श्यामची आई आणि आजची मुले

0
60

साने गुरुजीचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक म्हणजे मातृप्रेमाचे महान्मंगल स्तोत्र आहे असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. श्याम या शाळकरी मुलाच्या भूमिकेतून छोट्या कथा अन् प्रसंग साने गुरुजींनी लिहिले. एका छोट्या गावात संध्याकाळी श्याम आपल्या मित्रांना आपल्या आईविषयीच्या कथा सांगतो, अशी सर्व प्रसंगाची रचना आहे. कोमल हृदयाचा, भाबडा मुलगा आपल्या आईविषयी सांगतो तेव्हा त्याचा कंठ भरून येतो, डोळ्यांत अश्रू दाटतात व ऐकणार्‍या मुलांचीही तशीच स्थिती होते.
 

आज साठीच्या वयात असलेल्यांनी साने गुरुजींना पाहिले आहे, ऐकले आहे. ना.ग.गोरे, एस. एम.जोशी, प्रकाशभाई मोहाडीकर, वसंत बापट, निळू फुले व सेवादलातील सर्वच जण साने गुरुजींची वेडी मुले होती, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सारी उदात्त तत्त्वे गुरुजींच्या आचरणातून, कथांतून त्या पिढीत उतरली. ती सर्व मंडळी स्वातंत्र्याच्या चळवळीत तर होतीच; शिवाय शिक्षण, कला, साहित्य, समाजकारणात यशस्वी ठरली. मात्र ती सर्वजण साने गुरुजींची ‘मुले’च होती.
 

आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ चित्रपट काढला व त्यास चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान अर्थात सुवर्ण कमल मिळाले.

‘ग्रंथाली वाचक दिना’निमित्त या वर्षी ‘श्यामची आई’ हेच सूत्र घेतले आहे!

‘श्यामची आई’ हा साहित्यातील अमोल ठेवा मानला जातो. पुस्‍तक प्रसिद्ध झाले त्यानंतर पन्नास वर्षे पुस्तकाने सुशिक्षित मनावर राज्य केले. लोक जेव्हा हे पुस्तक वाचत, तेव्हा ते अक्षरश: रडत असत, एखादे पुस्तक वाचता दोन-तीन पिढ्या भारावल्या गेल्या, असे या पुस्तकात आहे तरी काय? साने गुरुजी स्वातंत्र्य चळवळीत असताना, सत्याग्रह केल्यामुळे तुरुंगात गेले व तिथे त्यांनी हे पुस्तक लिहिले. पुस्तक 1935साली प्रकाशित झाले. ‘श्यामची आई’स पंच्याहत्तर वर्षे झाली.
 

उपक्रम पाचवी ते सातवीतील मुलांसाठी आहे. प्रत्येक शाळेने पाच मुले निवडून पाठवायची आहेत. प्रत्येक शाळेकडे ‘श्यामची आई’ हे पुस्तक आहेच, पण प्रत्येक मुलाला कायमचे व स्वत:चे राहवे म्हणून पाच पुस्तके प्रत्येक शाळेस दिली आहेत. शिक्षकांनी मुले निवडून ही पुस्तके त्यांना देऊन टाकावीत, व पुन्हा परत घेऊ नये. उपक्रमाची आठवण प्रत्येक मुलामुली जवळ राहील.

उपक्रमाचे दोन भाग आहेत.

  1. ‘श्यामची आई’ पुस्तकातील कोणताही प्रसंग सात ते आठ मिनिटांत त्या दिवशी रंगमंचावर सादर करायचा. शक्यतो पाचच मुले त्यात असावीत. पोशाख, मेकअपची व्यवस्था नाही व आवश्यकताही नाही. मुलांनी गणवेशातच कार्यक्रम सादर करावा अशी अपेक्षा आहे.
  2. प्रसंग सादर करून झाल्यावर दुसर्‍या शाळेतील मुले, ‘श्यामची आई’ पुस्तकावर आधारित दोन प्रश्न सादरकर्त्या मुला-मुलींना विचारतील; त्यांची त्वरित उत्तरे त्यांनी द्यायची आहेत. प्रत्येक शाळा अशा ‘रॅपिड फायर’ पद्धतीच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने मूळ पुस्तक नीट वाचणे गरजेचे आहे.

ठाण्यातील अविनाश बर्वे आणि श्रीधर गांगल हे दोघे गेली बारा वर्षे मुलांसाठी असे अभिनव कार्यक्रम योजत असतात. त्यांचा ध्यास मुलांमध्ये वाचनवृत्ती वाढावी हा आहे. त्यामुळे ‘ग्रंथाली’च्या वाचकदिनाची (25डिसेंबर) संकल्पना उचलून त्यांनी ठाण्यातील वाचकदिन आयोजण्यास 1998 सालांपासून सुरुवात केली. त्यामध्ये वाचनाविषयी टॉक शो, धर्म आणि अध्यात्म व अभिजात कला यांचा संबंध (गंगावतरण), एक पुस्तक दोन पिढ्या, ठाण्यातील बालकवी, मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांच्या शोध, म्हणींचिया खाणी, चित्रकला, ग्रंथमैत्री, कवितेचं आकलन, ‘आमचा बाप’ चे नाट्यरुपांतर, लहान तरी महान (‘ग्रंथाली’-‘ज्ञानयज्ञा’तील पुस्तके), शोधांच्या गोष्टी नाट्यरूपात असे मुलांचा स्पर्धात्मक सहभाग असलेले कल्पक कार्यक्रम योजले. त्यामध्ये दरवर्षी सर्वसाधारणपणे पंचवीस शाळांतील मुले सहभागी होतात. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर हे दोन महिने ठाण्याच्या शाळांमधील ध्येयप्रेरित शिक्षकांसाठी बरेच औत्सुक्याचे व उत्साहाचे असतात. बर्वे व श्रीधर गांगल तळमळीने काम करत असतात. त्यामुळे त्यांना शाळा संचालकांचे, मुख्याध्यापकांचे, ठाणे ग्रंथसंग्रहालयाचे सहकार्य लाभत असते. खरेतर ही वाचन चळवळ सर्व महाराष्ट्रभर पसरण्याची गरज आहे. परंतु सध्याचा जमाना एकांड्या व स्थानिक प्रयत्नांचा आहे. त्यापासून प्रेरित होऊन व्यापक आंदोलन उभे राहिले असे घडताना दिसत नाही.

यंदा साने गुरुजींच्या ‘श्यामच्या आई’ या पुस्तकाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्यामुळे ते पुस्तक समाजाच्या लक्षात पुन्हा आणून देण्याचे काही उपक्रम होत आहेत. त्यामधील बर्वे-गांगल यांचा हा प्रयत्न विशेष लक्षणीय म्हणावा लागेल.
 

प्रतिनिधी – thinkm2010@gmail.com

ग्रंथाली वाचक दिनाचे ठाणे येथील कार्यक्रम दरवर्षी गाजतात व शाळाशाळांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होते. येथे सादर केली आहेत ती गेल्या काही वर्षांच्या कार्यक्रमांची दृश्ये.

About Post Author