सासवडचा पुरंदरे वाडा

2
90

पुण्यापासून पूर्वेस तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावी सरदार पुरंदरे यांचे दोन वाडे आहेत. वाडे कऱ्हा नदीच्या साधारणपणे काठावर आहेत. त्यांची पडझड झालेली आहे. त्या दोनपैकी मुख्य वास्तू म्हणजे पुरंदरे यांचा भुईकोट! अंबारीसह हत्ती जाईल अशा सुमारे पंचवीस फूट उंचीच्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर पुण्याच्या शनिवारवाड्याचा जणू जुळा भाऊ असा पुरंदऱ्यांचा वाडा दिसतो. दोहो बाजूंस अष्टकोनी बुरुजांची वास्तुरचना पाहून क्षणभर मती गुंग होते. दहा फूट उंचीची चौकट आणि तिला घट्टारलेली गजखिळ्यांनी युक्त दारे वाड्याच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत जणू! दरवाज्यावरील गणेशपट्टी आणि नक्षीकाम मनास सुखावते. दोहो बाजूंस तटबंदीच्या सुमारे पंचवीस फूट उंचीच्या रुंद भिंती, त्यास जोडणारे बुरुज आणि प्रत्येक कोपऱ्यावर व मध्यभागी पंचकोनी सज्जे हे तत्कालीन वास्तुरचनेचे वैशिष्ट्य सांगून जातात. परंतु वाड्याचे विस्तीर्ण स्वरूप पाहिल्यावर आतील चारचौकी वाड्यांचे चार मजले पेलण्याचे सामर्थ्य असलेल्या जोत्यांवरून नजर फिरवल्यावरून त्याची त्या काळी असलेली ऐतिहासिक उभारणी लक्षात येते. मात्र वाड्यात एकही वास्तू शिल्लक दिसत नाही.

तटाच्या भिंतींना लागून गणेशमंदिराचे प्रवेशद्वार आहे. तसे मंदिर वाड्याच्या आत आहे. श्रीगणेशाचे दर्शन घेण्यास पाच-सहा पायऱ्या चढून वर जावे लागते. गणेशाचे वैशिष्ट्य असे, की तो द्विभुज आहे. मंदिराला जोडून उभी असलेली तटबंदीची चिरेबंदी भिंत, त्यावरील जंग्या आणि इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्यांनी पडलेली थोडीफार भगदाडे पाहून तिच्या भक्क्मपणाची मातब्बरी पटते. तो वाडा अंबाजीपंत पुरंदऱ्यांचा! वाड्याच्या मागच्या बाजूस पाठभिंतीस जोडून अप्रतिम भैरवनाथ मंदिर आहे. त्यात एक पोर्तुगीज घंटा आहे.

पहिल्या वाड्याच्या शेजारी, बोळासारखे अंतर सोडून पुरंदरे यांचा दुसरा वाडा आहे. वाड्याचे प्रवेशद्वार पहिल्या वाड्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला आहे. ते प्रवेशद्वारसुद्धा अंबारीसह हत्ती जाईल इतक्या उंचीचे आहे. त्यावरील नगारखाना डौल सांभाळून आहे. वाडा उत्तराभिमुख आहे. त्याचा दरवाजा भक्कम आहे. त्यावरील नक्षीदार सज्जा लांबरुंद, नाजूक आहे.

दोहो बाजूंला देवड्या, समोर सोफा… तेथे राहतात श्री सुनील पुरंदरे. चौसोपी, तिघई, दुमजली अशा त्या वाड्याचे जुने स्वरूप बऱ्यापैकी जपले गेले आहे. दिवाणखान्याचे स्वरूप मनोहरी असे दिसते. पंचवीस बाय पस्तीस या आकाराचा दिवाणखाना सुरूचे खांब, दोन खांबांमधील महिरप, कोरीव भक्कम तक्तपोशी धारण करून, त्याच्या धन्याचे वैभव दाखवून जातो. तीन फूट जाडीच्या भिंतीत प्रत्येक दहा फुटांवर खिडकी असून खिडकीच्या लाकडी दारावर नक्षिकाम केलेले दिसते. दिवाणखान्याच्या दारात कारंजाचा हौद आहे. त्याच्या रचनेचे कौशल्य विलक्षण आहे. एका बाजूच्या दुमजली सोप्यात काही पुरंदरे मंडळी राहतात. त्याच्या समोरचे सोपे पडलेले आहेत. दरवाज्यावरील सोप्यात मात्र जुन्या खुणा दिसून येतात. उत्तम प्रकारची तक्तपोशी, भिंतीवरील हिरमुजी रंग व त्यावरील नक्षिकाम टिकून आहे. पुन्हा खाली उतरल्यावर पडलेल्या सोप्याच्या भिंतीच्या वर पाण्याची टाकी आहे. तेथून पूर्ण वाड्यास पाणीपुरवठा होत असे.

खाली दोन चौकी जोत्यांवर दुमजली इमारती आहेत. मुख्य वाड्यास जोडून चार चौक आहेत. तेथे काही कुटुंबे राहतात.

दोन्ही वाड्यांचे पूर्ववैभव अंशत: जरी शिल्लक असले तरी त्यात एकेकाळी वास्तव्य करणाऱ्या अंबाजीपंत व त्र्यंबकपंत पुरदऱ्यांच्या स्वराज्यनिष्ठेचा व कर्तृत्वाचा वैभवशाली इतिहास अक्षय टिकून राहिला आहे. निष्ठा, नम्रता, ऋजुता, सर्जनशीलता, सुसंस्कृतता लेखणीने, वाणीने आणि समशेरीने सिद्ध करणारा पुरंदरे घराणे मराठ्यांच्या इतिहासात अपूर्व व अजोड असे होऊन गेले.

शके 1625 (सन 1703) मधील एका पत्रात ‘कसबे सासवडचे कुलकर्ण व कर्यात सासवडचे कुलकर्ण पदाबद्दल समस्त पुरंदरे यांनी अत्र्यांशी वाद घातले.’ अशी नोंद आहे. ‘शके 1614 (सन 1692) च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत पुरंदरे, धनाजी जाधवांबरोबर चंजीस (जिंजीस) जाऊन जमिनीच्या सनदा घेत आहेत.’ अशी एका पत्रात नोंद आढळते. त्यावरून असे म्हणता येईल, की पुरंदरे घराण्याकडे परंपरागत कुलकर्ण वतन होते. त्या घराण्यातील अंबाजीपंत ही व्यक्ती धनाजी जाधवराव यांच्या बरोबरीची असल्याचे दिसते. शके 1614 मध्ये पुरंदरे मराठ्यांचे नोकर होते. शके 1624 मध्ये ते सुखवस्तू रयत आहेत. सासवड गाव कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे असे. शके 1623 मध्ये अत्रे आणि पुरंदरे यांचा वाद असल्याचे दिसते. रामचंद्र पंत अमात्य, सेनापती धनाजी जाधवराव, सचिव शंकराजी नारायण यांच्याशी पुरंदऱ्यांचा दृढ परिचय होता. त्या घराण्यातील हेरंब नावाचा माणूस बराच महत्त्वाचा होता. तुको त्र्यंबक, अंबाजी त्र्यंबक या बंधुद्वयांखेरीज त्यांचे चुलतभाऊ काशी, गोमाजी, गिरमाजी विश्वनाथ व भाऊबंद चिंतो महादेव पुरंदरे हेसुद्धा आपल्या वकुबाप्रमाणे राजकारणात वावरत होते. सेनापती धनाजी जाधवरावांच्या कृपेने त्यांना थोरपद प्राप्त झाले.

छत्रपती शाहूमहाराज सुटून आल्यावर लांबकानी (खानदेश) येथे अंबाजीचा पुतण्या मल्हार तुकदेव हा शाहुराजांना भेटला. त्यावेळी काही अत्रे मंडळीही शाहुमहाराजांकडे सामील झाली.

शाहूराजे साताऱ्याला विधियुक्त अभिषेक करून (1708) छत्रपती झाले. अंबाजीपंत व खंडो बल्लाळ यांचा स्नेह जुळला. पंतांच्या साहाय्याने बाळाजी विश्वनाथाने कर्ज काढून फौज बनवली. शाहुराजांनी सेनापतीपदावरून चंद्रसेनास काढल्यावर त्याचा भाऊ संताजी यास नेमले. तो कर्तृत्वशून्य निघाल्यामुळे 1712 मध्ये मानसिंग मोरे यास सेनापती नेमले व त्याच्या दिमतीस अंबाजीपंत यास नेमले. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर 17 एप्रिल 1720 रोजी बाजीरावास छत्रपती शाहूमहाराजांकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्याच वेळी अंबाजीपंत पुरंदरे यांना मुतालिकीची वस्त्रे करून दिली. पुरंदरे मुतालिक म्हणून साताऱ्यास शाहूमहाराजांजवळ राहत असत. अंबाजीपंत, त्यांचा मुलगा महादोबा, मल्हार तुकदेव ऊर्फ दादोबा, त्र्यंबक सदाशिव ऊर्फ नाना हे शाहुमहाराजांजवळ राहून पेशव्यांची बाजू सांभाळत. 1737 मध्ये अंबाजीपंत, पिलाजी जाधव व गणोजी भोसले आणि आनंदराव पवार यांनी माळव्यात मोठी स्वारी करून दयाबहादुराशी कित्येक संग्राम व व्यवहार केले. कोल्हापूरकर संभाजीराजे यांच्या व शाहुमहाराजांच्या भेटीच्या प्रसंगी जाखणवाडी गावच्या मैदानात अंबाजीपंत होते (1731). उमाबाई दाभाडे यांच्या भेटीसाठी शाहुमहाराजांनी काही महत्त्वाची मंडळी पाठवली होती. त्यांत अंबाजीपंत होते.

बाजीराव पेशव्यांशी अधिकारवाणीने अंबाजीपंत बोलत असत. तरीसुद्धा त्यांत आदब राखत असत. पेशवे लहान असले तरी अंबाजीपंतांस पत्रातून ‘चिरंजीव’ असे संबोधत असत. बाळाजी ऊर्फ नानासाहेब यांना जेव्हा दमाजी गायकवाडाने पकडले, त्यावेळी अंबाजीपंतांनी त्यांना दंड भरून सोडवले. बाजीरावांविरुद्ध कारस्थाने करणाऱ्या सरदारांना पत्रे लिहून त्यांचा बंदोबस्त केला. अंबाजीपंत पेशव्यांचे कारभारी व उपमंत्रीच होते. त्यांचा मृत्यू भाद्रपद शुद्ध 8, शके 1656 (सन 1735) ला माहुली येथे झाला. त्यांच्या सौभाग्यवती बयाबाई यांनी सहगमन केले. महादोबा व सदाशिव हे त्यांचे पुत्र. पानिपतच्या युद्धात बाबा पुरंदरे होते. त्यांना ग्वाल्हेरच्या दरम्यान व्यवस्थेसाठी मागे ठेवले होते. महादोबा पुरंदरे हे नानासाहेबांच्या वेळी एक सज्जन व पेशव्यांच्या गुरुस्थानी होते.

मराठ्यांच्या इतिहासात कर्तृत्ववान व निष्ठावंत अशी बहुमोलाची माणसे त्या घराण्याने दिली.

(आधार – डॉ. सदाशिव शिवदे लिखित ‘ऐतिहासिक वाडे – भाग 1’)
(छायाचित्र – सदाशिव शिवदे)

About Post Author

Previous articleजलदुर्ग कोर्लई
Next articleवाळुज गावची मंदिरे
डॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदे'चे अध्‍यक्ष होते. त्‍यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्‍कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्‍यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्‍होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्‍या पत्‍नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्‍यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्‍तके प्रकाशित आहेत. त्‍यांच्‍या 'माझी गुरं-माझी माणसं' या ग्रामीण कथासंग्रहातील कथांचे आकाशवाणीवर वाचन झाले. शिवदे यांना त्‍यांच्‍या लेखनाकरता अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. शिवदे यांचे ७ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. लेखकाचा दूरध्वनी 9890834410

2 COMMENTS

  1. अतिशय सुंदर अशी माहिती आपण…
    अतिशय सुंदर अशी माहिती आपण दिली आहे त्याबद्दल धन्यवाद ? ?

    साहेब मला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या स्वराज्य कार्यात सहभागी असणार्‍या स्वराज निष्ठा यादव घराण्या बद्दल माहिती हवी आहे आपणास काही माहिती उपलब्ध असेल किंवा झाली तर आम्हाला देवू शकता काय
    विशाल यादव
    सासवड, पुरंदर
    7507569696

  2. अतिशय सुंदर अशी माहिती आपण…
    अतिशय सुंदर अशी माहिती आपण दिली आहे त्याबद्दल धन्यवाद ? ?

    साहेब मला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या स्वराज्य कार्यात सहभागी असणार्‍या स्वराज निष्ठा यादव घराण्या बद्दल माहिती हवी आहे आपणास काही माहिती उपलब्ध असेल किंवा झाली तर आम्हाला देवू शकता काय
    विशाल यादव
    सासवड, पुरंदर
    7507569696

Comments are closed.