सरदार पिलाजीराव जाधव यांचे वाडे

4
110

पुणेअहमदनगर मार्गावर, पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर, वाघोली या गावात पेशव्यांच्या काळातील सरदार पिलाजीराव जाधव यांचे ते वाडे त्यांच्या शौर्याची, कर्तृत्वाची आणि वैभवाची स्मृती जपून आहेत.

वाघोली गावात प्रवेश केल्यावर, गावाच्या मध्यभागी, सुस्थितीत असलेली वेस पाहण्यास मिळते. पूर्वी ती गावाच्या सीमारेषेवर होती. मात्र गावाचा विस्तार वाढत गेल्यानंतर ती आता गावाच्या मध्यभागी आली आहे. पंचवीस फूट उंचीच्या त्या वेशीचे चिरेबंदी बांधकाम गेली अडीचशे वर्षें ऊन, पाऊस, वादळ-वारा, थंडी यांना झेलत ताठ उभे आहे. वेशीची सुबक कमान पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे.

वेशीतून आत प्रवेश केला, की थोड्याच अंतरावर सरदार पिलाजीराव जाधव यांचा वाडा आहे. वाड्याची तीस-पस्तीस फूट उंचीची तटबंदी पाहून वाड्याच्या भव्यतेची सहज कल्पना येते. तटबंदीजवळून पुढे सरकल्यावर उजव्या हाताला वाड्याचा प्रचंड दरवाजा नजरेत भरतो. त्यावरील कमळांची शिल्पे चित्त वेधून घेतात. दरवाजावरील वीटकामातील सज्जा मात्र पूर्णपणे ढासळला आहे. त्यासाठी वापरलेले लाकूडही जराजर्जर झाल्याचे दिसते. तरीसुद्धा तो सागवानी दरवाजा जाधवांच्या महानतेची जाणीव पाहणाऱ्याला करून देतो.

दरवाजातून प्रवेश केल्यावर झाडा-झुडुपांच्या आत दडलेली तेथील इमारतींची चिरेबंदी जोती आणि त्यांचे टोलेजंग स्वरूप दृष्टीपुढे उभे राहते. त्या वाड्यात पूर्वी आग लागून बऱ्याच गोष्टी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे तेथे इमारतींच्या जोत्यांशिवाय व आतील चौकांशिवाय काही नाही. जाधवरावांच्या सध्याच्या वारसदारांपैकी संग्रामसिंहराव यांच्याकडून आतील मूळ वाडा सहा मजल्यांचा होता असे समजले.

वाड्याच्या बाहेर पडून सात-आठ पायऱ्या उतरल्या, की वाड्यासमोरचा रस्ता लागतो. तेथून दुसऱ्या वाड्याकडे जाणारी वाट आहे.

जाधवरावांच्या दुसऱ्या वाड्याचीही तटबंदी तिचा भक्कमपणा टिकवून आहे. मुख्य दरवाजा दुरुस्त केल्यामुळे चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची कमान सुस्थितीत असून तिच्यावरील सज्जांचे बांधकाम नवीन केले आहे. त्यामुळे तेथे जुन्या-नव्याचा संगम पाहण्यास मिळतो.

दरवाजातून प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंच्या ढेलजा (रखवालदाराच्या चौक्या) रेखीव सागवानी खांब आणि तुळया यांवर भक्कमपणे उभ्या असलेल्या दिसतात. वाड्याचे जोते चिरेबंदी आहे. त्या चौसोपी वाड्याच्या दोन सोप्यांच्या जोत्यांवर नवीन बांधकाम करण्यात आले आहे. तेथे सरदार पिलाजीराव जाधव यांचे वंशज रामचंद्रराव वास्तव्य करत आहेत.

वाड्याच्या जवळपास जाधवरावांनी राममंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर, भैरवनाथ अशी अनेक मंदिरे बांधली. ती सारी गावाची श्रद्धास्थाने झाली आहेत. आजही त्या मंदिरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांनी गावात नवे चैतन्य निर्माण होते.

गावातून बाहेर पडल्यावर पुणे-अहमदनगर मार्गाच्या पलीकडे सरदार पिलाजीराव जाधव यांची भव्य छत्री (समाधी) आहे. त्या भव्य चौथऱ्यावर घोटीव पाषाणातील सुबक बांधकाम आहे. समाधीजवळच जाधवराव घराण्यातील इतर पुरुषांच्या समाधी दिसतात.

पिलाजीरावांच्या समाधीपासून आठ-दहा मीटर अंतरावर सरदार पिलाजीरावांनीच बांधलेले वाघेश्वराचे भव्य मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम उत्तम प्रकारच्या कातीव (घडीव) दगडांचे असून ते सुस्थित आहे. मंदिरावर कोरलेली शिल्पे नेत्रसुखद आहेत. मंदिरासमोरील नंदी त्या वास्तूच्या भव्यतेत भर घालतो. ते मंदिर पेशवेकालीन मंदिररचनेचा उत्तम नमुना आहे. मंदिरातील शिवलिंग आळंदीजवळील चऱ्होली गावातून आणण्यात आले होते. बाजीराव पेशव्यांनी तेथील तळ्याजवळील बागेसाठी जमीन दिली होती. ते स्थळ सरदार पिलाजीराव जाधव यांची भव्य छत्री, त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या समाधी, शेजारील विस्तीर्ण तलाव, भव्य आणि सुंदर असे वाघेश्वर मंदिर या गोष्टींमुळे विलोभनीय झाले आहे. तेथील तळ्यात नौकानयनाची सुविधा केल्यामुळे ते स्थळ पुणेकरांच्या सहलीचे ठिकाण बनले आहे.

शाहूमहाराज मोगलांच्या कैदेतून सुटून साताऱ्यास सन १७०८ मध्ये आले. त्या वेळी परतीच्या वाटेवर सरदार पिलाजीराव जाधव त्यांना सामोरे गेले. बाळाजी विश्वनाथ पेशवेपदावर आल्यावर त्यांना दमाजी थोरात यांनी हिंगणगावच्या गढीत कैद केले होते. पिलाजीरावांनी त्या थोरातास पकडून शाहूराजांपुढे आणले( १७१६). पिलाजी दिल्लीच्या स्वारीत बाळाजी विश्वनाथांबरोबर होते (१७१८). पिलाजीरावांनी निजामाचा औरंगाबादमध्ये बंदोबस्त केला (१७२४). त्यांनी जंजिऱ्याच्या मोहिमेत चांगली कामगिरी बजावली. वसईच्या मोहिमेत पोर्तुगिजांशी सामना केला. गढामंडलाच्या मोहिमेत छत्रसालाच्या मुलाने बाजीरावाबरोबर पिलाजीरावांचाही सत्कार केला होता. पिलाजीराव बंगालच्या स्वारीतही सहभागी होते. त्यांनी व्यंकटराव घोरपडे व कोल्हापूरकर छत्रपती संभाजी यांचा तंटा मिटवला. कान्होजी आंग्रे यांना इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या विरोधात मदत केली.

पिलाजीरावांनी सासवड, दिवा, वाघोली, जाधववाडी या व्यापारी पेठा वसवल्या. त्यासंबंधी शाहूमहाराज एका पत्रात म्हणतात : ‘राज्याभिषेक शके ३४ सर्वधारी नाम संवत्सरे शाहू छत्रपती महाराज यांनी पिलाजी बिन (वडिल) चांगोजी यास मौजे दिवे येथे पेठ वसवण्यास सोयीचे गाव आहे, तरी पेठ वसवावी. तिचे नाव शाहूपुरी असे ठेवावे. त्यास तुम्हास पेठेचे सेटेपण इनाम वंशपरंपरेने इतर ठिकाणचे वाणी उदमी आणावे, वतन वंशपरंपरेने खावे.’

दिवेघाटातील मस्तानी तलाव म्हणून ओळखला जाणारा तलाव पिलाजीराव यांनी बांधला. पिलाजींची ब्रह्मेंद्रस्वामींवर नितांत श्रद्धा होती.

पेशव्यांच्या दरबारात पिलाजीरावांना इतर सरदारांपेक्षा विशेष मान होता. त्यांचा एकंदर फौजफाटा व जातसरंजाम मिळून अडीच लक्षांचा मुलूख होता. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे पिलाजी जाधवराव यांना स्वत:च्या वडिलांप्रमाणे पूज्य मानून त्यांचा आदर राखत. ते त्यांना काका म्हणत. पिलाजीरावांचे देहावसान ३ जुलै १७५१ रोजी वाघोली येथे झाले.

त्या घराण्यातील सध्याचे वंशज संग्रामसिंहराव हे प्रेमळ व सुस्वभावी असून त्यांनी वाड्याची माहिती संकलित करण्यात सहकार्य केले.

वाघोलीशिवाय जाधववाडी व नांदेड येथे जाधवरावांचे गढीचे वाडे आहेत.

– डॉ. सदाशिव शिवदे

(सर्व छायाचित्रे – सदाशिव शिवदे)

About Post Author

Previous articleदृष्टिवंत योगिता
Next articleमरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख
डॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदे'चे अध्‍यक्ष होते. त्‍यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्‍कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्‍यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्‍होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्‍या पत्‍नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्‍यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्‍तके प्रकाशित आहेत. त्‍यांच्‍या 'माझी गुरं-माझी माणसं' या ग्रामीण कथासंग्रहातील कथांचे आकाशवाणीवर वाचन झाले. शिवदे यांना त्‍यांच्‍या लेखनाकरता अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. शिवदे यांचे ७ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. लेखकाचा दूरध्वनी 9890834410

4 COMMENTS

 1. अप्रतीम माहीती. इतिहासाच्या
  अप्रतिम माहिती. इतिहासाच्या अशा साक्षीखुणा जपायला हव्यात.

 2. खुप छान आणि इतक्या जवळ असणारी
  खूप छान. इतक्या जवळ असणारी ऐतिहासिक वास्तू आपण सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद सर. परिवर्तन प्रणाम.

 3. अप्रतिम महिती आहे. मला सातव…
  अप्रतिम महिती आहे. मला सातव आडनाव व वाघोली यांचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याची इच्छा आहे.व जाधव रावांशी काय संबंध होता हे जाणुन घ्यायचे आहे.या साठी
  मला मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे.

 4. ऐकून असलेले नाव- गाव इतके…
  ऐकून असलेले नाव- गाव इतके जवळ असावे आणि आपल्याला माहीत नसावे ,याची खंत मला आज वाटली.पिलाजी राव यांचे शौर्य मी ऐकून होतो.. आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव या माहितीमुळे मी घेतला.. आपणास द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत..

Comments are closed.