सुधीर गाडगीळ – पुण्यभूषण!

0
35

—–

सुधीर गाडगीळ
पारंपरिक सभा-व्याख्यानादी कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचा असायचा तो वक्ता. तसेच सभेला अध्यक्षही असायचा. अध्यक्षीय समारोप ही मोठी आकर्षक बाब असायची. न. चिं. केळकर, लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ अशांची ती खासीयत. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी श्रोते गावातील सभागृहापासून मैदानापर्यंत कुठे कुठे जायचे व पुढची जागा पटकावायचे. बघता बघता, सभांचे ते माध्यम कालबाह्य झाले. वक्त्यांची, अध्यक्षांची प्रगल्भता कमी झाली. सभांमध्ये करमणुकीचा घटक शिरला आणि अध्यक्षांची जागा निवेदकाने वा सूत्रसंचालकाने घेतली. त्या पदाचे महत्त्व हे सर्वप्रथम ठसवले ते सुधीर गाडगीळने. तोपर्यंत कार्यक्रमात कधी निवेदन आले तर ते निव्वळ अनुक्रमाणिका-वाचन असायचे. सुधीरने त्या शुष्क निवेदनात त्याच्या सदा प्रफुल्लित चेहऱ्याने आणि ठसठशीत आवाजाने जिवंतपणा आणला. सुधीरने त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर कार्यक्रमात निवेदकाला वक्त्याइतके महत्त्व आणून दिले. सुधीरने ते कसब कसे आत्मसात केले, त्याने त्याचा जम कसा बसवला, त्याच्या निवेदन कारकिर्दीचा पाया कसा रचला गेला याबद्दलच्या आठवणी सुधीरने अनेक ठिकाणी ‘निवेदित’ केल्या आहेत. तो म्हणतो, ‘मी शुद्ध सदाशिवपेठी वातावरणात वाढलो. आजोबा रोज स्तोत्र म्हणून घ्यायचे. आजीचे बोट धरून मी कीर्तन-प्रवचनाला जायचो आणि वडिलांबरोबर व्याख्यानांना.’ स्वातंत्र्यवीर सावरकर, दत्तो वामन पोतदार, आचार्य अत्रे, ना.सी. फडके, एस.एम. जोशी, नाथ पै यांच्याकडून पै पै साठवत जावी तसे सुधीरने वक्तृत्वाचे गुण गोळा केले. मात्र सुधीरवर सर्वाधिक प्रभाव पडला तो पुलंचा. तो म्हणतो, ‘मी ऐकलेल्या वक्त्यांमध्ये पुलंचा प्रभाव माझ्यावर पक्का आहे. ते श्रोत्यांशी सहजपणानं संवाद साधत. पुलं कोणत्याही कार्यक्रमाला उगाच भारी पोषाखात जात नसत. त्यांचा पेहराव साधा पण स्वच्छ असे. त्यांचा तो नीटनेटकेपणा माझ्या मनावर ठसला.’ त्यातही सुधीरचे व्यावसायिक वेगळेपण आहेच. नीटनेटक्या पेहरावासाठी त्या काळात पुण्यात सगळ्यात महाग असलेल्या ‘सिलाई’ची निवड त्याने कपडे शिवण्यासाठी केली. तर वेळेअभावी कपडे घरी धुऊन इस्त्री करण्याच्या फंदात न पडता तो कपडे धुण्यासाठी बाजीराव रोडवरच्या ‘डिलक्स’कडे चार पैसे जास्त मोजू लागला. त्याच्या या व्यावसायिक वृत्तीतूनच त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ‘डिलक्स’ आवृत्ती तयार झाली.

सुधीरच्या कारकिर्दीच्या आरंभीचा काळ, म्हणजेच १९७० चे दशक. तो महाराष्ट्रात सांस्कृतिक समृद्धीचा काळ होता. युक्रांद, दलित पँथर यांच्या चळवळी, पुण्यातील तरुण मार्क्सवाद्यांचा डिलाईटचा अड्डा आणि त्याच वातावरणात प्रदर्शित झालेला ‘बॉबी’… अशा तरुणाईच्या उसळत्या, उत्साही माहोलामध्ये खास तरुणांच्या म्हणून ओळखल्या गेलेल्या ‘साप्ताहिक मनोहर’मध्ये सुधीर पत्रकारिता करत होता. ‘युक्रांद’च्या कुमार सप्तर्षी यांची मुलाखत आणि ‘चारो ओर सिर्फ बॉबी’ या दोन टोकांच्या गोष्टी सुधीरने सारख्याच उत्साहाने केल्या. सुधीरला पत्रकारितेतून असा चतुरस्त्रपणा येत गेला. ‘तू ऑफिसमधले बाकीचे काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस.’ असे खुद्द संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांनीच सांगितल्याने सुधीर बिनधास्त असायचा. धनंजय थोरात, विलासराव देशमुख, उल्हासदादा पवार यांच्याबरोबरची भटकंती असो, संजय कुलकर्णी, वरुणराज भिडे यांसारख्या समवयीन पत्रकार मित्रांबरोबर मंडईच्या मार्केट उपहारगृहामध्ये रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या ‘बाजार गप्पा’ असोत सुधीर सगळ्यांच्यात रमायचा.

मी ऐकलेल्या वक्त्यांमध्ये पुलंचा प्रभाव माझ्यावर पक्का आहे - सुधीर गाडगीळत्याच सुमारास ‘आय राईट विथ नेकेड पेन’ अशा बिनधास्त वृत्तीने चित्रपट पत्रकारिता करणाऱ्या ‘देवयानी’ चौबळशी या ‘ययाती’ची कामानिमित्त ओळख झाली! सुधीर हा तिचा ‘पुण्याचा वाटाड्या’ होता तर देवयानीने त्याला चित्रपटांच्या पत्रकार परिषदांना नेऊन ‘मद्यरात्री’च्या मुंबईचे दर्शन घडवले. सुधीरला चित्रपट कलावंतांच्या गाठीभेटीतून कलावंतांच्या पडद्यामागील ‘रूपेरी’ जीवनाची ‘रूपे’ समजली. “या वावरण्यातूनच ‘मंतरलेले चैत्रबन’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मला मिळाले” असे सुधीर म्हणतो. सुधीरने त्या कार्यक्रमात गदिमांची गीते-गाणी सादर करताना, त्याचे त्याबाबतचे निवेदन तयार करताना सुधीर फडके, रमेश देव, सीमा देव, राजा परांजपे व खुद्द गदिमा यांच्या भेटी घतल्या. त्यांच्याकडून गाणी लिहिताना, त्याला चाली लावताना, त्या गाण्यांचे चित्रिकरण करताना काय किस्से घडले याची माहिती जमा केली. ती आकर्षक रीतीने श्रोत्यांसमोर सादर केली. सुधीरच्या निवेदनाला चैत्रपालवी फुटली.

सुधीरला ‘चैत्रबना’ने पूर्णवेळ निवेदनाचा व्यवसाय तो करू शकतो असा विश्वास मिळाला. त्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय त्याच्या मनात घोळू लागला. तेव्हा त्याची पत्नी शैला हिने स्वत: नोकरी करून त्याच्या निर्णयाला सक्रिय पाठिंबा दिला. त्याच वेळी आणखी एक गोष्ट जुळून आली. मुंबई दूरदर्शनवर निर्माता असलेल्या अरुण काकतकर यांनी सुधीरला मुक्त वाव दिला. मुंबईत आल्यावर राहण्यासाठी स्वत:चे घर उपलब्ध करून दिले. “मी काकतकर यांच्यासारख्या मित्रांच्या सहकार्यामुळेच ‘आमची पंचविशी’, ‘वलयांकित’, ‘मुलखावेगळी माणसं’ यांसारखे कार्यक्रम करू शकलो” अशी कृतज्ञता सुधीर व्यक्त करतो.

आवाजाचे सम्राट अमिन सयानी यांची मुलाखत घेताना सुधीर गाडगीळत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना सुधीरने एकच सूत्र डोक्यात ठेवले होते, ते म्हणजे, कार्यक्रमाचे स्वरूप संध्याकाळी सात-साडेसात वाजता दमून-भागून घरी येणाऱ्या नोकरदार, पांढरपेशा वर्गाला डोक्याला त्रास होणार नाही असे हलकेफुलके ठेवायचे. सुधीरने अनेक नामवंतांना मनोरंजक पण उद्बोधक अशा गप्पा, मुलाखती सादर करताना ‘बोलते’ केले. लालचंद हिराचंद, आबासाहेब गरवारे, ना.ग. गोरे, बाळासाहेब ठाकरे, जयवंतराव टिळक, व्यंकटेश माडगुळकर इत्यादी नामवंत सुधीरपेक्षा वयाने व अनुभवाने ज्येष्ठ असूनही त्यांना सुधीरने मुलाखतीत ‘नाजूक’ प्रश्नांवर बोलायला लावले. एक उदाहरण देण्यासारखे आहे. बाकीबाब बोरकरांना ‘पंचविशी’च्या कार्यक्रमात बोलावण्याचे ठरले. त्यांनी सुरूवातीला आढेवेढे घेतले. त्यांच्या प्रत्येक अडचणींवर सुधीरकडे उत्तर तयार होते. बोरकर म्हणाले, ‘अहो, एवढ्या पहाटे आमच्या इथं रिक्षा मिळत नाही. स्टेशनवर पोचणार कसा?’ ‘मी रिक्षा घेऊन येतो’ असे म्हणत ठरलेल्या दिवशी पहाटे साडेपाचला भर पावसात सुधीर त्यांच्या दारात हजर झाला. त्याने त्यांची बॅग घेतली. ‘सरींवर सरी आल्या गो | वेली ऋतुमती झाल्या गो |’ या बोरकरांच्याच काव्यपंक्तींची आठवण व्हावी अशी परिस्थिती होती. गाडीत बसल्यावर मुंबईला पोचेपर्यंत त्यांच्याच कवितेच्या ओळी म्हणत, गोव्याच्या निसर्गरम्य परिसराच्या आठवणी जागवत सुधीरने ‘पोएट बोरकर’ यांचा ‘मूड’ जपला. समोरची व्यक्ती केव्हा नि कशी खुलेल याबद्दलचा, वर्तनशैलीचा,  ‘देहबोली’चा अभ्यास त्याला असा उपयोगी पडला!

दूरदर्शनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेल्या सुधीरला राज्याच्या कानाकोपऱ्यातून निवेदने, मुलाखती अशा कार्यक्रमांसाठी निमंत्रणे येऊ लागली. कार्यक्रमांच्या जाहिरातींमध्ये ‘टिव्ही स्टार’ असा सुधीरचा उल्लेख होऊ लागला. केवळ देशभरातील नव्हे तर परदेशातील मराठी माणसांचा एकही सांस्कृतिक अड्डा असा नाही, की जेथे सुधीरने हजेरी लावलेली नाही. गाण्यांचे कार्यक्रम, मुलाखती घेत मुलुखगिरी करणाऱ्या सुधीरने गेल्या चाळीस वर्षांत बत्तीसशे मुलाखतींचा टप्पा पार केला आहे. त्यातही त्याचा बोलावणे आले, की जायचे आणि पाट्या टाकून यायचे असा प्रकार नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणाच्या सुविधा, निवास, प्रवास यांच्या सोयी, मानधनाविषयीच्या अपेक्षा यांबाबत कोणताही संकोच न बाळगता सुधीर माईक व पैसे दोन्ही नीट ‘वाजवून’ घेतो.

अमिन सयानी यांची मुलाखत घेताना सुधीर गाडगीळ कोणतीही प्रकट मुलाखत घेताना ‘अभ्यासोनी प्रकट व्हावे’ या समर्थांच्या उक्तीचा विसर सुधीरला कधी पडला नाही. ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची तिच्या कार्यकर्तृत्वाचा तो अभ्यास करतो. त्याचा स्वत:चा असा स्वतंत्र कात्रणांचा संग्रह आहे. व्यक्ती-विषयानुसार लावलेला तो संग्रह कायम नवीन माहितीने अद्ययावत ठेवला जातो. तशी मुलाखत घेणारा प्रत्येकजण साधारण पूर्वतयारी करत असतोच. मग सुधीरने घेतलेली मुलाखत सरस कशामुळे ठरते याचे रहस्य त्यानेच एका मुलाखतीत उघड केले. ‘मुलाखत घेताना समोरच्याची फजिती करायची नाही, त्याचा अपमान होईल असे प्रश्न विचारायचे नाहीत. उपप्रश्नांचा भडिमार करत उगाचच एखाद्याला मध्ये मध्ये अडवायचे नाही. फार घरगुती गप्पा मारायच्या नाहीत.’ अशी काही पथ्ये पाळत सुधीर मुलाखत देणाऱ्याला खुलवतो.

कायम आडरानात राहिल्याने बोलण्यास संकोचणाऱ्या प्रकाश आमटे यांची सुधीरने कॅनेडियन श्रोत्यांसमोर सफाईदार इंग्रजीत मुलाखत घेतली. अमेरिकेसारख्या देशात अनेक वेळा जाऊन आलेल्या सुधीरचे इंग्रजी चांगले आहेच, परंतु इंग्रजी मातृभाषा असणाऱ्या श्रोत्यांना गहिवरून टाकणे ते सुद्धा अनेक ठिकाणी आमटे यांच्या मुलाखती सादर करून त्यांच्या कार्याला परदेशात मान्यता व निधी मिळवून देण्याचे मोलाचे कार्य सुधीरने केले.

सुधीर गाडगीळ आणि प्रकाश आमटे यांच्या संयुक्त दौऱ्याचे आयोजन करणाऱ्या कॅनडास्थित जगन्नाथ वाणी यांना २०१२ सालचा कॅनडा सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. वाणी यांचा पुण्यात सत्कार झाला त्या वेळी स्वत:च्या दातृत्वाबद्दल फारसे न बोलणाऱ्या वाणी यांचे दातृत्व व कर्तृत्व यांचा तपशील सुधीरने त्याच कार्यक्रमातील छोटेखानी मुलाखतीत उघड केला.

पुण्‍यभूषण पुरस्‍कार स्‍वीकारताना सुधीर गाडगीळज्याचा विशेष गौरव केला जातो त्या व्यक्तीने सत्काराला उत्तर देणारे भाषण न करता त्याची छोटेखानी मुलाखत घेण्याचा प्रकार सुधीरने रूढ केला. यामुळे त्या व्यक्तीविषयीची नेमकी माहिती व तिची मते श्रोत्यांना प्रत्यक्ष त्या व्यक्तीकडून ऐकायला मिळतात. मध्यंतरी ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सुधीरला गौरवण्यात आले तेव्हा आशा भोसले यांनी त्याची अशीच छोटेखानी मुलाखत घेतली. त्या वेळी ‘आपला पक्ष कोणता?’ या प्रश्नावर सुधीरने उत्स्फूर्तपणे ‘रसिकांचा’ असे उत्तर दिल्यावर खच्चून भरलेल्या ‘बालगंधर्व’मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला!

तर असा हा सुधीर गाडगीळ. तो ‘थिंक महाराष्ट्र’चा ‘ब्रँड अँम्बासिडर’ झाला आहे. त्या कामासाठी सुधीरइतकी योग्य व्यक्ती दुसरी कोणती असू शकते! परदेशातील कोणत्याही दौऱ्यात यजमानाकडील वास्तव्यात एकदाही फुकट फोन न करणारा सुधीर सतत कार्यमग्न असतो. दूरदर्शनवर कार्यक्रम करताना मोकळ्या वेळेत लेखन करणारा, वेळेचे पूर्ण नियोजन करणारा, मुख्यमंत्र्यांपासून मंगेशकर कुटुंबापर्यंत सगळ्या मान्यवरांकडे उठबस असूनही त्या ओळखीचा फायदा न घेणारा आणि आयुष्यातील प्रत्येक नवा लौकिक स्वत:च्या हिंमतीवर ‘संपादन’ करणारा सुधीर हाच कर्तृत्ववान मराठी माणसांना जोडणारा, ‘थिंक महाराष्ट्र’चा खरा अँम्बासिडर ठरतो!

सुधीर गाडगीळ
१२७१, सदाशीव पेठ,
पुणे – ४११०३०
०२० २४४ ३६५६/ ३३८१

– रमेश दिघे ९४२३०४७४४० ramesh_dighe@yahoo.in

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here