संयुक्त आंदोलनातील कन्येचा शोध

0
31

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अनंत विश्वनाथ गोलतकर ह्यांना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर होती. त्यांना काय झाले? मुलगा की मुलगी? त्या अपत्याला हे माहीत आहे का, की आपले वडील आपल्या जन्मवेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झाले आहेत?

आचार्य अत्रे यांच्या 'क-हेचे पाणी' या पुस्तकात अनंत गोलतकर यांचे हौतात्म्य, त्यांच्यावरील अन्याय ह्याबाबत सविस्तर आढावा आहे. परंतु त्यांच्या गरोदर पत्नीचे पुढे काय झाले याची हकिगत कळली नव्हती व ती चुटपुट लागून राहिली. ह्या अपत्याचा शोध कसा घ्यायचा? गोलतकर हे सावंतवाडी जवळच्या तोंडवली गावचे हा उल्लेख अत्र्यांचा पुस्तकात आहे. मी १५ एप्रिलला रत्नागिरीच्या बी.एस.एन.एल.मध्ये अधिकारी असलेल्या सौ. ज्योती दीक्षित या माझ्या मैत्रिणीला फोन केला. तिला गोलतकरांची कथा सांगितली आणि काही माहिती मिळते का? याचा तपास काढायला सांगितला.

सुलक्षणा गोतलकरमी १६ एप्रिलला इंटरनेटवरून बी.एस.एन.एल.ची डिरेक्टरी पाहिली, पण तोंडवली नावाचे पान उघडेना. मात्र मालवण तालुका नावाने पान उघडले. गोलतकर असे नाव दिल्यावर, जवळ जवळ पंधरा गोलतकर मिळाले. त्यात तोंडवलीतले एक नाव मिळाले आणि मला अतिशय आनंद झाला. मी तातडीने तेथे फोन लावला, पण तो फोन बंद होता. पुन्हा एकदा तो विषय तिथेच संपला.

मग तालुक्यातल्या पंधरागोलतकरांकडे फोन केले. पंधरापैकी सहा उचललेच गेले नाहीत. आठ गोलतकरांचाआंदोलनाशी काही संबंध नव्हता. पंधराव्या शशिकांत गोलतकरांचाही मला हव्या असणा-या गोलतकरांशी संबंध नव्हता, पण त्यांच्या पंपावर काम करणारे मिलिंद पाटील हे तोंडवलीचे असल्याचे समजले. मिलिंद पाटील यांची ड्युटी संध्याकाळी सहा वाजता होती. संध्याकाळी मिलिंद पाटील यांच्याशी बोलणे झाले. त्यांना अनंत गोलतकर यांच्याबद्दल माहिती होती. तसेच, गोलतकरांची चुलत भावंडे व भावजय तोंडवलीत असल्याचे समजले. अनंत गोलतकरांना मुलगी असून ती मुंबईत असल्याचेही समजले. मिलिंद पाटील यांनी गोविंद गोलतकरांचा मोबाईल नंबर दिला. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर, अनंत गोलतकर यांच्या मुलीचे नाव वासंती आहे व लग्नानंतरचे नाव सुलक्षणा आहे इतपत माहिती व त्यांचा पत्ता मिळाला. पण त्यांच्याकडे फोन किंवा मोबाईल नंबर नोंदलेला नव्हता. मग दोन दिवस, बी.एस.एन.एल.च्या कॉलसेंटरवर संपर्क करण्यात गेले, बी.एस.एन.एल.ची वेबसाईटही तपासली, पण उपयोग झाला नाही. शेवटी, डोंबिवलीचा पत्ता तर आहे, जाऊन धडकावे हाच मार्ग योग्य वाटला, दरम्यान, गोविंद गोलतकरांना पुन्हा फोन केला. त्यांनी अजून माहिती पुरवली, की सुलक्षणा ह्यांचे पती सुधाकर 'अपना बाजार'मध्ये नोकरी करतात. खूप हायसे वाटले, मिताली मटकर यांना फोन केला. मला 'अपना बाजार'चा नंबर त्वरित कळवण्यास सांगितले. त्या शुटिंगमध्ये होत्या, तरीसुद्धा पंधरा मिनिटांत त्यांनी नंबर एसएमएस केला.

मी 'अपना बाजार'मध्ये फोन केला. मला गिरकरांचा नंबर मिळाला. तेथून मी सुलक्षणा गिरकर हुतात्मा अनंत गोलतकर यांची कन्या येथपर्यंत पोचलो.
संयुक्त महाराष्ट्र मोहिमेतील एक अज्ञात पान उलगडल्याचा आनंद झाला. आंदोलनातील कन्येला मी साक्षात् भेटत होतो!

– नरेंद्र काळे
narendra.granthali@gmail.com
9822819709
Last Updated On – 1 May 2016

About Post Author