प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटींमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा प्रदेश विभागला गेल्यामुळे उपरीनिर्दिष्ट संस्थेसारख्या मध्यवर्ती संस्थेची स्थापना अद्याप होऊ शकली नाही असे दिसते. तथापी यापुढील काळ निराळा असल्यामुळे व विशेषत: भावी हिंदी फेडरेशनचा भाषावार प्रांतरचना हाच पाया मुख्यत: राहणार असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राकरता अधिकारवाणीने बोलू शकणार्या, स्थिर पायावरील मध्यवर्ती संस्थेची जरुरी आहे.
प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटींमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा प्रदेश विभागला गेल्यामुळे उपरीनिर्दिष्ट संस्थेसारख्या मध्यवर्ती संस्थेची स्थापना अद्याप होऊ शकली नाही असे दिसते. तथापी यापुढील काळ निराळा असल्यामुळे व विशेषत: भावी हिंदी फेडरेशनचा भाषावार प्रांतरचना हाच पाया मुख्यत: राहणार असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राकरता अधिकारवाणीने बोलू शकणा-या, स्थिर पायावरील मध्यवर्ती संस्थेची जरुरी आहे. विशेषत: , ‘आंध्र महासभा,’ ‘कर्नाटक एकीकरण लीग’ अशांसारख्या आपापल्या मध्यवर्ती संस्था उभारून निरनिराळ्या राजवटींत विखुरलेले ‘आंध्र’ व ‘कर्नाटक’ यांच्यासारखे शेजारचे प्रांत आपापली प्रांतसंघटनेची पूर्वतयारी उत्साहाने व यशस्वी रीतीने करत असताना ‘संयुक्त महाराष्ट्रा’ने मागे पडणे इष्ट नव्हे आणि याच हेतूने आम्ही ‘संयुक्त महाराष्ट्र सभे’ची स्थिर पायावर संस्थापना करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या कामी शक्य ते साहाय्य देण्याबद्दल सर्व महाराष्ट्रीयांना सविनय विनंती करत आहोत :
योजना : संयुक्त महाराष्ट्राच्या नैसर्गिक व सांप्रतच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर त्याचे १. महाविदर्भ, २. मराठवाडा, ३. देश, ४. कोकण व ५. मुंबई शहर असे पाच स्वतंत्र भाग पडतात. या पाच विभागांत, त्यांचे स्थानिक वैशिष्ट्य शक्य तेवढे कायम ठेवून ‘संयुक्त महाराष्ट्रा’ चा एकसूत्रीपणा वाढवणारी कार्ये (उदाहरणार्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, संयुक्त महाराष्ट्राची आर्थिक व औद्योगिक पाहणी, संयुक्त महाराष्ट्र परिषद, इत्यादी इत्यादी) करणे व या पाची विभागांत स्नेहसंबंध संवर्धित करून भावी फेडरेशनमध्ये सर्वांचा एक मध्यवर्ती घटक कोणत्या पद्धतीने करावा त्याची योजना मुक्रर करणे इत्यादी इत्यादी उद्देशांनी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना व संवर्धन करण्याचे आम्ही योजले आहे.
धोरण : या सभेचे धोरण सर्वसंग्राहक स्वरूपाचे राहणार असून हिंदी राजकारणातील विविध पंथांच्या महाराष्ट्रीयांनी सभेच्या कामी भाग घेण्याला कोणताही प्रत्यवाय येणार नाही. तसेच कोणत्याही संस्थेच्या आघाडीवरील राजकारणामध्ये अगर पक्षसंघटनेमध्ये सभा भाग घेणार नाही. तथापी सभेच्या विविध चळवळी करताना कोणती तरी सामान्य राजकीय व आर्थिक दृष्टी अंगीकारणे भागच असल्यामुळे साधारणपणे इंग्लंडातील मजूर पक्षाच्या धोरणांतून प्रतीत होणारी समाजवादी दृष्टी ‘सभा’ आपल्या सर्व कारभारात ठेवील.
वैशिष्टय : या संस्थेचे भिक्षा ऊर्फ ‘झोळी’ हे, इतर संस्थांप्रमाणे एका ठरावीक योगक्षेम साधन राहीलच. परंतु त्याशिवाय संस्थेच्या मालकीचे अगर संस्थेच्या चालकत्वाखाली क्रमाक्रमाने निरनिराळे उद्योगधंदे उभारून त्यांतून निष्पन्न होणार्या फायद्यावरही संस्था आपला योगक्षेम अवलंबून ठेवील. ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी अगर’ ‘अनाथ विद्यार्थिगृह, पुणे’ यांनी चालवलेले छापखान्यांचे धंदे आणि नगर व पुणे येथील आयुर्वेद शिक्षण संस्थांनी चालवलेले औषधी शाळांचे धंदे आपल्यापुढे प्रत्यक्ष आहेतच. तेव्हा स्वत:करता ज्या आत्मीयतेने आपण खपतो त्या आत्मीयतेने सार्वजनिक संस्थांकरता खपणा-या नि:स्वार्थी आणि लायक कार्यकर्त्यांची वाण महाराष्ट्रात तरी मुळीच पडणार नाही. प्रश्न आहे तो फक्त सामग्रीच्या जुळणीचा आणि तज्ज्ञ मार्गदर्शकत्वाचा. पैकी पहिली ‘संयुक्त महाराष्ट्र सभे’च्या संघटनेने साधणार असून दुसरीची ‘सभे’ला त्या त्या धंद्यातील तज्ज्ञांकडून हक्काने अपेक्षा करता येईल. ट्रेड युनियन्स स्थापन करून समाजवाद सिद्ध करण्याचा जसा एक राजमार्ग आहे तसाच नियमित नफ्याच्या तत्त्वावर भांडवलाची व नियमित वेतनावर तज्ज्ञांची उभारणी करून सार्वजनिक संस्थेच्या चालकत्वाखाली निरनिराळे उद्योग यशस्वी करुन दाखवणे हाही समाजवाद-सिद्धीचा दुसरा राजमार्ग म्हटला गेला पाहिजे. हा दुसरा मार्ग संयुक्त महाराष्ट्र सभेच्या योगक्षेमाकरता शक्य होईल तसतसा जरूर चोखाळण्यात येईल.
या कामी महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या पुढा-यांची सहानुभूती आम्ही मिळवत असून आमच्या अंगीकृत कार्यासाठी महाराष्ट्रीयांनी आम्हाला शक्य ती मदत करावी अशी पुन्हा एकदा विनंती करून हे विनंतिपत्र संपवतो.
सर्वांचे नम्र.
०१. दा.वि.गोखले… बी.ए. एलएल. बी., पुणे
०२. ग.त्र्यं. माडखोलकर … उपसंपादक, महाराष्ट्र, नागपूर
०३. शं.न. आगाशे.. कॉमनवेल्थ चीफ एजंट, नागपूर
०४. डॉ. शिवाजीराव पटवर्धन … अमरावती
०५. श्री. शं.नवरे… संपादक, प्रभात, मुंबई
०६. दि.वा दिवेकर… एम.ए., पुणे
०७. रा.न.अभ्यंकर… बी.ए. एलएल.बी., पुणे
०८. पा.र. अंबिके.. संपादक, महाराष्ट्र परिचय, पुणे
०९. त्र्यं. वि. पर्वते .. उपसंपादक, बॉम्बे क्रॉनिकल, मुंबई
१०. मा. दि. जोशी… संपादक, बलवंत, रत्नागिरी
११. सु.मे.बुटाला… बी.ए. एलएल. बी. वकील. महाड
१२. ग. वि. पटवर्धन … मुंबई (कार्यवाह)
सभासद, प्रोव्हिजनल कमिटी – संयुक्त महाराष्ट्र सभा. पत्रव्यवहाराचा पत्ता : ग. वि. पटवर्धन, कार्यवाह प्रो. कमिटी, युसुफ बिल्डिंग, फोर्ट, मुंबई.
( अंतर्नाद , जून २०१० वरून )
Last Updated On – 1 May 2016
Chhan
Chhan
Comments are closed.