साल्हेर आणि मुल्हेर किल्ले (Salher and Mulher Forts)

1
342

नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातले साल्हेर आणि मुल्हेर हे दोन आवळे जावळे किल्ले, महाराष्ट्र आनि गुजरातच्या सीमेवर वसलेले आहेत. पैकी साल्हेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त उंच किल्ला. या त्याच्या वैशिष्ट्यामुळे गडप्रेमींचा तो आवडता किल्ला आहे. इतरवेळी रखरखीत दिसणारा ह्या किल्ल्याचा परिसर पावसाळ्यात असंख्य धबधब्यांमुळे अतिशय रम्य दिसतो.

साल्हेरभोवती एक रहस्याचेही वलय आहे. इ.स.1670 मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा पाठीवर येणाऱ्या मुघल सैन्याला झुकांडी देताना लुटीतला अर्धा खजीना साल्हेरवर लपवला होता अशी वदंता होती त्यामुळे एकेकाळी साल्हेर आणि आजूबाजूच्या डोंगरांमध्ये खजीना शोधणाऱ्यांचीही वर्दळ असायची. मुरलीधर खैरनार यांच्या ‘शोध’ ह्या वेगवान रहस्यमय कादंबरीला याच वदंतेचा आधार आहे. प्रत्यक्षात सुरतेच्या लुटीचा खजीना अर्ध्या सैन्याबरोबर राजगडावर सुखरूप पोहोचला आणि अर्ध्या सैन्यानिशी महाराजांनी मुघल सैन्याशी दिंडोरी येथे सामना केला आणि त्यानंतर साल्हेर, मुल्हेर, अहिवंत, खळा, जावडा, मार्कंडा हे किल्ले स्वराज्याला जोडले. स्वराज्याचे पहारेकरी असलेल्या या दोन किल्ल्यांविषयी रजनी देवधर यांनी त्यांचे अनुभव आजच्या लेखात लिहिले आहेत.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

भटकंती साल्हेर,मुल्हेरची 

नाशिक हे प्राचीन गाव धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण  आहे. प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना पंचवटी येथे वास्तव्य केलेहोते अशी आख्यायिका आहे. गोदावरीच्या काठावरील काळ्या आणि गोऱ्या रामाची मंदिरे, बारा ज्योतिर्लिंगामधील त्र्यंबकेश्वरचे देऊळ, सप्तशृंगी देवीचे देऊळ आदी  पुरातन  मंदिरे   असे अधिष्ठान लाभलेल्या नाशिकला ‘गिर्यारोहकांची पंढरी’ अशी  आणखी एक ओळख आहे. महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ल्यांपैकी सुमारे तीस किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत. येथील किल्ले, नामवंत सुळके उंच, दमछाक करणारे, गिर्यारोहकांचा कस पाहणारे आहेत. त्यांना पाहूनच नवशिक्यांची छाती दडपते. येथील ब्रम्हगिरी, धोडप, मार्किंडा, साल्हेर, मुल्हेर, सलोटा, हरगड, हरिहर, अहिवंत, रामसेज असे अनेक किल्ले ट्रेकर्सना खुणावत असतात. नवरा, नवरी, हडबीची शेंडी हे सुळके, अलंग, कुलंग, मदन, अंकाई, टंकाई हे किल्ले सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे  स्वप्न असते. सह्याद्रीतील किल्ले पायाखाली घालणे हा छंद जोपासलेल्या भटक्यांची  पावले  नाशिककडे वळतातच वळतात. आम्ही त्याला अपवाद नाही. नाशिक जिल्ह्यातल्या  साल्हेर, मुल्हेर किल्ल्यांवर  जाण्याचे ठरविले आणि नाताळच्या सुट्टीत ठाण्याहून खाजगी बसने रात्रभर प्रवास करून सकाळी सटाणा तालुक्यातील बागलाण येथे पोचलो. महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमेवरचा हा प्रदेश ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा, संपन्न, सुपीक आहे.

झुंजूमुंजू होताच साल्हेरवाडी येथून साल्हेर किल्ल्याच्या दिशेने निघालो.  सालोटा किल्ला व साल्हेर किल्ला यांच्या मधल्या खिंडीत येईपर्यंत उन्हाचे चटके जाणवू लागले. झाडे नसलेली उघडी, बोडकी वाट, अंगावर येणारा चढ, काही ठिकाणी मातीचे  निसरडे घसारे  तर काही ठिकाणी अनघड  होणारी वाट;  मजल दरमजल करत पार पाडली. शेवटच्या टप्प्यावरील दगडी पायऱ्या चढून वर गेल्यावर दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याने सारा शीण दूर झाला. डावीकडे कातळात  खोदलेली पाण्याची  टाकी आणि उजवीकडे खाली लांबवर पसरलेली हिरव्याकंच रंगातल्या शेतांच्या आखीव, रेखीव चौकटी. हा  औरस, चौरस हिरवा तजेला सावलीतून न्याहाळता येत होता.  कातळाचे भले मोठे लांबरुंद छत्र आमच्या  डोक्यावर होते.  राकट कडे, कपारी, घळ  अशी वैशिष्टय  असलेल्या साल्हेर या किल्ल्यावर सह्याद्रीतील  लांबलचक कपार  आहे. ऊन, पाऊस यापासून संरक्षण देणारी  ही   कपार  संपल्यावर   पठार  लागते . पठार ओलांडून परत थोडा चढ चढून  मुक्कामाच्या ठिकाणी  गुहेजवळ आलो. या गुहेच्या मागच्या टेकडीच्या शिखरावर परशुरामाचे देऊळ आहे. सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ला असलेल्या साल्हेर वरील हे देऊळ सुमारे 5000 फूट उंचीवर असल्याने तेथून  आजूबाजूचा विस्तृत प्रदेश न्याहाळता येतो. आजूबाजूच्या डोंगर रांगा, किल्ल्यावरील प्रशस्त गंगासागर तलाव   त्यातील पाणी निळसर दिसत असल्याने रमणीय  भासत होते. दूरवर दिसणारी  मांगी, तुंगी शिखरे,  डोंगर रांगा,त्यातून डोकावणारे  सालोटा, मोरागड, मुल्हेर, हरगड आदी किल्ले  हा सारा नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा. मावळत्या सूर्यबिंबाने ल्यालेला गुलाबी, केशरी साज आणी  संधिप्रकाश क्षीण होऊन काळोख दाटू लागताच आकाशाच्या विशाल घुमटावर उलगडत जाणारा  चांदण्यांचा  नक्षीदार   पट  पाहताना सारेच हरखले. डिसेंबरची  थंडी रात्री डोंगर रांगांतून स्वैर फिरणाऱ्या  वाऱ्यामुळे अधिकच बोचरी होत होती. नेहमीच्या शिरस्त्याने आम्ही शेकोटी पेटवली. शेकोटीच्या  ज्वाळा  पाहताना स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीरांच्या कथा आठवू लागल्या. या किल्ल्यासाठी मुघल व मावळे यांच्यामध्ये खूप मोठा रणसंग्राम झाला होता.

सूर्याजी काकडे या शिवाजी महाराजांच्या बाळपणापासूनच्या  जिवलग सोबत्याला साल्हेरच्या युद्धात मरण आले. इ.स. 1671 मध्ये या किल्ल्याला  दिलेरखान, बहादूरखान यांचा अजगरासारखा वेढा पडला होता. इतका मोठा वेढा अगोदर कधी पडला नव्हता.   शिवाजी महाराजांनी  सरनौबत प्रतापराव गुर्जर व मोरोपंत पेशवे यांना साल्हेर वर पाठवले.  प्रतापराव गुर्जर, मोरोपंत पेशवे, सूर्याजी काकडे  व अनेक कडवे सरदार या  वीरांनी जिंकलेले आणि  मुघल बादशहाच्या जिव्हारी लागलेले हे युद्ध;  मावळ्यांमध्ये  आपण मोकळ्या मैदानातही बलाढ्य  शत्रूचा पाडाव करू शकतो अशी हिंमत रुजविणारे होते. साल्हेरच्या  युद्धातल्या विजयामुळे स्वराज्याचा दरारा फक्त दख्खन मुलखात नव्हे तर हिंदुस्थानात वाढला. साल्हेर नंतर प्रतापराव गुर्जर, मोरोपंत पेशवे या मातब्बर सरदारांनी मुल्हेर किल्ला ही जिंकला.

सध्या किल्ल्यावर  लहानशी गुहा, गंगासागर तलाव, शिखरावरचे परशुरामाचे देऊळ व खुरटी झुडपे आहेत. तटबंदी, बुरुज आदी ऐतिहासिक अवशेष येथे नाहीत.  दुसऱ्या दिवशी साल्हेर गडावरून  उतरून आम्ही वाघांबे  गावात आलो. तेथून मुल्हेर गावात मुल्हेर गडावर जाण्यासाठी धनगर वाडी येथून मळलेल्या वाटेने गड चढू लागलो. उघड्या  बोडक्या  साल्हेरवरची उन्हे झेलल्यावर  भरपूर वृक्ष संपदा असलेला मुल्हेर गड आल्हादायक वाटतो.   गडावरची दाट झाडी  गड  फिरताना  सुखद सावली देते. गडावरील विहिरी, वाडे, घरे यांचे अवशेष, सोमेश्वर व गणेश मंदिर, विस्तीर्ण मोती तलाव तसेच आंबा, वड असे वृक्ष हा गड  एकेकाळी संपन्न होता याची साक्ष देतात. गडाच्या बालेकिल्ल्यावर पाण्याचे टाके, राजवाड्याचे अवशेष  व भडंग नाथाचे देऊळ आहे. किल्ला पुरातन. याची पाळेमुळे खूप जुनी. महाभारतकालीन राजा मयूरध्वज व कनोजिया वंशातले बागुल राजे यांच्या अधिपत्याखाली हा प्रदेश होता. गडाचा पहिला उल्लेख इ.स. 1330 मधला  आढळतो. 1330 पासून इ .स. 1692 पर्यंत असलेले राजे, किल्लेदार, राजवटी यांची माहिती बागलाण प्रतिष्ठानकडे आहे. हा किल्ला बागुल राजांनी बांधला. बागुल राजवटीमुळे या परिसराला बागुल गड असे नाव पडले. त्याचा अपभ्रंश होऊन या प्रदेशाचे नाव बागलाण असे पडले असे म्हणतात. बागलाण  येथल्या लोकांची भाषा, पोशाख, जेवण म्हणजे मराठी व गुजराथीची मस्त सरमिसळ आहे. 1682 साली साल्हेरचा किल्ला मुघलांनी फंदफितूरीने घेतला. त्यानंतर 1795 मध्ये तो पेशव्यांच्या ताब्यात आल्याचा उल्लेख आहे. सन 1818 मध्ये मराठ्यांच्या इतर किल्ल्यांप्रमाणे साल्हेर मुल्हेर दोन्ही इंग्रजांच्या ताब्यात गेले.

अनघड  वाटा, उभा चढ  असलेला साल्हेर किल्ला चढताना  दमछाक करणारा तर मुल्हेर किल्ला  सहज सोपा आहे.  इतिहासाचे साक्षी असलेले, नैसर्गिक झीज व युद्ध  साहिलेले प्राचीन साल्हेर, मुल्हेर किल्ले  आजही गडप्रेमींना भुरळ घालतात.

-रजनी अशोक देवधर

7045992655
deodharrajani@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. साल्हेर ,मुल्हेर हा परीसरात आम्ही फिरलो आहेत.हरणबारी हे मोसम नदीवरील धरण , मांगी तुंगी डोंगर , अंतापूरजवळचा दावल मलीकचा डोंगर या भागात जाऊन आलो आहोत. किल्ले खालूनच पाहीले. वरती गेलो नाहीत. लेखातून छान माहिती मिळाली.
    बागलाण नावाचे कोणतेही गाव नाही. सटाणा हे नाशिक जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. सटाणा तालुक्यालाच बागुल राजांवरून बागलाण हे नाव पडले आहे. मुल्हेरला उद्धव महाराजांचे पुरातन मंदिर आहे. तेथील रासक्रीडा प्रसिध्द आहे. बागलाण तालुक्यातील भाषा ही अहीराणी आहे. अहीराणी भाषेलाच खान्देशी भाषा असेही म्हणतात. या भाषेवर हिंदी व गुजराती भाषेचा प्रभाव असला तरी ती मराठीला जास्त जवळची आहे. अहीराणी खान्देशी भाषा ही मराठीची एक बोलीभाषा आहे. पावसाळ्यात साल्हेर मुल्हेर परीसर सहलीसाठी खुप चांगला आहे.
    लेख आवडला म्हणून एवढे लिहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here