सदाबहार हिरेमठसर

_Sivanand_Hiremath_1.jpg

काही व्यक्ती ‘सदाबहार’ असतात, निसर्गातील सदाहरित वृक्षासारख्या. शिवानंद हिरेमठसर हे त्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व. ते सोलापूरच्या सिद्धेश्वर प्रशालेत शिक्षक म्हणून काम  करतात. त्याहून त्यांची ओळख आहे ती संवेदनशील वन्यजीव प्रेमी-अभ्यासक, कुशल छायाचित्रकार म्हणून.

माझे वडील सिद्धेश्वर म्हेत्रे आणि हिरेमठ सर, या दोघांची मैत्री. हिरेमठसरांचा विषय ‘गणित’ आणि माझ्या वडिलांचा ‘विज्ञान’. त्यामुळे त्या दोघांचा विविध उपक्रमांत सहभाग असतो. हिरेमठसरांशी असलेले माझे ऋणानुबंध नंतर ‘निसर्ग; माझा सखा’ या निबंधस्पर्धेच्या माध्यमातून आणि इतर अनेक उपक्रमांमधून आणखी दृढ झाले. मी भेटताक्षणी ज्यांच्यासमोर नतमस्तक होतो अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये शिवानंद हिरेमठसर आहेत. तेजस्वी चेहरा – चेहऱ्यावर कायम स्मित, विनम्र आणि कोठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारे हिरेमठसर यांच्याकडे पाहिले, की ‘शरण बसवेश्वरां’ची आठवण झाल्यावाचून राहत नाही.

सरांचा जन्म अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या गावी झाला. ते ‘बाल शिवानंद शाळे’तून आल्यानंतर सुरपाट्या खेळणे, प्रशस्त मोठ्या विहिरींमध्ये व नदीमध्ये पोहणे, नदीमध्ये आढळणाऱ्या सुंदर-मनमोहक गारगोटया गोळा करणे, झाडांमधून मध गोळा करणे आणि काचेच्या गोट्यांबरोबर कितीतरी वेळ खेळत राहणे या गोष्टी करत. खेड्यात जन्मलेल्या मुलांचे ‘बालपण’ काही औरच असते, हेच खरे!

सरांनी चपळगाव येथील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अक्कलकोट आणि सोलापुरातील संगमेश्वर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. हिरेमठसरांना निसर्ग आणि वन्यजीव यांच्याप्रती प्रचंड प्रेम आहे. सरांनी त्यांच्या घरामध्ये लहानपणी दोन मांजरे, अकरा कुत्रे यांच्यासह ससे आणि हरीण पाळलेले होते. सुट्टीच्या दिवशी, वासरांना शेताकडे चरण्यास घेऊन जाणे हा त्यांचा नित्यक्रम. ‘शेती’ हा विषय त्यांच्या आवडीचा. ते शेतामध्ये नांगरणे, पाणी देणे, भाजीपाला बाजारात नेऊन विकणे अशी कामे मन लावून करायचे. त्यांनी ते सातवीत असताना त्यांच्या शेतामध्ये जांभूळ, आंबा, नारळ यांसारखी फळझाडे लावली. ती झाडे मोठी झालेली आहेत. हिरेमठसर सद्यकाळातील कमी होत जाणाऱ्या वृक्षराजीमुळे व्यथित आहेत. त्यांना त्यांनी लहानपणी आणखी झाडे का लावली नाहीत याची खंत वाटते. परंतु त्यांनी केवळ खंत वाटून न घेता, पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःला अक्षरशः वाहून घेतले आहे.  

_Sivanand_Hiremath_2_0.jpgते ‘पर्यावरण संवर्धन‘ या विषयावर बोलताना, मला ‘पर्यावरण संवर्धनाची आवड लहानपणापासूनच आहे आणि नंतर भरत छेडा मास्तर यांची भेट झाल्यामुळे त्या कार्यासाठी चांगले व्यासपीठ मिळाले…’ असे सांगतात. हिरेमठसर स्वतः पक्षी अभ्यासक आहेत. ते सुटीच्या दिवशी निसर्ग भ्रमंतीमध्ये विविध पक्ष्यांचा अभ्यास करतात. त्यांना छायाचित्रे काढण्याची आवड आहे. ते पक्ष्यांचे निरीक्षण करून त्या निरीक्षणाच्या नोंदी ठेवतात. ते विद्यार्थ्यांकडून वृक्षलागवड आणि त्याचे संवर्धन करून घेतात. हिरेमठसरांनी वाळलेल्या काटक्या चार पायांमध्ये घेऊन उभ्या असलेल्या मोरपंखी गळ्याच्या सरडयाचा सुंदर फोटो काढला आहे. सरडा जणू हातात गिटार घेऊन उभा असल्याचा त्या फोटोमध्ये भास होतो. सरांनी फेसबुकवर तो फोटो पोस्ट करताना छान कॅप्शन लिहिली आहे, ‘बहारो फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है…”. शिवानंद हिरेमठसरांचे ‘कवी’मन असे दिसून येते. त्यांनी तशी अनेक सुंदर छायाचित्रे टिपलेली आहेत. त्यांच्या छायाचित्रांची दखल वृत्तपत्रांनी घेतलेली आहे.  

सरांनी निसर्गचक्रामध्ये मानवाने केलेल्या हस्तक्षेपावर सुंदर लेख लिहिलेला आहे, त्यांचा तो लेख फेसबुक टाइमलाईनवर वाचता येईल. त्यांनी पर्यावरण संवर्धनावर अनेक व्याख्याने दिलेली आहेत. त्यांचे लेख विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहे.

त्यांच्या घरी अर्धांगिनी सौ. राजश्री (बी.ए), दोन मुले – रत्नाकर आणि साक्षी आहेत. सर कृतिशील शिक्षक म्हणून ते परिचित आहेत. त्यांच्या मते, प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे देशाचे भावी नागरिक आहेत. त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्टया सक्षम बनवण्यासाठी शिक्षण देऊन संस्कारित करताना, पुस्तकी ज्ञानाबरोबर निसर्ग-ज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर आणून निसर्गभ्रमंती, पक्षीनिरीक्षण, क्षेत्रभेट या गोष्टींच्या माध्यमातून सूक्ष्म जीवापासून प्राणी आणि इतर सजीव यांचे पर्यावरणातील महत्त्व, त्याचबरोबर ‘जगा आणि जगू द्या’ हे ब्रीद त्यांना पटवून सांगण्याचे त्यांचे कार्य अनमोल आहे.

त्यांचा मानस त्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘निसर्ग संवर्धन’ रूजवण्याचा आहे. शिवानंद हिरेमठसरांचे शाळेत नागपंचमी-स्लाईडशो द्वारे अभ्यासकांद्वारे सापांची माहिती, झाडांना राख्या बांधणे, वृक्षारोपण-विद्यार्थ्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त करणे, ‘सेल्फी विथ ट्री’, इको फ्रेंडली गणेश मूर्ती-शाडूची मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण, चिमणी दिन(घरटी बनवणे), जल दिन, हवामान दिन, वाघ दिन साजरा करणे असे अनेक उपक्रम असतात. सामाजिक वनीकरणच्या (सोलापूर) वतीने वृक्षदिंडी, वृक्षलागवड असे उपक्रम ‘हरित सेने’च्या माध्यमातून राबवले जातात. त्यामध्ये तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन शाळांमधून दिले जाते. शिवानंदसरांची सुंदर फेसबुक पोस्ट.

“Look at Animals kindly, and they will see.
Talk to animals gently, and they will listen”……

‘निसर्ग माझा सखा’

– अरविंद सिद्धेश्वर म्हेत्रे

arvind.mhetre@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. फारच छान माहिती ….आणि…
    फारच छान माहिती ….आणि हिरेमठ सरा सारख्या हिऱ्याला शोधल्याबद्दल लेखकांचे अभिनंदन .

  2. अरविंद सर व शिवानंद सर याचे…
    अरविंद सर व शिवानंद सर याचे अभिनंदन, निसर्ग माझा सखा मधून निसर्ग संवर्धन करत उपक्रम करून योग्य मार्गदर्शन करत आहेत. प्रेरणादाई लेख,शिवानंद सरांचे उत्क्रुष्ट कार्य.. थिंकमहाराष्ट्र यांचे ही अभिनंदन व मनापासून निसर्गमय हार्दिक हरीत आभार,सुंदर लेख वाचनात उपल्बध करून देत आहात.
    सर्वाना खूप शुभेच्छा
    धन्यवाद

Comments are closed.