साईबाबांमधील संस्कृतिसंकर

0
16

साईबाबांमधील संस्कृतिसंकर

– दिनकर गांगल

साईबाबा आणि संतोषीमाता ही दोन दैवते गेल्या शतकाच्या उत्तरार्धात समाजात प्रबळ झाली. त्यांच्याविषयीचा भक्तिभाव वाढतच गेला. त्याला अनुषंगून नागमणी, बेळगावची कलिका अशी काही छोटी प्रभावशाली संस्थाने होती. लोक त्यांचे बिल्ले लावून फिरताना दिसत, परंतु साई व संतोषी यांना असाधारण महात्म्य लाभले. त्यांच्यावर चित्रपट निघाले, पुस्तके वगैरे तर लिहीली गेलीच. संतोषीमातेवर अनिता गुहाची भूमिका असलेला सिनेमा निघाला. तो बहुधा मातेच्या लोकप्रियतेचा कळस होता. त्यानंतर, ओघाओघात संतोषीमातेची समाजातील थोरवी जाणवेनाशी झाली. इतरही छोटीमोठी दैवते विरळा दिसू लागली. उलट, तत्त्वज्ञानी पुरूष, आध्यात्मिक बाबा यांचे समाजावरील वर्चस्व वाढले. पांडुरंगशास्त्री आठवले, नाना धर्माधिकारी, अनिरुद्ध बापू यांचा मुद्दाम उल्लेख करता येईल. असे सिद्ध पुरूष (स्त्रियादेखील) गावोगावी, जिल्ह्या-जिल्ह्यांत कमीजास्त प्रभावाने व्यक्त होत होते. आता, त्यांचाही जमाना तेवढा सामर्थ्यशाली राहिलेला नाही. आठवले, धर्माधिकारी निवर्तले, अनिरूद्ध बापू त्यांच्या प्रभावक्षेत्राच्या कमाल मर्यादेस पोचले.

सुनील गोडसे परंतु या सर्व प्रवाहांमध्ये साईबाबा यांच्याविषयीची श्रद्धा व भक्ती सतत वाढतच गेलेली आढळून येते. भक्तजनांच्या वा-या विठ्ठलाकडे वर्षांतून एकदा, आषाढीतील एकादशीला जातात. चारशे वर्षांच्या परंपरेनंतर आता पंढरपूरला दोन-पाच लाख लोक जमतात. परंतु शिर्डीला साईबाबांकडे आठवड्याला पाच-दहा वा-या जाताना दिसतात. नाशिक-संगमनेर रस्ता हा पदयात्रींनी सतत गजबजलेला असतो. साईबाबा रामाचे अवतार मानले जातात. त्यामुळे रामनवमीला (एप्रिलमध्ये) तळपत्या उन्हात लाखभर लोक तरी शिर्डीचा रस्ता विविध दिशांनी आक्रमत असतात. साईबाबांचा महिमा असा सर्व बाजूंनी वाढत असताना संतोषीमातेपासून अनिरुद्ध बापूपर्यंतच्या महनीय व्यक्तींचे भक्त व अनुयायी टिकून असतील, परंतु त्यांचा प्रभाव समाजामध्ये जाणवत नाही.

लेखक- कलासमीक्षक द.ग.गोडसे यांनी पदयात्रींच्या व यात्रेकरूंच्या वहिवाटीच्या रस्त्यांवर डोंगर-कपारींत गावदेव कसे निर्माण झाले याचे सुरेख विवेचन केले आहे. रामदासांनी ठिकठिकाणी मठ स्थापून हनुमानपुजेचा बलशाली मार्ग प्रसार केला, तो प्रबळ मुस्लिम सत्तेला आव्हान देण्याची शक्ती स्थानिक समाजात निर्माण व्हावी म्हणून. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजंयती सार्वजनिकरीत्या साजरे करणे आरंभले तेही लोकजागृतीच्या हेतूने. देव-दैवतांचा असा हेतुपूर्वक सामाजिक वापर वेळोवेळी झालेला आहे. आर्किटेक्ट विनय चांदे यांनी कलादृष्ट्या अशा धार्मिक प्रतीकांची मांडणी केली आणि दाखवून दिले, की मनुष्याला जेव्हा चरितार्थासाठी धनुष्यबाणाची गरज होती, तेव्हा ‘अजानबाहू’ अशा धनुर्धर रामाची प्रतिमा निर्माण झाली आणि मानवी जीवन जेव्हा गुंतागुंतीचे झाले तेव्हा मानवी बुद्धीला आणि कलाजाणिवेला सतत आव्हान देत राहील असा श्रीगणेशाचा आकार निर्माण झाला!

प्रा. सु.ग.शेवडे, दिनकर गांगल व लेखक सुनिल गोडसेसमाज आपली प्रतीके(व दैवते) ठरवत असतो. आजच्या समाजाचे प्रतीक साईबाबा हे  आहे आणि म्हणूनच, त्याची लोकप्रियता वाढत जाऊन एके दिवशी ते तिरुपतीहूनही अधिक धनसंपन्न होईल, म्हणजे कमाल लोकप्रिय होईल अशा बातम्या वारंवार येत असतात.

हे सगळे सुचण्याचे व आठवण्याचे कारण म्हणजे सुनील गोडसे यांचे ‘साईबाबांच्या जन्माचे रहस्य’ नावाचे पुस्तक वाचनात आले व ते फार वैशिष्ट्यपूर्ण वाटले. गोडसे यांचा दावा असा आहे, की त्यांनी या पुस्तकासाठी बरेच संशोधन केले आहे आणि नवी माहिती संकलित केली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावी साईबाबांचा जन्म झाला. त्याबाबत सर्व माहिती जमा करून गोडसे यांनी अधिकृतपणे नोंदली आहे. साईबाबांचा आरंभीचा वावर परभणी जिलह्यातील
सेलू-उमरखेड-मानवत या परिसरात झाला. त्यानंतर ते एका लग्नाच्या निमित्ताने शिर्डीला आले आणि तिथेच स्थिरावले. ते एकूण त्र्याऐंशी वर्षे जगले ( २८ सप्टेंबर १८३५ ते १५ ऑक्टोबर १९१८). त्यापैकी साठाहून अधिक वर्षें त्यांचे वास्तव्य शिर्डी येथेच होते. त्यांना अनेक सिद्धी होत्या. संस्कृत भाषा, वेदाध्ययन, इस्लाम धर्मांची मूलतत्त्वे, त्या धर्मातील पूजापद्धती या सर्व गोष्टी त्यांनी अत्यंत अल्पावधीत आणि सहजपणे प्राप्त करून घेतल्या. ते एकाच वेळी बालयोगी व बैरागी होते. त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार झाल्याच्या कहाण्या सांगितल्या जातात. ज्यांची ‘माता धरती’ आहे आणि ‘पिता अंबर’ असे हे अफाट व्यक्तिमत्त्व! ते देव नव्हते, परंतु देवमाणूस होते असे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात सांगण्यात आले.

साईबाबाची चरित्र..सुनील गोडसे यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे छान! त्यांच्या कथनशैलीत रसाळपणा आहे. सत्यनारायणाच्या कथा व श्रावणातील कहाण्या जशा अनेकवार, परत परत ऐकल्या तरी त्यात रमायला होते , तसे गोडसे यांनी वर्णिलेल्या या पुस्तकातील कहाण्या परत परत वाचताना घडून येते. त्यांनी लिहिण्यासाठी फॉर्मही वेगळ्या प्रकारचा निवडला आहे. साईबाबांच्या जीवनात आलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या तोंडून त्यांची त्यांची कहाणी प्रगट होत जाते. त्यामुळे प्रत्येक प्रकरण वेगवेगळ्या शैलीत येते आणि साईबाबांविषयीच्या गोडव्यामध्ये भर टाकत जाते. गोडसे यांनी साईबाबांच्या जीवनाशी समरस होऊन हे पुस्तक लिहिले आहे व त्यामुळे ते प्रत्ययकारी झाले आहे.

पण त्याहून महत्त्वाचा आहे, तो त्यांचा या पुस्तकातून व्यक्त होणारा दृष्टिकोन. साईबाबांच्या ठायी भारतीय संस्कृतीतील समन्वय व्यक्त होतो हे गोडसे यांना कळले आहे. त्यामुळे या समाजातील हिंदू-मुस्लिम, जाती-जमाती हे भेद साईबाबांनी कधीच कसे मानले नाहीत, हे ते दाखवून देतात. वेगवेगळ्या प्रसंगांत ते अल्लाची जात कोणती? विठ्ठलांची जात कोणती? असे प्रश्न साईभक्तांच्या तोंडून उपस्थित करतात आणि शेवटी, साईबाबा स्वत:  एक प्रसंगात सांगतात, की मै (राम व रहिम यांना मानणा-या) कबीर की जात का हूँ! गोडसे यांची लेखनशैली, साईबाबांच्या स्थायी हा जो संस्कृतिसंकर झालेला आहे तो यथार्थपणे व्यक्त करते.

गोडसे यांचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. त्यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले आहे, की ‘हे पुस्तक वाचून हिंदू-मुसलमान यांतील दरी कमी होण्यास मदत झाली तरच बाबांच्या कार्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल.’ गोडसे यांच्या मनाचा हा मोठेपणा कौतुकास्पद होय. तथापि, प्रकाशन समारंभात दिसून आलेली विसंगती अशी, की या पुस्तकाला प्रा. सु.ग.शेवडे यांची प्रस्तावना आहे. त्यांनी प्रस्तावना औचित्यपूर्ण लिहिली आहे. परंतु प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे भाषण केले ते मुसलमान समाज व पाकिस्तान यांना नष्ट करण्यास चिथावणी देणारे होते ! सुनील गोडसे यांना काय अभिप्रेत आहे? साईबाबांची सर्वधर्मसमावेशकता, की शेवडे यांनी त्यांच्या पुस्तकांच्या निमित्ताने व्यक्त केलेले हिंदू धर्माचे वर्चस्व?

गोडसे यांना साईबाबा हवे आहेत आणि शेवडेही हवे आहेत. ते दोघे एकत्र कसे नांदणार? शेवडे यांनीही प्रस्तावनेत साईबाबांचे गुणगान केले आहे. ते साईबाबा, ज्यांनी येथील मुसलमान समाजासही मोठा आधार दिला आहे! गंमत अशी, की भारतीय समाजात हा दुटप्पीपणा व मानभावीपणा खपून जातो. श्रोतेही दोन्ही प्रकारची मते ऐकून टाळ्या वाजवतात. भिन्न भिन्न मते व्यक्त झाली पाहिजेत, समजून घेतली गेली पाहिजेत, तोच लोकशाहीचा प्राण आहे हे खरेच, परंतु तर्कशुद्ध व तर्कदुष्ट, साधार व निराधार यांत फरक केलाच पाहिजे. साईबाबा या दैवताचा समाजशास्त्रीय अर्थ संस्कृतिसमन्वय हाच आहे.

दिनकर गांगल

About Post Author

Previous articleवैकुंठवासी
Next articleमुंबई ON Sale
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.