षड्रिपू हे मित्र आहेत!

1
67
_Shadripu_Carasole

‘उठून जा’ म्हटल्याने कोणी जात नाही हे तर खरेच आहे, पण ‘उठून जा’ म्हणणाऱ्याच्या म्हणण्याला जो काही एक तत्वज्ञानाचा गौरव आहे तो त्याला राहू न देणे हे या परिच्छेदाचे प्रतिपाद्य आहे. एकदा संसाराला मन विटायास हवे असे ठरवल्यामुळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सहा रिपू आहेत, असेही तत्त्ववेत्त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ज्या अत्यंत उदात्त अशा विकारांवर आमचे जीवित सर्वस्वी अवलंबून त्यांना ‘रिपू’ म्हणून शिवी दिली आणि या रिपूंच्या कब्जात तुम्ही जात आहात असे सांगून त्यांना लाजवण्याचा घाट घातला, पण आम्ही लाजायचे बंद करणार आहोत. प्रत्यक्ष व्यवहारात तत्त्वज्ञानाचा बोज त्याच्याकडे ठेवून या विकारांच्या कह्यात आम्ही वागत आहोत, पण त्या तत्त्वज्ञानाचा बोजसुद्धा आम्हास उरू द्यायचा नाही. संसाराकडे पाहण्याच्या दृष्टीतच आम्हाला पायाभूत फरक घडवून आणायचे आहेत. ज्यांना तुम्ही ‘रिपू, रिपू’ म्हणता ते रिपू नव्हेत; तर ते आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या संगतीत आम्हास सुख उत्पन्न होते असे आम्हास वाटते. त्या त्या विकारांचा अतिरेक झाला म्हणजे ते रिपू बनतात. योग्य मर्यादेत असताना ते परममित्र असतात व त्यावरच आमचा संसार पोसतो. जे अन्न आम्ही खातो तेसुद्धा जर आहाराबाहेर खाल्ले तर ते शत्रू बनल्यावाचून कधी राहयाचे नाहीत, पण जर का ते आहारात असले तर आमच्या शरीराचा पोष उत्तम रीतीने करते. असेच वरील विकारांचे आहे.

‘काम’ हा शत्रू मानणे याच्यासारखी दुसरी चूक त्रिभूवनात नाही. अतिरेकाने नाश होतो, बुद्धी भ्रष्ट होते, स्मृती विकल होते हे सर्व खरे आहे, परंतु योग्य मर्यादेच्या आत सर्व विश्वाला आपल्या गोडीत सुख उत्पन्न करणारा इतका चांगला विकार दुसरा कोणता नाही. फार काय सांगावे? ब्रह्माने हे विश्व जरी खेळ म्हणून उत्पन्न केले असले तरी त्या खेळातील प्रसरणाचे आदिसूत्र म्हणून त्याला हा ‘काम’ उत्पन्न करावा लागला. याची जी अत्यंत सूक्ष्म अशी छाया ‘प्रेम’ नावाने वावरते, ती अंगावर पडली असता थंडीतल्या कोवळ्या उन्हाप्रमाणे मधूर लागते आणि तिचा अनुभव घेत पुष्कळ वेळ बसावे असे वाटू लागते. या कोवळ्या उन्हाच्या बळावर कसलेही साहस करण्यास माणसे आजवर प्रवृत्त झालेली आहेत. मग या ‘कामा’स शत्रू कसे मानता येईल?

‘क्रोधा’ने तरी आपले काय वाईट केले आहे? त्याला बेफाम सोडता कामा नये, इतकेच काय ते. पण बेफाम सुटलेल्या इतर मनोविकारांना जर फटकारा मारून मर्यादेत आणायचे असेल तर ‘क्रोधा’चा उपयोग केवढा तरी आहे.

‘लोभा’ने संसार सिद्ध केला आहे. ‘खाईन खाईन’, ‘भोगीन भोगीन’ असे वाटत असल्यामुळे माणसे केवढ्या प्रचंड उद्योगांना हात घालत आली आहेत! त्यांची महत्त्वाकांक्षा याचमुळे बळावली आहे. हा इतरांचे मनोगत लक्षात न घेता बेफामपणे पुढे गेला तर मात्र धन्यावरच उलटेल व शिकारीसाठी जवळ बाळगलेला चित्ता जसा रक्ताच्या लोभाने धन्यावरच उलटावा तसा हा उलटेल यात काही शंका नाही.

‘मोहा’ने तर अरुचकर व बीभत्स वस्तुकडेसुद्धा पाहण्याला निराळ्या काचा प्राप्त झाल्यामुळे याच्यातील खरे गुण ओळखण्याला मदत होते. हा मोहाचा गुण जर अंगी नसता तर कवींना वस्तुजातीचे सामुदायक सौंदर्य जे वर्णता येते, ते कधी आले नसते. अर्थात हा जर अतिरेकास गेला व माणसे बेताल अथवा बतोल झाली, म्हणजे जर त्यांनी यांच्या गायनातील संवाद बिघडवला, अथवा ते एका अंगालाच झुकू दिले, तर मोह हा घात करील यात शंका नाही. चंद्राची आवड धरणाऱ्या एका चिनी कवीने, जलविहार करत असताना उसळत असलेल्या लाटेतील चंद्रबिंबाला आलिंगन देण्याचा मोह धरल्यामुळे जसा त्याचा नाश झाला तसा अतिमोहित माणसाचा नाश होईल हे खरेच आहे.

‘मद’ हा वैभवाच्या स्थैर्याला उपयोगी पडतो आणि फार बळावला तर त्याच वैभवाचा नाश करतो.

‘मत्सरा’ला शिवी दिली नाही असा प्राय: कोणी तत्त्ववेत्ता नसेल. लपतछपत वागणाऱ्या या गूढस्थ विकाराची भीति सर्वांनीच बाळगलेली आहे, पण म्हणतात तितका तो दुष्ट नाही. त्याच्या सौम्य व मर्यादित स्वरूपात तो आपल्या संसाराचा रक्षिता आहे. संसाराच्या निरुंद मार्गावरून चालत असताना स्त्री-पुरुषांचा झोक जाण्याचा संभव असतो. त्याप्रसंगी त्यांना थोडेसे दरडावून त्यांचा तोल सावरून धरण्यास ‘मत्सरा’इतका उपयोगी मित्र दुसरा कोणी नाही. परस्परांविषयीचा अविश्वास हा भाबडेपणाने बोलून दाखवण्याइतका कायम व प्रबळ नसतो, पण सूक्ष्म रूपाने तो त्या त्या ठिकाणी असतो व त्यामुळेच पती पत्नीला , पत्नी पतीला मार्गावर ठेवण्याचे काम सूक्ष्म मत्सराच्या लपतछपत केलेल्या दर्शनाने घडवून आणतात. पुरुष हा रात्री घराच्या बाहेर फार राहू लागला तर त्याला आडवळणाने का होईना, पण जी स्त्री जाब विचारत  नाही ती स्त्रीच नव्हे आणि दुसरीकडे कोठे आपल्या संगतीच्या बाहेर, कोणाच्या साध्या निमित्ताने का होईना, पण स्त्री जर फिरकणार असली तर कोणतेही संभावितपणाचे मिष पुढे करून पुरुष जर त्यात मोडता घालत नाही तर तो पुरुषच नव्हे. अर्थात हेच काम अनिवार झाले तर परस्पर दोघे विश्वासयोग्य असतानासुद्धा संसाराची वाताहत होईल हे सांगणे नलगे.

या प्रतिपादनावरून ध्यानात येईल, की ज्या षड्विकारांना रिपू रिपू म्हणून संबोधलेले आहे ते संसारी माणसांचे रिपू नव्हेतच आणि म्हणून त्यांची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. ज्या कोणाला तप आचरायचे असेल, रानावनांत जाऊन बसायचे असेल त्यांच्या एकाग्रतेच्या मार्गात हे विकार विघ्न आणत असतील. त्यांना रिपूसारखे हे वाटावेत हे स्वाभाविक आहे. पण संसाराला लाथ मारू इच्छिणाऱ्यांना ते त्यांच्या मूल व बालबोध स्वरूपातसुद्धा जरी रिपू असले तरी संसारी लोकांना त्या स्वरूपात ते तसे नाहीत. फक्त ते अनावर झाले, उपयुक्ततेच्या मर्यादा ओलांडून पलिकडे गेले व विवेकाची ते फरपट काढणार असे दिसू लागले म्हणजे मात्र ते शत्रू बनतात हे खरे, पण या बाबतीत धर्माचे प्रतिपादन हे उपकारकच ठरत आले आहेत हे ध्यानात आणावे. उग्र वासनांचा उपशम करावा व हे जे विकार म्हणून सांगितले त्यांना नेहमी कह्यात ठेवावे असे धर्मानेच शिकवले आहे. म्हणून ज्यांना ज्यांना या उपदेशाप्रमाणे वागण्याचे साधले आहे त्यांचे त्यांचे संसार सुखाचेच झाले आहेत व म्हणून धर्माचे हे ऋण ते मान्य करतील, पण धर्माच्या तत्त्वज्ञान राशीत यांना जे वैरी म्हटलेले आहे व नित्याच्या जीवनातसुद्धा त्यांच्याकडे संशयित नजरेने पाहिले पाहिजे अशी जी काही कल्पना होते तेवढी असू नये, असा मात्र आग्रह आहे.

– श्री. म. माटे
(श्री. म. माटे यांच्या ‘संग्रहालय जानेवारी/फेब्रुवारी/मार्च 1992’ या त्रैमासिकाच्या लेखातून उद्धृत)

About Post Author

Previous articleकोपरगावचा पेशवेवाडा ऊर्फ विटाळशीचा वाडा
Next articleघरे-मुले हवीतच कशासाठी?
श्रीपाद महादेव माटे यांचा जन्म विदर्भातील शिरपूर या गावी २ सप्टेंबर, १८८६ रोजी झाला. माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू महाविद्यालयीन जीवनात अध्यापक म्हणून लाभले. त्यांच्यावर लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. माटे यांनी सातार्‍यातील आणि पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून काही काळ अध्यापन केले. त्यानंतर, ते पुण्याच्या एस.पी. कॉलेजात इंग्रजी व मराठी विषयांचे प्राध्यापक म्हणून होते. माटे हे ‘रोहिणी’ या मासिकाचे पहिले संपादक होते. माटे यांनी ‘केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड) या ग्रंथांचे संपादन करून, साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांची ‘विज्ञानबोध’ या ग्रंथाची त्यांनी संपादित केलेली दोनशे पानी प्रस्तावना गाजली. त्या प्रस्तावनेतून त्यांनी विज्ञानयुगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. माटे यांनी आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे काम केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांत काही चरित्रेसुद्धा आहेत. त्यांची ‘पक्षिकेचा वारा’ ही एकमेव कादंबरी आहे.त्यांचे देहावसान २५ डिसेंबर, १९५७ साली झाले.

1 COMMENT

  1. Khupch chan lek aahe ha …
    Khupch chan lek aahe ha .
    Ha vegla vichar chan vatla..kharch thoda vichar kela ki hya saglya Ripu limit madhe chan vattattat ..

    Aabhari aahe

Comments are closed.