सेवालय – एका प्रार्थनेची गोष्ट

carasole

‘‘इतनी शक्‍ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना…’’

रवी बापटलेचिमणीसारखी असलेली चिमणी, विश्वास, गायत्री, अनिकेत, सोनाली, अक्षय ….सारेजण डोळे मिटून प्रार्थना म्‍हणत असतात. त्‍यांना पाहून इकडे कितीही प्रयत्‍न केले तरी माझे डोळे मात्र पुन:पुन्‍हा भरून येतात! ओळखीच्‍या त्‍या शब्‍दांमागे दडलेले वेदनेचे अर्थ कमालीचे अस्‍वस्‍थ करत जातात.

चिमणी, धीरज – वय वर्षे सहा, विश्वास – वय वर्षे सात, गायत्री – वय वर्षे आठ आणि इतर अठरा जण. ‘सेवालया’त एकूण पंचवीस मुले-मुली आहेत. ही सारी चिमुरडी HIV+ आहेत. रवी बापटले यांनी या निष्‍पाप जिवांचे मायबाप होत, त्‍यांची शैक्षणिक-सामाजिक जबाबदारी उचलत स्‍वतःला ‘सेवालय’ प्रकल्‍पास वाहून घेतलेले आहे. हा माणूस ‘दैनिक संचार’ या वृत्‍तपत्राचे जिल्‍हा प्रतिनिधीपद आणि ‘एमआयटी’ सारख्‍या नामांकित महाविद्यालयातील प्राध्‍यापकी सोडून चार वर्षांपासून ‘सेवालय’च्‍या माध्‍यमातून ह्या मुलांसाठी काम करतोय.

याबाबत विचारले असता बापटले अगदी सहज-साधेपणाने सांगू लागतात, ‘‘प्राध्‍यापक म्‍हणून काम करत असताना, काही विद्यार्थ्‍यांना सोबत घेऊन 30 मार्च 2006 रोजी ‘आम्‍ही सेवक’ अभियान सुरू केले होते. त्यामध्‍ये आम्‍ही पहाटे पाच वाजल्‍यापासून आठ वाजेपर्यंत लातूर  शहरात स्‍वच्‍छता मोहीम राबवली. सव्‍वा वर्षे चाललेल्‍या त्या मोहिमेत आम्‍ही स्‍वच्‍छता, जनजागृती, तातडीचे रक्‍तदान शिबिर असे उपक्रम राबवले. शासनाकडून लातूरला स्‍वच्‍छतेचे प्रथम पारितोषिक त्‍या वर्षी मिळाले. त्यादरम्‍यान, माझे गाव धोंडीहिप्‍परगा येथे दुर्घटना घडली. मुंबईस वेठबिगारी करणा-या जोडप्‍याचा मुलगा उपचारांअभावी HIV+मुळे वाईट अवस्‍थेत मरण पावला. गावकर्‍यांनी अज्ञान अन् अंधश्रद्धा यापायी त्या मुलाला अन्‍नपाण्‍यावाचून एका खोलीत कोंडून ठेवले. त्या घटनेचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. प्रश्‍नाची दाहकता मला सुन्‍न करून गेली. तेव्‍हाच मी HIV+ मुलांसाठी काम करण्‍याचा निर्णय घेतला. मी लहानपणापासून भावाकडे शिकायला म्हणून राहत होतो. कुटुंबात राहिलो की त्‍या कुटुंबाचा अधिकारही प्रकल्‍पावर येईल म्‍हणून मी घर सोडले; लग्‍न न करण्‍याचा निर्णय घेतला आणि 14 ऑगस्‍ट 2008ला नोकरीही सोडली.’’

Punha 'School chale hum'..."‘सेवालय’ची सुरुवात केली तेव्‍हा मी एकटाच होतो, पण चालताना अनेक समविचारी मित्र, मान्‍यवर, तरुण-तरुणी स्‍वयंस्‍फूर्तीने सोबतीला आले; ते ‘सेवालय’मधल्‍या मुलांचे आई, बाप, बहीण, भाऊ बनले. माझे मित्र शांतेश्वर यांचे आजोबा मन्‍मथाप्‍पा मुक्‍ता यांनी ‘सेवालय’साठी साडेसहा एकर जमीन दान केली. ‘आम्‍ही सेवक’च्‍या टीममधील काही तरुणांनी सहकार्य केले. आम्हाला ‘सेवालय’च्‍या उभारणीसाठी निधीची आवश्‍यकता होती. मग आम्‍ही लातूरच्‍या शाळा-कॉलेजांत जाऊन मदतीसाठी आवाहन केले. शाळांमध्ये ‘खाऊमधून एक रूपया’ ही मोहीम सुरू केली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून साठ हजार रुपये गोळा झाले. शासकीय अधिकार्‍यांनी कायम सहकार्य केले. आम्ही ‘पैसे नकोत, मूठभर तांदूळ द्या’ अशी मोहीम राबवली. तिलाही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. काही शाळा तर दर आठवड्याला तांदूळ पाठवतात. आरंभी एखादा मुलगा आजारी पडायचा, अत्‍यवस्‍थ व्‍हायचा, तेव्‍हा त्‍याला दगडधोंड्यांतून वाट काढत दुचाकीवर शहरात न्‍यावे लागे. खूप हाल व्‍हायचे. मग ‘दैनिक एकमत ’चे संपादक शरद कारखानीस यांनी वर्तमानपत्रातून संस्थेच्‍या मदतीसाठी आवाहन केले अन् लोकवर्गणीतून ‘सेवालय’ला रूग्‍णवाहिका मिळाली.’’ हे सर्व सांगता सांगता बापटले गहिवरले.

‘सेवालय’ जरी लोकसहभागातून चालत असले, तरी ‘सेवालय’ला स्‍थापनेच्‍या वेळी लोकप्रतिनिधींपासून जनसामान्‍यांपर्यंत अनेक पातळ्यांवरून विरोधच झाला होता. तो वर्तमानपत्रांतून गाजलाही होता. शाळांतून गोळा करण्‍यात आलेल्‍या साठ हजार रूपयांतून जुलै 2007मध्‍ये ‘सेवालय’च्‍या कार्यालयासाठी दोन खोल्‍या बांधण्‍यात आल्‍या. त्‍या बांधत असताना गावक-यांनी विरोध केला. ‘सेवालय’च्‍या एका बाजूस गाव आहे तर दुस-या बाजूस लमाणांचा तांडा. गावकर्‍यांनी काही जणांना ‘सेवालय’विरुद्ध भडकावले. एके रात्री तर साठ-सत्‍तर लोकांचा जमाव ‘सेवालय’वर चालून आला आणि त्यांनी कार्यालयासाठी बांधलेल्‍या दोन खोल्‍या पाडल्‍या. बापटले यांनी पोलिसांचे संरक्षण मागितले. पण त्यांना वादही वाढवायचा नव्‍हता; म्‍हणून त्‍यांनी कोणावर पोलिसकेस केली नाही. ज्‍या लोकांनी ‘सेवालय’वर हल्‍ला केला त्‍या लोकांनी कालांतराने ‘सेवालय’चे काम पाहिले आणि त्‍यांचे मतपरिवर्तन झाले. त्याचे उदाहरण म्‍हणजे ‘सेवालय’चे बांधकाम पाडताना पुढे असलेला प्रकाश आडे हा तरुण त्‍याच्‍या पत्‍नीसह ‘सेवालय’मध्‍ये पूर्णवेळ काम करतो. लमाणांचा तांडा बापटले आणि ‘सेवालय’ यांच्‍या बाजूने आहे. बापटले स्‍वतः त्‍या तांड्यात जाऊन काही अॅक्टिव्हिटी घेतात. गाव त्यांच्या कामास जोडले गेले नसले तरी तांडा जोडला गेला आहे अशी भावना बापटले यांची आहे.

Ravi Baapatle with prakash & manda aamte,madhaw baawgeबाजूच्‍या गावाने प्रकल्‍पास वीज देण्‍यासाठी नकार दिला. तो काळ ‘सेवालय’साठी बराच खडतर होता. अशा कितीतरी दिव्‍यांमधून जात ‘सेवालय’ उभे राहिले! चिमुरड्यांना गावच्‍या शाळेत प्रवेश नाकारण्‍यात आला. गावकर्‍यांनी ‘आमच्‍या पोरास्‍नी शेण काढाय पाठवू पर ‘त्‍या’ पोरांबरूबर शाळंत घालणार नाय’ अशी भूमिका घेतली. त्‍यांचा (गैर)समज एचआयव्हीबाधित मुलांसोबत राहिल्‍याने आपल्‍या मुलांनाही HIV+ ची लागण होईल असा होता.

शेवटी बापटले यांनी महत्‍प्रयासाने गावकर्‍यांची हरप्रकारे समजूत घालून मुलांसाठी शाळेचे दरवाजे उघडायला लावले. बापटले यांनी गावकर्‍यांची हात जोडून विनंती करत त्‍यांचे प्रबोधन करण्‍याचा प्रयत्‍न केला. ‘सेवालय’ची मुले गावातील इतर मुलांच्‍या बरोबरीने शिक्षण घेत आहेत. शिक्षणाचे दरवाजे उघडले गेले आहेत, पण बहुतेकांच्‍या मनाचे दरवाजे अजूनही बंद आहेत. हसेगावच्‍या ग्रामपंचायतीकडून ‘सेवालय’वर घालण्‍यात आलेला बहिष्‍कार कायम आहे!

‘सेवालय’चा 14 ऑगस्‍ट हा वर्धापनदिन. उजाड माळरानावर पाया खोदून दगड-माती-विटांनी हिरवेगार, रम्‍य ‘सेवालय’ उभे राहण्‍याच्‍या प्रवासात अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा सहभाग आहे. ‘सेवालय’कडून 14 ऑगस्‍ट अन् 31 डिसेंबरला रॅली काढून, व्‍यसनमुक्‍ती अन् एडसविषयक जनजागृती करण्‍याचा उपक्रम दरवर्षी केला जातो. पेटती मशाल अन् फडकता तिरंगा घेऊन मोठ्या व्‍यक्‍तींसह ‘सेवालया’तील चिमुरडीही लातूरपर्यंतचे अकरा किलोमीटर अंतर धावत पार करतात. रॅली लातूरच्‍या वेगवेगळ्या मार्गांनी दरवर्षी काढली जाते. रॅलीचे गांधी चौकात पोचल्‍यानंतर राष्‍ट्रगीतासह विसर्जन होते.

सेवालयअनेक व्‍यक्‍ती ‘सेवालय’शी जोडल्‍या गेल्‍या आहेत. एस.टी.चालक असणारे शिवराज टिमके सरांसह मुलांचेही मामा बनले. मेडिकल रिप्रेझेण्टेटिव्‍ह असलेले सूर्यकांत बंडवार यांना अपघात झाला. त्यांनी बारा महिने बेडवर राहिल्‍यानंतर समाजाची सेवा करण्‍याचा निश्चय केला. त्‍यांना ‘सेवालय’बद्दल कळले. सूर्यकांत बंडावार ‘काका’ इथे आले. त्‍यांच्‍या पत्‍नीही समजून-उमजून त्‍यांना साथ देतात. ती दोघेही ‘सेवालय’मध्‍ये पूर्णवेळ काम करत आहेत. काकूंनी स्‍वयंपाकाची तर काकांनी औषधोपचाराची जबाबदारी उचलली आहे.

‘सेवालय’ची धर्मदायआयुक्तांकडे नोंदणी झाली आहे. बापटले यांनी मुलांना निवासी ठेवण्‍यासाठीचा परवाना मिळवला आहे. ‘सेवालय’ची वास्‍तू लहान लहान खोल्‍यांमध्‍ये विभागलेली आहे. एका बाजूला चार रूम आहेत. त्‍यात लहान मुले झोपतात. खासदार रूपाताई पाटील-निलंगेकर यांनी संस्‍थेला पाच लाखांची मदत केली होती. त्‍यातून एक हजार स्‍क्‍वेअर फुटांचा हॉल बांधण्‍यात आला आहे. शाहू कॉलेजचे पहिले प्राचार्य, स्‍वामी रामनंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि लातूरचे नगरसेवक-खासदार डॉ. जर्नादर वाघमारे यांच्‍याकडूनही ‘सेवालय’ला दहा लाखांची मदत करण्‍यात आली आहे. ‘सेवालय’साठी गवत-काठ्यांपासून चार कुट्या तयार करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यांपैकी एकीत रवी बापटले राहतात. उरलेल्‍या तीन कुट्यांमध्‍ये मुले दिवसभर असतात. गावकर्‍यांकडून करण्‍यात आलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर पुन्‍हा गैरप्रकार घडू नयेत यासाठी रात्र झाल्‍यानंतर मुलांना हॉलमध्‍ये झोपण्‍यास पाठवले जाते. सात अॅटॅच संडास-बाथरूमची सोय आहे. एक मोठे स्‍वयंपाकघरही आहे. संस्‍थेने सर्वप्रथम बांधलेल्‍या दोन खोल्‍यांचा वापर कार्यालय आणि धान्‍याची कोठी म्‍हणून केला जातो.

 

लातूरपासून अकरा किलोमीटर दूर हासेगावजवळ ‘सेवालय’ उभे आहे. ‘सेवालय’कडून दरवर्षी एक ते पाच मे दरम्‍यान श्रमशिबीर घेतले जाते. श्रमदानातून शेततळे, भाजीपाल्‍यासाठी अर्धा एकर जमीन, ‘सेवालय’च्‍या कुट्या आणि एक नर्सरी तयार करण्‍यात आली आहे. नर्सरीमध्‍ये बाराशे झाडे असून त्‍यांपैकी नऊशे झाडे केशर आब्‍यांची आहेत. त्‍यांचे उत्‍पन्‍न सुरू होईल.

प्रत्‍येक मुलाचा महिन्‍याचा किमान खर्च दोन हजार रूपये असतो. प्राथमिक, औषधोपचार, शिक्षण वगैरेंचा खर्च बर्‍यापैकी भागतो. ‘मुले दत्‍तक योजना’अंतर्गत आतापर्यंत सतरा जोडप्‍यांनी येथील प्रत्येकी एक मूल दत्‍तक घेतले आहे. मुलाच्या महिन्‍याच्‍या खर्चातील अर्धी रक्‍क्‍म जोडप्याकडून देण्‍यात येते. ‘सेवालय’ची टीम एडसबद्दल जनजागृती करण्‍यासाठी महाराष्‍ट्रभर फिरते. देणगीसाठी आवाहनही केले जाते. त्यातून जमा होणारा निधी ‘सेवालय’साठी वापरला जातो.

‘सेवालय’ कोवळ्या वयातल्‍या मुलांचा केवळ सांभाळ करून थांबणार नाही, तर रवी बापटले यांनी मुलांचे आर्थिक-सामाजिक पुनर्वसन करण्‍याचा निर्धार बोलून दाखवला. योग्‍य वयात त्यांचे विवाह लावून देऊन त्‍यांचे भविष्‍य अधिकाधिक आश्‍वासक बनवण्‍याचे बापटले यांचे स्‍वप्‍न आहे.
मुलांना भेटायला ‘सेवालया’त गेले की ती बिलगतात अन् भरून आलेले डोळे घेऊन निरोपाचा हात सोडता सोडत नाहीत. नववीत असलेली राणी बोलकी आणि हुशार आहे. ही पोर स्‍वतःची खरीखुरी कहाणी सांगत लोकांना बदलण्‍याचे आवाहन करत महाराष्‍ट्रभर फिरते. राणी म्‍हणते, की मला लोक विचारतात, तुला मोठेपणी काय व्‍हायचेय? मी म्‍हणते, मला संशोधक होऊन HIV+वर औषध शोधून काढायचेय. आई-वडील लहानपणीच वारले. नातेवाईकांनी मला सांभाळायला नकार दिला. मी आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न तीन वेळा केला. मात्र मला जगायचेय. मी माझ्या आई-वडिलांना सरांमध्‍ये पाहते. मला आता इथल्‍या माझ्या छोट्या भावा-बहिणींसाठी जगायचंय.’’ सकाळी ‘‘मन का विश्वास कमजोर हो ना…’’ या ओळी आळवणार्‍या त्‍या चिमुकल्या भाबडेपणामागचा समंजस कणखरपणा निःशब्‍द करणारा होता.

शर्मिष्‍ठा शशांक मीना भोसले, 9822232952, 7276255123, इमेल –sharmishtha.2011@gmail.com

सेवालय – हासेगाव, ता. औसा, जि. लातूर, पीन कोड –413512

रवी बापटले– 9503177700

Last Updated On – 3rd Jan 2017

About Post Author

1 COMMENT

  1. बाबा आमटेनी कुष्ठरोग्यांची
    बाबा आमटेनी कुष्ठरोग्यांची सेवा केली त्यांच्याच धरतीवर रवी बापटलेजी आपण HIV बाधित लोकांची सेवा करत आहात. आम्हाला आपला अभिमान आहे

Comments are closed.