संस्कार आणि हक्क

0
20

शिक्षण आणि संस्कार या गोष्टी भारतीय जीवनात एकमेकांना जोडूनच येतात. शिकायचे म्हणजे संस्कार करून घ्यायचे! तो विचार, मला वाटते, ऋषींच्या आश्रमशाळा, गुरुकुल शिक्षणपद्धत या परंपरेतून आला असावा. पण ब्रिटिश राजवट भारतात दोनशे वर्षांपूर्वी आल्यानंतर येथे औपचारिक शिक्षणपद्धत आली. शिक्षणाचा संबंध नोकरीव्यवसायाशी, अर्थार्जनाशी जोडला गेला. शाळा-कॉलेजांमध्ये विविध विषयांचे, विद्याशाखांचे ज्ञान मिळू लागले. त्यामध्ये संस्कारांचा भाग उघड नव्हता व नाहीदेखील. मूल्यशिक्षण या नावाने मुलांना वागणुकीचे काही धडे दिले जातात, पण त्यासाठी तासिका असतात. त्या विषयाच्या मार्कांची मोजदाद होते. पुण्याचा एक ट्रस्ट तर गेली कित्येक वर्षें मूल्यशिक्षणाचे प्रयोग काही शाळांतून जाणीवपूर्वक राबवून पाहत आहे, पण त्यामधून विशेष संस्कारशील मुले निर्माण झाल्याचे ऐकिवात नाही. स्वातंत्र्योत्तर काळात संस्कार हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरला जाऊ लागला आणि श्रमसंस्कारसारख्या संज्ञा तयार झाल्या. आता तर वाचनसंस्कार, खाद्यसंस्कार असे शब्द सर्रास उपयोगात आणले जातात. संस्कार या शब्दाचा अर्थ जो परंपरेने धार्मिकतेशी जोडला गेला होता तो मोकळा झाला.

परवाच्या 1 मे रोजी संस्कार या शब्दाने माझी गोची केली. मी एका शाळेत शिक्षकांशी गप्पा मारण्यास गेलो होतो. शिक्षक त्या दिवसाचे महत्त्व सांगताना ‘कामगार दिन’ व ‘महाराष्ट्र दिन’ या दोन्हींची वैशिष्ट्ये, त्यासाठी झालेले ऐतिहासिक लढे असे विवरण करत होते. ‘कामगार दिना’चा इतिहास जेमतेम दीडशे वर्षांचा तर महाराष्ट्र राज्य जरी 1960 मध्ये निर्माण झाले असले तरी राज्याची, मराठी भाषेची परंपरा पार दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहनांपासून सुरू होते – त्यात लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा अशी लेणी असतात. शिवाजीराजांसारखा जागतिक दर्ज्याचा पराक्रमी व दूरदर्शी पुरुष असतो. शिक्षकांच्या कथनात मराठीचा हा जो ऐतिहासिक संस्कार मुलांपर्यंत पोचवला जातो त्याचे अभिमानपूर्ण वर्णन होते. त्यांनी कामगार दिनाचाही उल्लेख केला. त्यांना शिक्षक म्हणून बरेच हक्क कामगार लढ्यातून मिळाले आहेत. त्यांच्यापैकी एका सरांचा सत्कार गुणवंत कामगार म्हणून झाला होता. कामगारांचा पहिला रक्तरंजित मोर्चा शिकागोला निघाला व तेथून 1 मेचा कामगार दिन सुरू झाला अशा हकिगती त्यांच्या बोलण्यात येत होत्या, परंतु त्यामुळे ते मोहरून जात नव्हते. त्यांचे लौकीक जीवन त्यामुळे सुधारले गेले आहे याची जाणीवही त्यांना नसावी. मी मात्र त्या साऱ्या संदर्भांनी चक्रावून गेलो. महाराष्ट्राची जाज्वल्य परंपरा, मला तिचा लाभलेला वारसा या गोष्टी मलाही सुखावतात. पण तितकाच आनंद मला ‘कामगार दिना’च्या पाठीमागे असलेल्या लढ्याने होतो. त्या चळवळीतूनच कष्ट करणाऱ्या माणसांना त्यांचे हक्क प्राप्त झाले. त्यांचे पगारमान त्यांचा हक्क म्हणून ठरवले गेले. त्यांच्या कामाचे तास पक्के झाले. त्यांना साप्ताहिक व अन्य सुट्ट्या तशाच मिळू लागल्या.

माझ्यासमोर प्रश्न उभा ठाकला, की मला मराठी भाषा व संस्कृती लाभली ती परंपरेने व संस्कारांनी. मी माझा मराठीपणाचा संस्कार जपलाही आत्मीयतेने आहे. कधी कधी तर मला मी मराठी असल्याचा गर्वदेखील वाटतो. त्याच राज्याच्या स्थापनेचा दिन साजरा करत असताना, मला काही गोष्टी हक्काने लाभल्या आहेत, त्यांचेही कौतुक मनी दाटते.

मला संस्कारसंकल्पना भारतीय परंपरेने दिली आणि हक्काची जाणीव आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेने दिली. त्या संस्कारसंकल्पनेत आणि हक्काच्या जाणिवेत संघर्ष येतो तेव्हा मी अस्थिर होतो. तो संघर्ष परंपरा आणि नवता किंवा आधुनिकता एवढ्यापुरताच असेल तर तो मानसिक द्वंद्वामधून निभावून नेता येतो, परंतु उद्या, त्याकरता जीवनच पणाला लागले तर? मला माझ्या सध्याच्या जीवनात तशी चाहूल लागते. आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो- सुखाचा मार्ग संस्कार संकल्पनेचा की हक्काच्या जाणिवेचा?

– दिनकर गांगल

About Post Author

Previous articleहरित क्रांतीसाठी जमिनीत कर्ब हवेच!
Next articleशंकरराव आपटे – लोकप्रिय खलनायक
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here