सातारा-परळीचे प्राचीन शिवमंदिर

3
131
_Paraliche_Shivmandir_1.jpg

सातारा शहराच्या नैऋत्येस नऊ किलोमीटरवर सज्जनगडाच्या पायथ्याशी ‘परळी’ या गावी एक मंदिर आहे. त्या गावामध्ये दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत. त्यांची बांधणी यादव काळात तेराव्या शतकात झाली असावी. शेजारी शेजारी असणाऱ्या त्या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पडझड झालेली आहे. त्यांतील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे. तेथे महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. त्याच्या शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्या स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून त्यांतील दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप सोळा स्तंभांवर आधारलेला असून त्यातील चार पूर्णस्तंभ आहेत. सभामंडपात दोन देवकोष्टके आहेत, पण ते रिकामे आहेत. सभामंडपात सुंदर आणि रेखीव असा नंदी आहे.
मंदिराच्या खांबांवर सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. त्यांमधील काही आभासी शिल्पे आहेत. मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या व उजव्या बाजूंस ‘मिथुनशिल्पे’ (कामशिल्पे) कोरलेली आहेत.
मंदिरासमोर सुमारे सहा मीटर उंचीचा कोरीव मानस्तंभ आहे. त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी पंचमुखी शिवलिंग आहे. सदाशिवाचे ते अव्यक्त रूप आहे. सदाशिव म्हणजे सद्योजत, वामदेव, अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्था. त्या दाखवणारी ती प्रतिमा आहे. त्या पंचस्थिती म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू व आकाश यांची रूपे.
_Paraliche_Shivmandir_2.jpgशिवाच्या सदाशिव रूपातील अनेक मूर्ती उपलब्ध आहेत, त्या व्यक्त स्वरूपातील आहेत. येथे ती अव्यक्त रूपातील आहे. मंदिराच्या समोरील परिसरात मान तुटलेला नंदी आहे.
शेजारी पुष्कळ वीरगळ शिल्पे आहेत. त्यांतील अनेक वीरगळांवर नक्षीदार काम केलेले आहे.
त्याच परिसरात अनेक समाधी आहेत. माझ्या मते, त्या लिंगायत समाजातील असाव्यात. त्यातील एका समाधीवर सुंदर गणेश मूर्ती एका शिवलिंगाशेजारी ठेवलेली आहे. शेजारी एक सुंदरशी ‘पुष्करणी’ आहे, पण ती देखभालीअभावी सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
शेजारी, उरमोडी नदीच्या काठी केदारेश्वराचे मंदिर आणि महारुद्र स्वामींची समाधी आहे. केदारेश्वराचे देवालय शक्यतो पाण्याने भरलेले असल्याने तेथील शिवलिंग पाण्यात असते.
एके काळी समृद्धीच्या परमोच्च शिखरावर असणारे हे मंदिर सध्या एकांतवास भोगत आहे. या मंदिराकडे सहसा कोणी येत नाही.
– संतोष अशोक तुपे
मो. 9049847956
Santoshtupe707@gmail.com

About Post Author

3 COMMENTS

  1. कालच दि.२९/११/२०१९ रोजी हे…
    कालच दि.२९/११/२०१९ रोजी हे मंदिर पाहून आलो. वैभवाच्या काळात किती सुंदर दिसले असेल ते मंदिर! मंदिरात असलेल्या दगडी खांबांवर नक्षीकाम अप्रतिम वाटले. खूप भावला तो मानस्तंभ! (आता आपल्या लेखात समजले.) मी समजत होतो ती दीपमाळ आहे. पंचमुखी शिवलिंगाविषयी माहिती छान दिली आहे.
    अशी पुरातन ठिकाणे,वास्तू आपल्या पूर्वजांविषयी अभिमान निर्माण करतात.

Comments are closed.