हिंदू धर्मामध्ये गाईला महत्त्वाचे स्थान आहे. तिला कामधेनू असेही म्हणतात. कारण भारतात तिच्या प्रत्येक अंशाचा उपयोग केला जाई. आयुर्वेदात गाईचे शेण, गोमूत्र, दूध, दही व तूप यांमध्ये औषधी गुण असल्याचे सांगितले आहे. गाईच्या पंचगव्याचा उपयोग धार्मिक विधींमध्ये केला जातो. तसेच, अग्निहोत्रासाठी गोमयापासून (शेण) बनवलेल्या शेण्यांना (गोवऱ्या) जास्त मागणी असे.
शेणी बनवण्याची पद्धत सोपी आहे- त्या शेणापासून बनवल्या गेल्या म्हणून शेणी. शेणी बनवण्यासाठी गाय व बैल यांची विष्ठा वापरली जाते. त्या विष्ठेलाच शेण म्हटले जाते. शेणामध्ये भाताच्या गवताचा भुसा मिसळला जातो, नंतर त्यात पाणी मिसळून पायाने किंवा हाताने मळले जाते. मळलेल्या शेणाचे गोळे बनवले जातात. ते गोळे मोकळ्या जागेत भाकरीपेक्षा जरा मोठ्या आकारात थापले जातात. त्या शेणाच्या भाकऱ्यांनाच शेणी (गोवऱ्या) असे म्हणतात. शेणींना वाळवी लागू नये किंवा त्यांना मुंग्या लागून त्यांची माती होऊ नये म्हणून जमिनीवर चुलीत जाळलेल्या लाकडांची राख पसरवली जाते. त्या नैसर्गिकरीत्या उन्हामध्ये वाळवल्या जातात. गाई-बैल, म्हशी चरताना माळरानावर शेण टाकले जाते. ते तेथेच वाळते. ते शेणदेखील इंधनासाठी गोळा केले जाते. त्यांना ‘रानगोवऱ्या’ असे म्हणतात. शेण्या माचावर रचून ठेवल्या जातात. माच म्हणजे वाळवलेल्या शेण्यांना वाळवी लागू नये म्हणून जमिनीपासून एक फुटाच्या उंचीवर चार बाजूंना दगड लावून त्यावर आडवी-उभी लाकडे टाकून केलेले मचाण.
शेण्यांना आध्यात्मिक महत्त्व आहे. गाईच्या शेणापासून बनवलेल्या शेण्या हिंदूंच्या धार्मिक कार्यात वापरल्या जातात. धार्मिक कार्यात वापरल्या जाणाऱ्या शेण्यांना ‘शोभण्या’ म्हटले जाते. शेण्यांच्या हवनातून निर्माण झालेले तेज जडत्वदायी असते. त्यामुळे ते भूमंडलात प्रकट तेजाच्या रूपात स्थिर होते असे म्हणतात. तसेच, होमहवनातील शेण्यांच्या प्रज्वलनातून वातावरणात वायू स्वरूपात चैतन्याच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होऊन वातावरणाची शुद्धी होते असा समज आहे. होळीसारख्या सणात होळी पेटवण्यासाठी लावलेल्या झाडाच्या फांदीच्या सभोवताली शेणी रचण्याची प्रथा आहे. त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे-धार्मिक विधी, यज्ञ, पूजा या समयी गाईच्या तुपाची आहुती देऊन शेणी जाळल्या असता हवा शुद्ध होते व हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढते असे सांगितले जाते.
ई-मार्केटिंगच्या जमान्यात शेणींनी देखील ऑनलाईन विक्री उत्पादनांच्या यादीत स्थान मिळवले आहे. फ्लिपकार्ट, Amazon वर त्या ‘काऊ डंग केक’ या नावाने उपलब्ध आहेत. पारंपरिक चूल पेटवण्यापासून ते होमहवनापर्यंत आवश्यक असलेल्या शेण्या हव्या त्या आकारात व संख्येत घरपोच मिळण्याची व्यवस्था ऑनलाईन शॉपिंगच्या साईटवर करण्यात आली आहे. त्यामुळे शेण्या थापणाऱ्या हातांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
– वृंदा राकेश परब