शेतीतील कष्ट स्त्रियांचे, श्रेय लाटले मात्र पुरुषांनी!

-carasole-image

‘शेतीची सुरुवात मानवी संस्कृतीत महिलांनी केली. पुरुष शिकारीसाठी बाहेर जात, त्या वेळी महिलांनी स्थानिक पर्यावरणातून बिया गोळा केल्या. त्या लावल्या आणि त्यांची वाढ करण्यास सुरुवात केली. त्यांनीच त्यामधून शेतीविज्ञान विकसित केले. जगभर शेतात काम करणाऱ्यांमध्ये महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे’… प्रसिद्ध शेतीतज्ज्ञ स्वामिनाथन यांनी ही मते ठामपणे व वेळोवेळी मांडली आहेत. शेतीची सुरुवात महिलांनी केली असे जगभरही मानले जाते. चीनमध्ये त्यांच्या एका सणाला मुलीच्या डोक्यावर धान्य उगवलेली टोपली देऊन तिची पूजा केली जाते. त्या विधीचे कारण हेच, की शेती महिलांनी सुरू केली. पुरुष घराबाहेर पडले, की. महिलांकडून घरातील कामे उरकून फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून शेती सुरू झाली.

शेतीचा इतिहास हा बारा हजार वर्षांचा आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या अन्नधान्यांची भर पडत गेली. कॉफीचा इतिहास दीड सहस्रकाचा आहे आणि सोयाबीन वनस्पतीचे महत्त्व तर दीडशे वर्षांपूर्वी कळून आले. शेतीसाठी शेतकरी हा पुरुषवाचक शब्द रूढ आहे, जणू शेती पुरुष करतात! वस्तुस्थिती मात्र उलट आहे. शेती महिला करतात आणि प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर गावाच्या बाहेर, वेशीजवळ आढळते. मंदिरात शेतात काम करणाऱ्या अनेक महिलांचे पतिराज असतात आणि त्यांच्या हातात पत्ते असतात! ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील स्थिती आहे. घरातील लक्ष्मी मात्र शेतात राबत लक्ष्मी घरात कशी येईल यासाठी प्रयत्नशील असते. अशी परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभर आहे.

विकसित कृषिक्षेत्रामध्ये केवळ जमिनीवरील शेती समाविष्ट होत नाही. अन्न आणि कृषी संस्था या जागतिक संघटनेने त्या क्षेत्रात प्रत्यक्ष जमिनीवर केली जाणारी शेती, मत्स्यशेती, मधुमक्षिकापालन, रेशीमशेती, कुक्कुटपालन, पशुपालन अशा शेती आणि शेतीपूरक सर्व व्यवसायांचा त्या क्षेत्रात समावेश केला आहे.

-mahila-shetiमानव आणि निसर्गातील अनेक जीव शेतीक्षेत्रातील उत्पादनांवर जिवंत आहेत. त्या क्षेत्राचे कार्य कसे होते त्यावरच जगातील शांतता व सौख्य अवलंबून राहणार आहे. औद्योगिक उत्पादन भलेही देशाचे आर्थिक स्थान निश्चित करो. शेतीक्षेत्राने चांगले कार्य केले तरच राष्ट्र स्वावलंबी राहू शकते. शेतीक्षेत्र हे ग्रामीण भागाच्या आणि देशाच्या आर्थिक विकासाचे मुख्य सूत्रधार आहे. ती किल्ली महिलांच्या हाती आहे. जागतिक पातळीवर त्रेचाळीस टक्के महिला या कृषिक्षेत्रात कष्ट करताना दिसतात. त्यांचे जगणे त्या कामावर अवलंबून असते. काही देशांत ते प्रमाण त्र्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आफ्रिका, भारत या प्रदेशांमध्ये सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त शेतीउत्पादन हे छोट्या शेतकऱ्यांकडून होते. त्यामध्ये महिलांचा वाटा हा मोठा आहे. भारतात ग्रामीण भागातील चौऱ्याऐंशी टक्के महिलांचे जगणे शेतीवर अवलंबून आहे. त्यातील साधारण सत्तेचाळीस टक्के महिला या कामगार म्हणून शेतात काम करतात, तर तेहतीस टक्के महिला या स्वत:च्या निर्णयानुसार शेती करतात. उरलेल्या तीन-चार टक्के महिला या अन्य प्रकारे त्या क्षेत्राशी संबधित काम करतात – जसे की कुटिरोद्योग किंवा पूरक उद्योग यांमध्ये कार्य करत असतात.

निर्देशित आकडेवारीमध्ये मासेमारीसारख्या उद्योगाचा समावेश नाही. मत्स्यशेतीमध्येदेखील महिलांचा वाटा हा चोवीस टक्के इतका आहे. जागतिक पातळीवर ते प्रमाण २१.४ टक्के इतके आहे. भारतात २००९ च्या पाहणीनुसार एकूण महिलांचा सहभाग अन्नधान्य उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये चौऱ्याण्णव टक्के इतका होता, तर १.४ टक्के महिला भाजीपाला उत्पादनासाठी कष्ट घेत होत्या. एकूण महिलांपैकी ३.४ टक्के महिला फळे आणि कडधान्य शेतीत कार्यरत होत्या. चहा, कापूस, तेलबिया इत्यादींच्या शेतांमध्ये जागतिक पातळीवर काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण हे पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. साधारणत:, महिलांना शेतांमध्ये अकुशल कामगाराचे काम देण्यात येते. उदाहरणार्थ गवार, भेंडी, वांगी अशा भाज्यांची तोडणी ही पूर्णपणे महिलांकडून होते. तेथे पुरूषांचा हात कोठेही दिसत नाही. चहाची पाने तोडणे, कॉफीच्या बिया गोळा करणे अशी कष्टाची कामे महिलाच करत असतात.ते काम मोठ्या कष्टाचे असते.

शेतीची आणि शेतीपूरक व्यवसायाची मालकी मात्र महिलांकडे नाही. ती मालकी महिलांकडे राहवी यासाठी काही देशांनी त्यांच्या कायद्यात बदल केले आहेत. विशेषत: दक्षिण आफ्रिकी देशांनी तसे कायदे करून महिलांना शेती आणि व्यवसाय यांची मालकी देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. महिलांची शेतीक्षेत्रातील भूमिका ही कष्टकऱ्यांची आहे, कामगारांची आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत अपवादानेच स्थान मिळते. त्यांच्या विचारांची दखल घेतली जात नाही. त्यांची भूमिका ही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापुरती मर्यादित असते.

शेती व्यवसायात असणाऱ्या महिलांमधील सत्तर टक्के महिला अल्पशिक्षित किंवा अशिक्षित आहेत. त्यांना कमी शिक्षणामुळे कौशल्याधारित कामाच्या प्रांतात प्रवेश नाकारला जातो. त्याचा परिणाम महिला आणि पुरुष यांच्या वेतनदरावर पडतो. शासनाचे नियम महिला आणि पुरुष यांना समान वेतन द्यावे असे असले तरी ग्रामीण भागात महिला आणि पुरुष यांच्या दरांमध्ये तफावत आढळून येते. काही ठिकाणी, ते दर दुप्पट असतात. कामाच्या तासांत मात्र समानता असते किंवा अनेकदा महिलांचे कामाचे तास जास्त असतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना दिली जाणारी मजुरी सत्तर टक्के आहे. ते क्षेत्र असंघटित असल्याने महिलांच्या मजुरीच्या दराबाबत ग्रामीण भागात फरक पडलेला दिसून येत नाही. 

-mahila-sheti-जगभरात, सर्वसाधारणपणे, लग्नानंतर महिला या  घरी राहण्यास येतात. काही देशांमध्ये, त्यांना लग्नानंतर स्वतंत्र घरे करावी लागतात. पुरुषांची जी आर्थिक परिस्थिती आहे तिच्याशी महिलांना जुळवून घ्यावे लागते. शेती आणि घरे हे पुरुषांच्या नावावर असतात. त्यामुळे पुरुषी अहंकारातून त्यांना कौटुंबिक हिंसाचाराचाही सामना करावा लागतो. अशी, कोणतीही संपत्ती नावावर नसलेल्या महिलांपैकी चौऱ्याऐंशी टक्के महिलांना अपमानास्पद वागणूक मिळते, तर एकोणपन्नास टक्के महिलांच्याबाबत मारहाणीच्या घटना घडतात. तेच, ज्या महिलांच्या नावावर संपत्ती आहे त्यांतील चौदा टक्के महिलांना अपमानास्पद वागणूक मिळते आणि केवळ सात टक्के महिलांना घरगुती मारहाणीस सामोरे जावे लागते.

महिला या पारंपरिक शेतीपद्धतीचा पुरस्कार करतात. हरित क्रांतीनंतर रासायनिक खते आणि संकरित बियाणे यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रयत्नातून तयार झालेले बियाणे जगभर वापरले जाऊ लागले. त्यासाठी आवश्यक असणारे पाणी आणि खत यांचा वापर गरजेपुरता होणे आवश्यक होते. त्याचे सुयोग्य ज्ञान न घेता, अधिक खते आणि अधिक पाणी हेच सूत्र वापरले जाऊ लागले. परिणामी, पंजाबसारख्या प्रांतात जास्तीत जास्त पाणी मिळवण्याकरता बोअरवेल मोठ्या प्रमाणात खोदल्या गेल्या. बोअर अधिक खोल गेल्यावर मिळणारे अतिक्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरले जात होते. खतांचा अतिरिक्त मारा आणि अतिक्षारयुक्त पाणी यांच्या परिणामाचे दृश्य स्वरूप सर्वांसमोर येऊ लागले आहे. महाराष्ट्रात तीच परिस्थिती थोड्याफार प्रमाणात उद्भवली आहे. त्यांतील महत्त्वाचा भाग आहे तो बियाण्यांचा. हरित क्रांतीच्या ओघात देशी वाण जवळपास नष्ट झालेले आहे. ग्रामीण भागातील महिलांनीच संकरित वाणांचा धोका प्रथम ओळखला. त्यांनी त्याबाबत जागरूकता दाखवत देशी वाण जतन करणे, वाढवणे आणि वितरीत करणे आरंभले आहे. त्यांनी त्या त्या पीकाच्या वाणाच्या जनुकीय पेढी तयार केल्या आहेत. राहीबाई पोपेरे यांच्यासारख्या आदिवासी महिलेने स्वत:ची देशी बियाण्यांची बँक तयार केली, वाढवली आणि ती त्या भागात चळवळ म्हणून रूजू लागली आहे!

महिलांचे जास्त प्रमाण शेतीपूरक व्यवसायातही आहे. कुक्कुटपालन हा महत्त्वाचा व्यवसाय. तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर छोट्या आणि घरगुती स्वरूपात चालतो. अनेक खेड्यांत बहुतांश घरांत कोंबड्या पाळल्या जातात. त्या कोंबड्यांचे पालनपोषण, अंडी गोळा करणे आणि विक्री करणे हे संपूर्ण काम महिला करतात. त्यातून मिळणारे उत्पन्न महिलांच्या वैयक्तिक आर्थिक गरजा भागवण्याइतके आहे. पिल्लांची निर्मितीही घरगुती व्यवसायात काही वर्षांपूर्वीपर्यंत होत असे. मधुमक्षिकापालन हा दुसरा पूरक व्यवसाय म्हणून काही शेतकरी करतात. त्या व्यवसायात महिलांचे प्रमाण कमी आहे. मासेमारी व रेशीम शेतीमध्येही महिला मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. कष्टाची कामे, अकुशल कामे महिला करत असल्याने त्यांच्या वाट्याला शेती उत्पादन येते. पशुपालन व्यवसायात जनावरांना खुराक देणे, त्यांना पाणी पाजणे, त्यांची स्वच्छता करणे, दूध काढणे ही कामे महिलांकडून केली जातात. दूध संकलन केंद्रावर पोचवण्यात मात्र पुरुष पुढे असतात. त्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न पुरुषांच्या खिशात जाते! कष्ट करणाऱ्या महिलांकडे उत्पन्न अपवादानेच जाते. शेती क्षेत्र महिलांचे आहे, मात्र तेथे महिला उपेक्षित आहेत!

 
– व्ही.एन. शिंदे 9673784400
vilasshindevs44@gmail.com 
 

About Post Author

1 COMMENT

  1. आपण जो लेख लिहिला आहे तो तो…
    आपण जो लेख लिहिला आहे तो वास्तवाला धरून आहे. त्याचे श्रेय स्त्रियांना मिळाले पाहिजे.

Comments are closed.