शिक्षकांना आवाहन

5
32
_Shikshkanche_Vyasapith_Uddesht_1.jpg

शिक्षक मित्रांनो, हे आपले व्यासपीठ आहे आणि आपण सर्वजण मिळून याचा प्रसार जगभर करणार आहोत. कोठलीही गोष्ट एकट्याने होत नाही. अनेकांचे सहाय्य त्यात लाभते तेव्हाच ती साध्य होते.

शिक्षकांचे व्यासपीठ ही निबंधस्पर्धा नाही. लेखनस्पर्धा नाही. किंबहुना ही स्पर्धाच नाही. ही शिक्षकांची चळवळ आहे. शिक्षक एकेकटे त्यांचा आवाज त्यांच्या त्यांच्या  कार्यक्षेत्राच्या ठिकाणी उमटवत असतात. ते त्यांचे म्हणणे त्यांना जमेल तसे मांडण्याचा प्रयत्न करत असतात किंवा तशी संधी मिळाली नाही, तर ते व्यक्त न होता गुपचुप त्यांचे काम करत असतात, पण शिक्षक किंवा गुरू यांच्या गप्प बसण्यात समाजाचे फार मोठे नुकसान आहे, त्यामुळे समाज भरकटण्याचा धोका आहे, तेव्हा शिक्षक मित्रांनो, तुम्ही तुमच्या लेखण्या उचला आणि तुमची मते मांडा. उपक्रम सांगा. त्यासाठी हे व्यासपीठ आहे.

आम्ही तुम्हाला एका तरी विद्यार्थ्याबद्दलचा खरा अनुभव सांगा असे म्हणत आहोत. त्या मागचे कारण हे आहे, की एकातरी जीवनात बदल घडवून आणणे हे शंभर भाषणे देण्यापेक्षा फार मोठे काम आहे अशी आमची धारणा आहे आणि ते काम शिक्षक करू शकतो, करत असतो. लाखो रुपयांनी किंवा मोठ्या भाषणांनी जे काम होत नाही ते काम शिक्षकाचे प्रेमाचे चार शब्द करू शकतात.

लोकमान्य टिळक यांनी ज्ञानाविषयीचे विचार ‘गीतारहस्य’ या ग्रंथात मांडले आहेत. ज्ञान म्हणजे काय? फार मोठया डिग्र्या मिळवल्या, ढीगभर पुस्तके लिहिली, भाषणांना लोकांनी टाळ्या वाजवल्या – Once more  म्हटले, की तो माणूस सर्वज्ञानी झाला? छे! छे! लोकमान्य म्हणतात, ते ज्ञान नव्हे. ती केवळ तोंडपाटीलकी झाली. खरे ज्ञान म्हणजे या सर्व जगात एकच आत्मतत्त्व भरले आहे याचे आतून ज्ञान होणे! शिक्षक म्हणून एकातरी विद्यार्थ्याला तुम्ही जिव्हाळयाने शिकवले का? त्यामुळे त्याच्या आयुष्यात काही परिवर्तन झाले का? तुम्हाला तुमचे आत्मतत्त्व त्या मागे गवसले का?

शिक्षणव्यवस्था बदलत आहे. शिकण्याच्या-शिकवण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत, होणार आहेत. तर त्याप्रमाणे बदलणे आवश्यक आहे. पण हे बदल वरवरचे आहेत. शिक्षण या संकल्पनेचा पाया कधीही बदलणार नाही. वसिष्ठ ऋषींनी ज्ञानप्राप्तीचा उपदेश ‘योगवासिष्ट्य’मध्ये श्रीरामांना केला आहे. ‘राघवा, मनाचे संयमन श्वासोच्छवासावर पूर्ण लक्ष देऊन करणे व त्याद्वारे मन शांत करणे. तसे शांत मन कोठल्याही प्रसंगाने कधी विचलित होत नाही. शांत मन कोठल्याही गोष्टीचा सारासार विचार करते आणि मग त्याद्वारे मन एकाग्र होऊन कोठल्याही असाध्य गोष्टी सहज साध्य करता येतात.’ तोच उपदेश गीतेमध्ये आहे. तोच उपदेश शंकराचार्यांनी सांगितलेला आहे. तोच उपदेश बायबल आणि कुराण या ग्रंथांमध्ये देखील थोड्या फार फरकाने आहे. बुद्धांनी तोच उपदेश केला आहे. विवेकानंदांनी जगभर जी प्रवचने केली त्याचे सार त्याच उपदेशात आहे. सर्वांत महत्त्वाचे आहे ते स्वतःच्या मनावर नियंत्रण असणे. स्वतःची स्वतःला जाणीव असणे म्हणजेच स्वस्वरूपाची ओळख असणे. ते शिक्षणाचे मूळ आहे आणि आपण त्यापासून दूर पळत आहोत.

माझ्या शिक्षकमित्रांनो, माझ्या काही वर्षांत घडत गेलेल्या शिक्षणक्षेत्रातील या विचारांना कशा प्रकारे कलाटणी मिळाली ते मला तुम्हाला सांगावेसे वाटते. मी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 2007 पासून शिबिरे घेत आहे. शिबिरांमध्ये अनेक मान्यवरांनी येऊन मुलांशी संवाद साधला आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमधील मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमी राहू नये, त्यांना किमान शिक्षण चांगल्या प्रकारे मिळावे, त्यांना शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनता यावे अशा अनेक गोष्टी मनात होत्या. जेव्हा शिबिरे सुरू केली त्या दरम्यान एक गोष्ट आढळून आली, ती म्हणजे गुरू आणि शिष्य यांमधील भावनिक नात्यामध्ये दुरावा येऊ लागला आहे. त्याचा दोष मला कोणालाही द्यायचा नाही, कारण तो देणे योग्य नाही. समाज ज्या विचारधारेने चालत असतो तीच विचारधारा समाजातील प्रत्येक जण आचरणात आणत असतो. त्यात कोठल्याही एका व्यक्तीला अगर घटकाला दोष देण्याची गरज नसते. गरज असते, ती विचारधारा निर्माण का झाली हे जाणण्याची आणि ती बदलणे आवश्यक असल्यास ती कशी बदलावी या बाबतच्या कार्यक्रमाची. व्यक्ती जर त्या विचारधारेत वाहत असेल तर तिने स्वतःला आधी रोखले पाहिजे. तरच तो प्रवाह बदलण्याचा प्रयत्न करणे शक्य आहे. गेल्या काही दशकांत समाजाची मानसिकता बदलत चालली आहे. त्याला कारण इंग्रजी शिक्षण आहे, की वाढता चंगळवाद आहे; की, मीडिया आहे, की माणसांची बदलत चाललेली मनोवृत्ती आणि गरजा आहेत? ते जागतिक पातळीवर होणारे बदल आहेत. त्याचा विचार होणे आवश्यक आहे. पण एवढे मात्र खरे, की कोठल्याही गोष्टीत बदल वरवर कितीही जरी झाले तरी त्यातील मूलतत्त्व किंवा त्याचा पाया हे कधीही बदलत नाहीत. कारण पाया बदलला तर ती गोष्टच शिल्लक राहणार नाही. बदल हे वरकरणी असतात आणि जग फिरून त्याच ठिकाणी येत असते.

माझ्या शिक्षक मित्रांनो, स्वतःला घडवण्याची वेळ आली आहे. मी या शिक्षक व्यासपीठावरून तसे कळकळीचे आवाहन करत आहे. मोठया संख्येने या चळवळीत सामील व्हा. तुम्ही तुमचे विचार, तुमची मते, तुम्ही केलेले काम, तुमच्या विद्यार्थ्यांना घडवताना तुम्हाला आलेले अनुभव तुमच्या शब्दांत येथे पाठवा. शब्द कसेही असू देत, त्यातील आशयाला महत्त्व आहे. आपण मिळून हे जगाला दाखवू, की एक शिक्षक जेव्हा ठरवतो तेव्हा तो रामासारखा परमेश्वरदेखील निर्माण करू शकतो; अर्जुन-शिवाजीसारखा लढवय्या देखील निर्माण करू शकतो; पण त्यासाठी आपण वसिष्ठ, कृष्ण, रामदास स्वामी, सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले यांच्यासारखे निष्ठावान शिक्षक होण्याचा प्रयत्न करूया.
( तुम्ही तुमचे लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ला इमेलद्वारे info@thinkmaharashtra.com व पोस्टाने (22, मनुबर मेन्‍शन, पहिला मजला, 193 डॉ. आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई – 400 014) या पत्त्यांवर पाठवू शकता. तसेच 9892611767 या मोबाईल क्रमांकावर व्हॉटस् अॅपने पाठवू शकता. )

– शिल्पा खेर

About Post Author

5 COMMENTS

  1. छान उपक्रम आहे नक्की लेख…
    छान उपक्रम आहे नक्की लेख पाठवू पण कोठे पाठवावे हे समजले नाही

Comments are closed.