सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर मंदिर

1
39
carasole

श्री सिद्धरामेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत! महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील भक्तांचे ते आराध्य दैवत! सिद्धेश्वर मंदिराचा परिसर छत्तीस एकरांचा आहे. तिन्ही बाजूंला सरोवर आहे व ते स्वच्छ ठेवले आहे. मंदिराआधी डाव्या बाजूस ग्रंथालय व पुढे हनुमान मंदिर आहे. मुख्य मंदिर भव्य आहे. मंदिरावर व कळसावर कलाकुसर आहे. रोज अन्नछत्र असते व मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्याचा लाभ घेता येतो. मंदिरात स्वच्छता आढळते. गाभाऱ्यात शंकराची पिंडी असून त्यावर मुखवटा बसवला आहे.

मंदिराच्या पंचकमिटीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात बारा विद्यालये व दोन महाविद्यालये चालवली जातात. विद्यार्थी वसतिगृहही आहे. तेथे कोणतीही देणगी न घेता प्रवेश दिला जातो. राहणे व जेवण मोफत आहे. मंदिरात लायब्ररीही आहे.

सोलापूरचे जुने नाव सोन्नलगी! श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर या सिद्धपुरुषाने बाराव्या शतकात सोलापुरात अवतारी कार्य केले. त्यांची महती अशी होती, की ते जेथे जात ती भूमी पुण्यक्षेत्र होई. त्यांनी सोलापुरात अडुसष्ठ शिवलिंगांची स्थापना केली व छत्तीस एकर क्षेत्रफळाचे सरोवर निर्माण केले. तोच सिद्धेश्वर तलाव! तलावाच्या मध्यभागी बेट तयार करून तेथे तपश्चर्या केली, तेथे सिद्धेश्वर मंदिर उभे आहे. त्या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली, समाजसुधारणा केल्या. विशेष म्हणजे त्या काळी गोरगरिबांचे सामुदायिक विवाह लावून दिले. दरवर्षी मकर संक्रातीला तेथे यात्रा भरते (12 जानेवारी ते 16 जानेवारी). तैलाभिषेक, काठ्यांची मिरवणूक, अक्षता सोहळा असे धार्मिक कार्यक्रम होतात. लक्षावधी लोक जमतात ते सर्व पांढऱ्या पोशाखात! पांढरी टोपी, सदरा, धोतर वा लेंगा असा सर्वांचा वेष असतो. भाविकांना यात्रा काळात राहण्यासाठी यात्री निवासाची सोय आहे.

– प्रमोद शेंडे

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.