सुयश गुरूकूल – सोलापूरचे आगळे विद्यामंदिर

3
39
carasole

मुले विद्यालयाच्या प्रांगणात आनंदाने बागडत आहेत, वर्गात बसलेल्या मुलांच्या मुद्रांवर कुतूहल आहे- ती शिकवणाऱ्या शिक्षकाकडे आदराने पाहत आहेत. कोणाच्याही चेहऱ्यावर कंटाळा नाही. सर्वत्र आनंद, उत्साह भरून राहिलेला आहे…  हे दृश्य आहे सोलापूरच्या ‘सुयश’ विद्यालयातील. चाळीस वर्षें शिक्षक म्हणून काम केलेल्या मलासुद्धा स्वप्ननगरीत गेल्यासारखे वाटले. प्रत्येक वर्गात तीस-पस्तीस मुले आहेत, ती एका बाकावर दोघे अशी बसलेली आहेत. शिक्षक आनंदाने शिकवत आहेत. मुले नि:संकोचपणे शंका विचारत आहेत, शिक्षकांना उत्तरे देत आहेत आणि शिक्षक त्यांना शंका विचारण्यास उत्तेजन देत आहेत असे दृश्य सोलापूरच्‍या ‘सुयश गुरूकूल’मध्ये पाहण्यास मिळाले.

‘सुयश गुरूकूल’ची कथा ही चकित व आनंदित करणारी आहे. केशव शिंदे हे या आगळ्या ‘विद्यापीठा’चे निर्माते आहेत. त्यांची स्वत:चीही एक हृद्य कथा आहे. त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्यांची आर्थिक कुवत शिक्षण घेण्याची नव्हती. सोलापूरचे श्रीराम पुजारी या प्राध्यापकाचा मदतीचा हात अनेक मंडळींना लाभला, तसा तो केशव यांना मिळाला. केशव बी.एस्सी.पर्यंत शिकू शकले. अर्थार्जन ही त्यांच्या कुटुंबाची गरज होती, पण त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता दिसत नव्हती आणि त्यांना शिकवण्याची आवड होती. म्हणून शिंदेसरांनी १९८२ साली क्लास सुरू केला. शिकवण्यातील कौशल्य व विद्यार्थ्यांविषयी प्रेम यांमुळे विद्यार्थीप्रिय शिक्षक असा त्यांचा लौकिक झाला.

इंग्रजी माध्यमाची शाळा ही समाजाची गरज आहे.  ती चांगल्या प्रकारे पूर्ण करावी असे शिंदेसरांना वाटे. त्यांनी तशी शाळा १९९२ साली शहरात सुरू केली. तो व्याप सांभाळता सांभाळता सरांनी बी.एड. व एलएल.बी. पूर्ण केले. शाळा व संस्था उभी करताना त्यांना त्याचा फायदा झाला. शहरातील शाळा छान चालली होती -अजूनही चालू आहे. पण शिंदेसरांच्या मनात ‘गुरुकुल’ होते, एक ‘शांतिनिकेतन’ होते. निसर्गाच्या सान्निध्यात सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे विद्यालय!

माणूस एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो तेव्हा त्याची पूर्तता झाल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. शिंदे यांनी तोपर्यंतच्या अर्थार्जनातून जी काही पुंजी जमली होती ती घालून सोलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर सहा एकर जमीन विकत घेतली, तेथे इमारत बांधली. त्यांनी त्यांच्या मनातील ‘विद्यालय’ उभे  केले. निवासी शाळा हे त्यांचे ध्येय होते. शहरातून ‘सुयश’मध्ये विद्यार्थी कसे येतील? मग त्यांनी विद्यार्थ्यांची नेआण करण्यासाठी बसेस विकत घेतल्या. शिंदेसर हाडाचे शिक्षक आहेत तसे हाडाचे शेतकरीही आहेत. त्यांचे जमिनीशी नाते घट्ट आहे. त्यांनी सर्व, अगदी सर्व प्रकारची फळझाडे ‘सुयश’मध्ये लावली आहेत. विद्यार्थ्यांना झाडे जणू दत्तक दिली आहेत. त्यामुळे मुले अतीव प्रेमाने झाडांची देखभाल करतात.

शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून चारशे विद्यार्थी वसतिगृहात राहतात. निवास, भोजन, वर्ग व जिमखाना असे विभाग आहेत. तेथे विद्यार्थी त्याच्या घरी असल्याप्रमाणे राहतो. सकाळी दूध, नास्ता असे सारे घरगुती. शाळा तर पाहण्यासारखी आहेच, पण त्यांचे स्वयंपाकघर व भोजनगृहही पाहण्यासारखे आहे. स्वच्छता, टापटीप…  मांडी घालून  बसायचे. समोर बेंच असतो. त्यावर स्वच्छ चकचकीत  ताट-वाट्या, पेले…  मुले हसत मजेत जेवतात. त्यांच्या आवडीची भाजी असते तर कधी कमी आवडीची भाजी असते, पण आहार चौरस आहे यावर भर असतो. सण-वार अथवा विशेष दिवस असेल त्यानुसार पक्वान्न असणारच. मी गेलो होतो त्या दिवशी शेतकऱ्यांच्या दृष्टीने विशेष दिवस होता -आवस-  गव्हाची खीर-हुग्गी- हवीच. आम्हाला ती अपूर्व मेजवानी झाली!

केशव शिंदे हे विज्ञान शिक्षक असल्याने त्यांच्या नियोजनात ती दृष्टी दिसते. सर्व स्वयपाक गोबरगॅसवर होतो. इमारतीत सोलर दिवे आहेत. सरांनी मूळ सहा एकरांत आणखी दहा एकर जमीन विकत घेतली. ‘सुयश’ एकूण सोळा एकर जमिनीवर वसले आहे. मुले फुलेही आहेत. ती फुलवावी लागतात. सर ते करतात; त्याचबरोबर शिस्त असते. ती प्रत्येकाच्या अंगी  बाणली आहे. पाचशे मुले इकडून तिकडे जात असतील तर ती रांगेतच जाणार! गंमतीची गोष्ट म्हणजे सर प्रांगणात सर्वत्र अनवाणी फिरत असतात!

शिंदेसरांच्या पत्नीही उत्तम शिक्षिका आहेत. त्यांचा वावर प्रसन्न असतो! दहा-वीस वर्षांत ‘सुयश’मधून बाहेर पडलेल्या व यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांविषयी विचारले तर त्यांनी एक भलीमोठी यादीच सादर केली. सरांना ती मुखोद्गत आहे. ती नावे ऐकली. फोटोंचे अल्बम चाळले आणि थक्क झालो. भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलम यांनी ‘सुयश’ला भेट दिली होती, त्या वेळी झालेल्या सोहळ्याचे फोटो पाहताना हरवूनच गेलो! मुख्य इमारतीच्या मध्यभागी अशी रचना आहे, की पाचशे मुले एकत्र बसून योगासने करू शकतील. वेळापत्रक तशा प्रकारचेच आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाळेला भेटी दिल्या आहेत. ज्या पुजारीसरांनी केशवसरांना घडवले त्यांचे एक आगळे स्मारक सरांनी तेथे उभे केले आहे. एक अतीव अर्थपूर्ण कविता एका शिळेवर कोरली आहे! सरांची कृतज्ञता त्यातून व्यक्त झाली आहे!

‘सुयश’मध्ये इंग्रजी व मराठी माध्यमातून शिक्षणप्रक्रिया चालते.

शिक्षणाचे माध्यम केवळ भाषा नसते, वृत्ती असते. विषयाच्या ज्ञानाबरोबर शिक्षकाजवळ विद्यार्थ्यांना देण्यासारखे काय आहे व ते देण्याची असोशी त्यास कितपत आहे हे महत्वाचे आहे. मातृदेवो, पितृदेवो नंतर ईश्वरापेक्षाही गुरू महत्वाचा असू शकतो याची प्रचीती ‘सुयश’मध्ये येते. शासनाच्या अनुदानाशिवाय विद्यालय उभे आहे. काही निवृत्त शिक्षक तेथे शिकवण्यास येतात. त्या त्या विषयातील तज्ज्ञ शिक्षकांची टीम ‘सुयश’ला लाभली आहे.

एक आगळी शाळा पाहून मन हरखून गेले,
शिंदे यांचे झपाटलेपण  पाहून, मन विनम्र झाले,
‘हे हवे ते हवे’ ऐकून निराशेचा सूर सरला
मन कौतुकाने ओतप्रोत होऊन गेले!
झपाटलेली माणसे आहेत म्हणून केवळ
छान काही घडत असते,
गावा-गावात, अगदी छोट्या वस्त्यांतही
नवल जन्मत असते!

संपर्क – केशव शिंदे ९४२२०६९४६१

– अविनाश बर्वे

*****

सोलापूरच्या अनिता ढोबळे यांचा मुलगा केशव शिंदे यांच्या ‘सुयश’ शाळेत शिकतो. त्यांनी या शाळेविषयी असे, सांगितले, की शाळेचे संस्थाचालक शिंदेसर स्वत: तेथे राबतात. सकाळी पाच वाजता उठून विद्यार्थ्यांकडून व्यायाम व योगासने करून घेतात. त्यांचा सहभाग शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात असतो. मुलांमध्ये मिसळणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांना योग्य प्रकारे आहार मिळत आहे, की नाही ते पाहणे यावर त्यांचे जातीने लक्ष असते. तसेच, अभ्यासाबरोबर गायन, वादन, चित्रकला या कलांकडेही लक्ष दिले जाते. दररोज सायंकाळी साडेतीन ते पाच वाजेपर्यंत मुले खेळांसाठी मैदानावर असतात.

शाळेत मुलांना स्वावलंबन शिकवले जाते. त्यांचा मुलगा ज्या वेळी सुट्टीत घरी येतो, तेव्हा तो स्वत:चे कपडे स्वत: धुतो. तसेच, परिसराची स्वच्छता, श्रमसंस्कार यांचे महत्त्व मुलांना सांगितले जाते. आहारामध्ये सर्व तऱ्हेच्या भाज्या मुलांना खायला दिला जातात. आरोग्यपूर्ण आहार त्या शाळेत मुलांना दिला जातो. परिसरात झाडे लावणे, पारंपरिक सण-उत्सव उत्साहात साजरे करणे हेही शिकवले जाते. त्या शाळेतील विद्यार्थी आजुबाजूच्या खेड्यातील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. थोरामोठ्यांच्या जीवनावरील नाटिका सादर करतात. एवढेच नव्हे तर तेथे राजकारणही शिकवले जाते. मुलांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. शिबिरे घेतली जातात.

शाळेच्या परिसरात गर्द झाडी आहे. त्यामुळे सोलापुरात जो उन्हाळा जाणवतो तो तेथे जाणवत नाही. उन्हाळ्यातही वातावरण प्रसन्न असते. अशी ही आगळीवेगळी व वैशिष्ट्यपूर्ण शाळा आहे.

– अनिता ढोबळे ९८२३२१०१३३

Last Updated On – 7th Jan 2017

About Post Author

3 COMMENTS

 1. माझा मुलगा पण या शाळेत होता

  माझा मुलगा पण या शाळेत होता
  नाना चे लक्ष असते पण सतत शिक्षक बदलत असल्याने गुणवत्तेवर परिणाम होतो बाकी छान आहे

 2. Apratim.

  Apratim.
  Ekda tya pujari siranbaddal mahiti deta yeil ka?
  Mala vatat ki pujari siranche vidyarthi godbole sir ani jabbar patel sir.
  Te doghehi pujari siranche abhhari astat karan te sangtat amhi tyancha mule ghadlo

 3. मी श्री केशव शिंदे सरांचा
  मी श्री केशव शिंदे सरांचा विद्यार्थी आहे मला सरांचा खुप अभिमान आहे 8275202948

Comments are closed.