श्री क्षेत्र कावनाई

10
226
carasole

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो.

कावनाई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्षें प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते.

त्या वेळी त्या तीर्थावर प्रथम कुंभमेळा झाला, म्हणे. कावनाई येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्‍थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे.

कावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन – १. कांचीपुरा, २. गुवाहाटी व ३. करंजगाव (शेगाव).

कावनाई क्षेत्राबाबत काही आख्‍यायिका प्रचलित आहेत. त्‍या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. त्या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरुन जात असताना त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे त्या गावाचे नाव कावनाई असे पडले. त्या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी तेथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच, तेथे गजानन महाराजांनी बारा वर्षें तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले.

भविकांकडून कामाक्षी देवीच्‍या मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य सांगितले जाते. त्‍यानुसार, प्रभू रामचंद्र ज्या वेळेस श्री क्षेत्र टकेद येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्या वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असताना पार्वतीदेवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावर शंकर म्हणाले, की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वतीदेवी सीतारूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. मात्र रामाने पार्वतीदेवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वतीदेवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने ‘माझ्यासाठी आपण येथे राहवे’ असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वतीमाता येथे राहिली. श्रीरामाची ‘काम इच्छा’ बघण्यासाठी आलेली हीच ती कामाक्षी माता. कावनई क्षेत्राचा असा इतिहास आहे.

कावनाई गडाचे बांधकाम मुघलांकडून करण्‍यात आल्‍याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार १७५० ते १७६५ या कालखंडात केला. पेशव्यांनी महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा त्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षीदेवीला सोने-चांदीचे अलंकार दिले, ते मंदिराकडे उपलब्ध आहेत. ते नवरात्र उत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. त्यांचा उल्लेख पेशव्यांच्या बखरी मध्ये आहे.

श्री कावनाई क्षेत्राजवळ कावनाई गड आहे. ते ठिकाण प्रसिद्ध असून गिर्यारोहणासाठी सोपे व सहज सर करण्यासारखे आहे. कावनाई गावापासून गड चढण्यास सुरुवात करून गडाच्या सोंडेवरून वळण घेत घेत गडावर जाता येते. गड चढून गेल्यावर कड्याजवळ पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर कड्यात मोठा दरवाजा आहे. सुस्थित असलेल्‍या त्‍या दरवाजाजवळ छोटी गुहा आहे. त्‍यात चार-पाच व्‍यक्‍ती बसू शकतील. दरवाज्यातून छोट्या भुयारी मार्गाने कडा चढून गेल्यावर गडाचा प्रशस्त भाग आहे. पश्चिम भागात एक बुरूज आहे. तेथे पाण्याचे टाके व मंदिर असून टाक्याला उन्हाळ्यातही पाणी असते. त्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही. गडावरून कळसूबाईची डोंगररांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा परिसर दिसतो. गडावर भटकंती करून मन प्रसन्न होते. गडावरील निसर्गसौंदर्य मन मोहून टाकते.

‘श्री क्षेत्र कावनाई’ला नाशिक शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक महामार्गावरून घोटी-इगतपुरीच्‍या दिशेने जाताना खंबाळे गावाजवळ उजव्‍या हाताला फाटा फुटतो. तो कावनाई फाटा या नावाने ओळखला जातो. कावनाई गाव तेथून सात किलाेमीटर अंतरावर आहे. इगतपुरीहून कावनाई गावापर्यंतचे अंतर सतरा किलोमीटर आहे. गावात शिरल्‍यानंतर उजव्‍या हाताला कावनाई गड दिसतो. गडाची एक सोंड गावात उतरली आहे. गडावर राहण्‍याची सोय नाही. मात्र पायथ्‍याला ‘कपिलाधारातिर्थ’ या आश्रमात राहण्‍याची सोय होऊ शकते.

– सीताराम आर. निकम

Last Updated On – 10th Feb 2017

About Post Author

10 COMMENTS

  1. सर खुप छान लेख आहे. आम्हाला
    सर खुप छान लेख आहे. आम्हाला त्यामुळे अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.

  2. Purv Itihas labhaleli aashi
    Purv Itihas labhaleli aashi barich thikane aahet .tyapaiki kavanai he hi aahe sir aapalyamule itarana itihas samajnyas nishhit madat hoil.thank you for important information.

  3. सर अतिशय महत्वाची अन दुर्मिळ
    सर अतिशय महत्वाची अन दुर्मिळ माहिती आपण दिली मी स्वतः कावनई गावाचा रहिवाशी आहे. माझ्या गावच्या पर्यटन संबंधी आपण दिलेल्या माहिती बद्दल आम्ही कावनई ग्रामस्त आपले आभारी आहे.
    धन्यवाद,

  4. खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  5. mahiti sakankalit karun…
    सुंदर संकलन अशीच माहिती संकलन करून सर्वांपर्यंत पोहोचवावी. इतिहासाच्या अभ्यासाला याचा उपयोग होईल.

  6. SIR , KHUPACH CHHAN MAHITI…
    सर, आमच्या गावाबद्दल खूपच छान माहिती दिली. धन्यवाद.

Comments are closed.