सोलापूरची उद्योगवर्धिनी: हजारो महिलांचे सक्षम हात! (Udyogvardhini – Power to Solapur’s Women)

चंद्रिका चौहान
सोलापूरच्या उद्योगवर्धिनीच्या प्रमुख आहेत चंद्रिका चौहान. उद्योगवर्धिनी हे सोलापूर परिसरातील महिलांच्या अल्पबचत गटांचे मोठे नेटवर्क आहे. चंद्रिका चौहान या देखील सरळ साध्या गृहिणीपासून खूप मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होऊन गेल्या आहेत. त्या सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. सध्या त्या मनरेगाची मध्यवर्ती समिती, सेवाभारती अशा राष्ट्रीय संस्थांच्या सदस्य आहेत.
उद्योगवर्धिनीचे काम 1993 साली सुरू झाले. आठ-दहा मैत्रिणींनी एकत्र येऊन आरंभलेले छोटेखानी काम होते ते. पाहता पाहता, त्यांचा पसारा वाढत गेला. तेव्हा संस्थेची नोंदणी 2004 साली केली गेली. उद्योगवर्धिनी हे नाव उद्योगाशी जरी जोडलेले असले तरी संस्थेचा मूळ उद्देश उद्योगिनी निर्माण करणे हा आहे. संस्थेने सामाजिक जाणिवेतून काही उपक्रम सुरू केले आहेत. त्या त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या व्यक्तींची काळजी उत्तमपणे घेत असतात.
उद्योगवर्धिनीचे कार्य तीन पदरी चालते. अन्नपूर्णा, टेलरिंग आणि पाखर संकुल अशा नावाने ती कामे चालतात. नावे सुचवतात त्याप्रमाणे अन्नपूर्णा विभाग भोजन व्यवस्थेची काळजी घेतो. टेलरिंग विभाग वस्त्रप्रावरण क्षेत्रात कार्य करतो आणि पाखर संकुल लहान मुलांची काळजी घेते. पण गंमत बघा, ‘उद्योगवर्धिनी स्वत: त्यातील कोणतीही कामे करत नाही. ती महिलांच्या बचत गटांकडून करवून घेतली जातात. एक आहे, की उद्योगवर्धिनीतर्फे बचत गटांना मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि त्या-त्या कामाशी जोडले जाते. उदाहरणार्थ, एखादा बचत गट शेंगांची चटणी बनवणार असेल तर त्यांना फक्त ते बनवण्यास लावायचे आणि मग ऑर्डरनुसार त्यांच्याकडे कामे येत राहतात. उद्योगवर्धिनीने या तऱ्हेने जवळपास दहा हजार बचतगटांना प्रशिक्षण देऊन उद्योगाच्या दिशेने नेले आहे. त्याशी संलग्न तेथील स्त्रीने ती आहे त्याच ठिकाणी राहून स्वतःचे काहीतरी सुरू करावे आणि सक्षम व्हावे असे काम उद्योगवर्धिनीकडून सुरू आहे. उद्योगवर्धिनीच्या सल्लागार अपर्णा रामतीर्थकर आहेत.
अन्नपूर्णा विभागात दोन योजना कार्यरत आहेत – पहिली अन्नपूर्णा योजना आणि दुसरी सरस्वती योजना. ना नफा ना तोटा तत्त्वावर या योजनेचे काम चालते. रोटरी क्लबचे सहकार्य या योजनेस आहे. योजनेत शंभर वृद्धांसाठी जेवण बनवले जाते. मठाच्या परिसरातील शंभर गरजू वृद्धांना दोन वेळच्या जेवणाचे डबे दिले जातात. दूरवरच्या भागातील वृद्धांना डबे घरी पोचवले जातात. संस्थेने त्याकरता दोन रिक्षा कायम ठरवलेल्या आहेत. सरस्वती योजनेच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य पोळीभाजी देण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. जैन समाजाकडून भुकेलेल्यांना गरम पोळीभाजी देण्याचे काम जैन रोटीघरच्या माध्यमातून चालते. जैन समाजाने ते काम उद्योगवर्धिनीकडे २०१२ साली सोपवले. शालेय पोषण आहारातून चार शाळांना (जवळपास दोन हजार विद्यार्थी) त्यांच्या नियोजित वेळेत पोषण आहार पोचवला जातो. या सगळ्या कामांमुळे अन्नपूर्णा विभागाला बाहेरून जेवण बनवण्याच्या ऑर्डर्स मिळत असतात. जसजशा ऑर्डर वाढत गेल्या तसतसे बचतगटांना जोडून घेऊन, त्यांना प्रशिक्षण देऊन ती जादा कामे त्यांच्याकडे सोपवली जातात.
चंद्रिका चौहान यांचे चिरंजीव मयंक हेदेखील उद्योगवर्धिनीसाठी भरपूर काम करतात. ते सांगतात, दिवाळीच्या दोन महिने आधी आम्हाला किचनची जागा वाढवावी लागते. कारण दरवर्षी संस्थेकडे फराळाची मागणी खूप असते. ऑर्डर येतात तसतसे पदार्थ बनवले जातात. त्या व्यतिरिक्त भाजणीची चकली, धपाटे, ज्वारीची कडक भाकरी (नव्वद दिवस टिकेल अशी), शेंगांची चटणी, काळा मसाला, तांदूळ पापड, कुरडई, शेवया, सांडगे, भरली मिरची, राजगिरा लाडू, शेंगांच्या पोळ्या, तिळगुळ हे पदार्थही बनवले जातात. उद्योगवर्धिनीच्या स्टोअरमध्ये ते पदार्थ असतात. किचनमधील वातावरण मनमोकळे असते. दुसऱ्या दिवशीचा किंवा पुढील आठवड्यातील जेवणाचा मेन्यू तेथे लावलेला असतो. प्रत्येक महिलेकडे तिचे तिचे काम वाटून दिलेले आहे. त्यामुळे कामाचा ताण निर्माण होत नाही. एखाद्या महिलेला काही कारणास्तव येणे जमले नाही तर तिच्याऐवजी दुसऱ्या महिलेला ते काम करावे लागते. त्या महिलेला अधिक काम केल्यामुळे अधिक भत्ताही मिळतो. किराणा सामान, भाजीपाला आणण्यासाठी त्यांचे दुकानदार ठरलेले आहेत. चपात्या बनवण्यासाठी लागणारे पीठ बाहेरून न घेता काही बचतगटांना गिरणी कर्जावर घेऊन देऊन त्यांच्याकडे गहू दळण्याचे काम दिले जाते. अशा तऱ्हेने एकेक उद्योगिनी सक्षम बनत आहे.
दुसरा टेलरिंग विभाग. तेथील महिलांनी शिवलेले विविध प्रकारचे ब्लाउज, ड्रेस, कापडी पिशव्या, रजई आणि गोधड्या असे अनेक प्रकार. महिलांना टेलरिंगविषयी बेसिक प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंगचे तंत्र समजावून सांगितले जाते. त्यानुसार तेथेही बाहेरून जशा ऑर्डर येतील तसे त्यांचे काम सुरू राहते. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतींनी डिझाइन करून बनवलेल्या पर्स आकर्षक दिसतात. सोलापूरला नॅपकिन बुके देण्याची पद्धत प्रसिद्ध आहे, त्याचेही काम तेथे चालते. नॅपकिन बुके बनवून विक्रीसाठी बाहेर पाठवले जातात. शिलाई प्रशिक्षणामुळे हजारापेक्षा अधिक महिला-मुली आत्मनिर्भर झाल्या आहेत. प्रशिक्षण दिल्यानंतर, टेलरिंगचा परवाना, उद्योगवर्धिनी कपड्यांचे उत्पादन कसे वाढवावे? विक्री कौशल्य यांसाठी मार्गदर्शन केले जाते. रजईची गॅरंटी असते. महिला विक्री कौशल्यात सेल्समनलाही फिके पाडतील अशा तयार झालेल्या आहेत. महिला आपुलकीने आणि मन लावून काम करत असतात.
उद्योगवर्धिनीचे काम सोलापूरच्या दत्त चौकातील शुभराय मठाच्या जागेत चालते. इमारतीत वरच्या मजल्यावर शंकर महाराज समुहाचे पाखर संकुल आहे. पाखर संकुलाच्या सचिव शुभांगी बुवा आहेत. टाकलेल्या मुलांचा सांभाळ संकुलात होतो. एक दिवसापासून ते सहा वर्षांपर्यंतची सोळा मुले-मुली संकुलात आहेत. मी संकुलात गेलो तेव्हा अगदी शांत वाटत होते. मी आत गेल्या गेल्या एक छोटी मुलगी दिसली. अपंग होती. पालकांनी तिला व्यंगत्व आले म्हणून रस्त्यावर सोडून दिले होते. दोन-तीन बालके झोपली होती. चार-पाच लहान मुले-मुली मस्त खेळत होती. त्यातील एक चिमुकली माझ्याकडे पाहून हसली. वयोगटानुसार बालकांसाठी वेगवेगळ्या खोल्या आहेत. मी सहा महिने ते दीड वर्षे वय असलेल्या बालकांच्या खोलीत गेलो तर लहान मूल, वर्षभराचे असेल, बसायला होत नाही पण प्रयत्न करत होते. मी त्याला अगदी अलगद उचलले. रडण्याचा जराही आवाज नाही. तेथे एक ताई लहान बाळाला बाटलीने दूध पाजत होत्या. ते बाळ साधारण महिन्याभराचे असेल. सोळा मुला-मुलींचा सांभाळ करण्यासाठी एकूण सतरा महिला आहेत. संकुल स्वच्छ दिसत होते. मुलांची आरोग्य काळजी घेतली जाते. मुलांसाठी एक विशेष किचन आहे. जेवण बनवून झाले की स्वतः चाखूनच मुलांना ते द्यायचे अशी शबरी पद्धत तेथे आहे. मुलामुलींची नावे त्या त्या ताईला जे आवडेल ते नाव तिच्या ताब्यातील बाळाला ठेवले जाते किंवा मग एकमताने नाव ठेवले जाते. एक मुलगी नवमीच्या दिवशी मिळाली. त्यामुळे तिचे नाव नवमी ठेवले गेले. संकुलात एक फलक आहे, त्या फलकावर प्रत्येक मुला-मुलीचे नाव, वजन आणि त्यांना सांभाळणारी ताई असे तक्ते आहेत. संकुलातील मुलांना दत्तक दिले जाते. तेथील सगळा कारभार ऑनलाईन आहे. मुलाला/मुलीला दत्तक दिल्यानंतरदेखील संस्थेकडून कायदेशीर रीत्या फॉलोअप सुरू असतो.
सगळ्या महिलांचे आणि उद्योगवर्धिनीचे ऋणानुबंध चांगले आहेत. महिलांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी महिन्याला काही ठरावीक शिष्यवृत्ती दिली जाते’; वेळप्रसंगी आर्थिक सहाय्यही केले जाते. आजारपण, लग्नकार्य अशा प्रसंगीही हातभार लावला जातो. तेथे काम करणाऱ्या महिलांच्या मुलामुलींना मठात दर शनिवार-रविवार चित्रकला, हस्तकला, संगणक असे विषय मोफत शिकवले जातात. उद्योगवर्धिनीने काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम केले आहेत. त्यांनी लोकमंगलच्या सामुदायिक विवाह सोहळ्यांत पहिली चार वर्षे एकूण एक लाख चपात्या बनवल्या. समाजाच्या सहकार्याने दरवर्षी पाचशे ते सातशे भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली आहे. तेथील प्रत्येक महिलेची कामाची जिद्द व कामाबद्दलची आस्था विशेष वाटली.

शैलेश दिनकर पाटील 9673573148 patilshailesh1992@gmail.com

शैलेश पाटील हे कल्‍याणचे राहणारे. ते एम.एस.इ.बी.मध्‍ये कार्यरत आहेत. ते हौसेने लेखनही करतात. त्‍यांचा ओढा भवतालच्‍या सांस्‍कृतिक गोष्‍टींकडे आहे. थिंक महाराष्‍ट्रच्‍या नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेधया मोहिमेच्‍या निमित्‍ताने ते थिंक महाराष्‍ट्रच्‍या वर्तुळात आले.—————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here