शेतकरी आणि क्रांती – प्रतिक्रांती

1
48
_ShetkariAni_krantiPratikranti_1.jpg

भारतामध्ये क्रांतिकारी शक्यता व्यक्त झाल्या, त्यांची प्रारूपे दिसू लागली, याचे नमुनेदार उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांची संघटित कृती हे आहे. शेतकरी वर्गामध्ये शोषणाविरुध्दचे बंड स्वातंत्रपूर्व काळापासून सुरू आहे. त्या बंडाची सुरुवात संघटनात्मक पातळीवर अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांमध्ये झाली. त्या चळवळीने शेतकरी वर्गामध्ये शोषणाविरुद्ध संघटन सुरू केले. त्या बंडाचे नेते स्वामी सहजानंद सरस्वती (अध्यक्ष) आणि एन. जी. रंगा (महासचिव) होते. त्या संघटनाचे नेते क्रांतिकारी होते. आचार्य नरेंद्र देव, राहुल सांकृत्यायन, मुझफर अहमद, ए. के. गोपालन, बिनय कृष्ण चौधरी, हरकिशन सिंह, सुरजित, एस रामचंद्र पिले, अमर राम इत्यादी. अशी नावे त्यांच्या बरोबर होती. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्या बंडामध्ये राष्ट्रीय पातळीवर क्रांतिसिंह नाना पाटील, गोदावरी परुळेकर व अशोक ढवळे या तीन मराठी नेत्यांनी किसान सभेचे नेतृत्व केले. त्यांनी शेतकरी वर्गाला शोषणाच्या विरुद्ध संघटित केले. किसान सभेची महाराष्ट्राशी संबंधित तीन महत्त्वाची बंडे आहेत. ती सामुहिकपणे लढवली गेली. त्या बंडानी सरकार, राज्यसंस्था आणि धोरणनिर्माते यांच्यापुढे आव्हान निर्माण केले. शिवाय, त्यांच्या बंडामध्ये पर्यायी धोरणाची संकल्पना दिसते; तसेच, वंचितापासून विकासाची सुरुवात करण्याचा दावा दिसतो. अखिल भारतीय किसान सभा ही संघटना शेतकरी वर्गामध्ये क्रांतिकारी बदल करण्यासाठी 1936 पासून प्रयत्न करत आहे. त्या संघटनेने शेतकऱ्यांची बंडे घडवून आणली आहेत. सभेची स्थापना लखनौमध्ये झाली. संघटनेच्या शाखा व सभासद पंचवीस राज्यांत कृतिशील आहेत. संघटनेचे दीड कोटींहून अधिक सभासद आहेत असा दावा केला जातो. संघटना छोटे शेतकरी, सीमांत शेतकरी, शेतमजूर-कामगार अशा वर्गामध्ये कृतिशील आहे. ती सरंजामी वृत्तीच्या विरुद्ध बंड करते. संघटनेने शेतकरी वर्गातील वंचित समूहाचे अधिकार ऐरणीवर आणले. त्यामुळे त्यांचे बंड श्रीमंत शेतकऱ्यांच्या विरुद्धदेखील आहे. त्या बरोबर संघटनेचे बंड राज्यसंस्था, सरकार आणि धोरणकर्ते यांच्यादेखील विरुद्ध स्वरूपाचे झाले आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डहाणू येथील तेराव्या अधिवेशनात 1955 साली झाले. पाटील यांनी त्याआधी प्रतिसरकारची स्थापना केली होती. त्यांचे प्रतिसरकार अन्नधान्य पुरवठा आणि बाजारव्यवस्था अशी, शेतीशी संबंधित लोकोपयोगी कामे करत होते. त्यांनी समांतर शासन आणि कारभार (आपला कारभार आपण करू!) या दोन्ही क्षेत्रांत शेतकरी म्हणून क्रांती केली होती. त्यांनी किसान सभेचे कार्य वंचित व शोषित शेतकरीवर्गाच्या हक्कांसाठी केले. त्यांचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर दूरगामी झाला. शिवाय, त्यांच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे प्रारूप किसान सभेच्या मदतीने भारतभर गेले.

शेतकरी वर्ग राज्यसंस्थेच्या विरुद्ध ऐंशीच्या दशकाच्या आधीपासून गेला. त्यामुळे शेतकरी वर्गाचे संघटन सुरू झाले. शेतकरी संघटना ते काम करत होती. तेव्हा गोदावरी परुळेकर यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय नेता म्हणून काम केले. त्यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 1983 साली पाटण्याच्या अखिल भारतीय किसान सभेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात झाली होती. त्यांनी आदिवासी शेतकरी वर्गात क्रांती घडवली होती. त्यांचे ‘जेव्हा माणूस जागा झाला’ हे पुस्तक डहाणू भागातील आदिवासींविषयक आहे. पुस्तकाच्या नावामध्ये क्रांतीची संकल्पना दिसते. आदिवासी- वारलींच्या जमिनी ठाणे जिल्ह्यात होत्या. भारतात वसाहतींची राज्यसंस्था आल्यानंतर उद्योजकांनी जमिनी खरेदी केल्या. बाहेरून आलेले लोक जमीनदार झाले आणि स्थानिक वारली लोक मूळच्या त्यांच्याच शेतात मजूर झाले! जमीनदारांनी वारली मजुरांना मारहाण केली. किसान सभेने त्या विरुद्ध बंड केले. त्यांचे नेतृत्व गोदावरी परुळेकर यांनी केले. त्या आंदोलनास त्यांनी सर्वसमावेशक स्वरूप दिले. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अन्याय, पितृसत्ताक समान व्यवस्था असे प्रश्न हाती घेतले.

त्याच किसान सभेने लाँग मार्च 6 मार्च 2018 रोजी नाशिक येथून काढला. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी वगैरे मागण्या त्या चळवळीमध्ये केल्या गेल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे उदासीन आहेत अशी प्रतिक्रिया मोर्च्यामध्ये उमटली होती. शेतकरी वर्गाचे हितसंबंध 2014 पासूनची राज्यसंस्था जपत नाही. त्यामुळे त्या मोर्च्यात राज्यसंस्थेविरुद्धच्या बंडाची वस्तुस्थिती दिसत होती. लाँग मार्चसोबत चर्चा गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री) करत होते (महाराष्ट्र टाइम्स 11 मार्च 2018). त्यांचा प्रयत्न बंडाची धार कमी करण्याचा होता. या दरम्यान महाराष्ट्रात विविध बंडे होत आहेत. उदाहरणार्थ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, किसान आंदोलन, भूमिपुत्र शेतकरी संघटना (जळगाव), जनमंच (नागपूर), किसान अधिकार अभियान (वर्धा), अन्नदाता शेतकरी संघटना, बळीराजा चेतना परिषद इत्यादी. पवनारच्या धाम नदीवर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय मुख्य होता. सरकार आत्महत्या थांबवण्यासाठी धोरण निश्चित करत नाही, अशी आंदोलनाची मुख्य टीका आहे. अमर हबीब यांनी सरकारच्या असंवेदनशीलतेवर ‘सरकारची कातडी गेंड्याची नाही तर मार्बलची आहे’ अशी टीका केली.

महाराष्ट्रात महात्मा फुले यांनी शेतकरी वर्गामध्ये क्रांतिकारी विचार प्रथम पसरवला. त्यांनी शिवाजी महाराजांचे प्रतीक शेतकरी किंवा कुणबी राजा असे मांडले. त्यांनी त्या प्रतीकाबरोबर कुणबी राज्यकर्ता वर्ग म्हणून कल्पिला. त्यामुळे शेतकरी वर्गात राजकीय अधिकाराची क्रांती सुरू झाली. त्या प्रतीकाचा किंवा मिथकाचा परिणाम महाराष्ट्रावर पडला आहे. परंतु त्याबरोबरच प्रतिक्रांतीचा आशयदेखील या प्रतीकावर प्रक्षिप्त केला गेला. त्यामुळे वस्तुस्थितीतील शेतकरीसमूह क्रांती आणि प्रतिक्रांती अशा दोन्ही प्रतीकांचा उपयोग कौशल्यपूर्ण पद्धतीने करत आहे. चळवळीमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा क्रांतिकारी शेतकरी राजा अशी आहे.

महात्मा फुले यांनी बळीराजाची संकल्पना मांडली. बळीराजाची संकल्पना हादेखील शेतकरी वर्गाचा राजकीय युटोपिया दिसतो. त्या संकल्पनेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आहे. बळीराजा ही संकल्पना क्रांतीशी जोडली गेली आहे. क्रांतीशी जोडलेल्या या दोन प्रतीकांमधून शेतकरी वर्गाला संघर्षाची ताकद मिळते. तसेच, त्या दोन्ही प्रतीकांमध्ये शेतकरी वर्ग क्रांतिकारी अर्थ शोधतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा जनता राजा किंवा बळीराजा अशी मिथके शेतकरी वर्ग व संघटना वापरत असतात. त्याचा अर्थ त्यांना क्रांतिकारी कृती असा व्यक्त करायचा असतो. ती प्रतीके शोषणाविरुद्धच्या लढ्याची प्रतीके बनली आहेत. शेतकरी वर्ग त्या प्रतीकांचा वापर  राजकीय आणि बौद्धिक हक्काची प्रतीके म्हणूनही करतो. त्या दोन्ही प्रतीकांमध्ये शेतकरी मुक्तीचा विचार मांडण्याची परंपरा प्रबोधन युगापासून सुरू झाली. ती परंपरा समकालीन दशकात जास्त संघर्षशील झाली आहे. त्यांचा संबंध मानवी हक्कांशी जोडला जात आहे.

बाबा आढाव हेदेखील 2017 मध्ये आंदोलन करत होते. शेतमालाला हमी भाव मिळावा, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा. सात बारा कोरा मिळावा. तसेच, पेन्शन मिळावी, अशा मागण्या बाबा आढाव यांनी केल्या आहेत.
(शेती प्रगती मासिक, एप्रिल 2018 वरून उद्धृत, संस्कारित व संक्षिप्त)

– प्रकाश पवार

About Post Author

1 COMMENT

  1. आम्ही सर्व तरुणांनी मिळून एक…
    आम्ही सर्व तरुणांनी मिळून एक संघटना उभी केली आहे अखिल भारतीय शेतकरी जनजागृती संघटना. संघटनेचे रजिस्ट्रेशन करायचे आहे काय करावे ते सुचवा धन्यवाद.

Comments are closed.