सत्याग्रहींचे नामपूर

2
90
_Satygrahiche_Nampur_1.jpg

नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यामधील नामपूर गावाने अनेक लढ्यांना बळ दिले अन् ते स्वत:ही युद्धभूमीत उतरले! शेतसाऱ्याचा लढा असो, भिलवाडचा सत्याग्रह असो वा स्वातंत्र्य चळवळ; नामपूरने स्वत:चे नाव नेहमीच कमावते ठेवले.

नामपूर सटाणा (बागलाण) या तालुक्याच्या ठिकाणापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. नामपूर हे बावन्न खेड्यांचे केंद्र आहे. बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्यातील हे मध्यवर्ती ठिकाण आहे. नामपूर मोक्षगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोसम नदीच्या काठावर वसले आहे. नामपूर हे नाव गावाला कसे पडले याबाबत बागलाणचे बाबा मुरलीधर अलई सांगतात की, नामू नावाचा साधू त्या परिसरात राहत असे. त्याने ते गाव वसवले, म्हणे. नामपूर त‌ीर्थस्थानासाठी परिचित आहे. नाथाडी आणि बाथाडी या नद्यांचा संगम मोसम नदीला येऊन मिळतो. त्या संगमावर अस्थी विसर्जनासाठी येण्याची प्रथा आहे. त्या त्रिवेणी संगमावर व्याघ्रेश्वर हे मंदिर आहे. पूर्वी त्या जागी मोठे दगडी मंदिर असावे, गाभारा वगळला तर मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. सोळाव्या शतकातील व्याघ्रेश्वर मंदिर जहागिरदार देशपांडे यांनी बांधल्याचे त्यांचे वंशज निनाद वसंतराव देशपांडे सांगतात. देशपांडे घराणे अनेक जहागिऱ्यांनी श्रीमंत होते. त्यांच्या जमिनी नामपूर ते पंढरपूरपर्यंत होत्या, असेही निनाद सांगतात. देशपांडे मूळचे मुल्हेरचे असावेत असेही म्हटले जाते. मात्र त्या घराण्याचा इतिहास हाती लागत नाही. देशपांडे यांचा वाडा नजरेत भरण्यासारखा आहे, तो त्यावरील काष्ठशिल्प व वाड्यावर अजूनही असलेल्या चित्रांमुळे. वाड्यावरील शिल्लक असलेले थोडेफार नक्षीकाम पाहताना, त्यावेळच्या सरदारांची श्रीमंती डोळ्यांत भरते. देशपांडे वाड्यात लहानशा दरवाज्यातून आत गेल्यावर समोर कारंजे दिसते. ते बंद आहे. मात्र देशपांडे कुटुंबीयांनी ते जपले आहे. उजव्या हाताला पडवीतील बैठक अन् त्यातील काष्ठशिल्प व छतावरील नक्षीकाम मन भारावून टाकते. वाड्याचा पहिला व दुसरा मजला तर चकितच करतो! वाड्यात देशपांडे यांचा दरबार भरायचा; तसेच, न्यायदानाचे कामही चालत असे.

_Satygrahiche_Nampur_3.jpgनामपूर गावात मंदिरे अनेक आहेत. त्यात राम, दुर्गा, भवानी, आसरा मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. गावात लोकदैवते ही अनेक आहेत. देशपांडे वाड्यासमोरचे विठ्ठल मंदिर वाड्यासारखे दिसते. तीन मजली विठ्ठल मंदिर फक्त मंदिर नाही तर ते अनेक लढे व चळवळी यांचे हक्काचे केंद्र होते. भजनांच्या साहाय्याने स्वातंत्र्यलढ्यासाठी समाजमनाला एकत्र करण्याचे काम खुबीने तेथे होत असे. तेथून संगमाकडे जाताना भवानी मंदिर व त्यापुढे व्याघ्रेश्वर मंदिरालगत अनेक समाधी पाहण्यास मिळतात. त्यांतील काही समाधी गोसावी समाजाच्या आहेत तर काही अज्ञात आहेत. मंदिराचे वैभव अनुभवताना सभामंडपातील शेंदुराने माखलेली गणपतीसारखी दिसणारी मूर्ती लज्जागौरीची तर नसावी असे वाटून जाते. मंदिराबाहेर देवळीत लाकडाचे लहान लहान नंदी नवसासाठी ठेवल्याचे गावातील डॉ. संजय सावंत सांगतात. ते मंदिरासमोरचा घाटही जहागिरदार देशपांडे यांनी बांधल्याचे सांगतात. त्रिवेणी संगमाचा साज-बाज पाहताना प्रदूष‌ित होत असलेली मोक्षगंगा तिचे दु:ख मांडत असतेच.

बागलाणचे बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरहरशेठ गोपाळ अलई यांचा सावरकर चौकातील वाडा म्हणजे चळवळींचा इतिहासच आहे. वाडा पूर्वी मोठा होता. वाड्यात एका भागाला रंगमहालही म्हटले जायचे. रंगमहाल अनेक चित्रांनी सजलेला होता. मात्र ती वास्तू शिल्लक नाही. नरहरशेठ यांचा नामपूरच्या सधन कुटुंबात जन्म झाला होता. व्यवसायाने सावकारीत असूनही त्यांची ओळख अव्यवहारी शेठ म्हणून अधिक होती. गरजूंना मोकळ्या हाताने मदत करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकले नाही. बागलाणमधील चळवळींना तन, मन आणि धनाने प्रोत्साहन देणारे नरहरशेठ गोपाळ यांच्या वाड्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींची रेलचेल असे. बाबा राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले गेल्यावर त्यांनीही स्वातंत्र्यसैनिकांना मदत करणाऱ्या वडिलांचे कार्य सुरू ठेवले. ते असहकार चळवळ, विदेशी कापडाची होळी, बागलाणातील सारावाढविरोधी चळवळ, कायदेभंग अशा अनेक चळवळींत सक्रिय झाले. ते परदेशी कापडावर बहिष्कार घालून थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या वाड्यात खादीनिर्मितीचे केंद्र सुरू केले. त्यांनी शंभर चरख्यांपासून निघालेल्या सुतापासून वस्त्रनिर्मितीसाठी वीस हातमाग वाड्यात सुरू केले होते. बाबांचा वाडा स्वातंत्र्यसैनिकांचे आश्रयस्थान होते. त्यांनी सारावाढविरोधी चळवळीची सुरूवात नामपूरमधून केली. त्या चळवळीचे लोण हळूहळू आख्या नाशिकमध्ये असे पसरले, की इंग्रजांमध्येही दहशत निर्माण झाली होती. लोकमान्य टिळकांनीही नरहरशेठ यांच्या वाड्यात बैठक घेऊन नामपूरमध्ये सभा घेतली होती तर गो. ह. देशपांडे, दादासाहेब पोतनीस, डॉ. खाडिलकर, डॉ. बाबा भुतेकर, डॉ. मोहिनीराज काथे, दादासाहेब बीडकर, वा. ज. मराठे, गद्रे वकील, नारायण खुटाडे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. खरे, वामनराव यार्दी यांसारखी मंडळी बाबांच्या वाड्यावर बैठकांना असत. सारावाढी विरुद्धच्या लढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मार्गदर्शन लाभले होते. बाबांच्या वाड्यात गुप्त बैठका होत. स्वातंत्र्यसैनिकांना भूमिगत होण्यासाठी वाड्यात लपवले जाई. मिठाच्या सत्याग्रहातही नामपूरहून एक तुकडी रवाना झाली होती. त्यांना इंग्रजांनी अटक करून रत्नागिरी तुरूंगात ठेवले. त्यांची सुटका एकवीस दिवसांनंतर केली गेली. त्यावेळी त्या सत्याग्रहींनी सोबत आणलेल्या मिठाचा लिलाव करून सहा हजार सहाशेपन्नास रूपयांचा निधी उभारला व तो जंगल सत्याग्रहासाठी नरहरशेठ यांच्याकडे दिला. नरहर गोपाळ यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सहभागामुळे त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षाही झाली. भिका खंडुशेठ कासार, पुंडलिक दत्त सावंत, गणपत खुटाडे यांच्यासह ग्रामस्थांनीही लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यलढ्याचा पारा नामपूरवर असा काही चढला होता, की 26 जानेवारी 1930 रोजी गावच्या चावडीवर नारायण गणपत खुटाडे यांनी तिरंगा फडकावला. त्यावरून नामपूरचे वातावरण तंग झाले. इंग्रज पोलिस गावात दाखल झाले; मात्र तिरंगा काढण्याची हिंमत कोणाला झाली नाही. अखेर तिरंगा 9 फेब्रुवारी 1930 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर उतरवण्यात आला. नामपूरच्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी प्रा. शं. क. कापडणीस यांच्या बागलाण इतिहास दर्शन व प्रभाकर मांडे यांचे बागलाणचे बाबा या पुस्तकातून अनुभवण्यास मिळतात.

_Satygrahiche_Nampur_4.jpgनामपूर अडकित्त्यांसाठी प्रसिद्ध होते. लोहार राहिले नसल्याने अडकित्तेही पाहण्यास मिळत नाहीत. मात्र सावरकर चौकातील भाऊसाहेब नारायण सावंत यांच्या घरात अडकित्त्याचे दर्शन होते. त्यांच्या घरातील जुनी भांडी व तिजोरीही पाहण्यासारखी आहे. आशीर्वाद चौकातील खांबलोणकर वाडाही पाहण्यासारखा आहे. त्यांनी किल्ल्यासारखा दरवाजा, आतील चौक, वाड्यातील काष्ठशिल्प, भुयार, जिने जपले आहेत. वाडा चित्रिकरणासाठीही वापरला जातो असे नंदराम मुरलीधर अलई सांगतात. खांबलोणकर वाडा हा स्वातंत्र्यचळवळ अन् नामपूरचा इतिहास यांची समृद्ध पाऊलखुण आहे. त्यामुळे तो वाडा जपला जाणार आहे असेही नंदराम अलई सांगतात. जवळच, टेंभे रस्त्यावर पायऱ्यांची बारवही आहे.

नामपूर मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. खानदेशचा मसाला म्हणजे नामपूरचा मसाला. दुर्गामातेच्या यात्रेत आठवडाभर मसाल्याचा बाजार भरतो. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नामपूरच्या तुळजाभवानीमातेची यात्रा ओळखली जाते. यात्रा पंधरा ते वीस दिवस भरते. त्यात मसाल्याची उलाढाल मोठी होते. यात्रा महाशिवरात्रीला गावात भरते असे सांगतात. आषाढी एकादशीला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाची यात्रा असते. तेथील लोकसंख्या पस्तीस हजार आहे. तेथे माध्यमिक तीन, इंग्रजी पाच शाळा,दोन महाविद्यालये आहेत. खानदेशचे लोक अहिराणी बोली बोलतात. या अहिराणी बोलीचेही तीन विभाग आहेत. तेथील मुख्य व्यवसाय शेती आहे. तेथे कांदा, डाळिंब ही मुख्य पिके आहेत. नामपूरमध्ये सोमवारी बाजार असतो. तेथे बुधवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलबाजार भरतो. गावात येण्यासाठी तालुक्याहून एस टी येते. खाजगी वाहतूकही तेथे आहे. बागलाण हा नाशिकचा भाग असला तरी मूळचा खानदेशचाच. त्यामुळे तेथील बोली अहिराणी आहे. तिचे स्वरूप मात्र धुळे-जळगावपेक्षा वेगळे असल्याने तिला बागलाणी अहिराणी असे म्हणतात.

नामपूर पूर्वीसारखे गाव राहिलेले नाही; मात्र विस्तारलेल्या नामपूरने त्याचे गावपण जपलेले आहे.

– रमेश पडवळ
ramesh.padwal@timesgroup.com

माहिती संकलन सहाय्य आणि छायाचित्र - लखन सावंत

(पूर्वप्रसिद्धी दैनिक महाराष्ट्र टाईम्स)

About Post Author

Previous articleशिंदखेड मोरेश्वर येथील सतिशिळा
Next articleसदाबहार हिरेमठसर
रमेश पडवळ दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत अाहेत. त्यांना पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याचा चौदा वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे ‘नाशिक तपोभूमी’ हे नाशिकचा इतिहास उलगडणारे पुस्तक 2015 साली प्रसिद्ध झाले आहे. पुरातत्त्व व इतिहास हे त्यांच्या लिखाणातील मुख्य विषय आहेत. त्यांनी आतापर्यंत नाशिकच्या पाचशेहून अधिक गावांची भटकंती केली असून, महाराष्ट्र टाइम्समधील ‘वेशीवरच्या पाऊलखुणा’ या सदरात त्यांचे 110 लेख प्रसिद्ध झाले आहेत. रमेश प्रत्येक रविवारी गोदावरी परिक्रम, हेरिटेज वॉक व गोदाकाठची गावे या उपक्रमांतून लोकांना वारसा स्थळांची भेट घडवतात. लेखकाचा दूरध्वनी 8380098107

2 COMMENTS

  1. नामपूर
    ला 7 प्रवेशद्वार…

    नामपूर
    ला 7 प्रवेशद्वार होते.
    ?

Comments are closed.