शास्त्री हॉल नावाचे शंभर वर्षांचे कुटुंब

2
20

शास्त्री हॉल ही दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीर्यांची जुनी वसाहत आहे. जुन्या भाषेत चाळींची वाडीवस्ती. मुंबईत ग्रँट रोडला नाना चौकापासून शंभर पावलांवर ती वस्ती आहे. त्या विशाल निवासी समूहाला शास्त्री हॉल हे नाव पडले तोही इतिहासच आहे. ती वाडी पेशवाईतील सरदार शास्त्री-पटवर्धन यांच्या वंशजांची. बडोदे संस्थानचे दिवाण असलेल्या सरदार पटवर्धन यांनी निर्जन पडिक जमीन असलेला तो भूभाग दीडशे वर्षांपूर्वी खरेदी केला. मुंबई बेट आकार घेत असताना त्या जागेवर ख्रिश्चन स्मशानभूमी होती. तेथे पोर्तुगीजकालीन बंगलाही होता. त्या बंगल्यात लाकडी तक्तपोशीचा हॉल होता. पटवर्धनांनी त्याचे नामकरण गंगाधरशास्त्री हॉल असे केले. त्यांनी त्यानंतरच्या शतकात मुंबईत येणा-या पांढरपेशा मध्यमवर्गीर्यांसाठी एकेक करत आठ चाळी उठवल्या. हॉलच्या भोवतीच्या चाळी म्हणून त्या वस्तीला शास्त्री हॉल असे नाव पडले. तो ऐतिहासिक बंगला १९६८ पर्यंत उभा होता. तो रस्ता रुंद करताना जमीनदोस्त झाला. तेथे उंच इमारत झाली. हॉल गेला पण वाडीला पडलेल्या नावाने अमर झाला.

शास्त्री हॉल म्हणजे गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळी आणि गोरेगावकरांच्या चाळी यांची सुधारून वाढवलेली आवृत्ती. ती वसाहत म्हणजे ‘ओव्हल’ आकारात उभा असणारा आठ चाळींचा समूह आहे. मधोमध पाचशे चौरस यार्डांचे मोकळे मैदान. एकेकाळी तेथे वाडीतील मुले सर्व मैदानी खेळ खेळत. आता सर्व जागा पार्किंगने व्यापून टाकली आहे. तरी गिरगावातल्यासारखे दोन इमारतींमध्ये मुळीच अंतर न ठेवता बांधकाम झालेले नाही. मैदानात व्हॉलिबॉल कोर्ट, दोन बॅडमिंटन कोर्ट व टेनिस-क्रिकेटची खेळपट्टी होती. गॅलरीत उभे राहून तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा रहिवाशांचा विरंगुळा असायचा. वाडीच्या मध्यभागी व्यायामशाळा होती. त्यातील आखाड्यातील लाल मातीत शड्डू ठोकल्याचा आवाज आणि दंडबैठका मारल्याचे हुंकार आसमंतात घुमत.

मोकळ्या-ढाकळ्या वातावरणामुळे रहिवाशांना ते गजबललेल्या दक्षिण मुंबईत राहतात, असे वाटतच नसे. गंमत अशी, की सामाजिक व सांस्कृतिक वातावरण सर्वत्र बदलले तरी तेथील चाळसंस्कृती शतकाहूनही अधिक काळ अबाधित आहे. चाळींना कॉमन व्हरांडा असल्यामुळे तेथे शेजा-यापाजा-यांच्या गप्पांच्या मैफली सदोदित रंगलेल्या दिसतात. कोणत्याही घरी शुभकार्य असले की दहा-बारा खोल्यांचा मजला त्यात  कुटुंबासारखा भाग घेतो. कोणत्याही घरात संकट उद्भवले तरी क्षणभरात तेथे सारे धाव घेतात. दंगे, राजकारण, बॉम्बस्फोट यावर हमरातुमरीच्या चर्चा रंगतात. कधी लहानसहान तंटेबखेडे उद्भवतात. पण ते विसरलेही जातात. सामुहिक समाजजीवनाचा वसा वाडीत तीन पिढ्यांनी जपला आहे.

शास्त्री हॉल वाडीत पारंपरिक सणउत्सव धुमधडाक्यात साजरे होतात. तेथील सार्वजनिक गणेशोत्सव गेली त्र्याण्णव वर्षे, लोकमान्यांच्या शिकवणीनुसार साजरा होतो. केशवजी नायकांच्या चाळीतील मुंबईतील पहिल्या गणेशोत्सवानंतर बारा वर्षांनी शास्त्री हॉलमधील गणेशोत्सव सुरू झाला.  तो मुंबईतील तिस-या क्रमांकाचा उत्सव मानला जातो. टाळमृदुंग आणि लेझीम यांच्या खणखणाटात पालखीतून निघणारी गणेशाची विसर्जन मिरवणूक, गावदेवीतून चौपाटीवर जाणा-या रस्त्यावरील कौतुकभरल्या नजरा आणि चॅनेल्सचे कॅमेरे यांच्याकडून उत्सुकतेने टिपली जाते. गोकुळअष्टमीची दहीहंडी आणि गोपाळकाल्याचा उत्सवही परंपरा जपत साजरा होतो. नवरात्रात ‘घागरी फुंकणे’ तेथेच पाहायला मिळते.

वाडीने नाट्य आणि संगीत या कलांचा वारसा वर्षांनुवर्षे जपला आहे. पंडित भास्करबुवा बखले हे जुन्या जमान्यातील तेथील रहिवासी. त्यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी होते ती शास्त्रीय संगीताच्या मैफलींनी. गणेशोत्सवात अनेक नामवंत गायकांच्या मैफली तेथे रंगत असताना पुलं, काशीनाथ घाणेकर आणि अनेक मान्यवरांनी त्यांची मजा चाखली आहे आणि त्यांच्या लेखनात मजेचा उल्लेख आवर्जून केला. संगीत रंगभूमीवरील अनेक नायिका रंगवलेल्या सुमती टिकेकर आणि त्यांची सून आरती अंकलीकर यांनी अभिजात संगीताची तर बाळासाहेब टिकेकर आणि त्यांचे चिरंजीव उदय यांनी अभिनयाची पताका फडकत ठेवली ती या भूमीतील वास्तव्यातच. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील ‘बाबाजी’ उदय टिकेकरांनी अजरामर करून टाकला आहे.

वाडीवर अनेक वर्षे सप्तसुरांची सावली होती, ती शेजारच्या बंगल्यात राहणा-या लता मंगेशकर यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वास्तव्याची. शास्त्री हॉल आहे कोठे? त्याच्या खाणाखुणा सांगताना त्याकाळी रहिवासी सांगत असत, लता मंगेशकर राहतात त्या बंगल्याशेजारी!
शास्त्री हॉलमधील अनेक ज्येष्ठ रहिवाशांनी मुंबईच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवनावर कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. स्वामी स्वरूपानंद हे पूर्वाश्रमीचे गोडबोले येथेच एका चाळीत रहिवासी होते. संस्कृतचे गाढे पंडित आणि विल्सन कॉलेजच्या संस्कृत विभागाचे प्रमुख प्राध्यापक ….. वेलणकर आणि बॅरिस्टर असून उत्तम चित्रकार म्हणून नावाजलेले, बॉम्बे आर्ट सोसायटीचे संस्थापक बॅ. ओक हे आयुष्यभर तेथेच वास्तव्याला होते. अनेक सर्जनांचे गुरू डॉ. गोपाळराव केळकर हे निष्णात शल्यविशारद हे शास्त्री हॉल वाडीच्या आरोग्याचे आधारस्तंभ होते.

नव्याने दुरुस्ती होऊन काहीसा आधुनिकतेचा साज जरी चढवला तरी शास्त्री हॉलमधील आठ चाळींनी त्यांचा मूळ चेहरा टिकवला आहे. चाळींना, मूळ मालकांच्या मुलींची दिलेली जुनी यमुना, कृष्णा, आनंदी, द्वारका, राधा, सावित्री ही नावेही अबाधित आहेत. त्यातील यमुना चाळ सर्वांत जुनी शंभर वर्षांच्या आसपासची तर सर्वात आधुनिक ‘नवी इमारत’ हीसुद्धा पंचेचाळीस वर्षांची.

शास्त्री हॉल मधील कुटुंबांचा आर्थिक स्तर खूप उंचावला आहे, तरी ती कुटुंबे पिढ्यान् पिढ्या तेथेच वास्तव्याला आहेत, ती तेथील सुरक्षित आणि समाजाभिमुख वातावरणामुळे. नाना चौक परिसर बारा टॉवर्सनी वेढला आहे. त्या रखरखाटात हा चाळसमूह ओअॅसिससारखा आहे आणि मग म्हणावेसे वाटते, ‘अजून त्या टॉवर्सच्या संगती, टिकून आहे एक वाडीवस्ती’

(‘महाराष्ट्र टाइम्स’मधील मूळ लेख सुधारून, वाढवून)

मधुसूदन फाटक

About Post Author

2 COMMENTS

  1. Iekh khoop chhan Phadke
    Iekh khoop chhan Phadke kutumb banglyat rahat hote toch Bangla Appa Phadke manager hote . Shastri hall chi mahiti vachun anand vatla.

Comments are closed.