शिक्षक विनीत पद्मावारचे आदिवासी स्वप्न (Teacher Changes Face of Adivasi Village)

0
32

 

विनीत पद्मावार गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कोयनगुडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापक आहेत. भामरागड हा आदिवासीबहुल तालुका. तेथील आदिवासीपाड्यांत माडिया ही बोलीभाषा बोलली जाते. मुलांना प्रमाणभाषा समजत नाही. त्यामुळे शिक्षणात मुख्य अडसर भाषेचा येतो. पण विनीत यांनी विविध उपक्रम व खेळ यांच्या माध्यमातून मुलांना शाळेकडे वळवले आहे. दुसऱ्या बाजूस त्यांनी स्वत: माडिया भाषा शिकून घेतली व त्यामुळे त्यांचा मुलांबरोबरचा संवाद सुकर झाला. त्यांचा जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यातही मोलाचा वाटा आहे.
          विनीत पद्मावार हे मूळचे यवतमाळ, घाटंजी येथील. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. विनीत डीएडला अकाउंट्समध्ये नव्याण्णव टक्के गुण मिळवून राज्यात पहिले आले (2002). त्यांची पहिली नोकरी भामरागड तालुक्यात बेजूर गावात (2007) झाली. भामरागड म्हणजे घनदाट जंगले व आदिवासी लोकवस्ती यांचा भाग. तेथे वर्षातील सहा महिने अर्ध्याहून अधिक गावांचा संपर्क पुराच्या पाण्यामुळे तुटतो. अशा अतिदुर्गम भागात आदिवासी मुले शाळेकडे फिरकतही नव्हती. विनीत यांनी पहिल्या दिवशी शाळा उघडली तेव्हा वर्गखोल्या अतिशय गलिच्छ होत्या. शाळा कित्येक दिवस बंदच होती. विनीत यांनी परिसर स्वच्छ केला; शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी करून घेतली, शैक्षणिक तक्ते व सुविचार शाळेच्या भिंतींवर सुवाच्य अक्षरांत रेखाटले. पण तेथील आदिवासींची बोलीभाषा माडिया ही त्यांच्या शिक्षणात मोठी अडचण होती. आदिवासी मुलांना प्रमाण भाषा समजत नाही. त्यामुळे मुले शाळेतून पळून जात.
          विनीत यांना त्या गावातील एक तरुण डीएड झाला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या तरुणाची भेट घेऊन शाळेत मराठी आणि माडिया या भाषांमध्ये भाषिक दुवा म्हणून काम करण्याची त्याला विनंती केली. त्यांनी त्या तरुणाबरोबर गावात फिरून पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देले व त्यांनी त्यांच्या मुलांना रोज शाळेत पाठवावे असे सांगितले. त्यांना पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
विनीत यांनी जंगलभर भिरभिरणारी ती आदिवासी मुले एका जागी स्थिर बसणारी नाहीत हे जाणले. त्यांनी मुलांच्या कलाने घेत खेळांच्या माध्यमातून मुलांना शाळेकडे आकर्षित केले. शिक्षक आणि शाळा यांबद्दलची मुलांच्या मनातील भीती कमी होत गेली आणि मुले शाळेत रमू लागली; रस्त्यावर बसून शिक्षकांची वाट पाहू लागली. विनीत यांनी कृतीतून मुलांना शिकवणे सुरू केले. त्यासाठी वेगवेगळी कृतिशील प्रशिक्षणे, लोकबिरादरीची प्रशिक्षणे यांचा आधार घेतला. लोकबिरादरी म्हणजे डॉ. प्रकाश आमटे यांची संस्था. ती त्याच परिसरात आहे. विनीत मुलांना मराठीचे माडिया भाषेत रूपांतर करून शिकवू लागले. त्यामुळे मुले त्यात रस घेऊ लागली.

 

          विनीत शाळेत पोचण्यासाठी भामरागड ते बेजूर असा नऊ किलोमीटर प्रवास रोज सायकलने करत. पावसाळ्यात बेजूरला पोचणे कर्मकठीण असे, कारण भामरागडजवळील पर्लकोटा नदी व बेजूरमधील छोटेमोठे नाले पावसाळ्यात दुथडी भरून वाहत. विनीत यांच्यावर एकदा सायकलसहित वाहून जाण्याचा प्रसंगही गुदरला होता, पण आदिवासी बांधवांनी त्यांना वाचवले. त्यांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बऱ्याचदा कंबरभर पाण्यातून नाले पार करून शाळा गाठली आहे.
         

विनीत यांना तशातच एक अपूर्व संधी चालून आली. लोकबिरादरी प्रकल्पात नामदेव माळी व प्रतिभा भराडे यांची रचनावादावर आधारित कार्यशाळा होती. विनीत त्या कार्यशाळेला उपस्थित राहिले. तेव्हा त्यांच्या मनात त्यांची शाळादेखील रचनावादी डिजिटल करावी असा विचार आला. डिजिटल शाळेसाठी एक लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून दहा हजार रुपये जमवले. लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांनी एकवीस हजार, माजी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी वीस हजार, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांनी पाच हजार, तर काही प्रतिष्ठित नागरिकांनी प्रत्येकी दोन हजार रुपये अशा देणग्या दिल्या. भामरागड पोलिस स्टेशनमधून पाच हजार रुपये जमा झाले. मुलांनीही सांस्कृतिक कार्यक्रमात नाश्त्याचा स्टॉल लावून डिजिटल शाळेसाठी साहाय्य केले. अशा प्रकारे, लोकसहभागातून गडचिरोली जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा बेजूरमध्ये 30 एप्रिल 2016रोजी सुरू झाली! शाळेचे उद्घाटन अनिकेत आमटे व तालुक्यातील अधिकारी यांच्या हस्ते झाले. डिजिटल शाळेमुळे ज्या मुलांना स्वत:चे नावही लिहिता येत नव्हते, ते लिहिते झाले. मुले स्वत: कविता रचू लागली.

 

          बेजूरच्या जिल्हा परिषद शाळेचा आलेख चढत असताना विनीत यांची बढतीवर बदली झाली. ते भामरागडमधील कोयनगुडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून रुजू 30 मे 2018 रोजी झाले. तेथेही शाळेची हालत बेजूरसारखीच होती. शाळेच्या इमारतीचे स्लॅब कोसळण्यास आले होते. पण विनीत यांनी गावातील लोकांना आवाहन केले. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून शाळेच्या इमारतीची डागडुजी करून दिली. विनीत यांनी शाळेसाठी आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्य निर्माण केले. काही सुशिक्षित लोकांनी शैक्षणिक साहित्य पुरवले. शाळेतील मुलांसाठी संगणकाची व्यवस्था करण्यात आली. शाळेतील आदिवासी मुले तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण घेत आहेत. मुलांचे तब्बल चौपन्नपर्यंत पाढे पाठ आहेत. मुले शाळेत टापटीप राहून नियमित येतात. सर्व विद्यार्थी एकत्र येऊन अभ्यास करतात. मुले विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवत आहेत.
          विनीत यांनी कोरोना काळात देवराई ग्राम ग्रंथालयसुरू केले आहे. त्यासाठी देवराई आर्ट व्हिलेज व जिल्हा परिषद शाळा (कोयनगुडा) यांनी साहाय्य केले आहे. ग्रंथालयात आठशे पुस्तके आहेत. वाचनालय संध्याकाळी 6 ते 8 या वेळात सुरू असते. त्याचे कामकाज गावातील शशी मडावी या सांभाळतात. गावातील नागरिकांसाठीही वाचनालय खुले आहे. जिल्हास्तरीय ग्रंथालय स्पर्धेत शाळेला पारितोषिक मिळाले आहे. जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी शाळेला बऱ्याचदा भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेतील मुलांच्या सहलीसाठी आर्थिक मदतही मिळवून दिली. त्या सहलीअंतर्गत मुलांना कलेक्टर कार्यालय, तहसील कार्यालय, त्यातील विभाग यांची माहिती करून देण्यात आली. शिवाय, नागपूर मेट्रोतून मुले व पालक यांना प्रवास घडवण्यात आला. कधीही बाहेरचे जग न अनुभवलेल्या त्या आदिवासी मुलांसाठी ती एक अविस्मरणीय आठवण असल्याचे विनीत सांगतात. शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. त्यासाठी आवश्यक तो भाजीपाला शाळेच्या परसबागेत पिकवला जातो. शाळेतएक विद्यार्थी एक झाडहा उपक्रम राबवला जातो.

 

विनीत आणि पत्नी विजया

          सध्या लॉकडाऊनच्या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून विनीत यांनी चारचार मुलांचे गट तयार केले आहेत. मुलांच्या घरी जाऊन सोशल डिस्टन्सिंग पाळत त्यांना अभ्यासक्रम शिकवण्यात येतो. त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त सामान्यज्ञानाचा उपक्रम सुरू केला आहे, जेणेकरून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयार होतील. विनीत यांनी अभ्यासगट उपक्रम सादरीकरणाच्या निमित्ताने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशीही संवाद साधला. विनीत यांना कलेक्टर व तहसीलदार कार्यालय फिरून आलेले त्यांचे विद्यार्थी भविष्यात त्या पदावर बसलेले पाहायचे आहेत.

          विनीत यांना 2018-2019 या वर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षकपुरस्कार व शिक्षण माझा वसाहा राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विनीत पद्मावार लोकबिरादरी आश्रमशाळेतील शिक्षिका विजया किरमीरवार यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.
विनीत पद्मावार 9404823390
(पुनर्लेखन वृंदा राणे-परब)– संतोष मुसळे 9763521094
santoshmusle1983@gmail.com
संतोष मधुकरराव मुसळे जालना येथे राहतात. त्यांनी एमए,बीएड पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आवलगाव (जालना) येथे तेरा वर्षे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केलेले लेखन विविध दैनिकांत आणि साप्ताहिकांत प्रसिद्ध झाले आहे. त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकहा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
————————————————————————————-———————————–
ग्रंथालयात वाचन करणारे विद्यार्थी
———————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here