श्री गोरक्षनाथ – नाथतत्‍वाचे प्रचारक (Shree Gorakshnath)

1
122
carasole

श्रीगोरक्षनाथांचा आविर्भाव विक्रम संवत् दहाव्या शतकात भारतात झाला. श्रीशंकराचार्यांच्या नंतर तेवढे प्रभावशाली व महिमान्वित महापुरुष भारतवर्षात कोणी अवतरलेले नाहीत! त्यांचे अनुयायी भारताच्या कानाकोपऱ्यात आढळतात. भक्तिमार्ग प्रचलित होण्याच्या अगोदर सर्वांत शक्तिशाली धार्मिक मार्ग म्हणजे गोरक्षनाथांचा योगमार्ग होय.

गोरक्षनाथ हे त्या काळचे सर्वांत श्रेष्ठ धार्मिक पुढारी होते. त्यांच्या जन्मस्थानासंबंधी एकमत नाही. त्यांचा जन्म गोदावरी तीरावर चंद्रगिरी नावाच्या गावी झाला होता असे ‘योगिसंप्रदायाविष्कृति’ या ग्रंथामध्ये म्हटले आहे. ग्रियर्सनने त्यांना काठियावाडमधील गोरखमठीचे निवासी म्हणून म्हटले आहे. त्यांचा जन्म बंगालमध्ये, पंजाबमध्ये झाला होता असा कित्येकांचा समज आहे. पंजाबमधील गोरख टेकडीवरून ब्रिग्ससाहेबांनी त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला असा तर्क लढवला आहे. मोहनसिंग यांच्या मतेही, त्यांचा जन्म पेशावरजवळ झाला असावा. गोरक्षनाथांचा जन्म ब्राह्मणकुळात झाला असावा व त्यांच्या आयुष्याचा बहुतेक भाग ब्राह्मण वातावरणात व्यतीत झाला असावा.

गोरक्षनाथांच्या नावावर पुष्कळ ग्रंथ उपलब्ध आहेत, परंतु गोरक्षनाथांनी स्वत: कोणते ग्रंथ लिहिले व क्षेपक ग्रंथ कोणते आहेत हा प्रश्न वादग्रस्त आहे. कित्येक विद्वानांनी त्या पुस्तकांच्या आधारे गोरक्षनाथांचे जन्मस्थान, त्यांचा कालनिर्णय, त्यांच्या विषयीच्या प्रचलित कथा यांवर प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला आहे. कबीरदास, गुरु नानक यांच्या बरोबर त्यांचा वार्तालाप झाला होता व ते चौदाव्या शतकात होऊन गेले असे अनुमान ग्रियर्सन यांनी बांधले आहे. फार काय, सतराव्या शतकात त्यांचा बनारसीदास जैन यांच्याशी शास्त्रार्थ झाला होता असाही एक स्वर आहे. डॉ. पीतांबरदत्त बडथ्वाल यांनी त्यांना अकराव्या शतकामधील प्रसिद्ध योगी मानले आहे व त्यांनी त्यांच्या मताच्या समर्थनार्थ गोरक्षनाथांच्या ग्रंथाचा उल्लेख केला आहे. कै. ह.भ.प. ल.रा. पांगारकर असे मानतात, की गोरक्षनाथ हे बाराव्या शतकात हयात होते.

गोरक्षनाथांची संस्कृत पुस्तके सर्व उपलब्ध नाहीत. ती सर्वच त्यांनी लिहिली आहेत असे म्हणणेही धाडसाचे आहे. एकूण अठ्ठावीस पुस्तकांचा उल्लेख डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांनी त्यांच्या ‘नाथसंप्रदाय’ या पुस्तकात केला आहे. त्यांतील अमनस्क, अमरौघशासनम्, गोरक्षपद्धति, गोरक्षसंहिता, सिद्दसिद्दांतपद्धति हे ग्रंथ अधिक महत्त्वपूर्ण आहेत. गोरक्षनाथांची काही पुस्तके हिंदीमध्ये आढळतात. त्यांचे संपादन डॉ. पीतांबरदत्त बडथ्वाल यांनी केले आहे. तो ग्रंथ ‘गोरखबानी’ नावाने प्रसिद्ध आहे. त्या ग्रंथात गोरक्षनाथांच्या चाळीस हिंदी पुस्तकांचा उल्लेख आहे. त्यांचे ग्रंथ मराठीतही आहेत. त्यापैकी ‘अमरनाथ संवाद’ हा ग्रंथ योगपर आहे. गोरक्षगीता या ओवीबद्ध ग्रंथातही योगविषयक अनुभव दिले आहेत.

मोहनसिंग यांच्या मते, गोरक्षनाथ हे उपनिषदांनी सांगितलेल्या योगमार्गाचे पुरस्कर्ते होते. गोरक्षमताचा हा आद्य सिद्दांत आहे, की जे ब्रह्मांडात आहे ते सर्व सूक्ष्म प्रमाणात पिंडात आहे. पिंडशरीरात मुख्य कार्यकारी शक्ती कुंडलिनी आहे. विश्वब्रह्मांडात भरलेली महाकुंडलिनी हे तिचे पिंडगत स्वरूप आहे. त्या शक्तीची उपासना करण्याकरता कोठे दूरवर भटकत जाण्याची जरुरी नाही. ती शक्ती प्रत्येक पिंडात, अणुपरमाणूत भरलेली आहे. ब्रह्मांडाच्या प्रत्येक कणात भरून उरलेली शक्ती मानवी देहात ‘कुंडलिनी’ रूपाने वास करते. नाथमार्गी साधक त्या शक्तीची उपासना करण्याकरता शरीर हे प्रमुख साधन मानतात. केवळ सक्तीचे संचालन हे तेथे प्रमुख ध्येय नसून शिवशक्तीचे ऐक्य म्हणजेच सहज समाधी साधणे हे खरे ध्येय आहे. मनुष्याला मोक्ष साधायचा असेल, तर सहज समाधीद्वारे मनाने मनाला पाहण्यास शिकले पाहिजे.

तंत्र, हठ अथवा रसशास्त्र ही शरीर अमर करण्याचा प्रयत्न असणारी शास्त्रे आहेत. गोरक्षनाथांचा पंथ हा आत्म्याचे अमरत्व अनुभवणे, नादमधूचा व शिवशक्तीच्या सामरस्याचा आनंद भोगणे याकरता आहे. आत्म्याचे मंदिर जे शरीर, त्याचे नुसते शोषण हे त्याचे ध्येय नव्हे. आत्म्याचे अमरत्व अनुभवणे हे त्या मार्गाचे उद्दिष्ट आहे.

नाथपंथामध्ये ज्यांनी या पंथाचा प्रसार केला व त्याचे वजन वाढवले असे गोरक्षनाथांसारखे प्रभावी व व्यक्तिमान पुरुष दुसरे कोणी झाले नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा त्यांच्यविषयी गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत.

‘तेणे योगाब्जिनी सरोवरु |
विषयविध्वंसैकवीरू |
तिये पदी का सर्वेश्वरू |
अभिषेकिले ||’   (श्रीज्ञानेश्वरी अध्याय अठरा – ओवी १७५६)

गोरक्षनाथांनी अनेक लोकांना त्या मार्गाची दीक्षा दिली. त्यातील एक फाटा गहिनीनाथांच्या द्वारा निवृत्तिनाथांकडे आला. पण गोरक्षनाथांनी योगासंबंधी तत्कालीन भारतीय जनता व राजे यांच्यात इतकी आवड निर्माण केली, की त्या विषयावर अनेक ग्रंथ संस्कृतात निर्माण झाले. गुरु गोविंदसिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात गोरक्षनाथांचे केवढे वजन होते व त्यांनी अनेक राजांना पंथात कसे खेचले त्याचे वर्णन केले आहे. बौद्ध व जैन लोकांतसुद्धा योगमतावर दहा ते चौदा या शतकांत अनेक ग्रंथ झाले. चालुक्य परमार यांच्या कारकिर्दीत शिवमंदिरे व शैवयोग यांवरील ग्रंथरचना यात पुष्कळच वाढ झाली. गोरक्षनाथ हेच त्या पंथाचे खरे कर्तृत्ववान आदिपुरुष. आदिनाथ व मत्स्येंद्रनाथ यांचे कार्यक्षेत्र त्या मानाने फारच संकुचित.

गहिनीनाथांची माहिती फारशी मिळत नाही; पण त्यांचा महाराष्ट्रात संचार होता. ज्ञानोबारायांचे आजे गोविंदपंत व आजी नीराबाई यांना त्यांचा अनुग्रह होता. त्यांनीच महाराष्ट्रास निवृत्तिनाथ दिले. त्यांनी निवृत्तिनाथांच्या दारात लावलेले नाथपंथाचे रोपटे, त्याचा विस्तार गगनावर गेला. पण अजून त्याचा इतिहास लिहिला गेलेला नाही. उत्तर हिंदुस्थानात जसे गोरक्षनाथ तसे महाराष्ट्रात ज्ञाननाथ. ‘निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले अपार जीवजंतु’ असे नामदेवरायांनी त्यांच्या कार्याचे वर्णन केले आहे. ज्ञानोबाराय हे योगी, भक्त व ज्ञानी असे असल्यामुळे त्यांच्याशी गुरुत्वाचे नाते जोडणारे असे वेगवेगळे लोक आहेत. ज्ञानदेवांशी त्यांचा योगमार्ग परंपरेतील साधू म्हणून संबंध जोडणारे महाराष्ट्रात पंथराजाचे कापडी (वाटचाल करणारे वाटसरू किंवा पांथस्थ) अजूनही आहेत. ‘भक्तिपंथी’ वारकरी ज्ञानोबाराय हे मोठे भक्त म्हणून त्यांच्याशी नाते जोडतात.

ज्ञानमार्गाचे पांथिकही महाराष्ट्रात आहेत. तेसुद्धा त्यांचा संबंध ज्ञानोबारायांशी जोडतात. महाराष्ट्रात अनुभवामृताची परंपरा विद्यमान आहे. तिच्यातही शाखा आहेत. एका शाखेने शिवकल्याण दिले व दुसऱ्या शाखेने प्रसिद्ध पुरुष विश्वनाथ ऊर्फ भय्याकाका – ज्यांनी कै. कुंटे यांना ज्ञानेश्वरीची गोडी लावली – दिले. शिवकल्याणांनी अनुभवामृतावरील त्यांच्या ‘नित्यानंदैक्यदीपिका’ या टीकेच्या शेवटी त्यांची परंपरा दिली आहे. ती अशी – शंकर, पार्वती, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, मुक्ताबाई, वटेश्वर, चक्रपाणी, विमळानंद, चांगाकेशवदास, जनकराज, नृसिंह, श्रीहृदयानंद, विश्वेश्वरराज, श्रीकेशवराज, श्रीहरिदास, स्वामी परमानंद, नित्यानंद व शिवकल्याण – नित्यानंदैक्यदिपिका. (अध्याय दहा/ ३४५-७५)

दुसरी शाखा अशी – आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सत्यामलनाथ, दीनानाथ, अनंतराज, अमळनाथ, भूमानंद, गोपाळ, विश्वनाथ ऊर्फ भय्याकाका, अण्णाबुवा हुपरीकर, रघुनाथबुवा.

ज्ञानदेवांच्या शिकवणुकीतील योग, भक्ती, ज्ञान यांचा समन्वय पंढरपुरी पांडुरंगचरणी झाला व म्हणून महाराष्ट्रापुरते बोलायचे तर पंढरपूर हे नाथपंथाचे पीठ झाले. श्रीमद् आद्य शंकराचार्य हे पंढरपूरचे ‘महायोगपीठ’ असे वर्णन करतात. नाथपंथाचे हे इवलेसे रोप पंढरपुरात निवृत्तिनाथ-ज्ञानेश्वर महाराज यांनी लावले व त्याला खतपाणी नामदेवराव, एकनाथ महाराज व तुकोबाराय यांनी घातले. त्यामुळे त्याचा वेल गगनावर गेला. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाइतका विस्तार पावलेला दुसरा संप्रदाय नाही. महाराष्ट्रात नाथसंप्रदायाला निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर महाराज यांनी भक्तिमार्गाची जोड देऊन त्याचा प्रसार केला.

उत्तर हिंदुस्थानात जो गोरक्षपंथ योगमार्गी म्हणून ओळखला जातो. संत कबीर व तुलसीदास या पंथांचे भक्तीस अनुकूल मार्ग म्हणून वर्णन करताना आढळून येत नाहीत. उलट, कित्येक असे म्हणणारे आहेत, की गोरक्षनाथांच्या मार्गात ईश्वरनिष्ठेला स्थान होते व म्हणूनच संत कबीर, गुरू नानक, ज्ञानेश्वर महाराज यांच्या मनाचा त्यांच्या मतावर परिणाम मोठा झाला. ज्ञानेश्वर महाराज हे भक्ती व योग यांत विसंगती मानत नव्हते; एवढेच नव्हे, तर त्यांचा त्यांच्या ठिकाणी उत्कृष्ट समन्वय झालेला होता.

दांडेकरांच्या ‘ज्ञानदेवांशी त्यांचा योगमार्ग परंपरेतील साधू म्हणून संबंध जोडणारे महाराष्ट्रात पंथराजाचे कापडी अजूनही आहेत.’ या विधानाबद्दल थोड्या खुलाश्याची गरज आहे.

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी अध्याय ६ आत्मसंयम योग. यात अष्टांग योगसाधनेसंबंधी विस्तृत विवरण आहे.  यातील –

‘ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी, पंथराजु (१५२)

तेथे प्रवृत्तितरूच्या बुडी, दिसती निवृत्तीफळाचिया कोडी, जिये मार्गीचा कापडी, महेशु आझुनी (१५३)’

या दोन ओव्यांचा संदर्भ वरील विधानाला आहे. संतश्रेष्ठ श्रीज्ञाननाथ हे कर्म, भक्ती, ज्ञान, योग इत्यादी परमात्मसाधनेच्या सर्वच मार्गांचे (पंथांचे) शिखरपुरुष आहेत. पण या चारमधील योगमार्ग हा सर्वश्रेष्ठ असे सांगण्यासाठी त्यांनी योगाला ‘पंथराज’ म्हटले आहे. आणि कापडी म्हणजे वाटचाल करणारे वाटसरू किंवा पांथस्थ. महादेव श्रीशंकर हे या पंथराज योगमार्गावरचे अनादि काळापासूनचे वाटसरू असून अगदी आजही त्यांची या राजरस्त्यावरील वाटचाल अखंडपणे सुरू आहे हा पुढच्या ओवीचा अर्थ. योगसाधना हा पंथराज आहे याचा खणखणीत पुरावा म्हणून त्यांनी ‘सर्वोत्तम विरागी तपस्वी शंकरही साधनेच्या याच राजमार्गावरून वाटचाल करत आहेत’ असे स्पष्ट केले आहे.

– मंदार वैद्य

(हरि भक्त परायण मामा (सोनोपंत) दांडेकर यांच्या सार्थ ज्ञानेश्वरी प्रतीमधील प्रस्तावनेतील ‘नाथसंप्रदाय’ प्रकरणातून उद्धृत)
(ज्ञानेश्वरी स्वर्णिमा पाक्षिक १ ते १५ मे २०१६ वरून उद्धृत)

About Post Author

1 COMMENT

  1. माहीती फार सुरेख दिली आहे.
    माहीती फार सुरेख दिली आहे. परंतु अजून विस्तार चालला असता.

Comments are closed.