (व्यक्ती वा चमू) भाग घेतला होता. प्रत्येक प्रस्ताव इतर आठ जणांनी (Anonymously) तपासून पाहायचा व त्यास गुण द्यायचे अशी ही प्राथमिक फेरी असते. सौमित्रने स्वतःही इतर आठ प्रस्ताव तपासून त्यांना गुण दिले होते. अशा रीतीने जगभरच्या एकशेबत्तीस जणांमधून दहा जण निवडले गेले. आता, अंतिम फेरीत त्यांनी सादर केलेल्या प्रक्रिया कंपनीतर्फे प्रयोगशाळेत तपासून पाहिल्या जातील आणि प्रयोगशाळांतील कसोटीला उतरेल तो प्रस्ताव सर्वोच्च, दहा हजार युरो पारितोषिकास पात्र ठरेल. सौमित्रला त्यासाठी शुभेच्छा.      
          सौमित्रची हुशारी बालपणापासून जाणवू लागली होती. तो तिसरी-चौथीत असल्यापासून ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ओढीने वाचू लागला होता. त्याने बारावीनंतर विशुद्ध विज्ञानशाखेचा अभ्यासक्रम जाणीवपूर्वक निवडला. त्याचे पीएच डी चे गुरू स्कॉट डेन्मार्क हे जगद्विख्यात विज्ञानसंशोधक आहेत. त्यांनी सौमित्रची विद्यार्थी म्हणून निवड केली व अभ्यासाच्या तीन वर्षांत त्याला विविध संधी दिल्या, त्याची कसोशीने तयारी करून घेतली. परिणामतः सौमित्रला पीएच डी मिळताच फ्रान्सिस अर्नोल्ड या नोबेल पुरस्कार विजेत्या रसायनशास्त्रज्ञ महिलेने (2018) त्यांच्या प्रयोगशाळेत सौमित्रची सहाय्यक म्हणून निवड केली (At CALTECH – California Institute of Technology). तोच मुळात सौमित्रचा मोठा बहुमान आहे. त्यात आता हा ‘मर्क’चा मानाचा मुकुटही त्याला लाभला आहे.
सौमित्र आठवले  soumitra.a@gmail.com
दिनकर गांगल 9867118517

 

(दिनकर गांगलहे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
———————————————————————————————————————- 
सौमित्रचे पीएच डी चे गुरू स्कॉट डेन्मार्क हे जगद्विख्यात विज्ञानसंशोधक आहेत.

 

फ्रान्सिस अर्नोल्ड या नोबेल पुरस्कार विजेत्या रसायनशास्त्रज्ञ आहेत.
त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत सौमित्रची सहाय्यक म्हणून निवड केली.

———————————————————————————————————-

About Post Author

Previous articleकोरोनावर मात प्राणायामाने! (Pranayam Helps Resist Corona)
Next articleमुसलमानांबद्दलचा आकस (Prijudice Against Muslims)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

18 COMMENTS

 1. वा,छान. आपल्याकडे अशी हुशार मुले आहेत ही अभिमानाची बाब आहे.तुम्ही या अप्रकाशित हि-यांची ओळख वाचकांना करून देत आहात हे काम वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 2. सौमित्रचे हे यश खरेच अभिनंदनीय आहे. विशुद्ध विज्ञानशाखा ही सध्या फारच दुर्लक्षित आहे. नवीन पिढीने यात रस दाखविला तर खूप काही चांगले होऊ शकते. सौमित्रचे उदाहरण त्यासाठी एक उत्तेजन ठरावे.

 3. सौमित्र चे अभिनंदन.तो सगळ्यांसाठी च प्रोत्साहन ठरेल. त्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. इतर मुलांनाही त्याची ओळख नक्की व्हायला हवी.

 4. वेब पोर्टलने सौमित्रची माहिती देऊन खूप चांगले काम केले आहे.अशा संशोधक विद्यार्थ्यांना आपल्या देशात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.तरच आपला देश खऱ्या अर्थाने महासत्तेकडे झेप घेईल!

 5. या वेब पोर्टलमुळे सौमित्रची माहिती कळली .त्याच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन .अशी हुशार मुले आपल्याकडे आहेत हे कळून आनंद वाटला .

 6. सौमित्र चे अभिनंदन.वेब पोर्टलने सौमित्रची माहिती देऊन खूप चांगले काम केले आहे. विशुद्ध विज्ञानशाखा ही सध्या फारच दुर्लक्षित आहे.तो सगळ्यांसाठी च प्रोत्साहन ठरेल.

 7. सौमित्र चे अभिनंदन.वेब पोर्टलने सौमित्रची माहिती देऊन खूप चांगले काम केले आहे. विशुद्ध विज्ञानशाखा ही सध्या फारच दुर्लक्षित आहे.तो सगळ्यांसाठी च प्रोत्साहन ठरेल.

 8. सर्व प्रथम वेब पोर्टलचे मनापासून आभार.सौमित्रचे हार्दिक अभिनंदन.नवोदित पिढींसाठी प्रेरणदायी कार्य. भविष्यातील वाटचालीस तेजोमय हार्दिक शुभेच्छा.

 9. आपल्या देशात संशोधक घडणे गरजेचे आहे आणि म्हणूनच सौमित्रचे विशेष अभिनंदन

 10. सौमित्र चे विशेष अभिनंदन.बेसीक विज्ञान त्याने निवडले.आणि आयसर मधुन त्याची निवड झाली.संशोधनात रामबाण व्हाव लागत.त्याने देशाचे नाव उज्ज्वल केले.त्याचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे

 11. माझ्या मते यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे सौमित्र बद्दल मला प्रथमच थिंक महाराष्ट्र च्या site वरच माहिती मिळाली. त्याआधी मला ही बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात किंवा कुठल्याही मराठी चॅनेल वर दिसली नाही. म्हणजे मी सर्व वर्तमानपत्रे पुर्ण वाचतो किंवा सर्व मराठी चॅनेल २४ तास बघत असतो असे नाही. पण इतर काही बातम्याना जे weightage मिळते, उदा. कोणी क्रिकेटपटूने शतक ठोकले, किंवा कोणा हिंदी चित्रपट क्षेत्रातील हिरो, हिरॉईन चा चित्रपट हिट झाला , त्याने कितीशे कोटींचा धंदा केला वगैरे वगैरे. तेवढे महत्व या बातम्याना मिडीया कडून दिले जात नाही. कदाचित media असे म्हणू शकेल की लोकांना अशा बातम्या वाचायला , ऐकायला आवडत नाहीत. आम्ही लोकांना जे आवडतं तेच देतो. थोडक्यात जे विकते तेच आम्ही देतो. माझा प्रश्न असा की मग लोकांची अभिरूची तुम्ही का बदलत नाही. ती जबाबदारी media ने उचलायला नको का ? दुसरा मुद्दा असा की या प्रकारच्या शिक्षणासाठी परदेशातच जाणे गरजेचे का आहे ? ज्या सोयी, संधी , सूविधा परदेशात मिळतात त्या इथेच का उपलब्ध करून देऊ शकत ? एकतर सरकार किंवा खाजगी क्षेत्रातील प्रंचंड श्रीमंत बलाढ्य उद्योजक, उदा.अंबानी, अदानी इ. त्यांची या देशाशी काही बांधिलकी आहे की नाही. सर मी कोणी विचारवंत वगैरे नाही. नॉर्मल सामान्य माणसाला जे वाटेल तेच मी लिहीले आहे. प्रदीप पाटील.

 12. सध्याच्या निराशावादी पार्श्वभूमीवर जगाला पुढे नेणारी क्षेत्रे आणि व्यक्ती समाजासमोर आणीत आहात हे फार महत्वाचे आहे.मनाला काम चालू ठेवण्यास उभारी मिळते …धन्यवाद

 13. अप्रतिम लेख. सौमित्राचे मनापासून अभिनंदन. विशुद्ध विज्ञान म्हणजे कोणता विषय, हे कळलं तर बरं होईल.

 14. सौमित्र ग्रेट! अभिनंदनया व्यसपीठावर असेच हिरे चमकू देत!त्यांना शुभेच्छा!आणि आपल्या या उपक्रमालाही!

 15. खूप अभिनंदन सौमित्र,भारतीयांना अभिमांनाच्या उंचीवर ठेवल्याबद्दल तुझे शतशः आभार

 16. सौमित्र आठवले या युवकाने ई मर्क च्या स्पर्धेत भाग घेऊन त्यामध्ये जे अभिमानास्पद यश मिळविले आहे ते भारतातील तरुण पिढीला संशोधन क्षेत्राकडे वळविण्यासाठी एक आदर्श म्हणून उपयोगी पडेल असा विश्वास आहे. नोबेल पारितोषिक विजेती बरोबर काम करण्याची संधी त्याला प्राप्त झाली आहे. मर्क च्या स्पर्धेत १३२ स्पर्धकांमधून जर दहा निबंध निवडले त्यातील एक सौमित्र चा आहे. मर्क कम्पनी सेंद्रिय कार्बनी क्षेत्रात अतिशय नावाजलेली जर्मन कम्पनी आहे. मर्क ची रसायने जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या एकूण गुणवत्तेविषयी शास्त्रीय जगात अपार आदर आहे. त्या पार्श्वभूमीवर सौमित्राचे यश उल्लेखनीय आहे. त्याच्या भावी संशोधनासाठी भरपूर शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here