सुजलाम सुफलाम गाव – मुरुड-जंजिरा (Murud Janjira Village)

मुरुड-जंजिऱ्याला सिद्दी संस्थानचा इतिहास आहे, छत्रपतींनी ते सर करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तेव्हा दर्यासारंग दौलतखानाने बाजूलाच, कासा खडकावर पद्मदुर्ग उभा केला…

मुरुड-जंजिरा हे माझे गाव. रेवदंडा-साळाव पूल ओलांडून मुरुडकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी बदलती दृश्ये नजर खिळवून ठेवतात. अधुनमधून समुद्राच्या लाटांचा खेळ, तर कधी नजरेला सुखावणारी मुलायम हिरवळ, मध्येच लागणारी लहानशी गावे.

शिल्पकलेचा देखणा आविष्कार मुरुडच्या वेशीवर दृष्टीस पडतो, तो म्हणजे जंजिऱ्याच्या भूतपूर्व नवाबांचा राजवाडा. नवाबांनी तो राजवाडा 1885 च्या सुमारास प्रशासनाच्या सोयीसाठी बांधला. राजवाड्याचे शिल्प मुघल व गोथिक पद्धतीचे आणि मनोहारी आहे. राजवाड्याच्या ठिकाणापासून सभोवारचा समुद्र व मुरुड शहराच्या परिसराचे दृश्य विहंगम दिसते. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी.

आकाशाशी नाते जोडणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागांतून घुमणारा मस्त मोकळा वारा… मखमली वाळूचे रम्य सागरतीर, अथांग पसरलेला आणि पांढरेशुभ्र मोती ओंजळी भरभरून किनाऱ्यावर रिते करणारा संपन्न रत्नाकर! मुरुडच्या पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस राजापूरची खाडी, दक्षिणेस फणसाड अभयारण्याच्या डोंगर रांगा व पूर्वेला गारंबीच्या डोंगर रांगा अशा मुरुडच्या भौगोलिक सीमा आहेत.

मुरुडच्या हद्दीत प्रवेश करताना दर्शन होते ते कोटेश्वरी ग्रामदेवतेचे. देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरते. कोटेश्वरी मातेची पालखी यात्रेच्या आदल्या दिवशी निघते. मुरुडच्या पुरातन मंदिरांपैकी श्री भोगेश्वर हे देवस्थान आहे. ते सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे आहे. भोगेश्वर वास्तूची स्थापना चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातर्फे 1952 साली करण्यात आली. दरवर्षी महाशिवरात्र, रामनवमी, कृष्ण जन्मोत्सव हे दिवस प्रवचन-कीर्तन-भजन-पूजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरे केले जातात. मुरुड गावातील दत्तवाडी परिसरानजीक उत्तरेकडील टेकडीवर समुद्रसपाटीपासून सुमारे साडेतीनशे मीटर उंचीवर श्री दत्तगुरूंचे देवस्थान आहे. त्यामुळे मुरुडच्या वैभवात परिपूर्णता आणि विलक्षण रम्यता आली आहे. दत्तगुरूंच्या पादुकांची प्रतिष्ठापना ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर साधूंनी त्या ठिकाणी या टेकडीच्या माथ्यावरील सपाट मैदानात, उंबराच्या झाडापाशी अठराव्या शतकाच्या मध्यास केली. दत्तजयंतीच्या दिवशी तेथे यात्रा भरते व डिसेंबर महिन्यात लघुरुद्र आणि महाप्रसाद असा कार्यक्रम होतो. तेथील नीरव शांतता आध्यात्मिक व्यक्तींना ब्रह्मानंद देऊन सुखावते. मुरुड गावापासून उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे चारशे फूट उंचीवर अत्यंत सुंदर वास्तू आहे. ती म्हणजे इदगाह. मुस्लिम समाज रमजान ईद व बकरी ईद या सणांच्या दिवशी इदगाहवर आवर्जून नमाज अदा करतात.

masalaमुरुड जंजिरा हे तालुक्याचे ठिकाण आहे. नागरी, फौजदारी व दिवाणी प्रशासनाचे व न्यायालयांचे ठिकाण आहे. मुरुड शहराचा स्थानिक कारभार मुरुड नगरपरिषद पाहते. नगरपरिषदेची स्थापना जंजिरा संस्थानचे सुविद्य पुरोगामी नवाब सर सिद्धि अहमदखान ह्यांनी 29 मे 1888 रोजी ‘मुरुड नगरपरिषद अॅक्ट, 1888’ नुसार केली. भारत स्वतंत्र ऑगस्ट 1947 मध्ये झाला. जनतेने स्वातंत्र्याची चळवळ सर्व संस्थानांतून जोरात सुरू केली होती. जंजिरा संस्थानही त्याला अपवाद नव्हते. नवाब सिद्दि मुहम्मदखान यांनी प्रजा परिषदेच्या नेत्यांशी जानेवारी 1948 मध्ये वाटाघाटी केल्या. त्या वाटाघाटीतून एक समझोता झाला. त्याप्रमाणे तीन सभासदांचे एक मंडळ तयार करण्यात आले. त्यात अण्णासाहेब पेंडसे, नानासाहेब कुलकर्णी व डॉ. उबारे यांचा समावेश होता. त्यानंतर केंद्रीय शासनाने संस्थाने भारतीय संघ राज्यात विलिन करण्याचे धोरण आखले. नवाब सिद्दी मुहमदखान यांनी जनमत व राष्ट्रीय अपेक्षा यांचा आदर राखून संस्थान भारतीय संघ राज्यात 3 एप्रिल 1948 रोजी विलीन करण्याबाबतच्या तहनाम्यावर सही केली. सिद्दी अंबरखानने 1621 साली स्थापलेल्या संस्थानाचा अस्त झाला व तेथे लोकशाहीच्या पर्वाचा उदय झाला. संस्थानाच्या विलीनीकरणानंतर नगरपरिषदेची पहिली निवडणूक 1952 साली झाली. विनायक भिडे वकील पहिले लोकनियुक्त अध्यक्ष झाले. सुधा भास्कर दिघे या पहिल्या उपाध्यक्ष झाल्या.

हे ही लेख वाचा- 
मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी

मुरुड नगरपरिषदेला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांचा डिसेंबर 1960 मध्ये सत्कार करण्याचा बहुमान मिळाला. राष्ट्रपतींबरोबर मुंबईचे गव्हर्नर श्रीप्रकाश व भारताचे अर्थमंत्री व कुलाबा जिल्ह्याचे पुत्र चिंतामणराव देशमुख होते. बाबासाहेब आंबेडकर मुरुडला वारंवार येत असत.

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक शहरी संस्कृती यांचा सुंदर मिलाफ मुरुड येथे पाहण्यास मिळतो. स्वंतत्र घर, घरापुढे अंगण आणि घराच्या मागच्या बाजूला दूरपर्यंत पसरलेल्या नारळी पोफळीच्या बागा, बागेत पाण्याची विहीर ही तेथील खासियत. मुरुड शहराची नगररचना म्हणजे नगरनियोजन शास्त्राचा अप्रतिम नमुना आहे.

मुरुड ही जंजिरा संस्थानाची राजधानी 1947 पूर्वी होती. जंजिरा किल्ल्याच्या इतिहासाचा मध्यबिंदू सिद्दी व मराठे यांच्यातील संघर्ष हा आहे. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच यांचे व सिद्दीचे संबंध आणि या सागरी सत्तांचे राजकीय डावपेच हेही त्याच रंगमंचावर खेळले गेले. ते संस्थान तीनशेसत्तावीस वर्षें टिकले. संस्थानावर एकवीस नवाबांनी राज्य केले. त्या संस्थानाचा इतिहास म्हणजे स्वत:चे स्वातंत्र्य व जंजिरा किल्ल्याचे अजिंक्यपण टिकवण्यासाठी करण्यात आलेल्या संघर्षाची कहाणी आहे. आफ्रिकेच्या भूमीवरून, हबसाणातून आलेल्या दर्यावर्दी सिद्दीने रामकोळ्याच्या मेढेकोटांवर कब्जा मिळवला. सागराच्या निळाईवर भयाचे काळे सावट पडले आणि एके दिवशी मेढेकोटच्या जागी भर समुद्रात ‘अजिंक्य दूर्ग जंजिरा’ उभा राहिला. विलक्षण देखणी वास्तू. काळाचा प्रभाव की मातीचा गुण, त्या आक्रमक पाहुण्याच्या पुढील पिढ्यांनी भारतीय मातीशी इमान राखले! गावानेही नावापुढे ‘जंजिरा’ हे बिरुद मिरवले.

जंजिरा किल्ला राजपुरीच्या किनाऱ्यापासून पश्चिमेला आहे. राजपुरी मुरुडहून पाच किलोमीटर अंतरावर आहे. तेथून शिडाच्या होडीने किल्ल्याकडे जाण्याची व्यवस्था आहे. किल्ल्याच्या तटबंदीमधील बुलंद बुरूज त्या पाणकोटाचे अभेदत्व मनावर ठसवतात. जंजिऱ्यात संस्थानाच्या इतिहासाचे अवशेष आहेत. सिद्दींचा राजवाडा, पाण्याचे तलाव, तोफा, मशीद, मंदिर, कबरी, घरांची जोती व बुरूज संस्थानच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाच्या आठवणी ताज्या करतात. शिवछत्रपतींनी त्यांचे आरमार या किनाऱ्यापाशी साक्षात आणले होते. तुफानी वादळातील सागरी लाटांचे तांडव फिके पडावे असा सागरसंग्राम घडला! जंजिरा अभेद्य राहिला. आरमार विन्मुख परतले. मात्र जाताना सुन्या किनाऱ्यावर पद्मदुर्गाची देखणी ओळख ठेवून गेले. शिवरायांचे दर्यासारंग दौलतखान यांनी तो ‘पद्मदुर्ग’ किल्ला 1661 मध्ये जंजिऱ्यापासून काही अंतरावर कासा खडकावर बांधला! त्यास ‘कासा किल्ला’सुद्धा म्हणतात. किल्ला भर अरबी समुद्रात एखाद्या ऋषीसारखा भासतो. धर्म-संस्कृतीचे भेद, सत्तासंघर्षाचे विखार, व्यापार-उदिमातील लालसा समुद्राच्या विशाल लाटांनी दूर वाहून नेले. गावचे किनारे त्यांपासून स्वच्छ मोकळे झाले. गावाला अडीच किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. डोळ्यात न मावणारा, कसल्याच चौकटीत न बांधून घेणारा अथांग अरबी समुद्र!

maruti-mandirमुरुड किनाऱ्याला लागून विश्रामबाग आहे. तेथे लहान मुलांना खेळण्यासाठी छान व्यवस्था आहे. चौपाटीवर उंट सफारी, घोडे सफारी, समुद्र सफारी अशा मनोरंजनाच्या सुविधा आहेत. खानावळ, रेस्टॉरंट, राहण्यासाठी हॉटेले अशा सोयी मोठ्या प्रमाणात आहेत.

पर्यटक खोकरी घुमटांचे शिल्पकाम पाहण्यास येतात. तो भारतीय व अरबी पद्धतीच्या शिल्पकलेचा उत्तम प्राचीन नमुना मानला जातो. सिद्दींचे धर्मगुरू सय्यद अली नजीर व सिद्दी नवाबांच्या काही कबरी खोकरी या ठिकाणी आहेत. ‘खोकरी’च्या घुमटांनी सहिष्णुतेची स्मृती जपली आहे. त्याचबरोबर, दरीत उतरणारी जांभ्या दगडातील पायवाट, सभोवतालची प्रचंड वृक्षसंपदा, वाहत्या पाण्याची गाज, पक्ष्यांची किलबिल हे सर्व अनुभवायचे असेल तर गारंबी धरणाला पर्याय नाही. नैसर्गिक पाणी अडवून बांधलेले ते धरण ‘गारंबी धरण’ म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटक पाण्याच्या प्रवाहात डुंबण्यासाठी त्या ठिकाणी आवर्जून पावसाळ्यात येतात. दत्तमंदिराच्या टेकडीवरून जंजिरा हँगिंग व्हॅली परिसरात पुरातन शिवमंदिर ‘क्षेत्रपाल’ म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे रम्य निसर्ग आहे. वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देणारे ते ‘शिवस्थळ’ आहे. जंजिरा संस्थानचा इतिहास अरबी समुद्राशी निगडित आहे. मुंबईहून एसटी वाहतूक नव्हती, तेव्हा ‘खोरा बंदर’ हा एकमेव जलमार्ग होता. त्याची नजाकत काही निराळीच.

मुरुडचे खाद्यजीवन समृद्ध आहे. शाकाहारी, मांसाहारी आणि मत्स्याहारी खास कोकणी पदार्थांची रससंपदा! मत्स्यप्रेमींना ताज्या मासळीची चव चाखण्यास मुरुडलाच आले पाहिजे. मसाला लावून तव्यावर तळलेले बोंबिल, बांगडा यांची तर लज्जतच न्यारी. अस्सल सीकेपी पद्धतीची सोडे घातलेली खिचडी, भरली वांगी, वालाच्या बिरड्याची व मसुराची आमटी यांचीही लज्जत वेगळी. मोदक, पुरणपोळी, तेलपोळी हा मेनू शाकाहारींसाठी. तेथील आमसुलांचे कोकम सार आणि सोलकढी यांची चव जिभेवर रेंगाळतेच. रुचकर, चविष्ट, स्वादिष्ट आणि पोषक असे पूर्णब्रह्म!….

मुरुड गावच्या परंपरांमधून एकात्मतेचे दर्शन घडते. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर हिंदू समाजामधील माळी, आगरी, भंडारी, कोळी ह्यांची वस्ती जास्त आहे. विविध जातिधर्माचे लोक तेथे एकत्र नांदतात. नारळ व सुपारी यांचे उत्पादन व मासेमारी हा तेथील लोकांचा प्रमुख उद्योग आहे. तसेच, तेथे भातशेती व कडधान्ये यांचे पीक घेण्यात येते. मुरुडची बाजारपेठ मोठी आहे. किराणा माल, कापड, मेडिकल, बांधकामाचे साहित्य, फर्निचर, शेती व मासेमारीची आयुधे, इंधन व इतर दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंची बरीच दुकाने आहेत.

तेथे सण मांगल्याने व उत्साहाने साजरे होतात. नारळी पौर्णिमेला कोळी समाजाकडून; तसेच, नगरपालिकेतर्फे संपूर्ण मुरुडवासीयांकडून नारळाची मिरवणूक निघते. सागराला नारळ अर्पण करून शांत होण्याचे आवाहन केले जाते. पूर्वी कोटेश्वरी देवीला रेडा अर्पण करून त्याचा बळी देत असत. सामाजिक कार्यकर्ते कै. रामचंद्र कोरलेकर यांच्या मुख्य प्रयत्नांनी ती प्रथा बंद केली. तसेच, लग्नानंतर रात्री वरातीला व त्यानंतर गोंधळाला जास्त महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये ग्रामदेवता कोटेश्वरीला रविवारी पहाटे घोसाळ्याची फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. रामनवमीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत दांडपट्टा, तलवारबाजी हे पारंपरिक खेळ खेळले जातात. गणेशोत्सवात घरोघरी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करून मनोभावे पूजा केली जाते. बकरी ईद व रमजान ईद हे मुस्लिम धर्मियांचे सण उत्साहाने, एकोप्याने साजरे होतात.

-janjirakillaमुरुड तालुका सहकारी सुपारी संघ ही संस्था मुरुडच्या व्यापारविश्वातील मानबिंदू आहे. तिची स्थापना नवाबांच्या प्रेरणेने 1938 मध्ये झाली.

नवाबांच्या काळापासून मुरुड-जंजिरा एकसंध सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून विकसित झाले. अंजुमन इस्लाम, भंडारी बोर्डिंग, सोमवंशीय क्षत्रिय माळी समाज, महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था, सर एस ए हायस्कूल, वसंतराव नाईक महाविद्यालय या व अशा इतर संस्था ज्ञानदानाचे, सांस्कृतिक व सामाजिक विकासाचे कार्य करत आहेत.

मुरुड स्वच्छतेमध्ये अग्रभागी आहे. केंद्र शासनाने देशामध्ये राबवलेल्या ‘स्वच्छ  भारत अभियाना’त मुरुड शहर देशात तेहतिसावे व महाराष्ट्रात तेविसावे येऊन बक्षिसपात्र ठरले आहे. मुरुड नगरपरिषदेतर्फे दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भव्य मुरुड-जंजिरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले जाते.

बहुतांश वेळेला अनेक पर्यटकांचा संभ्रम होतो, की नक्की कोणते मुरुड? रत्नागिरीमध्ये दापोली तालुक्यात हर्णे मुरुड म्हणून एक बंदर आहे. परंतु मुरुड जंजिरा हे रायगड जिल्ह्यात मोडणारे ठिकाण आहे. हर्णे मुरुड आणि मुरुड जंजिरा ही पूर्णत: वेगवेगळी गावे आहेत.

कालानुरूप मुरुडच्या भौगोलिक परिस्थितीत, लोकांच्या राहणीमनात बदल होत आहे. मुरुडला ऐतिहासिक स्मृती आहेत. समाजजीवन, कला, संस्कृती, परंपरा, जातीय सलोखा यांचे समृद्ध जीवन आहे आणि महत्त्वाचे म्हणजे विश्वनिर्मात्याच्या कुंचल्यातून साकारलेली सौंदर्यस्थळे ह्यांची अमूल्य अशी देणगी लाभलेली आहे. अभिमान सार्थ ठरावा असे माझे सुजलाम-सुफलाम ‘मुरुड-जंजिरा’ हे गाव आहे! माझ्या ह्या गावाबद्दल लिहिताना शब्दसंपदा अपुरी पडते.

प्रेरणा चौलकर 9518583577/8446516449
patilprerana92@gmail.com

About Post Author

4 COMMENTS

  1. अप्रतिम शब्दांकन, तिथे काही…
    अप्रतिम शब्दांकन, तेथे काहीकाळ वास्तव्य केल्यामुळे वाचताना ते दिवस डोळ्यासमोर उभे राहीले.

  2. खूप छान माहितीपूर्ण लेख…
    खूप छान माहितीपूर्ण लेख लिहिला आहेस प्रेरणा.

Comments are closed.