सेनादलाची निवड – कॅप्टन डॉ सुरेश वंजारी

3
34
_SenapatiNiwas_CaptainSureshWanjari_1.jpg

मी गेली अनेक वर्षें ‘सेनादल निवड मंडळा’चे प्रशिक्षणवर्ग घेतो. तसे क्लास सुरू करण्यामागील कारण म्हणजे मला तरुण मुलांच्या सहवासात राहता येते. मी त्यांना शिकवताना त्यांच्याकडूनही अनेक गोष्टी शिकत असतो. मी आमच्या घरी हे क्लास जेव्हा सुरू केले तेव्हा मुलांना फी आकारत नसे. मी अनेक मुलींनाही एसएसबी ट्रेनिंग दिले आहे. मुली सक्षम असतील तर भारताची पुढील पिढी सक्षम होईल. माझे म्हणणे प्रत्येकाने काही सैन्यात जावे असे नाही. पण जर अनेक मुलांना त्याविषयी माहिती मिळाली तर त्यांपैकी कित्येकांना ते वेगळे करिअर करता येईल अशी माझी धारणा आहे.

एसएसबी ट्रेनिंगमध्ये पूर्ण व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला जातो. एनडीए, सीडीएसईमध्ये निवड होण्याचे निकष फार वेगळे आहेत. एसएसबी ट्रेनिंगमध्ये मानसशास्त्राचा भाग पण बराचसा आहे. नुसते पाठांतर करून उत्तरे देणे तेथे चालत नाही. तेथे मुलाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विचार केला जातो. मी स्वत: मानसशास्त्रज्ञ नाही. परंतु मुलांचे मानसशास्त्र जाणून घेण्यासाठी त्या विषयातील पदवीची आवश्यकता नाही. काही सर्वसाधारण प्रश्नातून, त्यांच्या घराविषयीच्या प्रश्नातून त्यांची वाढ ज्या वातावरणातून झाली आहे ते लक्षात येते.

मी मुलांना शिकवताना त्यांचे अनेक वैयक्तिक प्रश्नदेखील सोडवतो. कारण शिक्षण म्हणजे नेमके काय तर जीवनाकडे बघण्याचा मुलाचा दृष्टिकोन अधिकाधिक विकसित होणे. त्याने आत्मविश्वासाने जगामध्ये वावरणे आणि त्या सर्वांतून त्याला आयुष्यात समाधान प्राप्त होणे.  मुलाचे व्यक्तिमत्त्व एकदा समजले, की एसएसबी इंटरव्ह्यूमध्ये त्यांना कशा प्रकारचे प्रश्न  विचारले जातील याचा मला अंदाज येतो आणि माझा अंदाज बऱ्याच वेळेला खरा ठरलेला आहे.

जीवनात साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. मी मुलांना विचारतो, की तुम्ही वडिलांना घरी काय हाक मारता? तर, डॅडी. आईला, मम्मी. वडिलांच्या भावाला, अहो काका. आईच्या भावाला, अरे मामा. वडिलांना नम्रपणे विचारता, ‘बाबा फी देता का?’ आईला हुकुम सोडता, ‘मला जेवण वाढ.’ ही जी सांस्कृतिक रचना आहे त्याविषयी जेव्हा मुलांशी मी बोलतो तेव्हा हळूहळू त्यांची कौटुंबीक पार्श्वभूमी माझ्या लक्षात येऊ लागते आणि मग त्यांची मानसिकता कशा प्रकारची असेल हे माझ्या लक्षात येते. एसएसबी मुलाखतीमध्ये पूर्णपणे उमेदवाराच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो. सैनिकी अधिकारी हा शारिरीक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम असणे फार आवश्यक आहे. फौजी बनणे म्हणजे सकाळी दहा ते सायंकाळी सात अशी नोकरी नव्हे. तेथे प्रत्यक्ष जीवनमृत्युशी काही वेळा सामना करावा लागतो. तेवढी मुलाची मानसिक क्षमता उच्च प्रतीची असणे, विचारांची दिशा वेगळी असणे आवश्यक आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास असायला हवा. पुन्हा त्या आत्मविश्वासाला अंहकाराचा स्पर्श असून चालणार नाही. एसएसबी क्लिअर होण्यासाठी मुलाजवळ ‘अनकॉमन कॉमनसेन्स’ असणे महत्त्वाचे आहे. सर्व शिक्षणप्रकियेमध्ये त्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे.

निखिला पामकर नावाची एक स्मार्ट चुणचुणीत मुलगी माझ्याकडे यायची. तिची एसएसबी मुलाखतीची तयारी करून घेताना, मी तिला म्हणालो होतो, की तुला जर असा प्रश्न विचारला, की तुम्ही जर या वेळेला सिलेक्ट झाला नाहीत तर? तू सांग, की मी पुन्हा प्रयत्न करेन. ते म्हणतील, नाही, पण हा शेवटचा चान्स आहे. तर काय कराल? त्यावर सांग, की मला खात्री आहे, की मी सिलेक्ट होइन. तरी ते म्हणाले, तुम्ही रिजेक्ट झाला आहात असे समजा. मग पुढे काय? त्यावर सांग, की सर तुमच्यासारखा हॅण्डसम सैनिकी अधिकारी बघून त्याच्याशी लग्न करून मी फौजचा एक भाग बनेन आणि तिला नेमके तेच प्रश्न विचारले गेले. ती सिलेक्ट झाली! निखिला पामकर आता हवाईदलामध्ये विंग कमांडर म्हणून कार्यरत आहे. त्या मुलीमध्ये बेसिक बुद्धिमत्ता आणि स्मार्टनेस होता. मी त्याला वळण दिले, इतकेच. तिच्या समाजातून आजदेखील कोणी मुलगी डिफेन्स ऑफिसर झालेली नाही. 

ती मला फोन केल्यावर बॉयफ्रेण्ड आणि मी तिला गलफ्रेण्ड असे बोलतो. ती मला वडिलांच्या जागी मानते आणि मी तिला मुलीसारखे मानतो. गुरू शिष्याचे संबंध हे फक्त ठरावीक काळाइतके कधीच नसतात. त्याची छाप मनावर आयुष्यभर राहते. उमेदवारांना अशा प्रकारे घडत गेले, की आश्चर्य वाटते, पण इतक्या वर्षांच्या अनुभवाने व्यक्ती बघितली, की तिचे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारचे आहे हे लक्षात येते आणि कळते, की त्या व्यक्तीला कोठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. ते प्रश्न विचारण्यामागे त्या व्यक्तीची मानसिकता जोखण्याचा उद्देश असतो. वरून जरी ते प्रश्न हलकेफुलके वाटले तरी त्यामागे मोठा अर्थ दडलेला असतो. त्यांचा संबध त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाशी निगडित असतो.

मी मुलांना 1979 पासून शिकवत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व ओळखून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करत आहे. मला मुलांशी चर्चा करण्यास, संवाद साधण्यास आवडते. त्यातून माझा अनुभव तर वाढतोच, पण मुले बरेच काही शिकतात. त्यांचा मुलाखत देण्यासाठीचा आत्मविश्वास वाढतो. मी मुलांचा स्वभाव, सवयी या बारीक गोष्टींची नोंद करून ठेवतो. डिफेन्स ऑफिसरचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक निराळा दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. त्यांना कोठल्याही परिस्थितीमध्ये बॅलन्स साधता आला पाहिजे, सारासार विचार करता आला पाहिजे.

ठाण्यामध्ये डॉ.आनंद नाडकर्णी यांनी संयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला गेलो असताना तेथे ललित ताहाराबाग म्हणून एक मुलगा होता. मी ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’वर भाषण द्यायला गेलो होतो. त्या मुलाने मला जे प्रश्न विचारले त्यातून त्याची वेगळी विचारसरणी मला आवडली. तो आता सैन्यात कर्नल आहे. मी जेव्हा त्याच्याशी बोलत होतो तेव्हा त्या मुलामध्ये मला विशेष चमक जाणवली. तो म्हणाला, की त्याला आर्मीमध्ये जायचे आहे. मी त्याला माझ्याकडे ट्रेनिंगला बोलावले. तो आर्मीमध्ये सिलेक्ट झाला. त्याला ‘सेनामेडल’ बाविसाव्या वर्षी मिळाले. ठाणे येथील ‘गडकरी रंगायतन’मध्ये त्यानिमित्त मोठा समारंभ ठेवला होता. मी व माझी पत्नी तेथे गेलो होतो. आम्ही पहिल्या रांगेत बसलो होतो. तेव्हा ललित ताहाराबाग व त्याचे आई-वडील आम्हा दोघांना स्टेजवर घेऊन गेले. त्याने आमचा सत्कार केला, की तुम्ही मार्ग दाखवलात. आत्मीयतेने शिकवले म्हणून मी आज इथपर्यंत पोचलो. निवृत्त असिस्टंट कमिशन ऑफिसर ऑफ पोलिस अरूण मोहिते यांचा मुलगा केतन मोहिते हादेखील आर्मीमध्ये कर्नल आहे.

मी पैशांसाठी काम केले नाही. मुलांना शिकवणे, त्यांना घडवणे हा माझा छंद आहे. ते काम मला आवडते. त्या कामातूनच मला भरभरून समाधान मिळाले आहे. म्हणून मी ऐंशीव्या वर्षीदेखील तरतरीत व उत्साही आहे. तो तरुण मुलांच्या संगतीचा परिणाम आहे.

कोणत्याही प्रकारच्या शिक्षणात विद्यार्थ्यांची मानसिकता शिक्षकांनी समजून घ्यायला हवी. त्यांनी त्याचा आत्मविश्वास वाढवायला हवा. तर मुले कोणतीही कठिण गोष्ट सहजसाध्य करू शकतात.

– कॅप्टन (डॉ.) सुरेश वंजारी

About Post Author

Previous articleधुंधुरमास
Next articleशिक्षक होण्यातील समृद्धी
कॅप्टन सुरेश वंजारी हे ‘इमर्जन्सी कमिशंड ऑफिसर’ या पदी 1962 ते 1968 पर्यंत कार्यरत होते. ते त्यावेळी झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धात सहभागी झाले होते. त्यांना शिकवण्याची आवड असल्याने त्यांनी ‘कॅप्टन वंजारी अकादमी’ची मुंबईमध्ये सुरुवात केली. आजवर 850 हून अधिक विद्यार्थी त्यांच्या अकादमीत शिकून भारतीय सेनेत रुजू झाले आहेत. कॅप्टन वंजारी यांना ‘नेल्सन मंडेला पुरस्कार’, ‘शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार’ इत्यादींसारख्या विवध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीसाठी त्यांना ‘डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान केली गेली आहे. लेखकाचा दूरध्वनी 9819272377

3 COMMENTS

  1. सैन्याला उत्तम सेनाधिकारी…
    सैन्याला उत्तम सेनाधिकारी देऊन आपण देशाच्या बळकटीकरणाचा उपक्रम राबवित आहात त्यामुळे देशाच्या जडणघडणीत आपला मोठा वाटा आहे ??

  2. Excellent. I am following u…
    Excellent. I am following u closely in MDL when u were ic Stores. I want to meet u persanally.canwe?

Comments are closed.