सुर्डी – पाणीसंकटावर मात करू पाहणारे (Surdi)

1
63
-surdi-water-village

सुर्डी हे सोलापूर जिल्ह्यातील गाव. तेथे दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळ असतोच. यावर्षी मात्र गावाने दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी एकजूट दाखवली. श्रमाची पूजा केली अन् झपाटून केलेल्या कष्टावर यशाची मोहोर उमटवली. पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ 2019 च्या स्पर्धेत सुर्डी गावाने प्रथम क्रमांक मिळवत राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.   

सुर्डी हे सोलापूरच्या बार्शी तालुक्यात वैरागपासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले गाव. जुन्या मोघम हद्दीप्रमाणे, शेजारच्या माढा तालुक्यातून वाहत जाणारी सीना नदी ओलांडली, की मराठवाडा सुरू…  त्याच हद्दीतील ते गाव, पण सध्या ते पश्चिम महाराष्ट्रात अंतर्भूत आहे. गावावर दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळाची छाया पडतेच पडते. एखाद्या वर्षी, पाऊस मुबलक पडतो; एरवी हरसाल कोरडे. तेव्हा पांढरे ढग जमतात, दुष्काळ पडतो तेव्हा ते गावाच्या उत्तरेला गढीच्या माळावर, सोनपठारावर कधीमधी उतरतात, माळावरचे दगडधोंडे ओले होतात, गवताच्या काड्या उगवाव्या इतपत बरसतात आणि नाहीसे होतात. गावाचा बाकी शिवार कोरडाच…. 2018 ची दिवाळी बिगरअंघोळीची गेली, इतपत पाणीटंचाई! राज्यात दुष्काळ जाहीर झाला, की गावातील लोकांना, शेतकऱ्यांना वाटते, मराठवाड्याच्या यादीत असतो तर बरे झाले असते! एखादे दुष्काळी पॅकेज, मदत, अनुदान तरी सरकारकडून मिळाले असते… पण आता आमचे गाव सोलापूर जिल्ह्यात ना! तो दक्षिण महाराष्ट्र. मराठवाड्याच्या हद्दीबाहेर ना घर का, ना घाट का… अशी स्थिती आमच्या आणि आसपासच्या बऱ्याच गावांची! तरी एकूण सातशेसत्तावन्न कुटुंबे आणि तीन हजार सातशेसत्याहत्तर लोकसंख्या असलेल्या सुर्डी गावचे शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे!

गावात एक प्रमुख ओढा, त्याला इतर सर्व छोटे ओढे, ओहोळ मिळतात व नंतर तो ओढा शेजारच्या गावातून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सदा कोरड्या तर कधी हंगामी वाहणाऱ्या नदीला जाऊन मिळतो. त्या ओढ्याच्या काठी दोन्ही बाजूंला साधारणपणे आठशे-हजार फूट जमीन ही त्यातल्या त्यात सुपीक आहे. बाकीची फारशी न पिकणारी आहे. पाऊस गावाच्या दोन-तीन बाजूंला माळावर झाला, की पाणी वाहत ओढ्याने येते. दोन वर्षांपूर्वी, 2016 साली, एका रात्री माळाकडील तळे भरून फुटले, ते पाणी थेट ओढ्यातून गावात शिरले, त्यामुळे सुपीक मातीचा बराच थर मोकळा झाला, ओढा गावाला वेढा टाकून गेला. ओढ्याशेजारी असणाऱ्या कुंभार गल्ली, सुतार नेट यांत पाणी शिरले, बरीच गाडगी-मडकी, सुताराची अवजारे, परटाच्या घरची कापडे पाण्यात गेली. त्या भागातील पाऊस बराच लहरी आहे, नेहमी पडत तर नाही अन् पडला, की विचित्र पडतो – दोन्ही तऱ्हांनी माणसांचे जीवन कैचीत धरतो. भीषण दुष्काळ 1972 ला पडला; विहिरी आटल्या, अन्नधान्याची वानवा होती. त्या दुष्काळात बऱ्याच लोकांनी गाव सोडले, उदरनिर्वाहाच्या शोधात मुंबईपुणे गाठले. त्यासाठी गावातील शब्द म्हणजे ‘जगायला’. लोक ‘जगायला’ मुंबई-पुण्याकडे गेले असे म्हणतात. त्या एका शब्दाने त्यांच्या परिस्थितीचे यथार्थ वर्णन होते! 

गावात मागासवर्गीय मंडळी मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्याकडे जमीनजुमला, शेतीवाडी नव्हती, इंदिरा गांधी यांनी सीलिंगचा कायदा काढला आणि त्या उपेक्षित वर्गाच्या पदरात जमिनीचे तुकडे पडले. काही लोकांनी 72 च्या दुष्काळात रोजगार हमीवर काम करून एक वेळेचा भाकरतुकडा खात गावातच राहण्याचा निर्णय घेतला; त्यांना गाव सुटला नाही. 

-surdi-gramastha-pani-foundation-त्या काळी, बरीच कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत झाली. पाझर तलाव खोदले गेले, लघु पाटबंधाऱ्यांची कामे झाली, पाणी साठवणुकीची साधने तयार झाली. गावाचा घाट माळावरच आहे, म्हणजे उताराचा रस्ता…पण तो उतार जास्त असल्याने तेथे रस्ता टिकत नाही. तो तालुक्याला जाणारा रस्ता टिकाऊ नाही. गावात एसटीच्या दोन फेऱ्या 1972 च्या दरम्यान तालुक्याच्या ठिकाणावरून होऊ लागल्या. त्या कायम आहेत. मात्र तो रस्ता डांबरी नाही. त्यामुळे तुळजापूर, सोलापूर अशा मार्गाने जाता येते, तो वर्दळीचा रस्ता… गावाचा शिवार मोठ्ठा आहे. परंतु, गावठाण फारसे मोठ्ठे नाही. बरीचशी घरे पडलेली आहेत. जे लोक दुष्काळामुळे गाव सोडून गेलेले आहेत त्यांची घरे प्रामुख्याने त्यात आहेत. काही लोक नोकरी-चाकरीसाठी बाहेरगावी आहेत, गावात राहणाऱ्या बऱ्याच लोकांनी अलिकडच्या काळात गावातील घरांना कुलुपे ठोकून, त्यांच्या शेतात नवीन घरे बांधून तिकडे मुक्काम ठोकला आहे, त्यांनी शेतीकडे, गुराढोरांकडे व्यवस्थित लक्ष देता यावे यासाठी गावातील घर बदलले…. गावाचा प्रमुख रस्ता बसथांब्यापासून ते ग्रामदैवत भैरोबाच्या देवळापर्यंत. तो अलिकडेच काँक्रिटचा झाला आहे. गावाच्या प्रवेशद्वारी कदमाची उंच माडी, पाटलाचा वाडा समोर आहे. ग्रामदैवत भैरोबाच्या देवळाच्या जवळ जुनी चावडी, त्या मंदिराच्या लगोलग मारुतीचे मंदिर. समोर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा, जरा खालील अंगाला वेशीत मरीआईचे देऊळ, चौकात गावाच्या मधोमध ग्रामपंचायत, पंचायतीसमोर पिंपळाचे झाड आणि त्याच्या चार बाजूंनी बांधलेला जुना पार (कट्टा). राजकीय प्रचार सभा व विविध कार्यक्रम तेथे होत असतात.

हे ही लेख वाचा – 
लामकानी : भरदुष्काळात चराईचे कुरण
…अन्यथा मराठवाड्याचे वाळवंट होईल?
जगन्नाथराव खापरे – ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा!

पंचायतीला लागून सार्वजनिक जुनी विहीर आहे. त्या चौरस विहिरीला ‘बारव’ असे म्हणतात. गावातील पाण्याचा तो जुना स्रोत. गावातील पाणीटंचाई वाढली, की गावचा थेट पाणीपुरवठा बंद होतो आणि गावकरी पाणी त्या बारवातून रहाटाद्वारे उपसून नेतात. कोणी पाणी गावच्या आसपासच्या शेतातील विहिरींतून आणतात. चौकात समाजमंदिर आहे, त्याच्या समोर मोठा कट्टा आहे. तेथे रोज सकाळी मंडई भरते. शेतातील लोक ताजा भाजीपाला विक्रीसाठी आणतात. शेजारी, नागोबाचे जुने मंदिर आहे. बाजूला विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर, त्याच्या समोर दत्ताचे मंदिर अन् त्या मंदिराच्या भिंतीला लागून नवीन बांधकाम झालेली मशीद आहे. अलिकडे तेथून अजान (प्रार्थना) होते. गावचा छोटासा आठवडी बाजार सोमवारी भरतो. परगावचे विक्रेते भांड्यांचा, कपड्यांचा बाजार मांडतात. तो बाजार दहा वाजेपर्यंत असतो. नंतर लोकांना शेतात जायचे असते व ते व्यापारी शेजारच्या मोठ्या गावाला जातात. गावाच्या बसस्टॉपवर चहा-वडापावची तीन-चार छोटी हॉटेले आहेत. केशकर्तनालयाच्या तीन-चार टपऱ्या थाटलेल्या आहेत. न्हाव्यांची नवीन पोरे बलुतेदारीवर होणारी हजामत, आता रोखीने पैशाच्या स्वरूपात करतात. हजामतीचा दर मात्र गावात शहराच्या मानाने निम्म्याने आहे.

-barav-surdi-gaonगावातील मुलाणी बोकड दर मंगळवार-शुक्रवार वाट्यावर कापतात आणि मटणाची विक्री करतात. अलिकडे बॉयलर कोंबड्यांची चिकन सेंटर गावात सुरू झाली आहेत. ती प्रत्येक दिवशी सुरू असतात. गावात रविवार पाळला जातो. मारुतीच्या मंदिराशेजारी असणारी खूप जुनी तालीम मोडकळीला आली. त्यामुळे पंचायतीने स्लॅबची पक्की तालीम गावाच्या बाहेर बांधून दिली आहे. पूर्वी गावातील अनेक पैलवान आखाड्यात सराव करायचे. गावच्या पैलवानांचे पंचक्रोशीत नाव होते. आता मात्र तरुणाई तालमीकडे जास्त फिरकत नाही. त्यांना व्यायामाची आवड राहिलेली नाही. ते मोबाईल घेऊन पारावर गप्पा मारण्यात तर काही टीव्ही पाहण्यात व्यस्त असतात. त्यामुळे गावची तालीम ओस पडली आहे.

नाईक निंबाळकर यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी या गावात उंचवट्यावर गढीचे (किल्ला) बांधकाम केले आहे. किल्ला कमीत कमी पाच एकरांत विस्तारला आहे,  किल्ल्याच्या चारही बाजूंस बुरुज आहेत. गावातील तो मोठा ‘लँडमार्क’ आहे. त्याच्या चारी बाजूंच्या तटाची उंची चाळीस-पंचेचाळीस फूट. तटाची रुंदी साधारण दहा फूट आहे. पूर्व व पश्चिम दिशांना मोठे दरवाजे पंधरा ते अठरा फूट उंच व नऊ ते दहा फूट रुंद आहेत. ते दरवाजे उत्तम प्रकारच्या लिंबाच्या अथवा बाभळीच्या फळ्यांचे आहेत. फळीची जाडी सहा इंच, आतील बाजूने दार बंद करून ती आगळ बाजूच्या कोंड्यात बसवतात. ती चोरांना वाड्यात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. ते दार उघडले, की त्याच्या दोन्ही बाजूंस तीन खण आहेत. त्यात पूर्वी वाड्याचे राखणदार थांबायचे. अशा प्रकारच्या गढ्या महाराष्ट्रात पेंढाऱ्यांचा सुळसुळाट ज्या वेळेस होता, त्यावेळी गावच्या रक्षणाकरता केंद्र म्हणून बांधल्या गेल्या असाव्यात. पेंढाऱ्यांचा बंदोबस्त झाल्यानंतर त्या त्या भागातील सरदारांनी त्या ताब्यात घेऊन त्यांचे अधिकारी तेथे नेमले. त्यांना जहागिरी दिल्या. मग त्या गढ्या व जमिनी एकाकडून दुसऱ्याकडे विकत म्हणा किंवा दुसऱ्या काही प्रकारे हस्तांतरित होत गेल्या. त्यांच्या वारसांनी त्या वाटून घेतल्यावर त्यांना राहण्यासाठी वाडे बांधले, त्यावेळी त्याच्या समोरची जागा जनावरे बांधण्यासाठी असायची. त्या वाड्याला बामनाचा वाडा म्हणतात. कारण त्या वाड्यात गावातील ब्राह्मण वर्गाचे वास्तव्य मोठे होते. ते गावकारभाराचे केंद्र असे. गावातील अभिजन ब्राह्मणवर्ग जहागिरदार-जमिनदार होता. शंभर-दीडशे ते दोनशे एकरांपर्यंतच्या जमिनी प्रत्येकी त्यांच्याकडे होत्या. त्यांच्याकडे गावातील सर्व बहुजन वर्ग चाकरीला असे. गावातील लोक शेतात मोलमजुरी करणे, शेताची राखण, त्यांची गुरेढोरे राखणे, मुनीमकी करणे यांसारखी कामे करत. ब्राह्मणांनी त्यांच्या शेतीत विविध प्रयोग केले. चांगली शेती पिकवली; चांगल्या प्रतीची द्राक्षे पिकवली. ती परदेशात निर्यात व्हायची. ते त्यांच्या अलिकडच्या पिढीला जमले नाही. त्यांनी उच्च शिक्षणासाठी गाव सोडला. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवल्या. काहींनी थेट परदेश गाठला. ते गावाकडे परतलेच नाहीत. त्यांची शेती गावातील इतर शेतकरी समाज वाट्याने करतो. त्याला बटईने शेती करणे असे म्हणतात. कसणाऱ्याला निम्मे उत्पन्न आणि शेताच्या मालकाला निम्मे उत्पन्न. त्यांची शेती काहींनी विकतही घेतली आहे. वाड्यात सध्या कोणी राहत नाही. गढी ढासळत चालली आहे, तिची अवस्था बिकट आहे. गढ्या त्या गावाचा व आसपासच्या गावांचा आधार होत्या, त्या आता भग्नावस्थेत उभ्या आहेत. गढ्या उत्तरोत्तर देखभालीच्या अभावी नामशेष होण्याची शक्यता आहे. गढ्या एवढ्या प्राचीनही नाहीत, की पुरातत्त्व खात्याने त्यांचे रक्षण करावे. कोठे कलाकुसरीचे लाकूडकाम अथवा दगडकाम नाही. काही धार्मिक महत्त्वही नाही. त्यामुळे तिकडे कोणाचे लक्ष जात नाही.

-gadhi-surdiचैत्र पौर्णिमेला गावची यात्रा असते, ग्रामदैवत भैरोबाचा उत्सव असतो. ज्योतिबाची यात्रा त्याच काळात असते. ज्योतिबा हे गावातील निम्म्या मराठा समाजाचे कुलदैवत आहे. त्यामुळे गावातील लोक त्या काळात मोठ्या संख्येने ज्योतिबाच्या डोंगरावर असतात. ते तेथील देवदर्शन संपले, की गावाकडील यात्रेला निघतात. ते गावात गावातील देव पुजार्या च्या घरातून बाहेर निघत नाही तोपर्यंत त्यांच्या घरी न जाता गावच्या शेजारच्या मळ्यात मुक्कामी थांबतात अशी रीत आहे. यात्रेत ढोल, ताशा, सनई या वाद्यांच्या तालावर नर्तिका नाचवल्या जातात. त्यालाच गावाकडील भाषेत ‘नायकिणी’ असा शब्दप्रयोग आहे. त्याचा देवाला मान आहे असे मानले जाते. एका वर्षी यात्रेतील नायकिणी नाचवण्याचा कार्यक्रम गोंधळामुळे रद्द केला गेला. यात्रा संपल्यानंतर गावात काही दुर्दैवी घटना घडल्या. गावच्या पुजाऱ्याच्या स्वप्नात देव आला आणि त्याने सांगितले, की माझ्या समोर नायकिणी नाचवण्याचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे मी रुसलोय अन् गावावर कोपलोय. तशी चर्चा गावात सुरू झाली. गावाने भीतीपोटी काही दिवसांतच प्रतियात्रा भरवली आणि देवाची मागणी पूर्ण केली! यात्रा कमिटी गावातून वर्गणी गोळा करून यात्रा भरवते. प्रत्येक गल्लीतील पुढारी त्यांच्या त्यांच्या सोंगांच्या गाड्यांची सजावट करून, सासनकाठ्या घेऊन रात्री मिरवणुकीसाठी तयार असतात. सर्वांचे नायकिणीचे ताफे वेगवेगळे असतात. शेवटच्या दिवशी दुपारच्या प्रहरी हनुमान मंदिराशेजारी कुस्त्यांचा फड भरतो. हलगी घुमू लागते. आसपासच्या गावचे पैलवान कुस्ती लढण्यासाठी येतात. पंचकमिटी त्यांचा मान करून, त्यांची कुस्ती लावून विजेत्या पैलवानांना इनाम देते. दिवस मावळतीला गेला, की चांगभले म्हणून कुस्तीच्या फडाचे विसर्जन केले जाते. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी, पैलवानांसाठी आणि भाविकांसाठी मोठ्या कढईत प्रसाद म्हणून गूळ टाकून गव्हाची खीर केलेली असते. सध्या, ती खीर कोणी आवडीने खात नाही. ते बुंदी-पुरीच्या महाप्रसादाकडे वळतात. बाहेरगावी असणारे लोक यात्रेनिमित्त गावाकडे आलेले असतात. वर्षाचा देव-देव करतात, सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र येऊन ‘शेरनी’ म्हणजे गूळ, खोबरे, साखर, पेढे, लाडू प्रसाद म्हणून सर्वाना वाटतात. रात्री छबिना म्हणजे पालखी सोहळा निघून गुलालाची उधळण होते व यात्रेची सांगता होते. गावात गणपती उत्सव जोरात साजरा होतो. गावात पूर्वी एकच गणेश मंडळ होते. आता प्रत्येक गल्लीत गणपती मंडळ आहे. गावात भजने, हरिनाम सप्ताह पारायणे होतात. नवरात्र उत्सव आराधी मंडळ साजरा करते. ते लोक देवीची गाणी म्हणतात त्याला ‘आराध्याची गाणी’ असे म्हणतात. ती गाणी फार सुरचित वगैरे नसतात; शब्दाला शब्द लावून केलेली व जमल्यास यमक साधलेली अशी ती रचना असते. त्याची चाल मात्र झांज, दिमडी, हलगी इत्यादी वाद्यांच्या एका लयीत जमणारी असते. ती गाणी अलिकडे सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर म्हटली जातात, शब्द हे बहुतेक इतर आरत्यांप्रमाणे देवीची, देवीच्या स्थानाची स्तुती करणारे असतात. त्यात सर्व जाती-जमातींचे लोक असतात. ते आठ दिवस उपवास करतात. देवीसमोर बसून गाणी म्हणतात. दुपारी गावातून फेरी काढतात. भाविक त्यांना उपवासाचे पदार्थ करून फराळ वाढतात.

दसऱ्याला देवीची मिरवणूक काढतात. हल्लीच्या दहा-पंधरा वर्षांत नवीन प्रथा सुरू झाली आहे. प्रत्येक खेड्यातील सार्वजनिक नवरात्र मंडळ असते. ती मंडळी – पंधरा-वीस कार्यकर्ते – एक टेम्पो घेऊन नवरात्र स्थापनेच्या अथवा आदल्या दिवशी तुळजापूरला जातात. तेथील देवीच्या देवळाच्या होमातील अग्नीने मशाल पेटवून, ती पळत पळत स्वत:च्या गावापर्यंत आणून गावातील देवीच्या स्थापना झालेल्या मंडपातील मशाल पेटवतात. कार्यकर्ते आळीपाळीने तुळजापूरच्या देवीच्या देवळापासून त्यांच्या गावापर्यंतचे अंतर पळत असतात. त्या मशालीला ‘ज्योत’ असे म्हणतात. ती देवीच्या मंडपात खांबाला बांधली जाते.

गाव द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. बरेच क्षेत्र द्राक्षाच्या लागवडीखाली आहे. ज्वारी, मका, तुर यांचे पीक मात्र चांगले येते. अलिकडच्या काळात सोयाबीनचे पीकक्षेत्र वाढले आहे. परंतु सिंचनाची सोय नसल्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. पाण्याचे स्रोत विहिरी, बोअरवेल, पाझर तलाव असे आहेत. पाटाचे (कॅनॉलचे) पाणी गावाकडे येऊ शकत नाही, कारण गाव उंचीवर आहे. शेतकरी वर्ग कष्टाळू आहे. परंतु दुष्काळाने सतत मार खातो. त्यांनी त्यावर उपाय म्हणून दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा स्वीकारला आहे.

-surdi-firstrank-pani-foundation-2019-watercupपन्नास वर्षांपूर्वी याच गावातून तालुक्याचे राजकारण चालायचे. आबा बामणाच्या वाड्यातून तालुक्यात कोणाला मदत करून निवडून आणायचे हे ठरवले जायचे. त्यांचे आवाहन तालुक्यातील मतदारवर्ग ऐकायचा. तो काळ गेला. गावात राजकारण दोन गटांत विभागलेले आहे. दोन्ही गट अभिजन मराठा वर्गातील आहेत. गावात दोन आडनावांच्या दोन भावक्या; बरीच नातीगोती दोन्ही गटांत एकमेकांत अडकून आहेत. त्यांच्यातच कधी सत्तासंघर्ष, भांडणतंटे, तर अनेकदा सोयरीक चालू असते. सरपंच निवडीचा मुद्दा हा गावकऱ्यांच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा व प्रतिष्ठेचा असतो. गावाची निवडणूक चुरशीची होते.

गावात अस्पृश्यता पहिल्यासारखी पाळली जात नाही. सुशिक्षित लोकांचा आलेख उंचावत आहे. शिक्षणाची सोय उच्च माध्यमिकपर्यंत आहे. शाळेचा क्रमांक जिल्हा गुणवत्ता यादीत असतो. त्यामुळे आसपासच्या गावची मुले शिक्षणासाठी सुर्डीला येतात. जिल्हा परिषदेने गावातील वाड्यावस्त्यांवरही चौथीपर्यंत शाळा सुरू केलेली आहे. गावात उच्च अधिकारी, फौजदार, शिक्षक, डॉक्टर, इंजिनीयर, पोलिस, सैन्य दल अशा विविध क्षेत्रांत काम करणारा सुशिक्षित वर्ग निर्माण झाला आहे. 

‘आपलं गाव काय होतं अन् काय झालं’ याची जाणीव झालेल्या सुर्डीच्या ग्रामस्थांनी भविष्यातील पाणीसंकट ओळखून दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी एकजूट दाखवत श्रमाची पूजा केली अन् झपाटून केलेल्या कष्टावर यशाची मोहोर उमटली. पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ 2019 च्या स्पर्धेत सुर्डी गावाने प्रथम क्रमांक मिळवत राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.   

 – मतीन शेख matinshaikh717@gmail.com
(मुराळी मासिकावरून उद्धृत, सुधारित – संस्कारित)
 

About Post Author

1 COMMENT

  1. व्वा मतीन व्वा… एवढं भरी…
    व्वा मतीन व्वा… एवढं भारी लिखाण केलं आहेस की बास्स… जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे… खुप छान वर्णन केलं आहेस…

Comments are closed.