साहित्य अभिवाचन – नवे माध्यम

3
100
तळेगाव येथील कलापिनी संघ स्‍पर्धेत अभिवाचन करताना (व्यासपीठावर मध्यभागी) संघप्रमुख डॉ, सुहास कानिटकर
तळेगाव येथील कलापिनी संघ स्‍पर्धेत अभिवाचन करताना (व्यासपीठावर मध्यभागी) संघप्रमुख डॉ, सुहास कानिटकर

तळेगाव येथील कलापिनी संघ स्‍पर्धेत अभिवाचन करताना (व्यासपीठावर मध्यभागी) संघप्रमुख डॉ, सुहास कानिटकर  मी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ऐरोली शाखेतर्फे १९७७-७८ व १९७८-७९ साली कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. कथास्पर्धेचा निकाल जाहीर करायची वेळ आली तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, की आपण निकाल जाहीर करण्याच्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा – म्हणजे निकाल पेपरमध्ये जाहीर करणे किंवा फक्त विजयी स्पर्धकांना, म्हणजेच कथालेखकांना तो कळवणे ह्यापेक्षा वेगळ्या प्रकारे तो जाहीर करावा. मी पारितोषिक वितरणासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या कार्यक्रमात कथास्पर्धेच्या सर्व लेखक-स्पर्धकांना निमंत्रित केले. कार्यक्रमातच निकाल जाहीर होईल हे कळवले.

किशोर पेंढरकर कलाकारांशी संवाद साधताना  प्रत्यक्ष कार्यक्रमात तीन सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कथांचे कार्यक्रमास उपस्थित सहभागी लेखक, प्रेक्षक व विशेष अतिथींसमोर सर्वप्रथम अभिवाचन केले. अभिवाचनासाठी स्थानिक कलाकारांकडून पंधरा-वीस दिवस तालीम करवून घेऊन ते उत्तम रीतीने सादर होईल याची तयारी केली. त्यामुळेच कथांमधील भावार्थ, जो लेखकाला वाचकांपर्यंत पोचवायचा होता तो प्रेक्षकांपर्यंत यथार्थपणे पोचवण्यात यश आले. प्रेक्षकांना, सहभागी लेखकांना कथा भावल्या व त्यानंतर कुठल्या कथेला कोणत्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले हे जाहीर केले. त्यामुळे उपस्थित सहभागी लेखकांनाही आपल्या कथेत काय कमी पडले आणि पारितोषिक विजेत्या कथेत काय अधिक चांगले आहे ते स्पष्टपणे आपोआप कळून आले. उपस्थितांना कथा सादर करून नंतर पारितोषिक-वितरण हा विचार, ही पद्धत आणि कार्यक्रमाचे असे आयोजन फारच आवडले.

 कार्यक्रमाचे यश पाहून माझ्या लक्षात आले, की अशा प्रकारच्या अभिवाचनात नाटकाच्या किंवा कथाकथनाच्या सादरीकरणाइतकी ताकद आहे आणि कुठल्याही प्रकारच्या साहित्याचे अभिवाचन प्रभावीपणे करता येऊ शकेल! मी त्यातूनच कथा, कविता, नाटक , कादंबरी, ललित लेख, सदर असे कुठल्याही प्रकारचे साहित्य घेऊन, त्यावर मंचीय सादरीकरणासाठी आवश्यक असल्यास काही संस्कार – संकलन करून त्यांचे अभिवाचनाचे प्रयोग सुरू केले.

पारितोषिक वितरण समारंभात प्रदीप भिडे कलाकरांना मार्गदर्शन करताना  केवळ वाचिक अभिवाचनाद्वारे लेखकाला अपेक्षित असणारा भावार्थ, त्यातील घटना, व्यक्तिमत्त्व जिवंत करून प्रेक्षकांसमोर ते चित्र साकार करण्यासाठी अतिशय स्पष्ट उच्चारण, आवश्यक ती लय, अर्धविराम-स्वल्पविराम-पूर्णविराम यांचा योग्य वापर, शब्दांवरील जोर, आवाजातील योग्य ते चढउतार या सगळ्यांचा समर्पक वापर करून कलाकृतीची, साहित्याची सुंदर अनुभूती प्रेक्षकांना देता येते हे लक्षात आले आणि साहित्य अभिवाचनाचे प्रयोग जोमाने सुरू झाले. त्यातून कोमसापच्या देवनार शाखेतर्फे साहित्य अभिवाचन स्पर्धेस सुरूवात झाली आणि या नव्या माध्यमास टोक येत गेले. त्यामधून गावोगावी साहित्य अभिवाचन समूह तयार होऊ लागले आहेत.

 साहित्‍यविश्वात या प्रकारच्या अनेक घडामोडी सतत घडत असतात. वेगवेगळ्या चळवळी उदयास येतात, त्यांतील काही सुरुवातीच्या काळात जोमाने, उत्साहाने चालवल्या जातात, नंतर बंद पडतात. काही चळवळी मात्र पुढे-पुढे जात, चांगली वळणे घेत नवनवीन अध्याय लिहितात. परंतु सर्व चळवळींची नोद साहित्यप्रवासाच्या इतिहासात होतेच असे नाही. तरीही त्या चळवळी आपापले योगदान, सेतुबंधनातील खारीच्या वाट्याप्रमाणे देत, वाटचाल करत राहतात.

'सफर ' नाटकाचे अभिवाचन करताना महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखेचा संघ  देवनारची (मुंबई ) अभिवाचन स्पर्धा आठ वर्षे सातत्याने चालू आहे. कोमसापच्या देवनार शाखेचे दत्तात्रय सैतवडेकर यांनी पुढाकार घेऊन, माझ्याशी सतत चर्चा करून ‘साहित्य अभिवाचन’ ही स्पर्धा प्रत्यक्षात आणली. आमची चर्चा दरवर्षी स्पर्धेआधी आणि स्पर्धेनंतरही चालू राहते. स्पर्धेचे अटी, नियम, स्पर्धेचे स्वरूप यांत सातत्याने चांगले बदल घडवत स्पर्धेने यशस्वी स्वरूप घेतल्याचे जाणवत आहे.

 स्पर्धेत प्रत्येक संघासाठी सादरीकरणाची मर्यादा एक तास ते एक तास दहा मिनिटे एवढ्या वेळची ठरवण्यात आली आहे. अनेकांनी कालमर्यादा पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटांची का नाही असे सूचित केले. परंतु स्पर्धेचा उद्देश हा केवळ साहित्य अभिवाचनापुरता मर्यादित न राहता, नवसाहित्याची निर्मिती किंवा नवीन संकलित कलाकृतीची निर्मिती व्हावी असा विस्तारित केला गेला आहे. पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी ठेवल्यास आयते तयार साहित्य उदाहरणार्थ- एकांकिका, कवितासंग्रह, दीर्घकथा सहज उपलब्ध होऊ शकते. परंतु एक तास ते एक तास दहा मिनिटांच्या कालावधीमुळे उपलब्ध साहित्याचा थेट वापर न होता, संघांना नवीन संहिता किंवा संकलन यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते.

 काही संघ संपूर्णपणे नवीन संहिता लिहून काढतात तर काही संघ एखाद्या कादंबरीतील किंवा नाटक-खंडकाव्यातील काही भाग उत्तम रीतीने निवडून त्याचे वाचन करतात. काही संघ स्वत: कथा, कविता, नाटक , लेख इत्यादी अनेक साहित्यप्रकारांतील वेचे निवडून एखाद्या विषयाचा परिपूर्ण वेध घेताना, स्वत:चे लेखन आणि सूत्रबांधणी करतात. या स्पर्धेचे हे वैशिष्ट्य म्हणता येईल, की एखाद्या विषयाची निवड संघाने केली तर तो फुलवण्यासाठी संघ अनेक साहित्यप्रकारांच्या संकलित वेच्याचा वापर करू शकते, परंतु विषयसूत्र मात्र असले पाहिजे.

‘साहित्य-अभिवाचन’ स्पर्धेत साहित्य आणि वाचिक अभिनय यांचे सुंदर मिश्रण तयार होते  गेल्या आठ वर्षांचा काळ पाहता असे लक्षात येते, की विशिष्ट कालावधीच्या अटीमुळे संघांनी काही नवीन संहिता निर्माण केल्या. साहित्यक्षेत्रात त्यांची नोंद अभावाने घेतली गेली आहे. पण त्यांतील काही संहिता अशा आहेत, की त्यांना योग्य ती प्रसिद्धी मिळाली पाहिजे आणि त्यांचे प्रयोगही विविध ठिकाणी व्हायला हवेत.

 स्पर्धा जशी संघांसाठी आव्हानात्मक आहे, तशीच, किंबहुना संघापेक्षाही जास्त परीक्षकांसाठी आव्हानात्मक आहे. कारण विविध साहित्यप्रकार हाताळले जात असल्याकारणाने सर्व साहित्यप्रकारांची जाण असणारे, सर्व साहित्यप्रकारांची बलस्थाने आणि त्यांच्या मर्यादा यांची जाणीव असणारे, तसेच ‘अभिवाचनाची’ही जाणीव व अभ्यास असलेले परीक्षक असणे आवश्यक ठरते.

 ‘साहित्य-अभिवाचन’ स्पर्धेत साहित्य आणि वाचिक अभिनय यांचे सुंदर मिश्रण तयार होते. नाटकांतील मंडळींना, एकाच जागेवर बसून केवळ वाचिक अभिनयाद्वारे साहित्याचे वाचन नाटकीय ढंगाने करणे रुचत नाही, पण प्रत्यक्षात अशा अभिवाचनाचा प्रसंग जिवंत करणे तेवढे आकर्षक वाटत नाही तर अनेक साहित्यिकांना त्यांचा मंचीय आविष्कार अनुभवला की दोन्ही घटकांना त्याचा आवाका लक्षात येतो व चांगल्या आविष्काराने सर्वजण अवाक् होतात.

 हे माध्यम केवळ वाचिक अभिनयाद्वारे आपण निवडलेले साहित्य किंवा विषयसूत्र निवडून तयार केलेली संहिता, तिचा भावार्थ प्रेक्षकांपर्यंत पोचवणे, त्या साहित्याच्या भावविश्वात एक तास प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे सामर्थ्य दाखवणे हे काम सोपे नाही!

– किशोर म.पेंढरकर
‘आशियाना’,
एएल ६/४/३, सेक्टर-५,
ऐरोली, नवी मुंबई -४००७०८
मोबाईल – ९८२१२३१४६६
Email – akansha_enterprises2005@yahoo.co.in

About Post Author

3 COMMENTS

  1. khup sundar lekh sir apala
    khup sundar lekh sir apala ani paripurna mahiti apan dilit abhivachan kase asave. kadhi spardha asen tar mala nakki avadel prekshak mhanun sahbhagi honyas.. sunil khandkear 8767561782 ha majha namber ahe mala msg karu shakta

  2. Namskar Sir ,
    Mla abhivachn…

    Namskar Sir ,
    Mla abhivachn spardhet bhag ghyayla nkkich aavdel.
    Applya lekhane mla khup mhit milali v mi prerit zalo ahe .
    Thanks,
    Vishal Tivarekar

  3. अभिवाचन स्पर्धा केंव्हा असते…
    अभिवाचन स्पर्धा केंव्हा असते ते कळावे.

Comments are closed.