संपादकीय

0
46

महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सवी वर्षे..

महाराष्ट्र निर्माण झाल्याला पन्नास वर्षें लोटली. या काळात जग पूर्ण बदललं. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसून आले. मराठी भाषिकांचं एक राज्य व्हावं या पलिकडे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा कोणताही मोठा अजेंडा नव्हता. त्यामुळे त्या काळातील सांस्कृतिक संकेत जसे होते तशी त्यांची महाराष्ट्र राज्याशी घडण आखली गेली. त्यानंतरचे गेल्या पन्नास वर्षांतील समाजस्थितीतील क्रांतिकारी बदल कसे रिचवायचे याचा कोणताही आराखडा नसल्याने त्या त्या वेळी छोटी-मोठी पावलं उचलली गेली त्यात धरसोडवृत्ती होती. शिवाय महाराष्ट्राची एक अडचण अशी की, हे राज्य व ही संस्कृती स्थलांतरितांची घडलेली असल्यानं सर्वसमावेक्षक असा कोणताही कार्यक्रम घेणं मुश्किल होतं. त्यातल्या त्यात सबळ होता तो भाषिक दुवा परंतु तंत्रज्ञानाच्या झपाट्यात तो दुवा कच्चा बनत गेला आणि महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवाच्या टप्प्यावर विघटनाच्या आव्हानाला (स्वतंत्र विदर्भाची हाक!) सामोरा जात आहे.

‘थिंक महाराष्ट्र..’ नं या टप्प्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील चार– तरुणांना, महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाबाबत त्यांना काय वाटतं असं विचारलं. त्यांचे प्रतिक्रियात्मक लेख येथे प्रसृत करत आहोत. आशिष कुलकर्णी हे जमिन विकास उद्योगात आहेत. दुस-या मुक्ता पुणतांबेकर या कलावंत आहेत. उन्मेष झगडे हे विद्यार्थी आहेत. अविनाश सावजी हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. या चौघांचे वैशिष्ट असे की त्यांचा सामाजिक कार्याशी जवळचा संबंध आहे.

याच संदर्भात मानवी जिव्हाळ्याचा एक वेगळा लेख नरेंद्र काळे यांनी सादर केला आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यामध्ये सर्वांत शोकात्म कहाणी आहे अनंत गोलतकर यांची. ते पोलिसी लाठीहल्ल्याला बळी पडले तेव्हा त्यांचं लग्न होऊन वर्षं-दीड वर्ष झालं होतं आणि बायको गरोदर होती. आंदोलनातील त्या कन्येची कहाणी काळे यांनी कथन केली आहे.

महाराष्ट्राबरोबर गुजरात राज्य जन्मास आलं स्वाभाविकच पन्नास वर्षांनंतरच्या दोन्ही राज्यांच्या प्रगतीची तुलना होते. गुजरात येथील वडोदरा येथे गेली चाळीस वर्षं राहत असलेले आर्किटेक-लेखक प्रकाश पेठे यांची निरीक्षणं एका लेखात मांडली आहेत. त्यातून कदाचित वेगली दृष्टी मिळेल.

संयुक्त महाराष्ट्राबाबतची ऐतिहासिक माहिती ‘थिंक महाराष्ट्र…’ ही संकेतस्थळ सुरु झाल्यापासून आम्ही सतत मांडत आलो आहोत. ती संदर्भासाठी केव्हाही पाहता येईल त्यासोबत संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आचार्य अत्रे यांच्या संबंधातले विनोद देखील सतत सांगत आलो आहोत. त्यातून या महापुरुषाचं दर्शन व्हावं अशीच इच्छा आहे.

 

    दिनंकर गांगल

    संपादक, थिंक महाराष्ट्र

About Post Author

Previous articleशिक्षण, निर्णयक्षमता आणि मूल्ये
Next article‘चाळेगत’ – नेमाडेपंथातील नवी पिढी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.