श्यामवर आईने केलेले संस्कार

0
49
Sane Guruji.jpg

Sane Guruji.jpg     पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी पालगड येथे एकत्र कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांच्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांचे वडील खोत असूनही घराच्या विभक्तीकरणानंतर मात्र घरची आर्थिक परिस्थिती खालावत गेली. गुरुजींचे स्वत:चे पूर्ण आयुष्य गरिबीत गेले. त्यांच्या आईचे नाव ‘यशोदा’ होते. त्यांचे लहानपणापासून, त्यांच्या आईवर फार प्रेम होते. त्यांनी आपल्या आईच्या सार्‍या आठवणी ‘श्यामची आई’मध्ये अत्यंत साध्या, सरळ व ह्दयस्पर्शी शब्दांत लिहिल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे संस्कार केले, त्यातूनच गुरुजींचा जीवनप्रवास घडला. त्यांच्या आईनेच त्यांना सर्वांभूती प्रेम करण्याचा धडा दिला.

'श्‍यामची आई'     सानेगुरुजींचे शिक्षण पालगडच्या शाळेत पूर्ण झाले तर माध्यमिक शिक्षण मिशनच्या शाळेत व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील महाविद्यालयात पूर्ण झाले. नंतर त्यांनी काही दिवस शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पण टिळक, सावरकर, कर्वे, गांधीजी यांसारख्या स्वातंत्र्यसेनानींचा त्यांच्यावर लहानपणापासून प्रभाव असल्याने त्यांनी शिक्षकपदाचा त्याग केला व ते १९३० सालापासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी झाले. त्यात त्यांनी अनेक सत्याग्रह, आंदोलने, उपोषणे केली. त्यात त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. असेच एकदा नाशिकच्या तुरुंगात असताना ‘श्यामची आई’चा जन्म झाला! नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी श्यामच्या आईच्या छत्तीस रात्री लिहून काढल्या आणि ‘श्यामची आई’ या रूपाने मराठी भाषेला मोलाचा दागिना मिळाला.

     जगामध्ये अनेक लेखकांनी, कवींनी आपल्या आईबद्दल लिहिले आहे; अनेक कविता केल्या आहेत. परंतु मराठी भाषेत सानेगुरुजींनी ‘श्यामची आई’मध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवले आहे तसे अतीव मांगल्याने, माधुर्याने ओथंबलेले महाकाव्य दुसर्‍या कोणत्याही वाङ्मयात असेल असे वाटत नाही. मराठी भाषेत अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आहे असे ज्ञानेश्वर सांगतात. पण कोणाच्याही मुखातून अथवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच ना पैजा जिंकणार? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे तसेच ते गुरुजींच्या ‘श्यामची आई’मध्ये आहे. या दोन्ही काव्यात शुद्ध व निर्मळ बुद्धी आणि प्रेम तुडुंब भरून वाहत आहेत. अमृतदेखील अळणी पडेल अशी नितांतमधुर स्थळे या काव्यात अगदी हारोहारीने ठिकठिकाणी लागून राहिली आहेत. स्फूर्तीच्या, प्रसादाच्या आणि तन्मयतेच्या दिव्य अवस्थेत असे लेखन संभवते. पुन: पुन्हा असे लेखन होत नाही.

     मातेचे प्रेम हे सर्वात श्रेष्ठ प्रेम. ममतेची, वात्सल्याची ती गंगोत्रीच! इतर सर्व प्रेमांचा उगम हा मातेच्या प्रेमातून होत असतो. त्या लहान बालमनावर मातेच्या गर्भापासून संस्कार होण्यास सुरुवात झालेली असते. श्यामच्या आईलाही माहीत होते, की आपल्या मुलांवर संस्कार कसे करायचे ते! जसे चंद्रसूर्याच्या किरणांनी कमळे फुलत असतात, तशाच मातापित्यांच्या कृत्याने मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात. त्यामुळे श्यामच्या आईने श्यामच्या मनाला ठेच न पोचवता त्याच्यावर चांगले संस्कार केले.

     ‘मातेचे प्रेम’ हा हिंदू संस्कृतीचा वारसा आहे. देवाला माऊली म्हणायचे, देशाला माता म्हणायचे व धर्मग्रंथाला आई म्हणायचे, ही फक्त आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. ह्या प्रेममयी, त्यागमयी, सेवामयी संस्कृतीचे स्तन्य गुरुजींच्या मुखात घालून आपल्या मुलावर व प्रत्येक मुलाचे आपल्या आईवर अतोनात प्रेम असते. पण या मायलेकरांचे आपापसातील प्रेम म्हणजे अमर प्रेम होते. अनेक लेखक, कवी रक्ताचे पाणी करून आईची थोरवी लिहितात, पण गुरुजींनी हे पुस्तक आसवांनी लिहिले आहे. गहिवरलेल्या अंत:करणाला मोकळे करत असताना साक्षात सरस्वती त्यांच्या हातातून धो-धो वाहत होती. पाण्याच्या रूपेरी धारा कारंज्यातून जशा एकदम वर उसळाव्यात, तसे गुरुजींच्या अंत:करणात जन्मापासून हेलावत असलेले मातेचे प्रेम गोष्टींच्या रूपाने त्यांच्या मुखातून एकदम उसळून बाहेर पडले आहे. ते गोष्टी सांगताना सवंगड्यांना म्हणतात, “अरे, मी आज जो काय आहे तो माझ्या आईमुळे. तिच्या संस्कारांमुळे. आई माझा गुरू आहे. ती माझी कल्पतरू आहे.”

     आईने गुरुजींना गाईगुरांवर, फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला शिकवले. कोंड्याचा मांडा करुन कसा खावा व अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही आपले स्वत्व व सत्व न गमावता कसे राहवे याची शिकवणही त्यांना त्यांच्या आईने दिली. गुरुजींचा जीवनझरा शक्य तितका निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या आईने केला. अश्रूंचा गुरुमंत्र त्यांच्या आईने त्यांना दिला.

Sane_Guruji.jpg     आई एकदा श्यामला म्हणाली, “अरे, शरीराची मलीनता घालवण्यासाठी प्रयत्न केलास; तसेच मनाची मलीनता घालवण्यासाठी देवाकडे चांगली बुद्धी माग हो.” किती साधा, सरळ पण तितकाच मार्मिक विचार येथे मांडला आहे. मनाची मलीनता घालवण्यासाठीच परमेश्वराने अश्रुंचे हौद डोळ्यांजवळ सतत भरून ठेवले आहेत. पण त्यांची कोणाला आठवण आहे? एरवी, माणसे बारीकसारीक कारणांसाठी रडताना दिसतात पण मनाची मलीनता घालवण्यासाठी देवासमोर बसून रडणारे क्वचित आढळतात. ‘असवून जल सिंच सिंच प्रेमवेली बोई!’ हा, अश्रूंच्या पाण्याने मन शुद्ध करून त्याच्यात प्रेमाची व भक्तीची वेल वाढवण्याचा मीराबाईचा मंत्र गुरुजींना त्यांच्या आईने दिला. अश्रूंनी तुडूंब भरलेल्या ह्दयात भक्तीची कमळे फुलतात. आईने गुरुजींना आपल्या जीवनवेलीला ‘आत्मशुद्धीच्या आसवांचे शिंपण घालावया’ लहानपणापासूनच शिकवले. म्हणून तर देशभक्तीची व ईश्वरभक्तीची चंद्र-सूर्यासारखी दोन तेजस्वी फुले पुढे, मोठेपणी त्या वेलीवर उमलली.

     गुरुजींच्या आईने त्यांच्या जीवनात आचारांचे, विचारांचे सौंदर्य निर्माण केले. त्यांच्या आईने त्यांच्या ह्दयात हळुवार भावनांचे मनोहारी काव्य ओतले. गुरुजींनी त्यांच्या वडिलांपासून फुलांचे वेड घेतले. पण गुरुजींना त्यांच्या आईने फुलांवर प्रेम करायला शिकवले. फुलांच्या कळ्या झाडावरून तोडू नयेत. त्यांना झाडांवर नीट फुलू द्यावे. झाडे ह्या त्यांच्या माता आहेत. त्या आपल्या मुक्या कळ्यांना जीवनरस पाजून फुलवतात. अशा वेळी आपण आधीच कळ्या तोडल्या तर झाडांना वाईट वाटते. अशा कितीतरी काव्यमय गोष्टी त्यांना त्यांच्या आईने शिकवल्या.

     त्यांनी आईकडूनच निसर्गावर प्रेम करण्याची दीक्षा घेतली. निसर्ग ही आपली माता आहे. तिच्यामुळे सार्‍या लेकरांचे भरणपोषण होत आहे. अशा मातेला मोटारीत बसून प्रवास करताना भर्रकन पाहण्यात काय अर्थ? त्यापेक्षा बैलगाडीतून प्रवास करावा. तिच्याजवळ सेकंदभर थांबावे. तिच्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत-घेत जीवन जगावे. या सृष्टीच्या महान संगीतसिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा! हे प्रेमाच्या अद्वैताचे तत्त्वज्ञान गुरुजींना त्यांच्या आईने समजावून सांगितले. गुरुजींना मातेच्या अंत:करणामधूनच सृष्टीचे अंतिम स्वरूप हे प्रेम आहे, युद्ध नाही हा बोध झाला. चोर, डाकू लोक चोरी करतात. खून, लुटालूट करतात. पण त्या कृत्यांच्या मूळाशी प्रेम ही एकच भावना असते.त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची लागलेली तळमळ ही एकच भावना त्या कृत्यांच्या मुळाशी असते. पण त्यांचे प्रेम मिळवण्याचे मार्ग मात्र चुकीचे आहेत. अशा लोकांचे परिवर्तन प्रेमानेच करता येते. माणूस अन्नावाचून जिवंत राहील पण प्रेमावाचून राहू शकत नाही. प्रेम हे जास्तीत जास्त द्यावे. ते दुप्पट होऊन आपोआप आपल्याकडे येते, असा मोठा मथितार्थ दडलेली गोष्ट त्यांनी सहज शब्दांत त्यांना समजावून सांगितली. त्यातूनच गुरुजींच्या जीवनात निरहंकाराचा, प्रेमाचा, सदाचाराचा, ईश्वर व मातृभक्ती यांच्या कस्तुरीचा सुगंध दरवळला. गुरुजींना आईने नि:स्वार्थी सेवेचे अन् आत्मसमर्पणाचे धडेही दिले. त्यांची आई त्यांना म्हणे, “अरे श्याम, आपण या जगात असे किती दिवस राहणार आहोत? दोन दिवस तर या जगात राहायचे आहे. या दोन दिवसांत आपल्याला जेवढे काही करता येईल तेवढे करावे. वाटेतला काटा बाजूला करावा, दगड बाजूला करावा, फुलझाड लावावे, आपल्याकडील जे काही असेल ते दुसर्‍यास द्यावे, नेहमी खरे बोलावे, दुसर्‍याचे कष्ट कमी करावेत, रडणार्‍याचे अश्रू पुसावेत, आजार्‍याजवळ बसावे, दुसर्‍याशी नेहमी गोड बोलावे.” गुरुजींच्या आईजवळ जगाला सुधारून सुखी करायचे इतके सोपे आणि साधे तत्त्वज्ञान होते. त्यांच्या आईने त्यांच्या मनात प्रेमाची भूक निर्माण केली.

     त्यांच्या आईने त्यांना प्रेमाची शिकवण दिली; तशीच, त्यांना स्वाभिमानाची, स्वावलंबनाची, स्वातंत्र्याची, देशभक्तीची, समानतेची शिकवण दिली. मानवपूजा ही ईश्वरपूजा आहे. ईश्वराच्या पूजेसाठी अवाढव्य बाह्योपचारांची गरज नसते. मनातून निघालेली तळमळीची आच पुरेशी असते. प्रत्येक मानवामध्ये ईश्वराचा अंश आहे म्हणून माणुसकी जपणे ही ईश्वरभक्ती आहे. यातूनच मोठेपणी गुरुजींनी सर्व लोकांची मनोभावे सेवा केली. त्यांनी मुंगी, किडा, झाडे, पशू या सर्वांवर मनोभावे प्रेम केले. आजच्या बदलत्या, धावपळीच्या युगात सगळी माणसे धावत असतात. कोणालाही कोणासाठी वेळ नसतो. प्रत्येक माणूस स्वत:च्या फायद्यासाठी धडपडत असतो. देशाचा विचारही कोणी करत नसतो. भारताला महासत्ता बनवण्याचे सामर्थ्य युवाशक्तीमध्ये आहे. पण आजची पिढी मात्र करमणुकीच्या साधनांच्या गटारगंगेत लोळत आहे. आज आपण बघतो, की आपण आपल्या वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतो. त्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केलेले असते. त्यांना आधाराच्या काळात आपण आधार देण्याचे टाळतो. ही स्थिती बदलण्याची शक्ती ‘श्यामच्या आई’मध्ये आहे. ही आई भारताच्या मुलाबाळांची ‘अमर गीताई’ आहे. मानवी जीवनातल्या सद्गुणांची, सौंदर्याची अन् मांगल्याची जणू काही ती खाण आहे.

     गुरुजींनी त्याना जो काही संस्काराचा ठेवा मिळाला तो ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या  रूपाने खुला केला. गुरुजींची माता ही फक्त गुरुजींची न राहता सार्‍या देशाची माता झाली आहे. त्यांनी दिलेला तो चैतन्याचा पान्हा अनेक लोक त्याच्या मुलांना अनंत काळापर्यंत पाजल्याशिवाय राहणार नाही आणि नंतरच, आपल्याला उज्जवल भारताचे चित्र पाहता येईल.

साने गुरूजी यांचेश्‍यामची आईहे पुस्‍तक वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

–    रश्मी भिडे
अकरावी कला – अ

About Post Author